मुंबई स्पिरीट' म्हणजे काय रे भाऊ?
मुंबापुरी, मुंबई, बॅाम्बे, बम्बई ही व अशी अनेक नावे घेऊन मुंबई पुढे जात आहे. जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही शहराला इतक्या विविध नामाभिधानांनी ओळखले जाणारे अन्य कोणतेच उदाहरण नसावे. ज्यांनी मुंबईला ‘आपले' मानले त्यांच्यावर मुंबईकर हा जिवापाड प्रेम करतो. तुम्ही देशातल्या इतर कोणत्याही राज्यात जा...तिथले लोक परप्रांतीयांना चटकन स्विकारीत नाहीत. पण मुंबईत येऊन ते लोक मात्र संविधान, आविष्कार स्वातंत्र्य, रहिवासाचे स्वातंत्र्य, कुठेही जाऊन रोजगार मिळवायचे स्वातंत्र्य याच्या बाता ऐकवतील..!
आराध्य देवता ‘मुंबादेवी' हिच्या नावावरुन ज्या शहराचे नावे ‘मुंबई' असे पडले ती नेमकी मुंबई कुणाची, हा वाद कधीही संपत नाही. सात बेटांची बनून मुळ मुंबई बनली होती. आगरी, कोळी हे समाजविशेष हे मुंबईचे मुळ नागरिक, त्यांच्या नावावर येथील अनेक जमिनी होत्या, आहेतही. त्यांच्याप्रमाणेच या मुंबईत मारवाडी, पारशी, जैन, गुजराती हेही समाजविशेष वर्षानुवर्षे वास्तव्य करुन आहेत. या महानगराच्या वाटचालीत त्यांचाही वाटा मोठा आहे. त्यांनी कधीही मुंबईतील कोणत्याच वास्तूवर कोणत्याही दंग्यात दगडफेक केली नाही; आगी लावल्या नाहीत. मोर्चा काढून ‘अमर जवान स्मृती स्तंभा'वर लाथा मारणे किंवा हुतात्मा चौकातील हुतात्म्यांच्या नावाच्या पाट्या उखडून फेकणे, त्यांची नासधूस करणे, बंदोबस्तावरील पोलीसकर्मी महिलांवर हात टाकायचा प्रयत्न करणे असली कामे अस्सल मुंबईकराने कधी केली नाही, कधी करणारही नाही.
या ‘मुंबई' नावाचा प्रभाव, प्रेम, आकर्षण, लोभ, आस्था, जवळीक, आपुलकी इतकी विशेष की १९७० च्या सुमारास जेंव्हा या महानगरातील गर्दी, वाढती लोकसंख्या, वाहतुक काेंडी यावर उपाय शोधून खाडीपुलापलिकडे आणखी एक महानगर वसवायचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी त्या नव्या शहराचे नाव ‘नवी मुंबई' असेल हे निश्चित करण्यात आले. आता आमची नवी मुंबईसुध्दा सुमारे पन्नास वर्षे जुनी होऊन गेली आहे. आता तर दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, चौथी मुंबई असेही शब्दप्रयोग तुम्ही प्रसारमाध्यमांतून वाचत असाल. मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन प्रमुख जिल्ह्यांची जागा आता जवळपास संपली आहे, मग मुंबई शेजारचा ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा येथे आणखी मुंबई वसवायचे नियोजन केले जात आहे. मुंबापुरी, मुंबई, बॅाम्बे, बम्बई ही व अशी अनेक नावे घेऊन मुंबई पुढे जात आहे, मला वाटते जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही एकाच शहराला इतवया विविध नामाभिधानांनी ओळखले जाणारे अन्य कोणतेच उदाहरण नसावे. महाराष्ट्राच्या राजधानीसह मुंबई ही ‘देशाची आर्थिक राजधानी' हे बिरुदही घेऊन वावरते आहे. त्याशिवाय फिल्मनगरी, स्वप्नांचे शहर, बॉलिवूड, मोहनगरी, कुबेरनगरी वगैरे वगैरे अनेक नावे मुंबईला आहेत ते वेगळेच! आज परिस्थिती अशी आहे की या मुंबईचे मुळ नागरिक, मुळ जमिनमालक, मुळ भूमिपुत्र हे येथे अल्पसंख्य होऊन गेले आहेत व इतरेजनांची मुंबईत चलती आहे. मुळचे आग्रीपाडे, कोळीवाडे आक्रसत गेले आहेत. त्यांच्या अवतीभवती टॉवर्स, मॉल्स यांचा विळखा पडला आहे.
मागे नवी मुंबईतील एका वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी तत्कालिन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे मला यावेळी स्मरण होते. ते म्हणाले होते... ‘विविध ठिकाणी शहरे वसतात, शहरे वाढतात. त्या शहरांत लोक येतात. लॉजिंग-बोर्डींगमध्ये राहावे तसे त्या शहरात कामापुरते राहतात. पैसे कमावतात, त्यातून आपल्या मुळ गावाकडे मालमत्ता वाढवतात आणि आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा आपापल्या गावी निघून जातात. त्यांना या शहराबद्दल आस्था, आपुलकी नसते. आपण राहतो शहरावर प्रेम करणारे, त्या शहराला आपले म्हणून वागणारे लोक वाढले पाहिजेत.' आज मुंबईत मूळ भूमिपुत्र, स्थानिक आगरी-कोळी व अन्य मूलनिवासी मराठी माणूस अल्पसंख्य बनला आहे हे पचवायला कठोर असे वास्तव आहे. पण म्हणून सरसकट प्रत्येक अमराठी माणूस, प्रत्येक परप्रांतीय हा महाराष्ट्रद्रोही, मुंबईविरोधी, मराठी माणसांचा दुश्मन मानायची काहीच गरज नाही. काही मुर्ख, नतद्रष्ट, अहंकारी, बेजबाबदार परप्रांतीय, अमराठी माणसांच्या वर्तनामुळे सगळ्यांकडेच ‘त्या' नजरेने न पाहिलेले बरे! आज स्थिती अशी आहे की ‘मुंबई इंडियन्स' नावाने जो क्रिकेट संघ खेळतो त्यातील परदेशी खेळाडू सोडूनच द्या; त्यात अस्सल मुंबईकर, मराठी खेळाडू किती आहेत? बघा मी नावे सांगतो..रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, श्रीजीथ कृष्णन, एन. तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या, करण शर्मा, दिपक चहर, अश्वनी कुमार, जस्प्रीत बुमराह आणि अर्जुन तेंडुलकर. एक जमाना होता अखिल भारतीय कसोटी क्रिकेट संघात मुंबईकर अर्धा डझन असायचे. जसे की अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, रवि शास्त्री, राजू कुलकर्णी, एकनाथ सोलकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रविण आम्रे इ.इ. पण आज तशी परिस्थिती नसली तरीही ‘मुंबई स्पिरीट' ज्याला म्हणतात ते इतके पॉवरफुल आहे की मुळ मुंबईचा नसलेल्या रोहित शर्माला यदाकदाचित कुठे डावलले गेले तर मराठी-अमराठी मुंबईकर मग हार्दिक पांड्याची कशी हुर्यो करतात ते साऱ्यांनी पाहिले आहे. मुंबईकर हा चिवट आहे, संघर्षरत आहे, तो सहजासहजी कोणतीही गोष्ट सोडुन देत नाही, पटकन हार मानीत नाही. ज्यांनी मुंबईला ‘आपले' मानले त्यांच्यावर मुळ मुंबईकर हा जिवापाड प्रेम करतो. तुम्ही बिहारला जा, उत्तरप्रदेशात जा, केरळला जा, कर्नाटकात जा, जम्मूत जा अथवा काश्मिरला जा...तिथले लोक परप्रांतीयांना चटकन स्विकारीत नाहीत. (पण मुंबईत येऊन ते लोक मात्र संविधान, आविष्कार स्वातंत्र्य, रहिवासाचे स्वातंत्र्य, कुठेही जाऊन रोजगार मिळवायचे स्वातंत्र्य याच्या गप्पा मारतील!) मात्र मुंबईचा मराठी माणूस कुणाची जात, धर्म, भाषा, वर्ण यांचा विचार न करता गुणवत्तेला केंद्रीभूत मानणार, मुंबईला जो आपली मानेल त्याला जीव लावणार. शांती पटेल, जॉर्ज फर्नांडीस, मुरली देवरा, जयवंतीबेन मेहता, रतनसिंह राजदा, शरद राव या व अशा शेकडो अमराठी व्यक्तीमत्वांनी मुंबईला आपले मानले होते. मुंबईच्या मराठी माणसांनी त्यांना अलोट प्रेम दिले, अनेकांना आमदार, खासदार म्हणून मतपेटीतून बहुमतांनी निवडून दिले. असे इतर राज्यात पाहायला मिळणे कठीण. मणीपूरमधील कुकी विरुध्द मैतेयी हा जीवघेणा हिंसाचार जरा आठवून पाहा.
या मुंबईला ज्यांनी आपले मानले, कर्मभूमी मानून तिची सेवा केली त्यांच्याबद्दल मुंबई व मुंबईकर कायम कृतज्ञतेची भावना बाळगून राहिले. मुंबईत अनेक पारशी, मारवाडी, जैन लोकांनी विविध वास्तू सर्वांसाठी उभारल्या. हे समाज प्रामुख्याने शांतीप्रिय, दानशूर, समाजसेवी तसेच ‘आपण भले आपले काम भले' या मानसिकतेचे मानले जातात. मुंबईतील विविध दवाखाने, सभागृहे, विश्रांतिगृहे, वाड्या त्यांनी सर्व समाजांसाठी सेवा पुरवण्यासाठी धर्मादाय स्वरुपातही उभ्या केल्या. काळाने कुस पालटली, शिक्षणाने दृष्टी विस्तारली, विविध जातीधर्मातील भिंती गळून पडल्या तशी मुंबईने आपलीही नजर व्यापक केली. आधीपासूनच ती सर्वांना ‘आपले' मानीत होतीच. आता मराठी लोकांचे विवाह बिगरमराठी, बिगरहिंदु व्यवतींशीही व्हायला लागल्याने मुंबईने सर्वांनाच आपल्या कवेत घेतले. आशा भोसले, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, अजित आगरकर, अश्विनी भावे, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, स्वप्निल जोशी या व अशा अनेक मराठी व्यक्तीमत्वांनी अमराठी जोडीदार निवडले. तर सलीम खान, आशुतोष राणा, मुरली देवरा, किरीट सोमैया आदि अमराठी व्यक्तीमत्वांनी मराठी महिलांशी विवाह केले. त्या सर्वांना मुंबापुरीने प्रेमच दिले. पण काही फालतू लोक येथे राहुन येथे पोट भरुन इथल्यांवरच डाफरतात, हात उचलायला बघतात त्यांना मुंबई व अस्सल मुंबईकर धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर प्रकरण, स्वतःच्या घरात मासे शिजवण्यावरुन परवयांनी दादागिरी करण्याचे प्रकार, मराठी माणसाला सोसायटीमध्ये फ्लॅट, जागा-नोकऱ्या नाकारण्याचे प्रकार या विरुध्द मुंबई खवळते. मग इथला मराठी माणूस या दीडशहाण्यांना बेदम चोपतो, जाहीर माफी मागायला लावतो.
सर्व बाजूंनी विस्तार पावत चाललेल्या मुंबईच्या/मुंबईकरांच्या दृष्टीचा विस्तार केंव्हाच झाला होता..म्हणून तर ‘एमएमआरडीए अटल सेतू एल ॲण्ड टी मॅरेथॉन' या ४२ किलोमीटरच्या व मुंबईतून शिवडीपासून सुरु होत रायगड जिल्ह्यातल्या न्हावा शेवा येथपर्यंतच्या व तेथून परत अशा धावण्याच्या स्पर्धेच्या विविध टप्प्यांत पहिले येणाऱ्या निखिल सिंह, प्रथमेश पर्माकर, वरुण कुमार या अमराठी धावपटुंनाही सर्वच्या सर्व स्पर्धकांनी प्रेम दिले. याच स्पर्धेत सपना रघुवंशी, धिरज सिंह, विनिता पाल, खूशबू बाघेल, करिश्मा भाटिया विनू सिंह, हृतिक बाल्यन, वेर्सी राम असे कित्येक बिगरमुंबईकर स्पर्धक वेगवेगळ्या टप्प्यांवर विजेते ठरले, त्या सर्वांना मुंबईकरांनी शुभेच्छा दिल्या. कारण मुंबईवर जेंव्हा संकट येते तेंव्हा इथला मुंबईकर जसा मदतीला धावून जातो तसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला आलेले अनेक सज्जनही त्या संकटात पुढे उभे ठाकतात. टाटांसारखे दानी व्यवतीमत्व करोनासारख्या महामारीत करोडो रुपयांची मदत करतात. १९/११ चे पाकिस्तानी अजमल कसाबी आक्रमण मुंबईवर होते तेंव्हा दिल्लीहुन मेजर संदीप उन्नीकृष्णन व त्यांच्या सारखे उमदे एनएसजी कमांडो मुंबईकडे धावून येत पाकिस्तानी आक्रमकांच्या हल्ल्याने घेरलेल्या मुंबईकरांची सुटका करताना प्राणांची बाजी लावतात. या साऱ्यांचा मुंबईकरांना, प्रत्येक मराठी माणसाला व सच्चा भारतीयांना प्रखर अभिमान आहे. हेच ते मुंबईकरांचे वेगळेपण! मुंबई स्पिरीट, मुंबई स्पिरीट याहुन वेगळे काहीच नाही. ते देशातील इतर महानगरांतूनही पाहायला मिळावे हीच अपेक्षा!
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर