प्रेमाची परिभाषा मनाचा गाभारा...
देवघरातल्या देवापुढे नतमस्तक होताना शांत रहावं डोळे बंद करून सारं काही आठवावं दिवसभरातील घटनांचा हलेकच मागोवा घेत चांगल्या-वाईटाची आपणच कबुली द्यावी किमयागाराशी झालेल्या संवादानंतर स्थिर मनानं नव्या दिवसाची सुरुवात करावी.
मनाच्या गाभाऱ्याचंही तसंच..
मनात दडलेल्या असंख्य कप्प्याचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो किंवा प्रत्येक वेळी त्या-त्या प्रसंगी एक नवा कप्पा सापडतो. अशा भव्यदिव्य मनात चोरपावलांनी कुणीतरी येऊ पाहत. त्या कुणीतरीला प्रवेश द्यायचा की, नाही हे ठरविण्याच्या आधीच आपल्याही नकळत चोरवाटेने त्या कुणीतरीने प्रवेश केलेला असतो तेंव्हा फक्त शांत राहायचं. परिस्थितीच्या हातातील बाहुलं न होता काळाच्या हातात सर्व सोपवून द्यायचं आणि त्याच कुणीतरीच्या बोलण्यातून, नजरेतून, हसण्यातून तुमच्याच नाही तर इतरांशी असलेल्या वागणुकीतून पारखून घ्यावं.
पारख करताना मात्र सर्व बाजूने करावी. कधी-कधी एखाद्याविषयी मनामध्ये काही कल्पना आखून ठेवलेल्या असतात, बरेच समज तयार झालेले असतात, समोरील व्यक्ती अशीच आहे असा ग्रह तयार झालेला असतो. हे सर्व समज बाजूला ठेवावेत, कारण कोणताही एक गुण-अथवा दोष म्हणजे तो माणूस नसतो. एखाद्याविषयी नकारात्मक मत तयार झाल्याने आपण त्याच चष्म्यातून त्या व्यक्तीकडे पाहतो आणि खरा माणूस ओळखणं राहून जातं. आपल्या या स्वभावामुळे आपण त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर अन्याय करतो त्याचं शाश्वत अस्तित्व नाकारतो हे आपण विसरून जातो. एखाद्याविषयी विविधांगानी विचार करतो तेंव्हाच तर खरं रूप समोर येत किंवा प्रसंगानुरूप जे समोर येत तेंव्हा त्यावेळचं ते खरं रूप असतं आणि नव्यानं त्या व्यक्तीला भेटतो. अशा विविधागांनी पारखून झाल्यावर त्या कुणीतरी विषयी आपुलकी आणि आत्मीयता वाटली तरच त्या कुणीतरीला मनाच्या गाभाऱ्यात बसवावं.
असंख्य कप्पे असलेला मनाचा गाभारासुद्धा किती निराळा असेल. या सर्व कप्प्यांची कवाडं उघडून या गाभाऱ्यात बसणारा कुणीतरीसुद्धा तितकाच निराळा असायला हवा किंवा तो वेगळाच असतो म्हणूनच तिथपर्यंत पोहोचतो. एकदा का गाभाऱ्यात तो पोहोचला की, तो फक्त तुमचा असतो. प्रत्यक्षात जरी बोलता येत नसेल तरी इथे तुम्ही त्या कुणातरीशी मनसोक्त गप्पा मारू शकता. त्या कुणीतरी सोबतचं तुमचं नातं पाण्यासम नितळ, खळखळून हास्यासारखं निखळ असायला हवं किंवा ते तसं असतं म्हणूनच कुणीतरी मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतं. जिथे मिळविण्याची अभिलाषा, क्षणिक सुखाचा मोह असतो तिथे अशी निरागसता कशी येणार?
या सर्वांपलीकडे जाऊन एका निराळ्या अवयावाने त्या कुणीतरीकडे पहावं. मग जे नंदनवन फुलेल ते दोन डोळ्यामध्येसुद्धा मावणार नाही.त्यानिराळ्या दृष्टीतून पाहताना तुम्हाला श्रुष्टी नवी वाटेल. आपलं श्रुष्टीतल असणं हवंहवंसं वाटेल.
संध्याकाळी देवघरात निरांजन लावल्यावर संपूर्ण घर प्रकाशित होतं. तसंच मनाच्या गाभाऱ्यातील त्या कुणीतरीकडे स्वच्छ नजरेतून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, तुमच्या मनाचा गाभारा सहस्त्र दिव्यांच्या ज्योतीने उजळवून निघालाय. हा गाभारा या प्रकाशाने कायम तेवत राहावा. शेवटी काय तर देव दगडात नसतो; पण श्रद्धा आणि विश्वास ठेवला की, दगडालाही देवत्व येतच. म्हणूनच इथे विश्वास आणि श्रद्धा महत्वाची. - ऋतुजा म्हात्रे-महामुनी