रोटी
देशाच्या पारतंत्र्य काळातील स्थानिकांनी एकत्र येऊन, गुलामगिरीतून बाहेर यावे याचे रेखीव चित्र या सिनेमात दिसते. सिनेमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य आणि वेळेला साजेसा होता. प्रमुख पात्रांच्या मुखी दिलेले संवाद अतिशय मार्मिक तसेंच बोचरे आहेत. १९४२ ची ती ‘चलेजाव मूव्हमेंट' आणि एक आम हिंदोस्तानीच्या जगण्यात आलेला अनाकलनीय बदल हे नकळत रोटी सिनेमाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
१९४२ साली मेहबूब खान निर्मित, वजाहत मिर्जा लिखित ‘रोटी' हा हिंदी सिनेमा कृष्णधवल रंगात प्रदर्शित झाला. ज्यामध्ये शेख मुख्तार, सितारा देवी, चंद्र मोहन, अख्तरी बाई आदि सिने कलाकार होते. जो त्या काळातला एक अविस्मरणीय चित्रपट होता. आज तो सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
सिनेमा सुरुच होतो तो चक्क एक शेतकरी शेत नांगरत आहे, नांगराचे फाळ टणक मातीला सैल करते, जेणेकरून त्यांत पेरलेला दाणा जाऊन दडतो...असे चलचित्र पडद्यावर येताच फ़िल्ममध्ये विषय काय असावा, ते स्पष्ट जाणवते. अर्थातच तो जमिनीशी निगडित आहे. तो काळ दुसऱ्या महायुद्धातला, उजव्या तसेंच डाव्या वैचारिक स्तरावरील कमालीचे त्या काळातले ताणले गेलेले विचित्र असंतुलन! गरिबीला कसलीच व्याख्या उरली नसावी. श्रीमंतीला लाखोंचे मुजरे प्राप्त होत असत. वाकलेला शेतकरी कंबरेत आणखीन मोडेल कसा, ह्यातच महात्म्य मानणारे उरलेले मोजकेच तत्कालीन राजे, शिवाय अजूनतरी आंग्ल राणीचा ध्वज आकाशी गर्वात फडकत होता. फुगलेल्या नकपुड्या, वटारलेले अहंकारी डोळे आणि समोर दरबारी उभा दरबान! हिंदोस्तानची बहुतांशी जनता दारिद्रय सोसत होती. श्रीमंत आणि गरीब या व्यतिरिक्त कसलाच विचार त्याकाळी केला जात नसे. भुकेला अन्न मिळाले, मग उद्याचे काय? काहीच कळत नव्हते त्यांना.
वजाहत मिर्झा यांनी लिहिलेली कसदार पटकथा, त्यावरील चित्रपटास लाभलेले उत्कृष्ट संकलन. दिग्दर्शकीय दृष्टिकोन काय असावा तो पहिल्याच दृश्यातून अधोरेखित झाला. यावरून सिनेमाची कथा काय असावी ते ध्यानी येते. तो काळ ताजेशाहीचा होता, ते वेगळे सांगणे नको. सर्वत्र थाट आणि गरिबांची पूर्ण वाट! जागोजागी दुःख पेरलेले होते.
चंद्रमोहन हा त्या काळातला रुबाबदार, ऐटीतला नायक! मात्र त्याने स्वीकारलेली नकारात्मक भूमिका जबरदस्त निभावली. घमेंड प्यायलेला उंचापुरा, देखणा, घाऱ्या डोळ्यांचा शहरी धनिक पूर्ण सिनेमात तोच शोभून दिसतो. शेठ कालिदासची नकारात्मक भूमिका त्यावेळी चंद्रमोहन यांनी लीलया पेलली आहे. गर्विष्ठ श्रीमंतीतला परिसर सर्वत्र दिसतो. रागीट, धनात लोळलेला आणि गरिबांना तुच्छ समजणारा हा स्वयंघोषित शेठ फक्त धनपूजक असतो. शेअर मार्केट आणि सोने ह्याचीच चर्चा करणारा. सोनेरी स्वप्नात रमणारा! तो तरुण अतिशय महत्वाकांक्षी पठडीतला. एकेदिवशी त्यांस कोणा एका भूगर्भ शास्त्रज्ञाकडून कळले की उत्तरेकडील दोन डोंगराच्या पलिकडे सोन्याच्या खाणी असाव्यात. त्याचा शोध त्वरित लावला गेला पाहिजे. नायक लक्ष्मीदास आपल्या (डार्लिंग नामक) प्रेयसीला सोबत घेऊन त्या डोंगरापलिकडे जाण्यासाठी मालकीच्या विमानाने निघतो. वाईट हवामानात त्यांचे विमान भरकटते, व दुर्घटनाग्रस्त होते. पायलट आणि नायक असे दोघेही घटनास्थळी मरतात. अरण्यांत फसलेले नायक-नायिका तहानलेल्या अवस्थेत पाण्याच्या शोधात सैरावैरा पळतात. शेवटी नजिकच्या रानात राहणारे प्रेमी युगुल बालम-किनारी (शेख मुख्तार आणि सितारा देवी) त्यांच्या मदतीस धावून येतात. आपल्या रानावनातल्या झोपडीत आणून त्यांची सुश्रुषा करतात, पाहुणचार देतात. शेतकरी जोडपे आपल्या चंगु-मंगु नामक अतिशय लाडक्या पाळीव म्हशीचे दूध पाहुण्यांना प्यायला देतात. दोघेही खुश होतात. अर्थात चंद्रमोहन दुखापतीतून बरा होतो आणि त्यांस वेध लागतात ते शहरातील आपल्या व्यवसायाचे! गरिबांना तुच्छ जमजणारा तो वेगळाच विचार करतो. तूर्तास त्याचा सोन्याचा नाद थांबतो!
मात्र लक्ष्मीदास आपली चाल हुकल्यामुळे निराश होऊन शहरांत कसे परतायचे ह्या बेतात असतो आणि नकळत रात्री त्या शेतकरी जोडप्याच्या लाडक्या पाळीव दोन म्हशीनाच बैलगाडीस जोडून (त्यांचे आभार न मानता) नायिकेसमवेत कसेबसे रेल्वे स्टेशनात येऊन पुढे आपले शहर गाठतो. दोघेही आपल्या बंगल्यावर सुखरूप पोहोचतात.
पाळीव म्हशी गायब झाल्याने बालम आणि किनारी निराश होतात शेवटी आपल्या लाडक्या पाळीव म्हशीच्या शोधात ते दोघेही कसेबसे शहरापर्यंत पोहोचतात. लक्ष्मीदास क्रोधावस्थेत त्या दोघांची हेटाळणी करतो. मात्र प्रेयसीच्या (डार्लिंग) सांगण्यावरून नाईलाजाने मजूर म्हणून त्यांना काम देतो. आपल्या रानांत चुकून का होईना, आलेल्या त्या शहरी पाहुण्याना स्वेच्छेने राजभोग दिला पण तीच धनिक व्यक्ती त्यांच्या महालात आल्यावर गरिबांना कशी तुच्छ वागणूक देते, हे पाहून रानावनातली माणसं आल्यावाटे निराश होऊन आपले पाळीव प्राणी घ्ोऊन निघून जातात. माणूस गावात असो किंवा शहरांत... सर्वांना पोटाची भूक मातीचे घास खाऊन नाही मिटवता येत, त्यांस हवी असते ती रोटी!
दिग्दर्शक मेहबूब खान यांनी या विषयाची निवड खूप छान केली. सिनेमा हे एक सजीव माध्यम त्याकाळी मानले जायचे. तत्कालीन वातावरणात जसे लोक रहायचे त्याचे उत्तम चित्रण पटकथेत स्पष्ट जाणवते. मेहबूब खान हे तसे डाव्या विचारांचे, इथल्या स्थानिकांनी गोऱ्या समोर स्लेव्ह म्हणून का वाकून रहावे? यावर विशेष लक्ष दिले आहे. स्थानिकांनी एकत्र येऊन, गुलामगिरीतून बाहेर यावे याचे रेखीव चित्र रोटी या सिनेमात दिसते. सिनेमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य आणि वेळेला साजेसा होता. प्रमुख पात्रांच्या मुखी दिलेले संवाद अतिशय मार्मिक तसेंच बोचरे आहेत.
४२ची ती ‘चलेजाव मूव्हमेंट' आणि एक आम हिंदोस्तानींच्या जगण्यात आलेला अनाकलनीय बदल हे नकळत रोटी सिनेमाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. आंग्ल मानसिकतेत कायम पंगू झालेली आशियाई उपखंडातील गुलामगिरितून मुक्त करण्याची ती डरकाळी म्हणजेच चलेजाव चळवळ नकळत त्याची सूक्ष्म प्रतिमा रोटी कथानकात स्पष्ट जाणवते. राणीचा ध्वज उतरला आणि त्याजागी तिरंगा फडकला!
सध्या सोन्याच्या खाणी म्हणजेच ग्रामीण भागातील जमिनीवर शहरी भागातील इनव्हेस्टर्स मंडळीचा डोळा आहे, हे कुणास गुपित राहिलेले नाही. गावांतील स्थानिक मध्यस्ती करणाऱ्यांच्या सहाय्याने हळूहळू गावे रिकामी होऊ लागलीत. जे नाही जात, त्यांना गर्दच्या मदतीने गुंगीत तडफडत जगण्याची मुबलक सुविधा करण्यात आलेली दिसते. जमल्यास एकदातरी रोटी सिनेमा बघून योग्य तो निर्णय घ्यावा, एवढीच अपेक्षा. - इक्बाल शर्फ मुकादम