मी गजरीला शोधतोय !

आई, अण्णा व माझे तुमचे गणू मामा सोना मावशी आणि माझी बायको गजरा ही सारी मंडळी देवाघरी निघून गेल्यामुळे घर तर रिकामे झालेच; पण माझे मन कशातच लागत नाही. आधार देणारी माणसे, प्रेम देणारी माणसे या घरातून निघून गेल्यानंतर आमच्यावर प्रेम कोण करणार? घरात फक्त भिंताडावर या साऱ्या जुन्या माणसांचा फोटो आहे या फोटोतील माणूस एक एक निघून गेल्यानंतर मागे काय राहिले ? फोटोची काच व बाजूच्या चार पट्ट्या.

... स्वप्नातील गोष्टी खऱ्या असतात की नाही हे मला माहित नाही; परंतु स्वप्नात अशा काही गोष्टी पडतात त्याचा अंदाज बांधणे सर्वांनाच कठीण होऊन जाते. स्वप्नात पडलेली गोष्ट व त्या गोष्टींमध्ये तल्लीन झालेला माणूस मात्र खरा त्यामध्ये अडकून पडतो. स्वप्न कधी दिवसा पडते तर कधी रात्री पडते. तर काहीजण म्हणतात रात्री बाराच्या पुढे व पहाटे साडेचारच्या आत पडलेले स्वप्न खरे असते. तर काही वेळा काहींच्या स्वप्नामध्ये पाठीभरून पैसे दिसतात. सकाळी जाग आल्यानंतर प्रत्यक्षात पाहिलं तर बाहेर च्या प्यावा म्हटलं तर खिशात एक पैसा नसतो. मग रात्री स्वप्नात आलेले पैसे नक्की कुठे गेले हे तो माणूस आठवू लागतो. तर काही ना विचित्र असे स्वप्न पडलेले असते, त्या स्वप्नातून ती व्यक्ती जागा होते आणि रात्रीच्या वेळी ते स्वप्न आठवू लागते.

परवा परवा मला असे स्वप्न पडले होते माझ्या स्वप्नामध्ये आमच्या कराडचा मामा बबन मामा स्वप्नात आला होता. हा मामा आठ महिन्यापूर्वी हे जग सोडून गेला. तो अधूनमधून गावाकडे यायचा. अतिशय विनोदी माणूस. स्वच्छ बोलणारा मनात काहीच नाही. सारे काही मन मोकळेपणा हा मामांचा खास स्वभाव. मामाचे पुढील रेल्वेमध्ये लवार मिस्त्री म्हणून काम करत होते. त्यांना एक सख्खा भाऊ त्याचे नाव गणपतराव मामा. हे कुटुंब मामासोबत कराड रेल्वे स्टेशनला राहत होते. त्यावेळी मामांची सर्व मुले काम करत होती. संसार अगदी त्यांचा सुखाचा चालला होता. जणू कशालाच काही कमी नव्हते. घरात वनराई फुलली होती.  गणू मामाची बायको सोना मामी नावाप्रमाणे सोन्याच्या स्वभावाची होती. सोना मावशी रेणुका मातेची सेवा करीत असे. त्या देवीची स्थापना सोना मावशीने तिच्या देव्हाऱ्यावर केली होती. तिच्या पायात लक्ष्मी होती. दिसायला एकदम गोरीपान सुंदर डोळे प्रत्येकाला तोंड भरून बोलायची. . इतके ते सुखी कुटुंब होते. सारीकडून पैसा येत होता. जणू कशालाच कशालाच काही कमी नव्हते. जसे जसे वय होत गेले तसे ही ही जुनी माणसे देवाघरी निघून गेली आणि घर रिकामे झाले. मामा मामी त्यानंतर त्यांची मुले वनवासी झाली. परत त्यांच्या मुलांची लग्ने झाली आणि कुटुंब विभक्त राहू लागले. एकत्र असलेला संसार सुनाचे व सासूचे पटत नसल्यामुळे वेगवेगळ्या चुली त्यांच्या घरात निर्माण झाल्या. खरंतर मामा मामीच्या नंतर या कुटुंबांनी एकत्र राहायला हवे होते; परंतु सुना घरात आल्यामुळे त्यांच्या घराचे घरपण कमी होत होत गेले. बबन मामा व सखाराम मामा ही दोघे भाऊ भाऊ कराड रेल्वे स्टेशनला नेहमी फिरायला यायचे. या दोन मामांचे आणखी दोन भाऊ मामा मामी त्यानंतर देवाघरी गेले होते व काही दिवसापूर्वी बबन मामांची बायको गजरा मावशी हीसुद्धा देवा घरी गेली होती. त्यामुळे बबन मामासुद्धा विचाराने व मनाने हतबल झाले होते. सारे घर रिकामे झाले त्याचे दुःख त्यांना सारखे सतावत होते....।

.... मामा काही वेळा म्हणायचा..जन्मलेला माणूस या पृथ्वीवर येणार संसार करणार मुलेबाळे होणार व एक दिवशी सर्वांचा त्याग करून आलेल्या घराकडे म्हणजे स्वर्गात जाणार. हा सृष्टीचा नियम आहे. माणसाचे आयुष्य आहे तोपर्यंत त्याला या परमेश्वराने अंग झाकण्यासाठी कपडा दिला, खायला अन्न दिले, प्यायला पाणी दिले. सारी व्यवस्था मानव जन्माच्या अगोदर परमेश्वराने व्यवस्था करून ठेवली आहे. ज्या दिवशी त्याचे बोलावणी येईल तेव्हा पासून कपडा-अन्नपाणी त्याचे बंद केले जाते. मी व माझी बायको गजराबाई आम्ही दोघांनी आई अण्णा असताना अतिशय चांगला संसार उभा केला. घरात कुणाला सुद्धा दुःखी ठेवले नाही. कारण दुःख ही गोष्ट मुळातच आमच्या घरात नव्हती. जशी आई, अण्णा व माझे तुमचे गणू मामा सोना मावशी आणि माझी बायको गजरा ही सारी मंडळी देवाघरी निघून गेल्यामुळे घर तर रिकामे झालेच; पण माझे मन कशातच लागत नाही. आधार देणारी माणसे, प्रेम देणारी माणसे या घरातून निघून गेल्यानंतर आमच्यावर प्रेम कोण करणार? घरात फक्त भिंताडावर या साऱ्या जुन्या माणसांचा फोटो आहे या फोटोतील माणूस एक एक निघून गेल्यानंतर मागे काय राहिले ? फोटोची काच व बाजूच्या चार पट्ट्या. जुन्या लोकांच्या फोटोकडे पाहून उतरत्या वयात दिवस काढणे म्हणजे मुश्कील आहे. माणसाला पूर्वीची जाणती लोक एकमेकाला आधार द्यायची. आधार हा बरेच काही काम करून जातो. तू पुढे जा मी तुझ्या मागे आहे म्हणूनच संसारी माणूस पुढे जात आहे. का? तर तू पुढे जा म्हणणारा माणूस हा एक त्याचा आधार आहे. संसाराचे गाडगेसुद्धा तसेच आहे. आणि परवा असेच एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये कराडचे बबन मामा आले होते...।

... मी बबन मामाला म्हणालो..
”काय बरेच दिवस झाले दिसत नाही; आज अचानक कसे कोणत्या गावाला गेलता की काय..”
”तुला माहीत नाही मी गेली सहा महिने स्वर्गात आलो आहे..”
”आणि स्वर्गात काय करताय?” मी म्हणालो..
”संसारापेक्षा मला स्वर्ग बरा वाटतो. कारण येतो खालच्या भानगडी वर येत नाही. इतकी मोठी यंत्रणा परमेश्वराने निर्माण केली आहे. जगापेक्षा स्वर्ग फार मोठा आहे मी आजवर स्वर्ग पाहिला नाही. पण सहा महिन्यापूर्वी वरच्या देवाचे बोलावणे आले आणि मला सारे सोडून यावे लागले.” मामा म्हणाले..
”स्वर्गामध्ये काय काय पाहिले ?” मी म्हणालो.
”गेली सहा महिने मी स्वर्ग फिरत आहे. देव दिसतात; पण बोलत नाहीत आणि शिवाय इथे माझ्या कुणी ओळखीचा नाही. माझी आई, अण्णा, गणू, बापू हे सुद्धा अजून दिसले नाहीत. मी तर खऱ्या अर्थाने माझ्या बायकोला म्हणजे गजरीला शोधायला लागलोय पाहूया भेटतात का. त्यांनासुद्धा माझी काळजी आहे. आपला बबनसुद्धा वर आला आहे; परंतु स्वर्ग हा विशाल असा मोठा आहे कोण कुठे आहे हे अजून मला कळायला साधन नाही.”  मामा म्हणाले..
”मामा आमच्या घरातील कोण दिसले का? तुम्ही सहा महिन्यापूर्वी गेला तुमच्या मागे माझा थोरला भाऊ तुमच्याकडे आला आहे. तुम्ही दोघेजण आपल्या घरातील सर्व माणसे शोधून काढा आणि खाली काय चालले आहे याची कल्पना त्यांना द्या.” मी म्हणालो..
”कल्पना तरी मी देणारच आहे; पण ते सापडाय तयार नाहीत ना; ही तर मोठी खंत आहे. घरातून माणसे निघून गेल्यापासून एकटे राहायला नको वाटते म्हणून देवाने वर घेतले पण इथे तर कोण कुठे आहे सापडाय तयार नाही. गजरी मला सापडू दे; कारण की माझ्या अगोदर बरीच वर्षे स्वर्गात आली आहे. तिला जुन्या लोकांचा पत्ता नक्की माहिती असणार. गजरी एकदा मला भेटू दे. म्हणजे साऱ्या गोष्टीचा साक्षमोक्ष लावणार आहे. मी तिला सांगणार आहे आई अण्णांच्या नंतर तू मला आधार देत होतीस. तूसुद्धा मला सोडून इकडे आलीस. पण माझी खाली काय गत झाली आहे हे तुला माहित नाही. या जगात कोण कोणाचे नाही प्रेम करणारे आई-वडील संसारात साथ देणारी बायको निघून गेल्यानंतर मला कोण आधार देणार आहे? गजरी गेल्यापासून मी केव्हातरी हसतो. गजरी होती तेव्हा तिने माझ्यावर फार प्रेम केले. सोन्यासारखा संसार केला घरात सर्वांवर प्रेम केलं. पण आता मला आता मला गजरी भेटल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.” मामा म्हणाले..
”आमच्या घराची आजोबापासून माझे परवा भाऊ वारल्यापर्यंत सारी स्वर्गात आहेत. आमच्या आमच्या घरातील सर्वांना सांगा. कळत्या वयामध्ये तुम्ही निघून गेला; पण पाठीमागे सारा त्रास हा त्रास मला सहन होत नाही. आणि आमच्या घरातील लोकांना सांगा आता मी लेखक झालो आहे.” मी म्हणालो.
”हे मला माहित आहे मी अभिला निश्चित सांगेन तू पुणंदी रोडला बंगला बांधत आहेस. तुझी मुले नोकरी लागली आहेत. अभिने तुला चांगला आशीर्वाद दिला. तू तर फार मोठा माणूस झाला तुला तुझ्या आईचा म्हणजे आभिचा आशीर्वाद व सद्‌गुरु कचरनाथ स्वामी यांचा आशीर्वाद तुला लाभला आहे. तुला मरेपर्यंत काही कमी पडणार नाही कारण तुला पेन्सिल सुद्धा आहे त्यामुळे तुला घरातील लोक टाकून देणार नाही. पण मी असा मी मानवयुगात असताना फक्त कष्ट केले, मुलं मुली मोठ्या केल्या; पण गाठीला पैसा कधी बांधला नाही. त्यांच्या सुखात मी व माझी बायको रंगून गेलो. हे सारे रंगली खरे; पण माझी अर्धांगी मध्येच मला सोडून गेली, याचे दुःख माझ्या मनातून जात नव्हते. पण इथे मी राजरोसपणे फिरतो ओळखी नसू देत; आज ना उद्या ओळख होईल. निदान ओळख झालेला तरी सांगेल तुमची माणसं येथे आहेत. स्वर्गात भरपूर देव वावरतात. त्याहीपेक्षा  पऱ्यांची संख्या फार आहे. अडचण अशी झाली आहे ते त्यांच्यातल्या त्यांच्यात काय बोलतात हे मला समजत नाही. खालच्या लोकापेक्षा स्वर्गातली लोक अतिशय सुखी व समाधानी आहेत हे त्यांच्या राहण्या-वागण्यावरून मला समजते.  काही वेळा मानव युगामध्ये असताना माझ्या मनात सतत एक प्रश्न यायचा तो म्हणजे स्वर्गात गेलेला माणूस अजूनपर्यंत परत आला नाही. जर एखादा परत आलाच तर मी त्याला विचारून स्वर्ग कसा आहे; पण पण मी खाली असताना मेलेला माणूस कधीच खाली आला नाही; परंतु आज मी तुझ्यासमोर स्वर्गाचे वर्णन सांगू शकतो. तू फक्त कोणाला सांगू नको.”

बबन मामा स्वप्नात माझ्याशी बोलत होते. ते हे जग सोडून सहा महिने झाले निघून गेले आहेत मामा अतिशय सुंदर बोलत होते तोपर्यंत पहाटेची महालक्ष्मी गाडीचा आवाज व इंजिनचा आवाज माझ्या कानावर आला आणि मी जागा झालो. मी मनात म्हणालो आजचे हे कसले स्वप्न म्हणायचे? प्रत्यक्ष मामा स्वर्गातून माझ्याशी बोलत आहेत. पुन्हा मला झोप लागली नाही. सूर्य कधी उगवतोय याची मी वाट पाहत होतो आता हे खरे आहे की खोटे आहे याचा विचार मला माझ्या मनाला होता.
-दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जे अमेरिकेला जमते ते भारताला का जमत नाही ?