छावा चित्रपट आणि मी

 आज अभिमान वाटावा असं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा ”छावा” पुन्हा एकदा या हिन्दू मुलखावर प्रत्येक देशाभिमानी हृदयात विराजमान झाला. छत्रपती धर्मवीर संभाजीराजे त्यांचा परिचय, अभिमानच नव्हे, तर गर्व ही तोकडा पडावा असा पराक्रम आणि तितकीच त्यांची क्रूर हत्या आपल्याच मराठी लाचारांनी केलेली गद्दारी ही छावा चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिली.

 चित्रपट पाहताना त्याहीपेक्षा चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, चीड वेदना आणि उस्फूर्तपणे दिल्या जाणाऱ्या घोषणा हे सगळं थक्क करून सोडणारा अनुभव आहे. हे सारं अभिनंदनीय आहेच त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे छत्रपतींचे विचार त्यांचे कुटुंब आणि फक्त कडवट निष्ठा. देव देश अन धर्मापायी प्राण घेतले ठायी. हा (Box office)  पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या व्यक्तिमत्त्वांचा आहे. हा चित्रपट निर्माते दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर अभिनेते विकी कौशल अभिनेत्री रशमिका मंडना यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय्य दिला आणि स्वतःच्या आयुष्यात एक अजरामर भूमिका केल्याचे समाधान मिळाले असणारच. मित्रांनो यश कीर्ती पैसा याचं गणित जेव्हढे पाहताना डोळे दिपवून जातात तेवढेच ते सांभाळणे अवघड असते. छावा चित्रपट पाहताना अनेक गोष्टींनी माझ्या डोक्यात कहर माजवला. ते दिवस समोर आणले याच मातीतील माणसं. चारशे वर्षांपूर्वी सुध्दा रक्ताचा रंग लालच होता. देशासाठी केलेलं बलिदान त्याहीपेक्षा त्या काळी केलेली आपल्याच माणसांनी केलेली गद्दारी ही केवळ चीड आणणारी गोष्ट नाही..पण विचार करणारी गोष्ट आहे. पुनः छत्रपती शिवाजी, संभाजी, तानाजी, संताजी धनाजी आणि असंख्य मावळे सगळचं थक्क करून सोडणारं कधीच जन्म घेणार नाही. त्या औरंग्याने म्हटलेच होते या मातीत गवतालासुद्धा भाले फुटतील पण वेळप्रसंगी चारदोन दाणे फेकले तर फितूरही होणारी बेशरम अवलाद याच मातीत उगवते. खंत इतक्याच गोष्टींची आहे  पुन्हा छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज जन्माला आले नाहीत पण गद्दारीने पुन्हा पुन्हा जन्म घेतला. आपल्याच आयाबहिणींची अगदी कोवळ्या तान्ह्या बालीकांवर अत्याचार करणारी नराधमांची अवलाद जन्माला आली. तेवढी मात्र घराणेशाही टिकून राहिली आहे. ज्या ताटात जेवत होतो त्याच ताटात छेद करणारी अवलाद पाहिली की वाटते राजे पुन्हा जन्मास यावे. दुसरे महत्वाचे मराठीचा अटकेपार झेंडा रोवणारे या चित्रपटाच्या निर्मात्याला एकही स्त्री भूमिकेसाठी सोज्वळ मराठी अभिनेत्री मिळू नये. सोज्वळता की ग्लॅमरस अभिप्रेत होते? काही कळत नाही; पण एक मराठी माणूस म्हणून आम्हालाही अभिमान आहेच की,

दुसरे अतिशय महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छाव्याला कळायला, खरा इतिहास कळायला एक चित्रपटाला चारशे वर्ष जावी लागली. त्यांच्यावर झालेल्या जखमा नंतर शिरच्छेद त्याहीपेक्षा एका मराठी गद्दाराने केलेली अटकेसाठी मदत. कीती जखमा घेऊन जगायचे? तरीही आपण शहाणे होत नसू तर आपल्यासारखे करंटे आपणच. आपण इतिहासातून काय शिकणार?  चित्रपटाचे यश की इतिहासातील जखमा. आजचे राजकीय पक्षांनी केलेले मातेरे पाहिले, हजारो लाखो कोटींचे गैर व्यवहार तरीही पांढऱ्या शुभ्र कपड्यातील काळे  कर्तृत्व पाहिले की आपली आपल्यालाच लाज वाटते. एका मंत्र्याच्या टोळक्याने एका सरपंचाची केलेली हत्या प्राण सोडताना टोळक्याने सरपंचाच्या तोंडात लघवी करणे, पाणी मागण्यासाठी आलेल्या जनतेला धरणात मुतू का असे विचारणारे राजकारणी इतका नीच हलकटपणा हाच का महाराजांनी घालून दिलेला रयतेसाठी आदर्श? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच जागतिक मराठी भाषा दिवस येत आहे. छावा हा मराठी मुलखातला इतिहास आहे सादरीकरण कुणीही करावे सगळ्यांचेच अभिनंदन; पण त्याच बरोबर एकही शिवाजी, संभाजी जन्मला नाही सध्या आहेत ते फक्त दत्तकपुत्र वारसदार सरकार दरबारी मनसबदारी मिळवणारे ! आम्हाला त्याचे काही देणेघेणे नाही. स्वस्वार्थासाठी आमच्या महाराष्ट्रावर कधीही चाल करून येऊ नये. दिल्लीश्वराकडे वाका; पण झुकू नका. महाराष्ट्रातले किल्ले हे श्वास आहेत. ते मजबुतीने उभे राहू द्या. छावा चित्रपट खुप यशस्वी होवो. खुप कमाई होऊ दे त्यातील काही हिस्सा इतिहास जतन करण्यात खर्ची घालावे. आपला मुलुखाचे नेहमीच सुराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा सध्या एकही छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज नाही पण हजारो लाखो गारधी औरंगजेब जन्मास आले आहेत. काही धर्माने काही कर्माने. वेळीस समाचार घेणे. सुज्ञास सांगणे न लगे. - राजन वसंत देसाई 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शारदा पीठमचे घर...शृंगेरी मठ