शेवरीची फुले
माणूस ज्या परिस्थितीत वावरतो त्यांत निसर्ग, पर्यावरण ह्यांचा विशेष सहभाग असतो. जो मानवाच्या ध्यानीं लगेच येत नसेल, पण कालांतराने निसर्गासमोर नमते घ्यावेच लागते. विनम्रता ही एक जाणीव आहे जी माणूस निसर्गाकडून आत्मसात करतो. त्याचा परिणाम कितीकाळ असतो हे ज्याचे त्याने समजावे.
शेवरीच्या झाडाला सध्या पानगळ सुरु झाली आहे. हे ऋतूचक्र आहे. त्यांस पर्याय काहीच नाही. मात्र विनम्रता त्यावर असलेल्या फुलांची दिसते. मातीतून पाण्याचा स्त्रोत वर शेंड्यापर्यँत जावे आणि पानांनी पाणी शोषुन घेतल्यास फुलांवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये व फुलांतील गंध, अर्क, मध गोळा करण्याचे काम मधमाश्यांना सहज शक्य व्हावे म्हणून निसर्गाच्या आज्ञेस मान देऊन शेवर पानगळ मान्य करते. पानन्पान गळून पडते. उरतात ती फक्त रंगीत फुले. ज्यावर विविध जातीचे पक्षी, मधमाशा, पराग सिंचनास पूरक असे भुंगे आणि रंगबिरंगी फुलपाखरे निवांत बागडू शकतील म्हणून निसर्गानेच तशी तजवीज केलेली असावी. जी शेवरीच्या झाडाने मान्य केली असावी. इतरांना सुख देण्यासाठी म्हणून केलेला हा त्याग असावा! माणूस हे समजून घेण्यासाठी वेळ लावतो. धर्म, जात, पंथ, रंग अशा विविध क्षेत्रात मग्न असलेला माणूस...आम्ही माणुसकी केंव्हा जपणार?
अलिकडे आपल्याच जन्मदात्या विषयीचे थिल्लर, अवास्तव, हीन दर्जाचे विनोद व्हायरल केले की मग काय सांगावं त्या लाखो फॉलोअर्सचे, किती-किती म्हणून कौतुक देशविदेशात होतंय त्यांचे! ख्याती मिळवतात. असा हा आजचा आमचा समाज! शिवराळपणा, उद्धटपणा, उर्मटपणा असे पणास लागलेले अहंकार कितीकाळ टिकणार? तेही ज्येष्ठ नागरिकांना संबोधून?
महिन्याभरापूर्वी माझ्या एका आत्येभावाचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. तो आजारी असतांना त्याची विचारपूस करण्यासाठी म्हणून मी सपत्नीक त्याच्या घरी गेलो. त्याने आग्रहाने जेऊ घातले. मस्त गतकाळातील गप्पा रंगल्या. नकळत त्याने ओळ्खले की ‘दादा मराठी आहे', म्हणून त्याने आपल्या अँड्रॉईड टीव्हीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचा एक एपिसोड लावला. तासभर आम्ही सर्वांनी बसून तो एपिसोड पाहिला. मस्त वाटले. एन्जॉय केला. तो ही स्वतःचे दुःख विसरुन हंशात सामील झाला. तोच म्हणाला "दादा मराठीत आजही चोख विनोद खळखळून हंसवतो. मी हा कार्यक्रम नेहमी पाहतो. ग्रेट!”
त्यानंतर काही महिन्यातच तो आम्हांस कायम सोडून गेला.
मराठी नाटक, त्यांतील प्रगल्भ विनोद आणि त्याहीपेक्षा ज्यास्त समंजस मराठी प्रेक्षक होय! आजही मराठी थिएटर सर्वत्र गाजत आहे. सोशल मीडियावर सध्या ज्याला जे वाटतेय ते लिहून किंवा रील बनवून जे अपलोड करत आहेत. त्यांमध्ये थिल्लर जोक्स तसेच बुजुर्ग आई-वडिलांची टिंगल केली जाते! वाईट वाटते आणि विशेष काय तर जगभरात त्यांचे म्हणें लाखो फॉलोअर्स आहेत! अशावेळीएक विनोदी किस्सा आठवला...एका म्हातारीला तपासून झाल्यावर डॉवटर म्हणाले..."तुमच्या या पायाचे दुखणे केवळ म्हातारपणामुळे आहे!”
यावर ती म्हणाली..."मग दुसरा पाय का दुखत नाही? तोही तर पहिल्याच वयाचा आहे?”
हा आहे प्रगल्भ विनोद. ना डॉकटरचा अवमान ना त्या वृद्ध पेशंटचा प्रश्न चुकीचा. खेळीमेळीचे वातावरण आणि स्फुरला तो हास्य विनोद!
जर निसर्गात एवढया विनम्रतेची जाणीव दडलेली असावी तर माणूस हा असा दिवसेंदिवस फाजील आणि गफलती का होऊ पाहतोय? निश्चितच यावर व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे कारणं येऊ शकतात, तरीही त्यावर अंकुश असावे, व्यक्त होण्यास हरकत नाही पण विनोद म्हणजे खि-खि करणे, कुणाची तरी खिल्ली उडवणे नव्हे! अशावेळी आमचे न्यायालय आहेच, पण खरंच अशा पोरकटपणा करिता न्यायाधीश नेमले गेले आहेत का? देशाचे नागरिक म्हणून समाजात ज्या घातक रुढी असतील त्यावर सुसभ्यपणाने व्यक्त होणे चांगले आहे. मात्र असभ्य भाष्य हे कुठेच स्वीकारले जाऊ नये. घरात किंवा समाजात. शासन, प्रशासन, न्यायालय यांना इतर बरीच कामे आहेत. जिभेला हाड नाही... तरीही अंकूश हा महत्वाचा...आज उद्या आणि नेहमीच!
शेवरीचे झाड खूप उंच असते. फक्त निसर्ग त्यांस पाणी देतो. संपूर्ण खोड-काट्यांनी भरलेले असते. पण आता फुलोरा आला अन पानांनी जमीन गाठली. फुलांना, खोडास किंवा पानांना कसलाच गर्व नाही. ताठ मानेने उभी ती शेवर पाहून मन तृप्त होते. निसर्गाने हेच मानवास शिकवले आहे. आपण ती शिकवण विसरता कामा नये.
ता.क.
मटात आलेली एक अपेक्षित अशी मुलाखत श्रेया बुगडे यांची छापून आली आहे. जबाबदारी घेऊन विनोदनिर्मिती व्हावी! अशी टिपणी त्यांनी केली आहे. दहा वर्षे एकच टीव्ही मालिकेत काम केल्याने त्यांना हा अनुभव आला असावा. "सध्या कंटेंट क्रिएटर्स आणि स्टँडअप कॉमेडी हे वादग्रस्त झालेले आहेत. घसरलेली विनोदाची पातळी, अश्लाघ्य शेरेबाजी अशा विविध विषयांवर या दिगग्ज कलाकाराने योग्य तो अनुभव कथन केला आहे. दखलपात्र होण्यासाठी जुन्या पिढीतील लोकांची खिल्ली उडवली म्हणजे झालो नामवंत." असला विचित्र प्रकार घडत आहे, त्यावर आजच्या अनुभवी कलाकारांनी पुढे येऊन मनोगत व्यक्त करणे आवश्यक आहे. - इक्बाल शर्फ मुकादम