शेणाच्या गोवऱ्यांचा उद्योग
पावसाळी दिवसांमध्ये सुके लाकूड मिळण्याचा अभाव असताना साठवण्यायोग्य जळाऊ इंधन म्हणून आणखी काहीतरी पर्याय असणे गरजेचे होते. बहुधा अशाच विचारांतून मानवाने ‘शेणाची गोवरी' तयार करण्याचा प्रयत्न केला असावा. गोवऱ्या तयार करण्याचे काम वरकरणी दिसायला सोपे आहे. पण त्यामागची मेहनत बऱ्यापैकी थकायला लावणारी असते.
मनासारखी खरेदी करण्यासाठी ‘ऑनलाईन शॉपिंग' चा पर्याय वापरणे आता सर्वसामान्य झाले आहे. यामुळे आपल्याला हव्या त्या वस्तू, हव्या त्या स्वरूपात प्राप्त करणे सहज शक्य होत आहे. अमेझॉन, पिलपकार्ट, मिशो यांसारख्या खरेदी संकेतस्थळांवर पिठापासून मिठापर्यंत सर्व काही मिळतं. या विक्रीवस्तूंच्या यादीतील एका वेगळ्या उत्पादनाबाबत आपण बोलणार आहोत. या वस्तूचे नाव पाहून मात्र आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ऑनलाईन विक्रीसाठी ठेवलेल्या या उत्पादनाच्या तपशीलात विशिष्ट व्यास, जाडी आणि वजन यांची माहिती दिलेली असते. कधीकाळी अस्वच्छ, कमीपणाचे मानले जाणारे हे उत्पादन एका आकर्षक आवरणात गुंडाळलेले दिसते. योग्य मार्केटिंगमुळे पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालेले हे उत्पादन म्हणजे ‘शेणाची गोवरी'.
‘घरोघरी मातीच्या चूली' असण्याच्या काळात इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. यासह पूरक जळाऊ इंधन म्हणून शेणाचा वापर होत असे. शेती व पशुपालन या भोवती मानवी जीवन फिरत असताना, मुबलक प्रमाणात गाई, म्हैशींचे शेण उपलब्ध होणे स्वाभाविकच होते. गावाबाहेर, रानावनांमध्ये जाऊन थेट सुकलेले शेण गोळा करणे हा एक इंधन मिळवण्याचा सोपा मार्ग. पण हा प्रकार आपल्या घरापुरताच. पावसाळी दिवसांमध्ये सुके लाकूड मिळण्याचा अभाव असताना साठवण्यायोग्य जळाऊ इंधन म्हणून आणखी काहीतरी पर्याय असणे गरजेचे होते. बहुधा अशाच विचारांतून मानवाने ‘शेणाची गोवरी' तयार करण्याचा प्रयत्न केला असावा. गोवऱ्या तयार करण्याचे काम वरकरणी दिसायला सोपे आहे. पण त्यामागची मेहनत बऱ्यापैकी थकायला लावणारी असते. जनावरांच्या गोठ्यातून शेण गोळा करून एखाद्या पाटीत भरून मोकळ्या जागेवर आणला जातो. या शेणामध्ये भाताचा तूस (फोलपटे) मिसळला जातो. पुढे या मिश्रणाचे गोळे करून त्याला थापले जाते. थापण्याच्या कृतीमुळे त्यांना ‘थापट्या' असेही एक नाव आहे.
या प्रक्रीयेतही विविधता आहे, यातून वर्तुळाकार, लंबगोलाकार यांसारख्या आकाराच्या गोवऱ्या तयार होतात. या गोवऱ्या उन्हात वाळत घातल्या जातात. शेणाच्या गोवऱ्या वाळण्यासाठी अधिक जागा लागत असल्याने घरांच्या भिंतीवर, कुंपणावर, दगडी कातळांवर गोवऱ्या चिकटवून सुकवल्या जातात. अर्थात इथपर्यंतच्या पद्धतीला आपण व्यवसाय म्हणत नाही. खरंतर व्यवसाय म्हणजे काहीतरी मोठं काम करणं असं नाही. अगदी छोट्यातील छोटी गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या आणि एकंदरीत समाजात असलेली मागणी आणि त्याची बाजारपेठ एवढ्या गोष्टी लक्षात घेऊन छोट्यात छोट्या पद्धतीने गरज लक्षात घेऊन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणं फार गरजेचं असते. शेण गोळा करण्यापासून ते गोवऱ्या थापून सुकवण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी लागणारी मेहनत, वेळ देणे सर्वांनाच शक्य होत नाही; यातूनच ‘गोवऱ्यांच्या लहानशा उद्योगाला' सुरूवात होते. लाकूडफाट्याच्या तुलनेत गोवऱ्यांची साठवणूक सहजसाध्य होत असल्याने या (अति) लघुउद्योगाला चालना मिळत गेली. खेड्यांमध्ये वस्तुविनिमय होत असताना शेणाच्या गोवऱ्या आणि इतर पदार्थ चलनाप्रमाणे काम करायचे. गोवऱ्यांचा पूरक उद्योग करणारे लोक प्रत्येक वेळी स्वतःच गोवऱ्या थापायचे असे नाहीत. तर लहान मुले, महिला यांनी थापलेल्या गोवऱ्या एखाद्या वस्तू, पदार्थाच्या बदल्यात विकत घेतल्या जायच्या. चिंचेच्या बिया भाजून ‘चिंचोके' तयार होतात. (या बिया खाल्ल्या जातात हेदेखिल सध्याच्या काळात ज्ञात नसावं!) लहान मुले या शेण उद्योजकांना गोवऱ्या विकून त्याबदल्यात चिंचोके घ्यायचे. हे उद्योजक नंतर गरजेप्रमाणे इतरांना गोवऱ्या विकून उदरनिर्वाह करायचे. या (अति) लघुउद्योगातून मिळणारी रक्कमही ‘अत्यल्पच' असणे स्वाभाविक होते.
पुढे शेती व्यवसाय, पशुपालन व्यवसाय यांना उतरती कळा लागली. गोवऱ्या जाळल्यानंतर होणारा धूरही आरोग्यास हानिकारक ठरत होता. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे शेणाच्या गोवऱ्यांचा उद्योगही मागे पडणे ठरलेलेच होते. घरोघरी मातीच्या चुली राहील्या नसल्या तरी अंत्यविधी, होम हवन, होळी याप्रसंगांमध्ये गोवऱ्यांची मागणी कायम राहीली आहे. अलिकडच्या काळात गाईपासून मिळणाऱ्या दूध, गोमूत्र, तूप या ‘पंचगव्य' उत्पादनांना महत्त्व प्राप्त झाल्याने ‘शेणाच्या गोवरी' व्यवसायाला संजिवनी मिळाली आहे. पण ही संजिवनी ‘ शेणाच्या गोवरी' ला नसून केवळ ‘गाईच्या शेणाच्या गोवरी' ला (Cow Dung Cake) मिळाली आहे. एका बातमीनुसार सोलापुरातील गोशाळेला जर्मनी आणि मलेशियातून तब्बल एक लाख गोवऱ्यांची ऑर्डर मिळाली आहे. या गोशाळांकडून आता मलेशिया आणि जर्मनीला या गोवऱ्या निर्यात करण्याचे काम सुरू आहे. निर्यात होणाऱ्या गोवऱ्या पूर्णपणे सुकवल्या जातात. त्या चांगल्या टिकतात.
काळाच्या ओघात टिकून राहणे महत्त्वाचे असते. न जाणो भविष्यात महिषीवंशातून प्राप्त उत्पादनाला एखादा मार्गदर्शक ‘गुरू' मिळाला तर या उद्योगासमोरील ‘लघु' नाव निघू शकेल. - तुषार म्हात्रे