मी आणि माझी प्रतिमा : आर्त अंतरात्माला साद घालणारा कविता संग्रह
कवयित्री सौ .प्रमिता काळे ह्या कविता लिहित नाहीत तर त्या कविता जगतात असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. कारण त्यांच्या सर्वच कविता मनाच्या आंतरंगात तयार होऊन रसिकांच्या मनाला भिडतात. म्हणुन त्या वाचकाला आपल्या वाटतात. सदर काव्यसंग्रहातील कविता वाचताना वाचक एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. कवितेत मनातील अनेक स्पंदने वाचकाच्या हृदयाचा ताबा घेतात व वाचक त्या कविता मनात गुणगुणत रहातो.
कधी वाटते मारुन यावा
कवितेचा फेरफटका
कवितेच्या प्रांगणात भेटला
मी प्रतिमा माझी प्रतिमा कविता संग्रह
मनासारखा निटनेटका ....!
अलिकडेच पार पडलेल्या गदिमा पुरस्कार सोहळ्यात पुणे चिखली येथील कार्यक्रमात भेट झाली असता कवयित्री सौ. प्रतिमा अरुण काळे यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह मी प्रतिमा माझी प्रतिमा हा अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेला काव्यसंग्रह मला सस्नेह भेट दिला. विशेष म्हणजे तो वणव्यामध्ये मित्र गारव्यासारखा या कवितेचे जनक आदरणीय कवी अनंत राऊत सरांच्या समक्ष..त्यामुळे तो काव्यसंग्रह कायम स्मरणात राहणार. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ इतके सुंदर व बोलके आहे की पुस्तक वाचण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. तसे मी कविता किंवा साहित्य लिहिण्याचा कालखंड जरी सन १९८९-९४ पर्यंतचा असला तरी त्यात खुप मोठा खंड पडून तब्बल २६ वर्षानंतर म्हणजे सन २०२० ला पुन्हा लेखन सुरु झाले. म्हणजे प्रतिमाताईंचा लेखन कालावधी व माझा लेखन कालावधी समान आहे . त्यामुळे सदर काव्यसंग्रहाचे मलाही मनोमन अप्रुप वाटले. तसे प्रतिमाताईंच्या अनेक कविता साहित्य ग्रुपवर एक आनंदाची मेजवानी देणारी तरल प्रतिमा असते त्याचा आस्वाद अनेक सारस्वत घेत असतात.
कवयित्री सौ .प्रमिता काळे ह्या कविता लिहित नाहीत तर त्या कविता जगतात असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. कारण त्यांच्या सर्वच कविता मनाच्या आंतरंगात तयार होऊन रसिकांच्या मनाला भिडतात. म्हणुन त्या वाचकाला आपल्या वाटतात. सदर काव्यसंग्रहातील कविता वाचताना वाचक एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. कवितेत मनातील अनेक स्पंदने वाचकाच्या हृदयाचा ताबा घ्ोतात व वाचक त्या कविता मनात गुणगुणत रहातो. हे कवयित्री सौ. प्रतिमा काळे यांच्या कवितेचे विशेषपण मला जाणवले. सदर संग्रहातील सर्वच कविता वाचकाला निखळ आनंद देण्याबरोबरच मनात विचारांचे काहुर माजून मानवीजीवनाबद्दल विचार करायला भाग पाडतात. त्या एका ठिकाणी म्हणतात ......
रणरागिणी तू संसारातील
नाना रुपातून हो कार्य
तुझे हास्य जीवनी उमलते
नित्य करत खरे सत्कार्य ....!
रणरागिणी या आपल्या कवितेत कवयित्रीने संसाररुपी महासागरात स्ञीचे असलेले स्थान अधोरेखित केले आहे. खरेच जीवनात , संसारात स्त्रीचे स्थान व कार्य असाधारण आहे. त्याचे मोल कधीच करता येणार नाही. स्त्री ही आई, बहीण ,मैञिण सहकारी अश्या अनेक पातळीवरती जीवन जगत असताना पुरुषांना निस्वार्थीपणे मदत करत असते. तिचे कार्य महान आहे असे कवयित्रीला यात सुचवायचे आहे.
दुसऱ्या मिलनाची आस या कवितेत कवयित्रीने खुपच सुखद प्रतिमा योजना केल्या आहेत त्या म्हणतात ....
प्रेमाच्या मिठीत पहुडता
गाणे गाऊयात पावसाचे
मिलनाची लागता आस
धडे मिळाले हो जीवनाचे...!
स्पर्श दोघांचाही बोलका
सांगे सोबतीस नित्य हवे
सखीचे अलगद लाजणे
काळजाचा ठोका चुकवे ...!
अतिशय प्रेम रसात न्हाऊन निघालेली हि कविता वाचताना वाचक आपल्या स्वतःच्या आयुष्यात डोकाऊन जातो व पती-पत्नी ,प्रेमीयुगल यांना एका वेगळ्याच विश्वात डुंबून ओलेचिंब करतो !!!
दूसऱ्या एका सामाजिक विषयावरील माणुसकीची कामना या कवितेत त्या म्हणतात..
जीवनाचा प्रवास खडतर
चालताना ही अवघड वाट
संकटे येतातच जीवनात
जणू त्यांचाच भरतो थाट ...
अश्रू नयनी अनावर झाले
सांगू कोणाला मी वेदना
मदतीच्या नावाने लुटतात
गोठल्या सर्वांच्या सवेंदना ...!
माणुस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात अनेक भले-बुरे प्रसंग येत असतात. कधी-कधी माणसाचं जीवन असह्य होतं. या पुढे जगूच नये असे वाटते. त्या काळात सर्वच आपल्या असहायतेचा गैरफायदा घेतात. तेंव्हा मानवाच्या संवेदनशील भावना कोठे सुन्न होतात. जीवनात असे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला कमी-अधिक प्रमाणात येत असतात त्या घटनांनी कवयित्रीचे मन सुन्न होते. ही कविता वाचकाला क्षणभर विचार करायला भाग पाडते. याचप्रमाणे त्यांच्या श्रावणसरी, आर्त किंकाळी, निसर्गाची माया, खेळ नियतीचा, जीवन सार, माझे बाबा, प्रितीचा गुलमोहर, नवी वाट, आई माझी कल्पतरु, प्रेम गाठ , काहूर अशा एकुण ७९ कवितांनी हा काव्यसंग्रह समृद्ध झाला आहे. यातील सर्वच कविता आपल्याला जीवन जगायला शिकवतात. जीवनातील अनेक सुख-दुःखे यावर फुंकर घालतात. कवितासंग्रह वाचल्यानंतर जीवन जगण्याची एक वेगळीच हुरहुर लागुन रहाते. अशा या सुंदर काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मधुसूदन घाणेकर यांची अतिशय वास्तवदर्शी प्रस्तावना लाभली आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अतिशय रेखिव केले असुन पाठराखण सौ.सुनिता गोविंद कपाळे, संभाजीनगर यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे. मनाच्या खोल-खोल कप्यात सदैव डुंबत राहणाऱ्या या काव्यसंग्रहाला व सौ.प्रतिमाताईंच्या पुढील लेखनकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!!
मी आणि माझी प्रतिमा कवयित्री : सौ. प्रतिमा अरुण काळे
प्रकाशन : समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर पृष्ठे : ९६ मूल्य : १२०
-तानाजी धरणे