‘न घेतलेला रस्ता' - वाचकांना समृद्ध करणारे पुस्तक
या पुस्तकात एकूण १८ दर्जेदार व कसदार लेख आहेत. सुरुवातीला काही जगप्रसिद्ध, नोबेल पुरस्काराचे मानकरी असे लेखक व त्यांच्या योगदानावर आधारित लेख आहेत. लेखकाच्या अभ्यासाचा आवाका आश्चर्यकारक आहे. तर्कशास्त्रज्ञ, मासिके, तत्त्वज्ञान चे संदर्भ व अनुभव या आधारे लेखांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध होते.
लेखक डॉक्टर अजित मगदूम हे नागाव कवठेचे सुपुत्र, विलिंग्डन महाविद्यालयाचे विद्यार्थी व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. इंग्रजी बरोबरच मराठी वाङ्मयाचाही त्यांचा व्यासंग मोठा आहे. मराठी साहित्याचे ते चोखंदळ वाचक, समीक्षक, संवेदनशील ललित लेखक, अनुवादक, ग्रंथलेखक आहेत. २२० हून अधिक पुस्तकांचे परीक्षण प्रसिद्ध केले आहे.
प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक रॉबर्ट फ्रॉस्टच्या ‘द रोड नॉट टेकन' अर्थात ‘न घेतलेला रस्ता' या आशयाचा लेख या पुस्तकात आहे. तोच शीर्षकलेख म्हणून लेखकाने निवडला आहे. या दृष्टीने हे शीर्षक समर्पक आहे. मुखपृष्ठावर त्या अर्थाने जंगलातून जाणारा "मळलेला व न मळलेला” रस्ता दाखविण्यात आला आहे. वाचकांच्या न करण्याच्या निवडीच्या स्वायत्ततेच ते एक सुंदर, प्रतिकात्मक व आव्हानात्मक रेखाचित्र आहे.
या पुस्तकात एकूण १८ दर्जेदार व कसदार लेख आहेत. सुरुवातीला काही जगप्रसिद्ध, नोबेल पुरस्काराचे मानकरी असे लेखक व त्यांच्या योगदानावर आधारित लेख आहेत. यामध्ये प्रामुख्याने नोबेल विजेता काझूओ इशीगुरो हे जपान व इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर भविष्याचा वेध घेत या दोलायमान जगास स्थैर्य देणारे लिखाण करताना दिसतात. लेखक पुढे सैलव्हिया प्लॅथ बद्दल लिहितात. वडिलांच्या दबावात वाढलेली, टेडच्या प्रेमप्रकरणात वेडी झालेली, नवनवीन प्रतीके वापरणारी, अनावर आवेगाने कविता लिहिणारी, विसाव्या शतकात अल्पायुष्यात श्रेष्ठतम स्थान निर्माण करणारी, आपले डोकं गॅस ओव्हन मध्ये घालून बटन दाबून आत्महत्या करणारी लेखिका सैलव्हिया प्लॅथची २४०० पानी पत्रे वादळ निर्माण करणारी होती, असा आशय आहे. शेक्सपियर एकमेवद्वितीय असल्याचे लिहितात. ओल्गा तोकरझुक, नोबेल विजेती लेखिका ही त्यांना सरहद्दी ओलांडणाऱ्या नव्या जीवन पद्धतीचा उत्कट अविष्कार करणारी वाटते. शासनसंस्था स्त्री-स्नेही नसल्याचे प्रतिपादन ते स्पष्टपणे करताना दिसतात. ज्यून एरिक-उदोरी ही वीस वर्षाची धीट लेखिका स्त्रीवाद सर्वसमावेशक करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा अनुवाद पुढील लेखात दिला आहे. मनाल- अल- शरीफ या सौदी अरेबियन महिलेने अल-वतन या दैनिकात स्त्रियांच्या हक्कासाठी केलेले लेखन मराठीत भाषांतरित करून लेखकाने दिले आहे.
"गांधीजी आणि अहिंसा” या लेखात लेखक गांधीवाद याबद्दल आपले गैरसमज स्पष्ट करतात. अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा मूल्यग्रहण करणारा लेख यामध्ये आहे. पिढीतले अंतर कसे वाढत जाते, आई आणि पत्नी यांच्यातील गुंतागुंती मुळे पूर्ण कुटुंबव्यवस्थेवर कसे परिणाम होतात, व्हाट्सअपच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम, दुस्तर वाद, संवाद व सुसंवाद याचे विवेचन, "नातं" या लेखात त्यांची नात इरा ने अमेरिकेत शिकवलेले "लेटे इट गो” ही बालकविता व त्याचे मराठीत अनुवादीत झालेले "फना” हे गीत मुलींचं स्वातंत्र्य गीत झाल्याचे सांगतात. मुलाकडे अमेरिकेला गेल्यानंतर सॅनफ्रान्सिस्को ला दिलेली भेट, कॅलिफोर्नियाची मिश्र संस्कृती, वुमेन्स बिल्डिंग, ब्रह्मकुमारीज मधील अनुभव याचे विवेचन केले आहे. शिफ्टिंग या शेवटच्या सदरात पुस्तके कमी करतानाचा किस्सा भावतो. लेखकाच्या पत्नी सौ. वृषाली याही लेखिका असल्याने घरभर पुस्तकांचा पसारा होतो आणि तो आवरताना त्या पुस्तकांच्या आठवणींना उजाळा मिळतो.
एकंदरीत लेखकाच्या अभ्यासाचा आवाका आश्चर्यकारक आहे. तर्कशास्त्रज्ञ, मासिके, तत्त्वज्ञान चे संदर्भ व अनुभव या आधारे लेखांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध होते. खूप अर्थांनी भारलेली, वजनदार, अवजड, नाविन्यपूर्ण शब्दांचा संग्रह लेखकाकडे आहे. सर्व लेख संक्षिप्त पण त्यांचे ठाम मतप्रदर्शन करतात. लेखकाची लेखन शैली अभ्यासपूर्ण आहे. लेखक सर्व अनुभवांकडे परीक्षकाच्या भूमिकेतूनच पाहताना दिसतात. कित्येक वाक्ये ही लिहून ठेवावी अशी, त्यांच्या विचारांची अनोखी छाप सोडणारी आहेत. चोखंदळ वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.
‘न घेतलेला रस्ता' लेखक - डॉ अजित मगदूम
प्रकाशक - ग्रंथाली पृष्ठ संख्या -१४६
मूल्य- २५०/रु.
-सौ स्वाती सनतकुमार पाटील