थोर क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज

आज १५ फेब्रुवारी,  बंजारा समाजातील महान क्रांतिकारक संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती. मध्ययुगात भारतात अनेक क्रांतिकारक संत महात्मे होऊन गेले ज्यांनी आपल्या आपल्या वर्तनातून, कीर्तनातून, विचारातून समाजात भक्तिभाव तर निर्माण केलाच; पण येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन होईल असे तत्वज्ञान सांगितले त्यात श्री संत श्री सेवालाल महाराज हे एक होते.

संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी तांडा गुत्त्ती बेल्लारी अनंतपुर जिल्हा आंध्रप्रदेश या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक असे होते. भीमा नाईक हे त्याकाळात अतिशय श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात. असे म्हणतात की भीमा नाईक यांच्या घरी इतकी श्रीमंती होती की त्यांच्या सात पिढ्या बसून आरामात जेवण करतील. त्यांच्याकडे सुमारे पाच हजार बैल आणि गाया  होत्या. ते  ४१ तांड्यांचे नायक होते. घरी लक्ष्मी पाणी भरत असूनही सेवालाल महाराजांचे मन रमत नव्हते. आपल्या बंजारा समाजातील लोक जुन्या रूढी परंपरांना कवटाळून बसला असल्याने बंजारा समाज इतर समाजाच्या मानाने खूप मागे आहे.  या समाजातील हाच मागासलेलापणा दूर करण्यासाठी काही तरी करावे असे त्यांना सतत वाटत होते. त्यांच्या आई धर्मली यांनी त्यांना लहानपणीच वीरांच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

आईच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. आपल्या बंजारा समाजात अनेक अनिष्ट चालीरिती आहेत. या अनिष्ट चालीरिती मुळेच समाज मागे आहे हे त्यांनी जाणले. बंजारा समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने न्यायचे असेल तर त्यांच्यात असणाऱ्या  अनिष्ट, बुरसटलेल्या चालीरिती बंद करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे असा विचार करून त्यांनी समाजामध्ये जनजागृती  केली. बंजारा समाजातील बांधवांनी अंधश्रद्धेला मूठमाती द्यावी असा त्यांचा आग्रह असायचा. अंधश्रद्धेमुळेच समाज मागे आहे असे त्यांचे ठाम मत होते. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतीही गोष्ट पारखून, समजून घ्या मगच विश्वास ठेवा असे ते म्हणत. त्यांना गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव मान्य नव्हता म्हणूनच घरची श्रीमंती असूनही त्यांनी आपल्या पुतण्याच्या विवाह एका गरीब कुटुंबातील मुलीशी लावून दिला होता. २५० वर्षापूर्वीच श्री संत सेवालाल महाराजांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण समाजाला दिली होती. श्री संत सेवालाल महाराज हे केवळ थोर विचारवंतच नव्हते; तर ते एक थोर सेनानीही होते.

 दिल्लीचा नवाब गुलाब खान मोहंमद खान याच्याशी सेवालाल महाराज यांच्याशी लढाई झाली. या लढाईत सेवालाल महाराजांनी मर्दुमकी गाजवत विजय मिळवला. श्री संत सेवालाल महाराजांनी भारतीय स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला त्यावेळी उमाजी नाईक, तंट्या भिल्ल यासारखे शुर सेनानी त्यांच्यासोबत होते. भारतीय इतिहासातील थोर विचारवंत आणि थोर सेनानी अशी ओळख असलेल्या श्री संत सेवालाल महाराजांचे २ जानेवारी १७७३ रोजी रुईगड, तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे निधन झाले. थोर विचारवंत, समाजसेवक त्याच सोबत शुर सेनानी असणाऱ्या श्री संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्याच पिढीला नव्हे, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचे विचार आत्मसाद करून त्या विचारांवर चालण्याचा संकल्प करणे हीच त्यांच्या जन्मदिनी त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. थोर विचारवंत, थोर सेनानी श्री संत सेवालाल महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! - श्याम ठाणेदार 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विचारांची अनुभुती देणारे चिंतन