जे अमेरिकेला जमते ते भारताला का जमत नाही ?

भारतात मशिदी आणि दर्गे यांच्या उत्सवांच्या निमित्ताने येणाऱ्या बांगलादेशींपैकी अनेकजण पुन्हा त्यांच्या देशात जातच नाहीत असे आता उजेडात आले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकून जगात पहिला क्रमांक पटकावला त्यात बांगलादेशी घुसखोरांचाही महत्वाचा वाटा आहे. दंगली घडवणे, लूटमार करणे, भूखंड बळकावणे, अनैतिक व्यवसाय अशा गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या हाती सापडत आहेत. घुसखोरांच्या विरोधात पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या नरमाईच्या धोरणावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत.

अमेरिकेत पुन्हा एकदा निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच निर्णयांचा धडाका लावला.  पहिल्याच दिवशी त्यांनी ४२ महत्वाचे निर्णय घेतले. अमेरिकेत अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय हासुद्धा त्यापैकीच एक. त्यातील तुकड्या भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेत जवळपास २० हजार भारतीय अपुऱ्या कागदपत्रांविना राहात आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयाने हे सर्वच जण हवालदिल झाले आहेत. युएस इमिग्रेशन अँड कस्टमच्या इन्फोर्समेंटच्या आकडेवारीनुसार २०२४ च्या नोव्हेंबर मासापर्यंत देशात राहणाऱ्या २० हजार ४०७ भारतीयांना अमेरिकेने अवैध घोषित केले आहे. यांपैकी २४६७ भारतीय नागरिक इमिग्रेशन डिटेन्शन कॅम्पमध्ये बंद करण्यात आलेले आहेत. मेक्सिको आणि सल्वाडोर नंतर अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक आहे. अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांच्या रोजगारावर आणि एकूणच अस्तित्वावर संकट कोसळल्याने भारतातील नागरिकांना त्यांच्याविषयी सहानुभूती असली तरी त्यांनी तेथील कायदा मोडला आहे ही बाबसुद्धा दुर्लक्षून चालणार नाही.  देशात अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या विरोधात ट्रम्प यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे भारतीयांची मने दुखावली असली तरी अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. फ्रांस आणि इंग्लड या दोन्ही बलाढ्य देशांनी अन्य देशातील नागरिकांना देशात अवैधपणे वास्तव्य दिल्यामुळे त्याची विषारी फळे चाखली आहेत, त्या धर्तीवर ट्रम्प यांनी देशहितासाठीच हा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. याउलट स्थिती आज भारतात दिसत आहे. भारतात CAA आन NRC कायदा लागू करण्यात येणार असल्याची घोषणा होताच देशातील एका समाजाने देशभर निदर्शने आणि आंदोलने सुरु केली. या समाजाच्या म्होरक्यांनी कायद्यांविषयी नीट जाणून न घेता लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून लोकांची माथी भडकवण्याचे काम केले. ‘आम्ही आमच्या नागरिकत्वाची कागदपत्रे दाखवणार नाही' असा एक सूर या समाजाकडून दिला गेला. विरोधी पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आगीत तेल ओतण्याचे काम केल्याने या कायद्याद्वारे घुसखोरांवर कारवाई करणे सरकारलाही शक्य झाले नाही. असे असले तरी देशातील अवैध घुसखोरीविरोधात असलेल्या कायद्याचा वापर राज्यांतर्गत सुरक्षा विभागाकडून किती प्रमाणात केला जातो हे पाहणेही गरजेचे आहे.

भारत आणि बांगलादेश यामधील सुमारे २८०० किलोमीटर सीमेवर भारताने काटेरी तारांचे कुंपण बसवले आहे तरीही आजतागायत १० कोटीहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केल्याचा अंदाज जाणकार वर्तवतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असताना सीमा सुरक्षा दलातील अधिकारी काय करत आहेत ? याचीही चौकशी होणे आज गरजेचे आहे. भारतातील मुस्लिमांची श्रद्धास्थाने असलेल्या मशिदी आणि दर्गे यांच्या उत्सवांच्या निमित्ताने भारतात येणाऱ्या बांगलादेशींपैकी अनेक जण पुन्हा त्यांच्या देशात जातच नाहीत असेही आता उजेडात आले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकून जगात पहिला क्रमांक पटकावला ज्यामध्ये दुर्दैवाने बांगलादेशी घुसखोरांचाही महत्वाचा वाटा आहे. भारतातील गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. भारतात राहून देशविरोधी कारवाया, अंमली पदार्थांची तस्करी, दंगली घडवणे, लूटमार करणे, भूखंड बळकावणे, अनैतिक व्यवसाय यांसारख्या गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या हाती सापडत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाराही बांगलादेशी गुंडच होता. झोपडपट्टी दादा, लोकप्रतिनिधी आणि दलाल यांच्या मदतीने या घुसखोरांच्या निवाऱ्याची आणि रोजगाराची सोय होते. काही दिवसांतच त्यांना बनावट मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड बनवून मिळते त्यामुळे बांगलादेशी असल्याचा संशय असूनही  त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना अवघड जाते. खरेतर बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखावी यासाठी विशेष शोधमोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात यावी, असे पोलिसांना आदेश आहेत. यामध्ये बांगलादेशी व्यक्ती शोधणे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शोधणे, तसेच त्या सर्वांना परत पाठवणे आदी कामे येतात; मात्र या सर्वांत अधिक वेळ जात असल्याने या आदेशाला पोलिसांकडूनच केराची टोपली दाखवली जात आहे. बांगलादेशात हिंदूंना वेचून त्यांचा छळ केला जात आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदूंची मंदिरे फोडली जात आहेत आणि आपण मात्र देशाला पोखरणाऱ्या या बांगलादेशी घुसखोरांबाबत कोणतीही विशेष राबवत नाही. आतातर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील घुसखोरांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. घुसखोरांच्या विरोधात पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या नरमाईच्या धोरणावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. या सर्वांचा विचार करता आज जे अमेरिकेला जमते ते भारताला का जमू शकत नाही असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून विचारला जात आहे.
-जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कालव्यांचे दगड