सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज : जीवन, कार्य आणि विचार
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एक उत्कृष्ट ”इंजिनियर” होते. त्यांनी फक्त किल्ले बांधले नाहीत, तर वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतः ‘राजगड' किल्ल्याचे आरेखनसुद्धा केले होते. आपल्या हयातीत १११ नवीन किल्ले बांधले. ते दरवर्षी तीन नवीन किल्ले बांधत. त्यांनी केलेले ‘सोशल इंजीनियरिंग अंधश्रद्धा, जाचक रुढी, खुळचट परंपरा यांना मोडीत काढून सामान्यांना प्रगतीकडे नेणारा दृष्टिकोन देणाऱ्या परंपरा सुरू केल्या. सामाजिक विकासाच्या आड येणाऱ्या चौकटी मोडत व्यक्ती आणि समाजाला समान संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि तळागाळातील, गावकुसाबाहेरील उपेक्षित, शोषित समाजाला प्रवाहात आणण्यासाठी ”सोशल इंजिनिअरिंग”चा उपयोग केला.
देव, देश आणि धर्मासाठी अहोरात्र लढणाऱ्या, झिजणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जाणले होते की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ”मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा” या व्यतिरिक्त कोणताच उपाय नाही आणि म्हणूनच त्यांनी लहानपणापासूनच मा. जिजाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राज्य निर्माण करण्याचे काम हाती घेऊन स्वराज्याची स्थापना केली.
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १९५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांना लहानपणापासूनच जिजाऊंनी उत्तम संस्कार दिले होते. सायंकाळी तिन्हीसांजी त्या शिवबाला जवळ घेत मायेने कुरवाळत कृष्णाच्या, रामाच्या, भिमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. लहान असताना शिवरायांना शूरवीर पुरुषांच्या गोष्टी आवडत. आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रमी व्हावे असे त्यांना वाटे. जिजाबाईंकडून तथा दादोजी कोंडदेव यांच्याकडून तलवारबाजी, दांडपट्टा व विविध मैदानी खेळ लहानपणापासूनच महाराजांनी शिकले होते. साधुसंतांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या प्रती आदरयुक्त भावना महाराजांच्या मनात निर्माण झाली होती. पुण्यामध्ये १६४५ साली ‘रायरेश्वरा'च्या मंदिरात शिवराय व आजूबाजूच्या परिसरामधील काही तरुण खलबतं करत होते. शत्रूच्या ताब्यातून रयतेला कसे मुक्त करावे, रयतेचे राज्य कसे आणावे, लोकांना न्याय कसा द्यावा. याबाबतीत ही खलबत्त चालू होती. गर्द जंगलात असलेल्या त्या शिवालयामध्ये महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची ”प्रतिज्ञा” घेतली, त्यावेळेस तेथे सोनपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ सबनीस, माणकोजी दहातोंडे सरनोबत, हनुमंत मुजुमदार हे मावळे उपस्थित होते.
महाराजांनी अठरापगड जातीधर्माचे लोक एकत्र केले, मावळ्यांची जमवाजमव केली. त्यांना घेऊन ते घोडदौड, तलवारबाजी करू लागले. खिंडी, डोंगरातील आडमार्ग शोधणे, घाट, चोरवाटा निरखून पाहणे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. शिवबाच्या हालचालींना आता वेग आला होता. त्यांनी पुण्याभोवतीच्या सर्व गडकोट किल्ले आपल्या सहकाऱ्यांसह तीक्ष्ण नजरेने न्याहाळले. शत्रूच्या फौजांची ठाणी, हत्यारे, दारुगोळा, तळघरे, भुयारे आणि चोरवाटायांची सर्व माहिती त्यांनी मिळवली. मावळ प्रांतातील बाजी पासलकर, विठोजी शितोळे, झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमळकर, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी स्वराज्य स्थापनेच्या कामात सामील झाली. जंजिऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा मुघल बादशहा या चार सत्तांनी त्यावेळी महाराष्ट्रात हाहाकार माजवला होता. महाराजांचा निश्चय अढळ होता. त्यावेळेस त्या परिसरातील गडकिल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. जर किल्ले आपल्या ताब्यात नसतील तर कसले आले ‘स्वराज्य'? तेव्हा एखादा भक्कम किल्ला आपल्याकडे असावा असे महाराजांना वाटू लागले. पुण्याच्या नैऋत्येस ६४ किलोमीटरवर कानद खोऱ्यात असलेला तोरणा किल्ला मोठा, कठीण आणि महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांमध्ये गणला जाणारा किल्ला होता. एवढा प्रचंड मोठा किल्ला असूनही आदिलशहाचे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी, दारूगोळा नव्हता. महाराजांनी हेच हेरले, आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचं तोरण बांधले.
तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले, येसाजी कंक या निष्ठावान आणि विश्वासू सहकार्याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला होता. सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला ‘प्रचंडगड' असे नाव दिले आणि स्वराज्याच्या स्थापनेची घोडदौड खऱ्या अर्थाने सुरू झाली. आपल्या राजाचा ”राज्याभिषेक” सोहळा, जो स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘रायगडा'वर ६ जून रोजी संपन्न झाला. याच दिवशी रयतेला हक्काचा वाली मिळाला, छत्र मिळाले आणि शिवाजी महाराजांना ”राजे पद” मिळाले. त्यामुळे हा दिवस आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. ६ जून १६७४ रोजी हिंदू पंचांगानुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर या शुभ ब्रह्ममुहूर्तावर हा नयनरम्य सोहळा पार पडला. स्वराज्याच्या कानाकोपऱ्यातील ब्रह्मणांना यासाठी आमंत्रित करण्यात आले. याचबरोबर आपल्या ‘राजे' पदाला मान्यता मिळाली आहे हे परकीयांना कळावे यासाठी डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या वकिलांना आमंत्रित करण्यात आले. परकीय सत्ता आपल्याला वचकून राहतील आणि ‘राजे पद' मिळाल्यानंतर त्यांच्याकडून कररूपाने आर्थिक हातभार लाभेल ही ‘दूरदृष्टी' यामागे महाराजांची होती.राज्याभिषेकाच्या दिवशी सात पवित्र नद्यांचे जल आणि स्वराज्याच्या चारी कोपऱ्यातील मृदा यावेळी खास विधीसाठी आणण्यात आली होती. जवळजवळ ३२ मण सोने वापरून एक अतिशय आकर्षक सिंहासन खास राज्याभिषेकासाठी तयार करून घेण्यात आले. त्यासाठी अनेक किमती हिरे मोती, जड जवाहीर वापरण्यात आलेहोते. काशीचे पंडित विश्वेश्वर भट अर्थात गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकाचा विधी पार पाडला आणि खऱ्या अर्थाने रयतेला ”छत्रपती शिवाजी महाराज” मिळाले. राज्यकारभार करीत असताना राज्याची एक ‘स्वतंत्र ओळख असावी' या उद्देशाने महाराजांनी आपली स्वतःची एक अष्टकोनी शिवराजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी...!!प्रतिप्रचंदलेखेव वर्धिश्णुर्विस्वंदिता !!
!!शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!!
अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदनीय अशी महाराजांची ‘राजमुद्रा' लोकांच्या कल्याणासाठी आहे, असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता महाराजांची ही मुद्रा संस्कृत भाषेत होती. रयतेचे राज्य निर्माण करीत असताना महाराजांचे संपूर्ण जीवन हे विज्ञानाधिष्ठित असून त्यांनी सातत्याने नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करून स्वराज्य सुजलाम सुफलाम केले. शून्यातून विश्व (स्वराज्य) निर्माण करण्याचे हे दुरापास्त काम महाराजांनी मोठ्या जिद्दीने आणि ताकदीने मावळ्यांच्या सहकार्याने पार पाडले. महाराजांचा राज्यकारभार पारदर्शी, शास्त्रशुद्ध होता. त्यांच्या पश्चातही त्यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र स्वराज्याच्या हिताच्याच वाटेने चालू राहिला. महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही भारताच्या लोकशाही राज्यव्यवस्थेची रचना केली. तथा राज्यघटनेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना, अनेक धोरणे राबवली. महिलांसाठी कायदे केले. भारतात आजवर होऊन गेलेल्या अनेक महान व्यक्तींपैकी महाराज एक होते. त्यांनी मराठी मनात राष्ट्रभावना जागवून मनामनात धगधगत्या ज्वाळा निर्माण केल्या. देशाप्रती, प्रसंगी ‘जीव देण्याची अथवा जीव घेण्याची' भावना निर्माण केली. इतर धर्मांबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी स्त्रियांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. प्रत्येक स्त्री ही आई, बहिणीसमान आहे असे मानले, स्वतःच्या कृतीने रयतेच्या मनात ते बिंबवलेसुद्धा. ते उत्तम प्रशासक होते. जनहितास प्राध्यान्य देणारी राज्यकारभाराची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी आठ मंत्र्यांचे ”अष्टप्रधान” मंत्रिमंडळ बनवले होते. त्यांनी राज्याचे तीन भाग बनवले. प्रत्येक भागामध्ये विभागवार सक्षम अधिकाऱी त्यांनी नेमला होता. न्यायव्यवस्थापनेचे काम मुख्य न्यायमूर्ती पाहत असत. तोरटमल आणि मलिक अंबर यांनी घालून दिलेल्या जमीन महसूल आकारणी पद्धतीवरच शिवाजी महाराजांची महसूल आकारणीची पद्धत आधारित होती. महाराजांनी एक कार्यक्षम व खडे लष्कर उभे करून, त्यात शिस्त बाणवली होती. त्यांच्या सैन्याचा मुख्यतः घोडदळ व पायदळावर भर होता.
भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी ‘जहागिरी' देण्याची पद्धत बंद करून, सैनिकांना वेतन म्हणून रोख रक्कम देण्यास सुरुवात केली. मोठे आरमार उभे करून त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवली. मराठी मनात राष्ट्रभावना जागवून नवचैतन्याचे ”रयतेचे राज्य” त्यांनी निर्माण केले. ते हिंदूधर्मीय असले, तरी अठरापगड जातींना त्यांनी आपल्या छत्रछायेखाली घेतले होते. ते सहिष्णू होते. इतर धर्मियांबद्दल त्यांना आदर होता. हिंदू धर्मातील उणिवा जमेस धरून त्यांनी धर्माची ‘प्रतिष्ठा' वाढवली. ते अत्यंत धाडसी, बुद्धिमान, विधायक कार्य करणारे ”जाणता राजा” म्हणून ओळखले जात. भारतात आजवर होऊन गेलेल्या अलौकिक आणि मोठ्या व्यक्तींपैकी एक असे शिवाजी महाराजांचे वर्णन आपल्याला करता येईल. महाराज जन्मानेच क्षत्रिय असल्याने लढाया करणे, लढाया जिंकणे, शत्रूला पराभूत करणे, त्यांची गनिमी काव्याने फसगत करणे, हे गुण महाराजांमध्ये स्वाभाविकपणे होतेच, परंतु त्या व्यतिरिक्त महाराजांनी राज्यकारभार करताना दाखवलेले कौशल्य त्यांना खऱ्या अर्थाने ”जाणता राजा” बनवते. या देशातील भूमिपुत्रांना परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महाराजांनी अहोरात्र संघर्ष केला. अडल्या नडलेल्यांना, गोरगरिबांना, उपेक्षितांना त्यांचा हक्क मिळवून देणे, त्यांचे जीवन भयमुक्त करणे, त्यांच्या जीवनात स्थैर्य, शांतता आणणे हाच महाराजांचा संघर्षाचा मुख्य उद्देश होता. सर्वसाधारण लोकांचे काम करताना धर्म, पंथ, जात त्यांनी कधीच पाहिले नाही आणि चालून आलेल्या शत्रूला त्याची जात, पंथ, धर्म याचा अजिबात विचार न करता प्रामाणिकपणे संपविण्याचे काम चोखपणे पार पाडले. त्यांच्या नेतृत्वात लढणारे लोक मराठी, कानडी, उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी, छत्तीसगढी अशा विविध प्रांतातील होतेच. परंतु भिल्ल, लमाण, गोंड इतकेच काय तर अगदी पठाण, मुसलमान अशा वेगवेगळ्या जाती- धर्माचे लोक त्यांच्या सैन्यात होते. अठरापगड जातींना महाराजांनी एकत्र करून जातीपातीच्या भिंती पाडून एक ऐतिहासिक क्रांती घडवली. महाराजांच्या सैन्यात काम करणारा सैनिक कोणत्याही जाती, धर्माचा, प्रांताचा, वंशाचा असला तरी तो एकच सर्वसामान्य ”मावळा” या नावाने ओळखला जात असे, आणि ”मावळा” या शब्दानेच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईला वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. महाराज स्वतः मातृ-भक्त होते. महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा केलेला मान-मरातब पाहून त्यांच्या चरित्राबद्दल ”बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ ठरते.
महाराजांनी समाज परिवर्तन घडवताना आर्थिक क्रांती सुद्धा केली. तत्कालीन व्यवस्थेत वस्तू स्वरूपात होणारी व्यवहार पद्धत बदलून महाराजांनी राज्य कारभारात रोख व्यवहार आणून प्रस्थापित आणि उपेक्षित समाजातील दरी कमी केली. त्यावेळी महाराजांनी कसेल त्याची जमीन ही पद्धत अमलात आणून जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले. वतनदारी पद्धत बंद करून आर्थिक विषमतेला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुजोर लोकांचे, सावकारांचे, माजलेल्यांचे अन्यायाने कमावलेले धन लुटून ते गोरगरिबांना वाटणे ही पद्धत महाराजांनी वापरली. अल्पावधीतच महाराजांनी कष्टकऱ्यांना, उपेक्षितांना जमिनीचे मालक बनविले.
आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या ”रयतेच्या राजाचे” अत्यंत वेगळ्या गुणांचे दर्शन आपणाला घडते. आत्तापर्यंत आपण शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाचलो. आता ते डोक्यात घेऊया आणि सर्व समाजाला सोबत घेऊन एक प्रगतिशील महाराष्ट्र आणि बलवान, स्वाभिमानी, सक्षम भारत घडवू याहीच महाराजांच्या पुरोगामी विचारांना खरी आदरांजली ठरेल. असा राजा आता कोणी नाही. व पुढे कधीच होणे शक्य नाही, अशा या ”जाणता राजाला”, ”छत्रपती शिवाजी महाराजांना” आमचा मानाचा मुजरा. जय शिवराय.
-दिलीप शिवराम जगताप