‘हर हर महादेव'चे सामर्थ्य !
२६ फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिनी प्रयागराज येथील महाकुंभात शेवटचे अमृत स्नान पार पडणार आहे. त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष यावर श्री महादेवाचा अंकुश आहे, असे म्हटले जाते. गतजन्मातील पापकर्मांमुळे आपणास या जन्मात प्रारब्ध म्हणून मानसिक आणि शारीरिक व्याधी भोगाव्या लागतात या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात, अशी अनेकांची धारणा आहे.
शिवाचे भारतासह जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. शिवाच्या नियमित उपासनेने भय, दुःख, रोग, दारिद्रय नाहीसे होऊन जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभते असा श्रद्धाळुंचा समज आहे. शिवाचे व्रत म्हणून अनेक जण सोळा सोमवार करतात, श्रावण महिन्यात सोमवारी निराहार राहतात. महाशिवरात्रीचे व्रत करतात. शिवाचे अघोरी उपासकही आहेत जे स्मशानात जाऊन शिवाची उपासना करतात. या सर्वांचे दर्शन आपल्याला यंदाच्या महाकुंभाच्या निमित्ताने झाले. ‘ओम नमः शिवाय' हा शिवाचा मंत्र आहे तर ‘हर हर महादेव' हा जयघोष आहे. ज्योतिर्लिंगांच्या स्थानी किंवा शिवाच्या मंदिरांत गेल्यावर ‘हर हर महादेव' चा जयघोष आपल्याला हमखास ऐकायला मिळतो. ‘हर हर महादेव' या जयघोषात प्रचंड सामर्थ्य आहे, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराजाच्या सैन्याचा म्हणजेच मावळ्यांचा जयघोष ‘हर हर महादेव'च ठेवला होता. या जयघोषाची त्यावेळेस प्रचंड दहशत होती. ‘हर हर महादेव'चा घोष कानी पडताच स्वराज्याचे शत्रू यवन थरथर कापू लागत. याच ‘हर हर महादेव' घोषाचे महत्व आता विज्ञानाच्या स्तरावही सिद्ध झाले आहे.
वाराणसीतील आयएमएस बीएचयूच्या फॅकल्टी ऑफ डेंटल सायन्सचे डॉक्टर तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर आगळ्या पद्धतीने उपचार करत आहेत. या ठिकाणी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दोन्ही हात वर करून ‘हर हर महादेव' चा जयघोष करण्यास सांगितले जाते. या अनोख्या उपचारामुळे रुग्णांना अवघ्या दोन महिन्यांत आराम मिळतो. डॉक्टरांनी तोंडावर शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या छातीचे काही स्नायू कापून त्यांचे रुग्णांच्या शस्त्रक्रिया केलेल्या भागावर रोपण केले असता रुग्णांच्या हाताची आणि खांद्यांची हालचाल पूर्णतः थांबल्याचे लक्षात आले. ही हालचाल पूर्ववत होण्यासाठी फिजिओथेरपीचे नेहमीचे उपचार करूनही विशेष फरक पडला नाही; मात्र याच रुग्णांनी ‘हर हर महादेव'चा जयघोष करत हात वर करण्याचा प्रयत्न केल्यावर हळूहळू अवयवांची हालचाल होऊ लागली आणि रुग्णांनाही आराम मिळू लागला. या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची कर्करोगाच्या ३०० हुन अधिक रुग्णांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८० टक्याहुन अधिक लोकांना विस्मयकारक आराम मिळाला, ज्या रुग्णांनी प्रतिदिन गांभीर्याने ही थेरेपी केली त्यांना दोन अडीच महिन्यांत त्यांचे हात पूर्णतः वर करता येऊ लागले. फिजिओथेरपीवर लाखो रूपये खर्च करूनही जो परिणाम मिळू शकला नाही तो केवळ ‘हर हर महादेव'च्या जयघोषाने अवघ्या दोन महिन्यांत मिळाला. येथील विद्याशाखा प्रमुख एच. सी. बरनवाल यांनी सांगितले की, वैद्यकीय शास्त्रात प्रथमच ‘हर हर महादेव' ही थेरपी म्हणून जगभरात स्वीकारली गेली आहे.
विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अखिलेश सिंह यांनी सांगितले की ‘हर हर महादेव'च्या घोषाने आध्यात्मिक शक्ती निर्माण होते जिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ, तर होतोच; शिवाय ही एक अशी फिजिओथेरपी आहे ज्यामध्ये अधिक श्रम करावे लागत नाहीत. काशीच्या लोकांना नेहमीच्या बोलण्यात ‘हर हर महादेव'चा जयघोष करण्याची सवय आहे; मात्र ही सवय म्हणजे सर्वात अधिक परिणामकारक फिजिओथरपी आहे. हे त्यांनाही माहीत नाही. छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर पाच पातशाह्यांना धूळ चारली. हजारो मुघल सैन्यावर काही शेकडा मावळे तुटून पडत आणि त्यांच्यावर विजयही मिळवत. त्यांना ही शक्ती आणि सामर्थ्य देण्याचे काम ‘हर हर महादेवचा' जयघोष करत असे हे आता लक्षात येते.
भगवंताच्या नामामध्ये किती सामर्थ्य आहे हे आता विज्ञानाच्या पातळीवरही सिद्ध होऊ लागले आहे. कलियुगामध्ये समस्त संतांनीही नामजपाचे महत्व विशद केले आहे. नियमित नामजपाने मनाची शक्ती वाढून मन एकाग्र होते, विद्यार्थ्यांना अभ्यासात मन एकाग्र करण्यासाठी नामजप एक प्रभावी उपाय आहे. व्यावहारिक जगातील स्पर्धेमुळे ताण आणि नैराश्य यांनी अनेकांना ग्रासले आहे. मनावरील ताण नाहीसा करण्यासाठीही नियमित नामजप गुणकारी आहे. जिथे जिथे देवतेचे नाम आहे तिथे त्या देवतेचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती एकवटलेली असते असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे नामजपाच्या आध्यात्मिक स्तरावर लाभ तर होतोच शिवाय मानसिक स्तरावरही होतो. ज्या नामाने दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी झाला, त्या नामापुढे आपले साधे सुधे आजार आणि रोग एव्हढे मोठे आहेत का ? -जगन घाणेकर