श्रीमंत योगी

छत्रपती शिवाजी महाराजांइतकं भारी व्यक्तीमत्व इतिहासात दुसरं नाही, अलेक्झांडर, नेपोलियनही त्यांच्यापुढे खुजेच. महाराजांनी माझ्या लहानपणीच माझं मन काबीज केलं, आणि त्यावर आजही त्यांचच राज्य आहे. हे जसं माझ्या बाबतीत घडलं तसंच ते इथल्या, महाराष्ट्रातल्या, लाखो बालमनांच्या बाबतीतही घडलं आहे.

काल वाचता वाचता "प्रतिक्षिप्त क्रिया” असा एक भारी शब्द आडवा आला. म्हणजे नक्की काय याचा शोध घेतला तर गुगलनं तत्परतेनं माहिती पुरवली. "प्रतिक्षिप्त क्रिया” (reflex action) म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल. मग आठवू लागलो, याचा आपण कधी काही अनुभव घेतलाय काय? आणि क्षणार्धात लक्षात आलं हे जे काही "प्रतिक्षिप्त क्रिया” प्रकरण आहे त्याचा अनुभव आपणच नव्हें तर उभा महाराष्ट्र घेत आलेला आहे - "शिवाजी महाराज की ..”हे तीन शब्द कुठेही-कधीही कानावर आल्यावर. बघा हां, हे ऐकल्यावर, मेंदूकडून कुठलीही आज्ञा न घेता, आपल्या नकळत काय काय होतं ते मान झटक्यात ताठ होते, छाती फुलून येते, मूठ वळली जाते, अंगावर रोमांच उभे रहातात आणि तोंडून न कळत त्या तीन शब्दांनंतरचा चौथा शब्द खणखणीतपणे बाहेर पडतो "...जय!”
लहानपणी ब. मो. पुरंदऱ्यांचे "राजा शिवछत्रपती” जवळजवळ महिनाभर वाचत होतो. एके दिवशी आजोबा टपली मारून म्हणाले "काय रे ही तुझी वाचनाची गती” मी म्हटलं "आजोबा, तिसऱ्यांदा वाचतोय”. आजोबा हसले. "कसलं भारी पुस्तक आहे ना आजोबा” मी म्हणालो. तशी पाठीवर हात ठेवत ते म्हणाले "पुस्तकाचं काय घेऊन बसलास, आपले महाराजच भारी होते”.

अगदी खरं. इतकं भारी व्यक्तीमत्व इतिहासात दुसरं नाही, अलेक्झांडर, नेपोलियनही त्यांच्यापुढे खुजेच. महाराजांनी माझ्या लहानपणीच माझं मन काबीज केलं, आणि त्यावर आजही त्यांचच राज्य आहे. हे जसं माझ्या बाबतीत घडलं तसंच ते इथल्या, महाराष्ट्रातल्या, लाखो बालमनांच्या बाबतीतही घडलं आहे. महाराजांचं कुठलं रूप आपल्याला भावलं, आवडलं? वयाने अवघे १५-१६ वर्षांचे असताना स्वराज्याचे स्वप्न पहाणारे आणि नुसतं स्वप्नं न पहाता निष्ठावंत मावळ्यांची टीम बांधणारे, आदिलशाही, मुघलांशी मुकाबला करीत स्वतःचे स्थान निर्माण करणारे की गनिमी काव्याने सर्जिकल स्ट्राईकचा जबरदस्त झटका शाहिस्तेखानाला देणारे?

मोठी स्वप्नं पहाणारे. फक्त पहाणारेच नव्हे, तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अचूक, नेमके आणि काटेकोर नियोजन करणारे की गवताच्या काडीचाही हिशोब ठेवणारे आणि भ्रष्ट, गलथान कारभाराला काडीमात्रही स्थान न देणारे.

निधड्या छातीने अफझलखानाला भिडून त्याचे शिरकाण करणारे की त्यानंतर "मरणांती वैराणी” या उदात्त विचाराने त्याची कबर बांधू देण्यास मान्यता देण्याचा उदारपणा दाखविणारे?

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा मान राखणारे की मिर्झाराजांशी राजकारणाचे डावपेच लढवणारे? आग्य्राहून धुर्तपणे सुटका करून घेणारे की औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीला नामोहरम करणारे?

केवळ सिंहासनारूढ न होता रयतेची/सैन्याची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेणारे की "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” - ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल - हे शब्दशः खरे करणारे?
कुठलंही एक रूप नव्हे तर या साऱ्याचा समुच्चय असणारं महाराजांचं अवघं व्यक्तीमत्व कुणावरही गारुड करणारं आहे.

महाराजांचं हे अवघं व्यक्तीमत्व समर्थ रामदासस्वामींनी समर्थपणे शब्दबद्ध केलं आहे.

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

महाराजांनी आजच्या काळात मला काय दिलं असा विचार केला आणि मनात आलं की त्यांनी काय नाही दिलं? स्वधर्माचा अभिमान बाळगण्याचं बाळकडू त्यांनीच पाजलं, प्रशासक कसा असावा याचे धडे त्यांनीच घालून दिले आणि लास्ट बट नॉट द लिस्ट  अन्यायाविरुद्ध यथाशक्ती लढा द्यायला त्यांनीच शिकवलं. तीनशे वर्षांपूर्वीची एक व्यक्ती आजही हे देतेय, यातच सारं आलं.
-सामान्य मावळा, मिलिंद पाध्ये 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

छावा चित्रपट आणि मी