दररोजच प्रेम करू या व आपले विश्वच करुणामय करू या
प्रेम करा, प्रेम विवाह करा, अरेंज मॅरेज करा - प्रेम करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांसाठी बलिदान करा. ते टिकवा, शेवटपर्यंत न्या. ह्यातच खरे प्रेम दडलेले आहे. नाही तर मग मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाहीतर मी तुझ्याशिवायच जगू शकतो ही वेळ येईल.
"मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही ते मी तुझ्या शिवायच जगू शकतो पर्यंत”
"जाने कैसे कब कहा इकरार हो गया, हम देखतेही रह गये और ये प्यार हो गया”
हे अस काही प्रेम झाल्यावर फिल्मी स्टाईलने रसायन होत असावं.
एक काळ होता जे प्रेम करत होते, पण व्यक्त करता येत नव्हतं. तेव्हा कौटुंबिक आणि सामाजिक खूप बंधन होती. असे किती करोडो प्रेम झाले असतील आणि ते एकमेकांच्या हृदयाच्या कप्यातच राहिले व ते कधीच बाहेर येऊ शकले नाही. नजरानजर झाली असेल एव्हढेच काय ते. तेव्हा मुलगा मुलीला बोलला म्हणजे खूप काही झाले. तेव्हा एव्हढं स्वातंत्र्य नसायचं. मुलाला मुलगी बघून हसली म्हणजे झालं त्याची लॉटरी लागली, त्याचं नशीब खुललं एव्हढंच काय तर त्याचे जीवन सार्थ झाले असंच समजायचं. तो तर बस "आज मैं उप्पर आस्मा नीचे” जसे काही दोन बोट स्वर्ग राहिला. एव्हढा त्याला आनंद व्हायचा. तेव्हा "आय लव यु” म्हणणे म्हणजे त्याला काय धाडस लागायचं? ते म्हणजे एक खूप पराक्रम केल्यासारखच असायचं. आता तर शाळेच्या आवारात सहज चक्कर मारा काय दृश्य दिसतं ते आणि महाविद्यालयातील परिसरातील नजरा तर सोडूनच द्या. असाच एक किस्सा घडला. एका प्रायमरी शाळेत पालक सभा झाली. तिसऱ्या वर्गातील मुलाची गोष्ट असेल. त्याने आपल्या वर्गातील मुलीला ‘आय लव यु' म्हटले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने मुलाच्या आईला बोलाविले आणि आपल्या मुलाच्या पराक्रमाचे सांगितले.
आपण ”आय लव यू” म्हणायचे म्हणजे आपल्या मनात हा शब्द त्याच अर्थाने म्हणजे एका तरुणाने एका तरुणीवर व्यक्त केलेले प्रेम होय. जर इंग्रज असता आणि त्याने "आय लव यू म्हटले तर मी तुझ्यावर प्रेम करतो” म्हणजे तो आपल्या मुलांवर, आई-वडिलांवर, नातेवाईकांवर प्रेम करतो असा होतो. इंग्रजांमध्ये त्यांना व्यक्त व्हावं लागतं. "आय लव यु” म्हणावं लागतं. तर आपल्या संस्कृतीत मात्र व्यक्त न होता आपण प्रेम करत असतो. मग ते आई-वडील असो, नातेवाईक असो, शेजारी-पाजारी असो, मित्र-मैत्रिण असो की पत्नी असो व पती व सहकारी.
आपलं प्रेम हे भावनेने, स्पर्शाने, देहबोलीने, नजरेने व केलेल्या कृतीने प्राणी आणि पक्षाप्रमाणे असत आणि आपण एकमेकाला समजून घेत असतो. हे खरं प्रेम हृदयातील व डोळ्यातलं असत. हे आँखो, आंखो मे प्यार हो जायेगा असं असतं. सध्याचं युग हे प्रस्तुती करण्याचे आहे. आता कोणाला थांबायला वेळ नाही. सध्याचे युग हे एकमेकाला परखतील, एक तर गाडी निघून जाईल नाही तर अपघात तरी होईल. तेव्हाही प्रेम विवाह व्हायचे; पण फारच तुरळक. १९९१ नंतर जागतिकरण झाले आणि संपूर्ण राहणीमानामध्ये कायापालटच झाला. हल्ली प्रेमाचा हंगाम खूप जोरावर आहे व त्याला सुगीचे दिवस आलेले आहे आणि त्याचे रूपांतर प्रेम विवाहाच्या पिकांमध्ये परिवर्तित होतांना दिसत आहे. म्हणतात की, हे वयच असं असतं, पागल होण्याचं, धुंद होण्याचं, आई-वडील खलनायक वाटण्याचं. ह्या प्रेमात ती आणि तो ह्याशिवाय काहीही दिसत नाही. आणा भाका, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थिती झाली असते.
काही दिवस, महिने व वर्षे झालीत आणि बाईसाहेबांना किचन दिसले की प्रेमाचा वधारलेला शेअरचा भाव गर्रकन खाली कोसळतो. हे तिचे, त्याचे प्रेमाचे शेअर कोणीही घेत नाहीत. ते मातीमोल झालेले असतात. ह्यांना प्रेम म्हणजे मजा हेच माहित असते. पण प्रेमाची दुसरी बाजू जबाबदारी ही यांना माहीतच नसते आणि माहित जरी असली तरी ते सोयीस्कररीत्या टाळत असतात. बरं प्रेम विवाहात जोखीम बरीच असते, एक तर त्यांनी घरच्यांना दुखावलेलं, नाराज केलेलं असतं. त्यांच्या भावना दुखावलेल्या असतात आणि ज्याची निवड केली तो किंवा ती कशी निघणार आहे ह्याची काहीच ग्यारंटी नसते. जरी प्रेम विवाह हे यशस्वी झाले असले तरी भारतात घटस्फोटाचे प्रमाण हे प्रेम विवाहवाल्यांचे जास्त आहे. भारतात सुप्रीम कोर्टाच्या नुसार प्रेम विवाह हे घटस्फोटाचे महत्वपूर्ण कारण आहे. युनिसेफ नुसार प्रेम विवाहाचे घटस्फोटाचे प्रमाण हे ५५ % आहे तर अरेंज मॅरेजचे फक्त ४ % आहे.
सुरुवातीला फक्त प्रेम असतं. ह्या प्रेमात दोघेही एकमेकांच्या चुकांवर अंथरून घालत असतात किंवा दुर्लक्ष करीत असतात. परंतु काही दिवसानंतर हे एक्सपोज होतात आणि आता एकमेकांचे दोष दाखवायला लागतात आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवर खटके उडायला लागतात. ह्यांना प्रेमासोबत जबाबदारी असते व एकमेकांसाठी बलिदान करायचे असते हे विसरूनच जातात आणि आता इगो निर्माण होऊन ते एकमेकांना दोष काढून त्याचे रूपांतर भांडणात होऊन घटस्फोटात होते. इथे बऱ्यापैकी प्रेमाचा झरा बंद झालेला असतो. आता कालपर्यंत मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही ते आता मी तुझ्या शिवायच जगू शकतो अशी दोघांची भावना निर्माण झालेली असते. पण हे का होते तर ह्याला कोणी कुटुंबातला सोबतीला नसतो, आधार नसतो आणि विशेष म्हणजे एकमेकाला समजून घेण्याची क्षमता संपून गेलेली असते व एकमेकांविषयी बलिदान करण्याची इच्छा नसते. अरेंज मॅरेजमध्ये जोडणारे बरेच दुवे असतात. सहजासहजी ते तुटू देत नाही किंवा टोकाची भूमिका घेत नाहीत. प्रेम करा, प्रेम विवाह करा, अरेंज मॅरेज करा - प्रेम करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांसाठी बलिदान करा. ते टिकवा, शेवटपर्यंत न्या. ह्यातच खरे प्रेम दडलेले आहे. नाही तर मग मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाहीतर मी तुझ्याशिवायच जगू शकतो ही वेळ येईल. ही वेळ कोणत्याही प्रेमवीरांवर येऊ नये अशी मनोकामना आपणह्या प्रेम दिवसाच्या निमित्य करू या. प्रेम दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रेम करायचे आहे ना मग प्रेम दिवसाची वाट कशाला? दररोजच प्रेम करू या व आपले विश्वच करुणामय करू या. - अरविंद मोरे