विश्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज
या पुस्तकामुळे शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्तरांवरील महत्व समजते. तसेच ते परकीयांच्या दृष्टिकोनातून कसे होते हे लक्षात आले. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंची ओळख झाली. या पुस्तकातून युरोपियन हे काळाच्या कितीतरी प्रगत होते आणि आपले शिवाजी महाराज त्यांच्याशी संघर्ष करून त्या काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करत होते, हेही लक्षात होते.
सतराव्या शतकात जगाचा पसारा फार छोटा होता. त्यावेळेस जेमतेम पन्नास देश अस्तित्वात होते. त्यापैकी जेमतेम चार-पाच देशांचा प्रभाव साऱ्या जगावर होता. याच शतकात इंग्लंडने अमेरिकेत आपला पाय रोवला. तसेच हिंदुस्तान मध्येसुध्दा प्रवेश केला. पोर्तुगीज आणि इतर देश सुध्दा इतरत्र हातपाय पसरत होते. त्याच शतकात हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला. त्यांच्या जन्माने भविष्यात निर्माण होणाऱ्या हिंदवी स्वराज्याची पहाट उजाडली आणि ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांच्या निधनामुळे १८३०६ दिवसांत मावळली. महाराजांच्या पन्नास वर्षाच्या काळात शेवटच्या ३५ वर्षांत महाराजांनी जे कार्य केले ते आपण इतिहासाच्या पुस्तकात व चरित्रात वाचले होते. परंतु महाराजांच्या कार्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली असेल याची अनेकांना कल्पना नसेल.
रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली येथील इतिहास विषय शिकवणारे शिक्षक श्री संजय शांताराम वझरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनातील कोणत्या प्रसंगाची जागतीक पातळीवर नोंद झाली आहे याचा सखोल अभ्यास केला त्यासाठी त्यांनी शेकडो ग्रंथ वाचले. अनेक इतिहासकारांशी चर्चा केली आणि तत्कालीन मोगल साम्राज्य, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या तुलनेने छोट्या असणाऱ्या स्वराज्याचा दबदबा त्या काळात अखिल विश्व पातळीवर कसा पसरला होता आणि युरोपात शिवाजी महाराजांचा डंका कसा वाजत होता, त्या काळात महाराजांविषयीची बातमी लंडनच्या वर्तमानपत्रात कशी छापली जात असे. हे ओघवत्या भाषाशैलीत, इतिहासाचे संदर्भ दाखले जोडत, त्याला आधुनिक भाषाशैलीची जोड देत हे पुस्तक साकारले.
या पुस्तकामुळे शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्तरांवरील महत्व समजते. तसेच ते परकीयांच्या दृष्टिकोनातून कसे होते हे लक्षात आले. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंची ओळख झाली. या पुस्तकातून युरोपियन हे काळाच्या कितीतरी प्रगत होते आणि आपले शिवाजी महाराज त्यांच्याशी संघर्ष करून त्या काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करत होते, हेही लक्षात होते.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संजय वझरेकर यांनी अनेक ग्रंथ वाचले. महत्वाचे संदर्भ जमवले व कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती दिली .अशा वेळेस कवी सुधीर मोघे यांच्या कवितेची आठवण होते. ते म्हणतात...
शब्दात निखारा फुलतो,
शब्दात फुलही हळवे,
शब्दांना खेळवितांना,
शब्दांचे भान हवे
संजय वझरेकर यांनी शब्दांचे भान ठेऊन कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय असलेले हे शब्दशिल्प साकारले आहे . वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे. संजय वझरेकर हे जसे उत्तम लेखक आहेत तसेच उत्तम वक्तेसुध्दा आहेत. विविध कार्यक्रमानिमित्त त्यांना निमंत्रण देऊन त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेता येईल.
विश्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज
लेखक - संजय शांताराम वझरेकर
प्रकाशक - कोमल प्रकाशन
प्रथम आवृती - ३१ डिसेंबर २०२४
पृष्ठ - १२८ मूल्य - १९९ रुपये
-दिलीप प्रभाकर गडकरी