सातारकरची शाळा         

राम सातारकर दुपारी अकराच्या सुमारास एसटी मधून वडगावच्या स्टॉपवर उतरला, समोरास त्याला एक स्टेशनरी दुकान उघडे दिसले, त्याचेकडे जाऊन मराठी शाळेची त्याने चौकशी केली.

सातारकर - ”अहो, इथे मराठी शाळा कुठे आहे हो?”
दुकानदार - ”असं दोन मिनिटं मागं चालत जावा, तिथं आंब्याचं झाड दिसल, तिच्या समोर दिसते ती मराठी शाळा”.
सातारकर - ”बरं बरं.”
सातारकर मागं चालत गेला, दोन मिनिटं चालल्यानंतर त्याला एक आंब्याचं झाड दिसलं, पण शाळा कुठे दिसेना. तिथं एका पडक्या घरामध्ये दोन-तीन म्हशी बांधलेल्या दिसत होत्या. सातारकर म्हशींच्या दिशेने पुढे निघाला, तिथे त्याला एक बोर्ड दिसला ‘जिल्हा परिषद मराठी शाळा, गाव वडगाव'. सातारकरच्या लक्षात आले, इथे जवळपास कुठेतरी शाळा आहे. म्हशींच्या बाजूने तो पुढे गेला, तेव्हा त्याला पुढे दोन खोल्या दिसल्या, त्या दोन खोल्यात बारा तेरा मुलं बसली होती, आणि खोल्यांच्या बाहेर ३५-३६ वर्षाचा एक माणूस उभा होता. त्या माणसाला पाहता सातारकरनं ओळखलं, हेच कुरले सर असणार.
सातारकर - ”नमस्कार सर, मी सातारकर.”
कुरले - ”बरं झालं की, तुमी आलं न्हवं, तुमचीच वाट पहात व्हतो. आता शालचा चार्ज घेवा आनी मला सोडवा.”
सातारकर - ”एवढे कंटाळला की काय सर?”
कुरले - ”कंटाळलो? ह्या गावात दोन वर्ष ऱ्हाणं, म्हणजे अंदमान शिक्षच की वो ( कुरले सात मजली हसला ). आता घेवा चार्ज.”
सातारकरने शिक्षणाधिकाऱ्यांच या गावात बदली केल्याचा आदेश त्यांना दाखवला. तसं कुरलेनी रजिस्टरवर नोंद केली आणि आदेश फायलीला लावला.
कुरले - ”चला सातारकर, तुमास्नी शाळा दाखवतो.”
कुरले उभे राहिले, तसे सातारकरपण उभे राहिले, मग या खोलीतून त्या खोलीत जात, कुरले सातारकरना म्हणाले
कुरले - ”ही आता तुमची शाळा. चार वर्ग हाईत, चार वर्गात मिळून  अकरा मुलं हाईत. पाच मुलगे सहा मुली. पहिली दोन मुलं, दुसरी चार मुलं, तिसरी चार मुलं आणि चौथी दोन मुलं.”
सातारकर - ”बरं ठीक आहे, आता मला तुम्ही राहत होता ती जागा दाखवा. माझी तेथे सोय होईल का?”
कुरले - ”व्हईल की, तसा आत्माराम काका बरा हाय, तेचि घरवाली बी बरी हाये, दुपारी त्यांची ओळख करून देतो.”
सातारकर मग मुलांची चाचपणी करू लागले. पहिलीच्या मुलांना अक्षर ओळखच नव्हती. दुसरीची मुलं पण तशीच. तिसरीतील एक मुलगी मात्र स्वच्छ वाचत होती.
सातारकर - ”तुझे काय नाव गं मुली?”
मुलगी - ”यशोदा, यशोदा उमाकांत सबनीस.”
सातारकर -” तुझ्या घरी कोण कोण आहेत?”
यशोदा - ”माझे वडील नोकरी निमित्त मुंबईला असतात. इथे आजी आजोबा आणि आई. आजी आजारी असते म्हणून आई इथे राहिली आहे. माझी आई ग्रामपंचायत सदस्य आहे.”
सातारकर - ”हो का, उद्या मी तुमच्या घरी येतो, तुझ्या आजी आजोबांना आणि आईला मला भेटायचं आहे.”
यशोदा - ”या सर, मी आईला सांगते तसं.”
दुपारी कुरले सरांनी सातारकरांना खोली दाखवली. कुरले सरांनी आपल्या दोन पिशव्या उचलल्या आणि सातारकरांनी आपली एक शबनम आणि एक पिशवी तिथे ठेवली. मग दोघे आत्माराम पाटलांना भेटायला गेले.
कुरले - ”पाटील, आमी चाल्लो, माझी बदली झालीय आमच्या गावी, ह्ये नवीन शिक्षक आलेत बघा, सातारकर.”
सातारकरांनी पाटलांना नमस्कार केला, तोपर्यंत पाटलांच्या घरवालीने पाणी आणि गूळ आणून ठेवला होता.
सातारकर - ”कुरले सरांची तुम्ही जशी जेवणाची व्यवस्था केली, तशी यांची व्यवस्था होईल का तुमच्याकडे?”
पाटील - ”व्हईल की, आमी दोगंच असतो इथं, एक पोरगी लगीन करून गेली, आमच्या घासत तुमचा एक घास. काळजी करू नका.”
सातारकर - ”मला जेवण करायला येतं, पण जेवणात अडकलं की मुलांकडे व्यवस्थित पाहता येत नाही. माझं अजून लग्न झालं नाही, आणि घरून कोण माझ्याबरोबर येऊ शकत नाही.”
पाटील - ”काय बी चिंता करू नका, आमी सकाळ सायंकाळीचापण देऊ तुमाला.”
सातारकरांना खोली दाखवून आणि आत्माराम पाटलांकडे जेवणाचे फिक्स करून दुपारच्या गाडीने कुरले आपल्या गावी गेले.दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सातारकर यशोदेबरोबर तिच्या घरी गेले. यशोदेने कालच आपले सर उद्या भेटायला येणार आहेत हे सांगितल्यामुळे यशोदेची आई त्यांची वाटच पाहत होती.
यशोदेची आई - ”या सातारकर सर, कालच इकडे बदलून आलात का?”
सातारकर - ”होय मॅडम, काल आल्या आल्या मी शाळेतील मुलांची चाचपणी घेतली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, इयत्ता तिसरी मधील यशोदा हीच एक मुलगी तिसरीच्या अपेक्षेएवढा अभ्यास करते आहें, म्हणून मी यशोदेला तिच्या घरच्या माणसांबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली तिचे बाबा मुंबईत राहतात, आणि तिची आई आणि आजी आजोबा इकडे राहतात. म्हणून माझ्या लक्षात आलं, यशोदेची आई तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असणार, म्हणून मुद्दाम मी भेटायला आलो.”
यशोदेची आई - ”हो खरंय, माझं माहेर रत्नागिरीचं, घरातील सर्व सुशिक्षित, माझ्या सासूबाई गेली दोन वर्षे बिछान्यावर आहेत, त्यांची शहरात यायची इच्छा नाही, आमची मुंबईतील जागापण तेवढी मोठी नाही, त्यामुळे मी यशोदेसह इथे राहायचे ठरवले, इथल्या शाळेतील मुलांचा अभ्यास व्यवस्थित नाही, या आधीचे शिक्षकपण इंटरेस्ट घेऊन शिकवत नाहीत, त्यामुळे मीच माझ्या मुलीचा अभ्यास घ्ोते.”
सातारकर - ”वहिनी हे तुम्ही चांगलेच करता, पण शाळेतील सर्व मुलांनी चांगला अभ्यास करावा असे माझे मत आहे , मी या गावात चार ते पाच वर्ष असेन, तोपर्यंत मुलांच्या अभ्यासात चांगला बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. या गावातील जे सुशिक्षित मंडळी आहे, ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायला हवे. याकरता मला तुमचे सहकार्य लागेलच, पण अजून ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे अशी मला माणसे हवी आहेत.”
यशोदेची आई - ”सर, या गावात सौदागर नावाचे गृहस्थ आहेत, सचिवालयातून निवृत्त होऊन ते आणि त्यांची पत्नी इथे राहतात, त्यांना पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड आहे, मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी त्यांची धडपड असते, पण या आधीचे शिक्षक त्यांना सहकार्य करत नव्हते. आपण त्यांना भेटू.”
सातारकर - ”हो वाहिनी, मी उद्या सकाळी नऊ वाजता सौदागर काकांच्या घरी जातो आणि त्यांना भेटतो.”
यशोदेची आई - उद्या मीपण काकांकडे सकाळी नऊच्या दरम्यान जाणार आहे, मी त्यांच्याकडून पुस्तके वाचायला आणत असते, मी आणलेली पुस्तके वाचून झाली आहेत, ती देऊन दुसरी पुस्तके घ्यायची आहेत, तेव्हा तुम्ही उद्या नऊ वाजता येणार असाल तर मी तिथे आहे.”  सातारकर - ”हो वहिनी, फार बरे होईल, उद्या सकाळी नऊ वाजता मी तिथे येतो.”
दुसऱ्या दिवशी सातारकर सौदागर काकांच्या घरी पोहोचले, तेव्हा काका आपल्या लायब्ररीत बसले होते, काकांच्या अवतीभवती पुस्तके पुस्तके होते, ताजी वर्तमानपत्रे होती. अनेक अंक होते. यशोदेची आई तिथे उभी राहून पुस्तके चाळत होती. सातारकर तिथे जाताच, यशोदेच्या आईने त्यांची सौदागर काकांबरोबर ओळख करून दिली.
सौदागर काका - ”मला काल बातमी कळली, शाळेमध्ये कोणीतरी नवीन शिक्षक आले आहेत म्हणून. मागील शिक्षक मला कधी भेटून आल्याचे आठवत नाही. पण तुम्ही मला भेटायला आलात, खूप आनंद झाला.”
सातारकर - ”होय काका, मी पाच वर्ष तरी  या शाळेत आणि गावात असेन. मुलांच्या शिक्षणासाठी इथे काही बदल करावे लागतील. तुमची दोघांची मला मदत हवी. सबनीस वहिनी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचापण आपण उपयोग करून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे शाळेची इमारत, सध्याची मुलांची शाळा म्हशीच्या गोठ्यात आहे, आपल्याला ही जागा बदलावी लागेल, जर कुठे चार खोल्यांची पण स्वतंत्र अशी जागा देत असेल, तर शिक्षणाधिकाऱ्यांना मी सांगून ती जागा आपण भाड्याने घेऊ शकतो.”
सौदागर काका - ”अहो भाड्याने कशाला, माझीच मागच्या बाजूला एक लहान बिल्डिंग आहे, त्यात खाली दोन खोल्या आणि वर दोन खोल्या आहेत, शाळेची स्वतःची जागा होत नाही तोपर्यंत माझी ही जागा मी शाळेसाठी फुकट देतो.”
सातारकर - ”हे तर छानच झाले, मी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना कळवतो.”
सातारकरांनी शिक्षणाधिकाऱ्यांना नवीन जागेबद्दल कळवले. सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली. एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये आली.
आता रोजच सातारकर आणि सौदागर काका एकमेकांना भेटत होते, यशोदेची आईसुद्धा अधूनमधून तिथे येत होती, एक दिवस सातारकर सौदागर काकांना म्हणाले,
सातारकर - ”काका, तुमच्याकडे एवढी वर्तमानपत्र येतात पुस्तके आहेत अंक येतात, माझी अशी इच्छा आहे की दर शनिवारी मुलांनी शाळेऐवजी इथेच तुमच्या घरी जमावे. तुम्ही मुलांना पुस्तकांबद्दल वर्तमानपत्राबद्दल सांगावे. गोष्टी सांगाव्या. मध्येमध्ये मी किंवा यशोदेची आईपण त्यांना कथा गोष्टी सांगेल. अशामुळे मुलांना पुस्तकाबद्दल आणि वाचनाबद्दल आस्था निर्माण होईल.”
सौदागर काका - ”हे फारच चांगले, मलापण मुलांना कथा गोष्टी सांगायला आवडतात, आणि त्यामुळे मुले माझ्या घरी येतील.”
पुढील शनिवारपासून शाळेतील मुले आणि सातारकर सौदागर काकांच्या घरीच जमू लागले. सौदागर काकांनी मुलांना विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या. गांधीजींच्या गोष्टी सांगितल्या. सातारकर बाल शिवाजीपासून शिवाजी महाराजांच्या सर्व कथा मुलांना सांगायला लागले. यशोदेची आई रामायणाच्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगायला लागली.
मुलांना शाळेत इंटरेस्ट निर्माण झाला. पुस्तकामध्ये त्यांना आस्था वाटू लागली. मुले आता रोजची वर्तमानपत्रे वाचू लागले. लहान  लहान पुस्तके वाचू लागली.
एक दिवस सौदागर काका सातारकर आणि यशोदेची आई एकत्र असताना, सातारकर म्हणाले,
”आपल्या मुलांना सारखाच गणवेश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रीमंत गरीब असा भेद राहत नाही. सर्वांना सारखेच कपडे. या करतात जर कोणी डोनर असेल तर त्या तर तो बघून त्याचेकडून कपडे मिळवावे.”
यशोदेची आई म्हणाली, ”मी सरपंचांना शाळेच्या गणवेशाची मदत करायला सांगते, हल्ली ते माझ्याकडे शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल नेहमी चौकशी करत असतात. आपण त्यांना पण या धडपडीमध्ये एकत्र घ्यावे.”
सातारकर - ”ही चांगली कल्पना आहे, वाटल्यास मी सरपंचांना भेटतो, त्यांची मदत पुढील अनेक गोष्टीसाठी आपल्याला लागेल.”
सातारकर दुसऱ्या दिवशी सरपंचांना भेटले. शाळेची प्रगती सरपंच ऐकून होते. स्वतः शाळेतील शिक्षक त्यांना भेटायला आल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मुलांना गणवेश देण्याची तयारी दाखवली एवढेच नव्हे तर सर्व मुलांना चप्पल देण्याचीपण तयारी दाखवली.

सातारकरांनी मुलांचे कपडे गावातील शिंप्याकडूनच शोध घेतले. सरपंचांकडून त्याच्यात त्याला पैसे देऊन शहरातून कापड आणायला सांगितले, एवढे का मिळाल्याने गावचा शिंपीसुद्धा खुश झाला. आता शाळेत जाणारी सर्व मुलगी आणि मुली एका ड्रेस मध्ये दिसू लागली. गावातील पालकांच्यापण हे लक्षात आले. शाळेमध्ये चांगले बदल होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. सातारकरांनी एकदा सौदागर काकांसमोर कल्पना मांडली. सौदागर काकांनी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शाळेतील मुलांचे एक एक विषय शिकवावा. म्हणजे आपल्यावरील दबावपण  कमी होईल. सौदागर काकांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी सातारकरांना सांगितले  ”माझ्या पत्नीला गणित शिकवायला फार आवडते, तसेच मला मराठी आणि इतिहास भूगोल शिकवायला फार आवडतो, तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही मुलांना हे विषय शिकवू. सातारकर खुश झाले. सौदागर काकू तिसरी आणि चौथीचे गणित घ्यायला लागल्या. सौदागर काका मुलांचे इतिहास भूगोल आणि मराठी शिकवायला लागले. यशोदेची आई मुलांना इंग्लिश शिकवायला लागली. बाकी सर्व विषयांवर लक्ष ठेवायला सातारकर स्वतः होतेच.

शाळेचे वातावरण बदलले, मुलांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण झाला, मुलाची भाषा सुधारली, गणित जमू लागले, इंग्रजीची लिपी पाठ झाली, लिहायला यायला लागली. तिसरीच्या मुलांपासून सातारकरणी स्कॉलरशिपची तयारी करून घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी दोन मुलांना स्कॉलरशिप मिळाली, त्यापैकी एक यशोदा होती. यशोदेच्या बाबांना आजी-आजोबांना खूप आनंद झाला. छोट्या गावात राहूनसुद्धा यशोदेचा अभ्यास व्यवस्थित होत होता म्हणून ते खुश होते. सातारकरांची इच्छा होती मुलांना सायकल चालवायला शिकवावे, पुढे आयुष्यात त्यांना वाहने चालवायला यायची असतील, तर मुला मुलींना यावेळेपासून सायकल चालवता यायला पाहिजे. पुन्हा सातारकर सरपंचांना भेटले. सरपंचांनी एका निधीतून मुलांच्या दोन सायकली आणि मुलींच्या दोन सायकली भेट दिल्या. मुलं आणि मुली सायकल शिकल्या. काही मुलांनी मग सायकल घेतली आणि सायकलवरून मुलं शाळेत यायला लागली.
हें चालू असताना सातारकर वरच्या वर्गाच्या परवानगीबद्दल धडपडत होते, मुले वाढत होती, पाचवीची परवानगी मिळाली, आजूबाजूच्या गावातील मुलेपण या शाळेत यायला धडपडत होती, आता सरकारकडून यास्मिन शेख ही अजून एक शिक्षिका मिळाली, ही नवीन पिढीतील असल्याने कॉम्पुटर शिक्षण घेऊन आलेली होती, शिवाय ती चित्राकेलेच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास झालेली. सातारकर खूष झाले, शेख बाई मुलांना चित्रकला शिकवायला लागल्या, शाळेत इलिमेंटरी ड्रॉईंगची तयारी सुरु झाली. आता त्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक या शाळेला ‘सातारकरांची शाळा' म्हणु लागले, मुलाला कुठल्या शालला घातलं? म्हटलं की  ‘सातारकरच्या की, आनी दुसरीकडे कशाला जायचं' आस्सं उत्तर यायचं.

शाळेला स्वतःची जागा असावी असे सातारकरना वाटत होते. सौदागर काकांनी आपली जागा फुकट वापरायला दिली हा त्यांचा मोठेपणा. पण शाळेचे हळूहळू वर्ग वाढत जाणार, तसतसे अजून वर्ग लागतील, त्या दृष्टीने सातारकर यांचे प्रयत्न सुरू होते. गावच्या सरपंचाकडे सातारकर बोलले, हा तुमच्या गाव आहे आणि तुमची शाळा आहे. तुमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं शिक्षण हव असेल, तर चांगल्या शाळेसाठी मोठी जागा हवी आहे. त्या दृष्टीने आत्तापासून प्रयत्न करायला हवेत. सरपंचांनीपण अनेकांकडे शब्द टाकला. शेवटी आत्माराम पाटील धावून आले. त्यांनी आपली २० गुंठे जमीन शाळेकर्ता देण्याचे कबूल केले. आता जमीन तर मिळाली, बांधकाम पुढे करता येईल, असे सातारकरने मनात म्हटले.

सातारकरांना या गावात येऊन चार वर्षे पुरी झाली होती. त्यांनी बदली फक्त पाच वर्षासाठी मागितली होती. आता सातवीपर्यंत वर्ग सुरू झाले होते. साडेचारशे मुले शाळेत येत होती. सध्याच्या चार खोलीत मुले मावत नव्हती, म्हणून सौदागर काकांच्या घरीपण काही वर्ग बसत होते, शाळेला अजून दोन शिक्षक मिळाले, आता स्टाफ चार शिक्षकांचा झाला, सौदागर काकांच्या सल्ल्याने गाव मीटिंग झाली. गावातील सर्व मंडळींनी शाळेसाठी बिल्डिंग बांधावयाचे ठरले. सुरुवातीला आठ खोल्यांची बिल्डिंग असणार होती. आणखी खोल्यांसाठी नियोजन करून ठेवण्यात आले होते. पैशासाठी सरपंच आणि इतर ग्रामस्थ जिल्ह्यात फिरले, मुंबईत फिरले. मूळ या गावातील पण आता मुंबईत नगरसेवक असलेल्या एका गृहस्थाने शाळा बांधून देण्याचा शब्द दिला. एका महिन्यात भूमिपूजन झाले आणि शाळेचे बांधकाम सुरू झाले.

सातारकर कॉलेजमध्ये असताना हेमलकसाला जाऊन आले होते. आमटेंच्या त्या शाळेत आदिवासी मुले कॉम्प्युटर आणि टॅब सहजपणे हाताळत होते. सातारकरांची इच्छा होती आपल्या वरच्या वर्गातील मुलांना असे टॅब मिळावे. जेणेकरून ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील. आता शहरातील मुले मोठमोठ्या विद्यापीठांचे क्लासेस आपल्या टॅबवर घेतात आणि यशस्वी अभ्यास करतात. येणाऱ्या काळासाठी ‘ई'बुक वाचणे पण महत्वाचे होणार आहें.  असे सुमारे २५ ते ३० टॅब मिळणे आवश्यक होते. मुलांसाठी असा टॅब देणारा कोणी डोनर मिळाला तर हवा होता. त्याच दरम्यान गावात जत्रेची धामधूम सुरू होणार होती. जत्रेचे होल्डिंग्स गावात लावले गेले होते. यावर्षी गावात ‘माधवी पाटील' हिचा तमाशा आयोजित केला होता. माधवी पाटील हिच्या तमाशाचे अनेक व्हिडिओज व्हाट्‌सअप फेसबुकवर फिरत होते. या भागातीलसुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते. माधवी पाटील हिचा तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. शेवटी जत्रा जवळ आली. देऊळ माणसांनी भरले होते. लांबलांबचे नातेवाईक या गावात आले होते. छोटी छोटी अनेक दुकाने देवळाभोवती लागली होती. देवीच्या देवळात मोठी गडबड होती. देवीचे मानकरी नवीन कपडे घालून मिरवत होते. तरुण आणि वृद्ध लोक सर्वच माधवी पाटीलच्या तमाशासाठी आसुसले होते.
जत्रा सुरू झाली, देवीची पालखी घरोघरी गेली. बाया बाप्याने देवीची ओटी भरली. रात्री देवळासमोरच्या पटांगणात माधवी पाटील तमाशा सुरू झाला.

‘कोन्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डोलात,  गावकरी बेभान झाले होते, फेटे उडवीत होते. टोप्या फेकत होते. तमाशा कार्यक्रम हाउसफुल्ल होता. जत्रा संपली, तरी माधवी पाटीलच्या तमाशाची चर्चा घरोघरी सुरू होती. यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त नफा झाल्याचे बोलले जात होते. सातारकरनापण समजले, यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली, ही रक्कम आपल्या शाळेसाठी मिळाली तर, वरच्या वर्गातील मुलांच्या हातात टॅब देण्याचे आपले जे स्वप्न आहे ते पुरे होऊ शकेल.पण हे पैसे मिळवायचे कसे?

सातारकरांचे सौदागर काकांशी आणि यशोदेच्या आईशी याबाबत बोलणे झाले. सौदागर काका, जत्रा कमिटी तसे ते पैसे देणार नाही. कारण या पैशातून त्यांना अख्या गावाला मटण आणि दारूचे जेवण द्यायचे असते. शिवाय पुढच्या वर्षीच्या तमाशाची पण तजवीज करायची असते. त्यांना मुलांची एवढी काळजी कुठे?

सातारकर : ”यासाठी आपण एक वेगळी आयडिया करूया. वहिनी, तुम्ही ग्रामपंचायतीतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घ्या. गावातील सर्व महिलांना या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी बोलवा. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौदागर काकांना बोलवा. सौदागर काका आपल्या भाषणात आपल्या गावातील शाळेतील वरच्या वर्गातील मुलांसाठी कॉम्प्युटर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे पटवून सांगतील. आणि त्यासाठी यावेळेपासून मुलांना टॅब देण्याची गरज असल्याचे बायकांना पटवतील. यासाठी सुमारे चार लाख रुपयेची गरज असल्याचे सांगतील आणि महिलांना सांगतील हे चार लाख रुपये जत्रा कमिटीकडे जमा असलेल्या पैशातून जर मिळाले तर हे शक्य होईल. प्रत्येक बाईने जर आपल्या घरात आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट धरला, तर हे पैसे आपल्याला मिळू शकतात.”
सौदागर काकांना ही कल्पना आवडली. यशोदेच्या आईने ग्रामपंचायतीतर्फे हळदीकुंकू आयोजित केले. गावातील प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण दिले. गावातील सर्व स्त्रिया नटून थटून हळदीकुंकवासाठी आल्या. हळदीकुंकू दिल्यानंतर प्रमुख पाहुणे सौदागर काका बोलू लागले..”या गावातील माझ्या बहिणींनो, गेली चार-पाच वर्षे सातारकर नावाचे शिक्षक आपल्या शाळेत आल्यापासून आपल्या शाळेची प्रगती तुम्ही पाहत आहात. त्यावेळी शाळेत दहा मुले होती ती आता ६०० च्या वर मुले गेली. स्कॉलरशिप परीक्षेत आपली मुले उत्तीर्ण झाली. ड्रॉइंग परीक्षेत आपली मुले चांगले यश मिळवीत आहेत. आपल्या शाळेसाठी नवीन इमारत उभी राहत आहे. आजूबाजूच्या गावातीलसुद्धा अनेक मुले आपल्या गावातील शाळेत येत आहेत. सध्या सातवीपर्यंत वर्ग आहेत, पुढील वर्ष आठवीचा पण वर्ग सुरू होणार आहे. नवीन नवीन शिक्षक या शाळेत येणार आहेत. आता काळानुसार मुलांना कॉम्प्युटर शिक्षण आवश्यक झाले आहे. तुम्ही शहरात गेल्यावर पाहिला असाल बँकेत, पोस्टात सर्व ठिकाणी आता कॉम्प्युटरशिवाय काम होत नाही. म्हणून आपल्या मुलांनी एवढ्या पासूनच कॉम्प्युटर शिकणे आवश्यक आहे. पुढच्या काळात कॉम्प्युटरमुळेच नोकऱ्या मिळणार आहेत. आपल्या मुलांनी शहरातल्या मुलांपेक्षा मागे पडता नये असे तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या मुलांच्या हातात टॅब असणे आवश्यक आहे.”
काकांनी आपल्या घरातला टॅब हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना दाखवला. हा असा टॅब मुलांच्या हातात असला, म्हणजे मुले दिल्लीतील मुंबईतीलसुद्धा क्लास करू शकतात. या गावातून देशा-प्रदेशातील तज्ञांची बोलू शकतात. शेतीविषयीसुद्धा माहिती मिळवू शकतात. याकरता यावेळेपासून या मुलांना टॅब मिळणे आवश्यक आहे. याकरता सुमारे चार लाखाची गरज आहे. आपल्या गावातील जत्रा कमिटीला यंदाच्या तमाशातून सुमारे पाच लाख रुपये मिळाले आहेत. त्यातील जर चार लाख शाळा कमिटीला मिळाले तर मुलांसाठी टॅब घेणे सोपे जाईल. याकरता माझ्या बहिणींनो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट करायचा की जत्रेमध्ये मिळालेले पैसे शाळा समितीकडे द्या. मला खात्री आहे  तुम्ही हट्ट केला म्हणजे तुमचे नवरे तुमच्या हट्टापेक्षा लांब जाऊ शकत नाही. आणि आपले टॅब घेण्याचे काम होईल.”

सर्व बायका आपापल्या घरी गेल्या. गावातील सुनंदाताई आपल्या नवऱ्याशी वाद घालू लागल्या  ”एवढं पैसं जमा झालंया, द्या की ते पोरांसाठी, का अजून बाई नाचवायची हाय.”
सुमनताई नवऱ्यासमोर कडाडल्या ”बाईला नाचवून पैसं जमा केल्या न्हवं, न्हाई शाळंसाठी दिलं तर माझ्याशी गाठ हाय.”
यमुनाताई टोमणेच मारत होत्या ”सातारकर गुरुजी शाळंसाठी एवढं राबत्यात, त्याच हाय काय जीवाला, पैस जमीवलं ते दारू मटण खण्यासाठी, पोरांसाठी करा की खर्च.” सगळा पुरुष वर्ग वैतागला,
सर्वांच्या घरात तीच परिस्थिती, जो तो बायकोला तोंड देता देता कंटाळला. शेवटी गावातले सगळे पुरुष एकत्र आले आणि शाळा कमिटीकडे चार लाख रुपये देण्याचे ठरवले. सौदागर काकांकडे चार लाख रुपये आले. शहरातील एका कंपनीकडे पंचवीस टॅबची ऑर्डर दिली गेली, आणि मुलांच्या हातात टॅब आले. मुलांना कॉम्प्युटर शिकवायला शेख बाई होत्याच. सातारकरांच्या मनात आले, आपण या गावात आलो तेव्हा शाळेचे वर्ग म्हशीच्या गोठ्यात भरत होते. १०-११ मुले जेमतेम होती. आता शाळेसाठी स्वतंत्र बिल्डिंग तयार होते आहे. आठ वर्ग बांधून होत आहेत, गरज पडली तर अजूनही बांधण्याची तयारी आहे, आपण आलो तेव्हा एक एकच शिक्षक होतो, आता सहा शिक्षक आले आहेत, सर्व शिक्षक आपल्या हाताखाली तयार झाले आहेत. सौदागर काकांचे त्यांना मार्गदर्शन आहे. स्वतः सौदागर काका आणि काकू शाळेत काही तास घेत आहेत. मुलांची प्रगती आहे. आता या शाळेची अशीच प्रगती होत राहणार. यापुढे या शाळेतील मुले एसएससी परीक्षेत चांगले यश मिळणार. आपले आता इथले काम संपले. आपण आता दुसऱ्या गावात जावे. जिथे आपली गरज असेल तेथे जावे.
सातारकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. सातारकरांवर शिक्षणाधिकारी खुश होतेच. मुलांच्या हातात टॅब देणारी पहिली शाळा होती सातारकरांची. शिक्षणाधिकारी सातारकराना म्हणाले ”आठवीच्या मुलांच्या हातात टॅब देणारी ही पहिली सरकारी शाळा आहे, जिचा नावलौकिक देशात नव्हे परदेशातसुद्धा वाजू लागला आहे. लवकरच या शाळेला परदेशी शिक्षण तज्ञसुद्धा भेट देणार आहेत. या शाळेला परदेशातूनसुद्धा मोठ्या मोठ्या देणग्या मिळतील.”
”हो सर, मला कल्पना आहे या शाळेचे भवितव्य उज्वल आहे. पण माझी आता या शाळेला गरज नाही. जेथे माझी गरज आहे तेथे माझी बदली करावी. असे गाव शोधावे येथील मुले अजूनही शाळेत जात नाहीत, पालकांना मुलाच्या अभ्यासाबद्दल काही वाटत नाही, तेथे मला नवीन आव्हान घ्यावयास आवडेल.”
शिक्षणाधिकाऱ्यांनी सातारकरांच्या विनंतीचा मान ठेवला, ५० किलोमीटर वरील दुसऱ्या तालुक्यातील टोकाच्या गावात त्यांची बदली केली. सातारकरांची बदली झाली हे गावात कळले, गावातील पालक त्यांना विनंती करू लागले, हे गाव आणि ही शाळा सोडून जाऊ नका म्हणून. पण सातारकर ठाम राहिले, पालकांनी सौदागर काकांना त्यांची समजूत व घालायला सांगितले. पण सौदागर काका म्हणाले ”सातारकरांचे बरोबर आहे, जेथे गरज आहे तेथे त्यांना जाऊ दे, त्यांच्यासारखा शिक्षक ज्या गावात जाईल, तेथे विद्यार्थी जमतील, शाळेची आणि शिक्षणाची भरभराट होईल. आपल्या गावचे नशीब सातारकर आपल्या गावात पाच सहा वर्षे राहिले याचे.”
सर्वांचा निरोप घेऊन सातारकर निघाले, त्यांना निरोप देण्यासाठी अख्खे गाव एसटी स्टँडवर हजर होते. शाळेतील सहाशे मुले आठ शिक्षक आणि गावातील लहान-मोठे सर्वजण. बायका डोळ्याला पदर लावत होत्या, पुरुष मंडळी डोळे हळूच पुसत होते. स्वतः सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपण हजर होते.
सर्वांना एकदा नमस्कार करून आणि सौदागर काकांच्या पायांना नमस्कार करून पाच वर्षांपूर्वी आणलेल्या दोन पिशव्या घेऊन सातारकर एसटी चढले.
-प्रदीप केळूसकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुंबई स्पिरीट' म्हणजे काय रे भाऊ?