झंडा ऊँचा रहे हमारा

मी डोळे चोळीत उठलो तर पहिलं माझं लक्ष बाहेरच्या दोरीवर टाकलेल्या कपड्यांकडं गेलं. तिथं ते मला दिसले नाही म्हणून, "दादा, माह्ये कपडे?” दादानं एखाद्या परटाला लाजवेल अशी इस्त्री कपड्यांना केली होती. मळ्यातून शाळेत जाताना मी बऱ्याचदा स्वतःचेच कपडे तीनतीनदा बघत होतो. शाळेच्या पटांगणात झेंडावंदनची सर्व तयारी झाली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. राष्ट्रगीत सुरू होऊन आम्हीं सर्वांनी झेंड्याला सलामी दिली.

शाळेतून घरी आल्या आल्या मी कपडे काढले अन्‌ तडक विहिरीकडं गेलो. तसा दिवस मावळायला अजून बराच उशीर होता. रोजच्यापेक्षा मी आज जरा जास्त धावपळ करत आलो होतो.बाजूच्याच पडकात शेळ्या चारणाऱ्या आजोबाला (दादा) माझी धावपळ समजून चुकली होती. लहानपणापासून दोडीला मामाच्या घरी शाळेला असल्यानं तसं पाहिलं तर तो माझा कर्ता-धर्ता होता. अडाणी असलं तरी काय झाल?  दररोज आमच्या शाळेतलं बँड पथकाचा आवाज गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या कानावर येत होता. म्हणजे एवढ्यात कधीतरी झेंडा फडकणार असं त्याला ते रोजचं ऐकून माहित होतं. कॅलेंडर वाचता येत नव्हतं म्हणून मला महत्त्वाचे सण-वार तो असंच अधून मधून विचारून घ्यायचा. त्याचे बरेचसे प्रश्न ठरलेले असायचे "दांडी पूनव कंधी?, चंपासट कंधी?,  वांगे सट ?...?...?” तो ते महत्त्वाचे दिवस मला कॅलेंडरवरून वाचायला सांगायचा. कधी कधी दुपारच्या वेळी शेळ्या सावलीला बसल्या म्हणजे तो मला खुंटीला अडकवलेलं कॅलेंडर काढून आणायला सांगायचा. मग त्यादिवशी आमचं पुढल्या राहिलेल्या वर्षभराचं सगळं बारीक सारिक विचारमंथन व्हायचं. त्याला एकदा मात्र सांगितलं म्हणजे तो त्याच्या डोक्यात कसं फिट्ट ठेवायचा हे त्याचं त्याला माहीत! मलाही बऱ्याच वेळा काहीच न शिकलेल्या दादाचं नवल वाटायचं. मनात प्रश्न यायचा "हा अजिबात न शिकून एवढा ध्यानात ठेवतो तर याचं थोडेफार शिक्षण झालं असतं तर मग विचारू नका!” मुंबईला गोदीत हमालीला ३०-३५ वर्षे राहिल्यानं त्याचं सामान्य ज्ञान खूपच वाढलं होतं. जगात फिरल्यावर ज्ञान वाढतं एवढं माहीत होतं पण हा जास्त फिरलाच नव्हता; मात्र संपूर्ण जगात फिरून फारून मुंबईला येणाऱ्या माणसांची गर्दी खूप अन्‌ नेमकं दादाच्या बाबतीत तेच घडलं. त्याला तिथं जगातल्या कानाकोपऱ्यातली माणसं भेटली अन्‌ तो पाहून पाहून चांगलाच हुशार झाला.

 वय झाल्यामुळं तो आता थकला होता; परंतु खाण्यापुरतं काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून तो दररोज शेळ्या वळायचा. आजही त्याची तीच ड्युटी सुरू होती. माझी एवढी तगमग बघून त्यानं आपल्या कपाळावर  चारी बोटांनी हाताची सावली धरत लांबूनच दादानं आवाज दिला, "झेंडा हाये का रे पोरा, नेवरती उन्द्या सकाळी?” मी विहिरीच्या थारोळ्यात उभं राहून खाली सोडलेली बादली भरून वर काढत बाजूला ठेवत, ”हा दादा, उद्या सव्वीस जानेवारी.” असं  दुसऱ्या बादलीत निरमा टाकून फेस करता करता सांगितलं. तेवढ्यात तिकडून आवाज आला, "लवकर आटेप, हाडाकले पायजेन जेवणळीपोहोत; म्हंजी टकटक नही राह्याची.” मी ईकडून, "हा, हा” करत कपडे निरमाच्या पाण्यात बुचकळले अन्‌ पुन्हा विहिरीत बादली सोडली. दादाचं म्हणणं एकदम रास्त होतं म्हणून मी ते धुतल्यानंतर शर्टला व टोपीला निळ देवून चांगले घरासमोरच्या दोरीवर वाळत घातले. दिवस आत्ता टेकायचा बेतात होता. सरुमामी अन्‌ ब (आज्जी) दुसऱ्याच्या वावरात रोजानं कामाला गेल्या होत्या त्याही आल्या. इकडं दादानं शेळ्या घरी आणल्या होत्या. मी पायखुट्या सोडत दादाला शेळ्या बांधायला मदत करू लागलो.

अंधार कधीच पडून गेला होता. ब दुसऱ्या दिवशी सकाळसाठी भुईमुगाच्या शेंगा फोडत बसली होती. बाहेरच्या चुलीवर मामीचा स्वयंपाक सुरू होता. मी एक दोनदा बाहेर दोरीवरच्या धुतलेल्या कपड्यांना हात लावून पाहिला; पण चांगलीच थंडी पडल्यानं हवेत गारवा होता. कपड्यांना दहा-वीस टक्केसुद्धा फरक पडलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी कवायतीत माझी निवड झालेली होती. ठराविक मुलांना रंगीत रिंग, काठ्या, डंबेल्स, लेझीम पथक अशी वेगवेगळी तयारी सरांनी करून घेतली होती. मी घुंगरूकाठी पथक मध्ये होतो. मनात यायचं जर का उद्या कपडे वाळले नाही तर त्याच काठीने मास्तर बेदम हाणातील म्हणून कपडे लवकर वाळावे म्हणून देवाला हात जोडत होतो. शेवटी दादाला माझी तगमग लक्षात आली. मामीचा स्वयंपाक आटोपला होता म्हणून तिने आवाज दिला, "नेवरती, घ्या घेऊन चला.” अन्‌ दादा व मी जेवायला बसलो. माझं जेवायला मन लागत नाही हे दादानं ओळखलं अन्‌ जेवता जेवता दादा म्हणला, "काय काळजी नको करू, मी उठण पहाटी पहाटी.” दादानं कितीही सांगितलं तरी माझं मन मला स्वस्थ बसून देत नव्हतं. शेवटी दादानं ओट्यावर आमचं अंथरूण टाकलं. झोपताना एकदा परत कपड्यांना हात लावून पाहिला तर परिस्थितीत काहीच सुधारणा नाही असं लक्षात आलं अन्‌  डोळे झाकले. काही केल्या झोप लागेना म्हणून सारखी माझी चुळबुळ सुरू होती. कुस बदलल्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हतं. शेवटी रात्री उशिरा कधी झोप लागली ते समजलंच नाही.

सकाळी दादाचा भल्या पहाटे आवाज ऐकू आला, ”ये पोरा, नेवरती उठ , झाड्याला जावून ये अन्‌  मंग आंघुळ करून घे पाणी तापलं तव्हर चांगलं कडाक.” मी डोळे चोळीत उठलो तर पहिलं माझं लक्ष बाहेरच्या दोरीवर टाकलेल्या कपड्यांकडं गेलं. तिथं ते मला दिसले नाही म्हणून, "दादा, माह्ये कपडे?” बाजूलाच ओट्यावरच्या भुईवर गोधडी टाकली होती. बाजूलाच तांब्यात चुलीतले कोळसे टाकून त्यानं पकडीला धरून इस्त्री सुरू केली होती! मी तर अवाकच झालो! माझं बाकीचं उरकून मी अंघोळ करेपर्यंत दादानं कपडे एकदम नंबरी करून ठेवले. तांबडं चांगलं फुटलं होतं. दिवस उगायला अजून थोडा वेळ होता. दादानं शेळ्या पिळून दुधाची चरवी सरूमामीच्या हातात देत, "च्या ठीव. सरू लै तल्लप झाली कव्हाची अन्‌ हाबी च्या-दूध पेऊन निघंन झेंड्याला.”

दादानं एखाद्या परटाला लाजवेल अशी इस्त्री कपड्यांना केली होती. मळ्यातून शाळेत जाताना मी बऱ्याचदा स्वतःचेच कपडे तीनतीनदा बघत होतो. शाळेच्या पटांगणात झेंडावंदनची सर्व तयारी झाली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. राष्ट्रगीत सुरू होऊन आम्हीं सर्वांनी झेंड्याला सलामी दिली. कपडे धुतल्यापासूनची माझी तगमग कुठं शांत झाली होती अन्‌ अभिमानाने बँड पथकाच्या तालावर आम्ही विद्यार्थी कवायत करत होतो. त्यादिवशी माझ्यासाठी घुंगरूकाठी , झेंडा अन्‌ धुतलेले कपडे एवढेच विषय डोक्यात सारखे फिरत होते. सव्वीस जानेवारीचं ते झेंडावंदन झालं अन्‌ मी मोकळ्या मनाने आनंदात उड्या मारतच घरी गेलो. दादानं शेळ्या चारायला सोडल्या होत्या. त्यानं लांबूनच हातातली काठी वर करून विचारलं, "जमलं का रे भाऊ बराबर?” इकडून मी जोरात आवाज दिला ,"दादा लै भारी झालं राव.!” माझं बोलणं ऐकून समाधानी झालेल्या दादा लांबूनच थोडा मोठा आवाज करत बोलला, "घे जेवून भूक लागली आसंल तुला आता; शिक्यात टोपलं आडकावल्यालं हाये, तुह्या मामीनं अन्‌ चुलीवर कालवाण आसंन पाह्य तिथं.” मी लांबूनच वर हात करत "बरं बरं रे दादा.” असं म्हणत हात धुतले अन्‌ जेवायला बसलो. कालपासून माझा चाललेला आटापिटा मी जेवता जेवता खोलवर विचार करत बघत होतो. माझी तळमळ अन्‌  माझ्या दादाचा वक्तशीरपणा यांचा मिलाप त्या दिवशी सार्थ ठरला होता. म्हणूनच शाळेत डौलात फडकणारा झेंडा मात्र डोळ्यासमोरून काही केल्या बाजूला जात नव्हता अन्‌ कानावर गीत ऐकू येत होतं झंडा ऊँचा रहे हमारा.. - निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 प्रदूषणाने खेळी केली, बनावट औषधे नशीबी आली