धर्म म्हणजे काय समजून घेण्यासाठी विपश्यना साधना केली पाहिजे

 विपश्यना साधना महाकठीण काम आहे हे सर्वसामान्य माणसांच्या मनावर बिबवले गेले आहे. दहा दिवस आर्यमौन धारण करावे लागते. साधना करताना आराधना बैठक बसतांना हात हातात बंद पाहिजेत. ध्यान धारणा करतांना डोळे बंद असलेच पाहिजे. मांड्यांची शरीराची हालचाल बिलकुल झाली नाही पाहिजे. या नियमाचे कडक पालन करावे लागते. ही माहिती असल्यामुळे अनेक लोक विपश्यना साधना करण्यासाठी जाण्यास घाबरतात. मनात एक प्रकारची भीती निर्माण केली जाते. त्यामुळेच बहुसंख्य लोक विपश्यना म्हणजे काय ही विद्या शिकण्यास जात नाही.

 धर्म म्हणजे काय? धर्माची कोणती शिकवण माणसाला दुख मुक्त करू शकते. ती आजपर्यत कोणी अनुभवली? त्यांची नियमावली काय आहे? देशात जगात अनेक धर्म आहेत. प्रत्येकाची शिकवण वेगवेगळी आहे. पण मानव एकसमान आहे. त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि संस्कार एक समान असायला हवे आहेत. पण ते नाहीत तिथेच हा प्रश्न निर्माण होतो. धर्म म्हणजे काय? त्याचे कोणते नियम आहेत? आणि निसर्गाचे कोणते नियम आहेत?

    मी गेली अनेक वर्ष या विपश्यना विद्या बाबत वाचून माहिती घेत होतो. परंतु वाचून, चिंतन करून घेतलेली विद्या आणि अनुभवातून घेतलेली विद्या ही नेहमीच वेगळी असते. ज्या प्रमाणे आग म्हणजे कशी असते ती चटका लागल्यावर कळते. थंड पाणी शरीराला स्पर्श केल्या नंतर कळते. हवा कशी असते ती शरीराला स्पर्शून गेल्यावर कळते. चव कशी असते ती जीभेवर ठेवल्या शिवाय कळत नाही आणि आवाज कसा असतो तो कानांवर पडल्याशिवाय समजत नाही. डोळ्याने दिसणारी सुंदरता कल्पना करून अनुभवता येत नाही. काळी आहे की पांढरी हे फक्त डोळेच सांगू शकतात. अशा निसर्गाने मानव, प्राणी, पक्षी यांना सहा दिलेल्या समान इंद्रिय आहेत, त्याशिवाय आपण जगु शकत नाही. इथे जात, धर्म, प्रांत, भाषा, वेशभूषा कशाचाही संबंध नसतो. तो अनुभवण्यासाठी आणि धर्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी विपश्यना साधना प्रत्येकांनी केली पाहिजे. ही संधी मला राहुल पवार यांच्यामुळे मिळाली. तीन वेळा माझा अर्ज ऑनलाईन दाखल केला. धम्मगिरी इगतपुरी येथे १५ जानेवरी ते २६ जानेवारी २०२५ नंबर लागला होता. मी वेळेवर ईमेलवर उत्तर देऊ शकलो नाही. नंतर ८ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ यासाठी नंबर लागला. पण मला लवकर हवा होता म्हणून ८ फेब्रूवारी ते १९ फेब्रूवारी धम्म वाहिनी मुंबई परिसर विपश्यना सेंटर रुंदवे टिटवाला या केंद्रावर नंबर लागला आणि मी दहा दिवस विपश्यना साधना यशस्वीरित्या करून आलो. त्याचा आगळा वेगळा कधीही न अनुभवलेला अनुभव वाचकांसमोर ठेवत आहे.

      तथागत गौतम बुद्धानी वयाच्या ३५ व्या वर्षी बोधी प्राप्त केली आणि तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यन्त लोकांना धर्म म्हणजे काय हे शिकवले. निसर्गाच्या शाश्वत नियमाचे पालन कसे करावे हे शिकविले. म्हणूनच विपश्यना साधना ही बुद्धाच्या शिकवणीचा सार आहे. आचार्य श्री.सत्यनारायण गोयंका गुरुजी १९६९ भारतात आले त्यांनी ही विपश्यना सुरू केली. आज विश्वभारत त्यांची २३० ध्यान धारणा केंद्रे सुरू आहेत. बारा दिवस आचार्य श्री.सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या वाणीतून आम्हाला विपश्यना साधना शिकविण्यात आली. २०१३ ला त्यांचे निर्वाण झाले हे आम्हाला बारा दिवसात कधीच जाणवले नाही आणि आम्हाला अडीचशे वर्षापूर्वीचे तथागत गौतम बुद्ध शब्दा शब्दातून समोर मार्ग दाखवतांना दिसत होते. विपश्यना (Vipassana) ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजातीपासून हरवलेली होती, २५०० वर्षांपूर्वी गौतम बुध्दाने शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याचप्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया (साधना) आहे. कुणीही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जाती स्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि अनित्य, दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे. हा संपूर्ण मार्ग (Dhamma) म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. ह्याच कारणामुळे, कुणीही जात, धर्म, वंश, समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी, ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल. रितीरिवाज, परंपरा,  कर्मकांड याच्याशी या साधनेचा कोणताही संबंध येत नाही.

      विपश्यना काय आहे? ही दुःखमुक्तिची साधना आहे. ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतीपूर्वक तसेच संतुलित राहून करु शकतो. ही जीवन जगण्याची एक अतिशय महत्वाची कला आहे. ज्यामुळे साधक एका स्वस्थ समाजाच्या हितासाठी  देशहीतासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्यासाठी मन आणि शरीर शुद्ध असले पाहिजे. त्यात समता, स्वातंत्र्य, करुणा, बंधुभाव, निर्भयता असली पाहिजे. हे नसल्यामुळे मानव जातीचे कल्याण न होता मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक (सायकोसोमॅटिक) आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे : मोह, द्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो. विपश्यना साधना गौतम बुद्धांनी शोधून काढली असली, तरी ह्या साधनेचा अभ्यास बौद्ध समाजापुरता मय्राादित नाही. स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे लोक या विद्येपासून कोसो दूर आहेत. हे मी आज या विद्येचा अनुभव घेतल्यामुळे लिहू शकतो. जगातील कोणत्याही पार्श्वभूमीची व्यक्ती ही विद्या शिकू शकतो. आणि ह्याचा लाभ घेऊ शकतो. विपश्यना शिबीरे अशा व्यक्तिंसाठी खुली आहेत की जे प्रामाणिकपणे ही विधी शिकू इच्छितात. ह्यामध्ये जात, धर्म किंवा राज्य, राष्ट्र भाषा कधीच आड येत नाही. जगभरातील हिन्दु, मुस्लीम, शीख, बौद्ध, ईसाई, यहुदी तसेच अनेक अन्य संप्रदायातील व्यक्तींनी अत्यंत यशश्विततेने विपश्यना साधनेचे लाभ अनुभवले आहेत कारण रोग सार्वजनीक आहे. म्हणूनच इलाजदेखील सार्वजनीक व्हायला पाहिजे. कोणताही धर्म हे स्वातंत्र्य कोणालाही देत नाही. त्यांचे अलिखित नियमाचे पालन त्यांना करावे लागते. शिक्षण आणि आरोग्य हे सर्वांना समान असते. पण प्रत्यक्ष हे जीवन जगतांना अनुभव खूप वेगळे वेगळे आहेत. हे शंभर टक्के सत्य विसरता येत नाही.

    विपश्यना साधना आत्मनिरिक्षणाद्वारे आत्मशुद्धिची साधना निश्चितच सोपी नाही. साधकांना खूप कठीण परिश्रम करावे लागतात. म्हणूनच विपश्यना साधना कठीण काम आहे असा प्रचार केला जातो. स्वतःच्या प्रयत्नाने साधक स्वानुभवातून आपली प्रज्ञा जागृत करतात; दुसरी कुणी व्यक्ती त्याच्यासाठी हे काम करू शकत नाही. म्हणूनच, स्वेच्छेने गंभीरपणे आणि स्वयंशासन पाळणाऱ्या व्यक्तीना ही साधना उपयुक्त होइल, जी साधकाच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी आहे व शिबीराची अनुशासन आचार संहिता ही साधनेचेच एक प्रमुख अंग आहे. त्याचे पालन करणारे यशस्वी होऊ शकतात. जे नियमांंचे पालन करीत नाही. ते स्वतःचे नुकसान करून इतरांचेसुद्धा नुकसान करतात. त्याला विपश्यना साधनेत शीलपालन म्हणतात. ज्यांच्याकडे शिलच नाही त्यांच्याकडून शील पालनाची अपेक्षा ठेवता येत नाही. अशा साधकावर कडक नजर ठेवण्यासाठी तीक्ष्ण नजर ठेवणारे आणि सात ते दहा साधना शिबिर करून आलेले धम्म सेवक प्रत्येक ठिकाणी तैनात असतात. ते निर्भय निःपक्षपाती आपली सेवा देत असतात. शासकीय सेवा देऊन सेवानिवृत झालेले अनेक वयोवृद्ध धम्मसेवक मी या धम्मा वाहिनी पावन परिसरात सेवा देतांना पहिले आहेत. ते पाहिल्यावर आणि अनुभवल्यावर धर्म म्हणजे काय समजून घेण्यासाठी विपश्यना साधना केली पाहिजे असे वाचकांना सांगतो.

      माणसाचे मन हे खूप चंचल असते. ते एका ठिकाणी कधीच स्थिर राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांच्या मनांत अनेक विकार हे साठलेले असतात. ते कधी कुठे कसे प्रगट होती हे सांगता येत नाही. म्हणूनच माणूस मनाने शरीराने कायम दुखी असतो. दुख कसे असेल कक्ष प्रकारचे असेल हे सांगताच येत नाही. यासाठी अंतर्मनात खोलवर जाऊन तिथे साचलेल्या विकारांचे संस्कारांचे निर्मुलन करण्याची साधना शिकण्यासाठी दहा दिवसाचे विपश्यना शिबिर केलेच पाहिजे आणि एकांतामध्ये अभ्यासाची निरंतरता ठेवणे हीच ह्या साधनेतील यशाची गुरुकिल्ली आहे. हा दृष्टिकोन लक्षात ठेऊनच नियमावली आणि समय-सारिणी बनवलेली आहे. ती आचार्य अथवा व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी नाही. तसेच ते कुठल्याही परंपरेचे अंधानुकरण नाही किंवा कोणतीही अंधश्रध्दा नाही. ह्यामागे हजारो साधकांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाचा वैज्ञानिक तसेच तर्कसंगत आधार आहे. नियमांचे पालन केल्याने साधनेसाठी अनुकूल वातावरण तयार होते; नियम तोडल्याने हे वातावरण दूषित होते. नित्य अनित्य या चक्रात माणूस आपोआप फसत जातो. दुख आहे हे सत्य पण ते नष्ट करता येते हे जेव्हा माणूस विसरतो. तेव्हा एक संपले की दुसरे उभे राहते दुसरे संपले की तिसरे हे वाढत जाते. त्यालाच अनित्य म्हटले जाते. जे आहे ते नष्ट होते, दुसरे येते. ते येऊ नये यासाठी मनावर समता भावाचे नियंत्रण ठेवले की माणूस दुसऱ्या दुखाची वाट पाहुच शकत नाही. असे हे अनोखे ज्ञान या विपश्यना साधनेतून मिळते. ते कायमस्वरूपी सुखी समाधानी ठेऊ शकते. निसर्ग धर्म म्हणजे काय समजून घेण्यासाठी विपश्यना साधना केली पाहिजे. - सागर रामभाऊ तायडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नांगरतो तळहाताच्या रेषा : शेतकऱ्यांच्या वेदनेचा पाढा मांडणारा कवितासंग्रह