मुलाखत
सुहास नुकताच एम. ए. इतिहास विषयात ‘नेट' परिक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याची उदया मुलाखत मंगळवेढ्याच्या सिनियर कॉलेजला होती. प्राध्यापक पदाची पूर्ण वेळ जाहिरात पेपरला त्यांनी पाहून अर्ज केला होता. कालच पोस्टमन येऊन मुलाखतीचे कॉल लेटर देऊन गेला होता. सुहासची ही मुलाखत या महिन्यातली तिसरी मुलाखत होती. परंतु सुहासला हे लक्ष्यात येण्यास बराच वेळ लागला होता की कारण मुलाखतीच्या अगोदर जाहिरात येण्याच्या अगोदर सगळंच फिक्स असतं.
सुहासचे वडिल एका साखर कारखान्यात कामाला होते. खूप कष्टातून त्यांनी त्याला शिकविले होते. सुहासला एक बहिण होती तिचे नाव अंजू होते जन्मतः अंध होती. अशा परिस्थितीतून सुहासने शिक्षण पूर्ण केले होते. सुहास सकाळी उठून तयार झाला सुहासच्या मुलाखतीची वेळ बाराची होती. आईनं सकाळी उठून डबा तयार केला. तो घेऊन मुलाखतीची तयारी करून बॅगेत सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तो निघाला. तेवढ्यांत वडिल सुहासला ‘थांब' म्हणतात. थोडे पैसे सुहासच्या खिशात टाकतात. तिकिटाचे पैसे घेऊन आई वडिलाच्या पाया पडून बस स्टँडला सुहास येतो. बसमध्ये बसून वेळेच्या आत मंगळवेढ्याच्या कॉलेजवर पोहचतो. तिथे पहातो लोकांची गर्दी बरेच लोक मोठमोठ्या गाड्यातून आले होते. बऱ्याच लोकांनी आमदारांची ओळख आणि शिफारसपत्र सोबत आणले होते. सुहासकडे यातलं काही नव्हते. तरी तो शांत होता. इतक्यात त्याच्या ओळखीचा सीताराम पोकळे दिसतो. सीताराम हा वर्ग मित्र असतो, तो बीडहून आला होता.
प्राचार्य कक्षाच्या बाहेर फलकावर क्रमाने विषय लिहिले होते. एकूण १० विषयाच्या आजच मुलाखती होत्या. त्यात इतिहास विषयाचा ८वा नंबर होता. त्यामुळे सीताराम म्हणाला, ‘सुहास चल आपल्या विषयाला वेळ आहे. चल कुठे तरी चहा नास्ता करू'. तेवढ्यांत सुरेश म्हणाला, ‘चहा नास्ता कशाला मी डबा आणलाय जेवणच करु या.' तेवढ्यात सीताराम म्हणाला, ‘तू जेवण कर मी चहा घेतो.' कारण सीताराम ची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडिल गवंडीकाम करत. त्या वेळी सुहास म्हणतो, ‘चल एक चपाती खाऊन घेऊ मित्रा' असं म्हणून ते कॉलेज कॅन्टिनकडे येतात. दोघे जेवण करतात. चहा घेऊन पुन्हा मुलाखत देण्यास सज्ज होतात.
सायन्स शाखेच्या मुलाखती सुरु होत्या केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झु-लॉजी, मॅथस या विषयाच्या मुलाखती संपल्या. त्यानंतर कला शाखेच्या मुलाखती सुरु झाल्या मराठी, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र असा क्रम होता. त्यानुसार मुलाखती होत होत्या. उमेदवार जात होते प्राचार्य कक्षाच्या बाजूची गर्दी ओसरू लागली आणि चार वाजता सुहास आणि सीताराम दोघांची मुलाखत संपली. दोघानांही दोन तीन मिनिटात नाव, गाव, पत्ता, शिक्षण विचारून जायला सांगितले. शिपाई हळूच म्हणाला, ‘सर साऱ्या जागा फिक्स आहेत तुम्ही कुठून आलात?' असं म्हणल्यावर सुहास म्हणाला ‘मी लातूरहून आलो आणि हा बीडहुन आला.' एवढं ऐकल्यावर शिपाई म्हणाला, ‘सिनियर कॉलेजच्या जाहिराती नावालाच दिल्या जातात माणसं अगोदरच घेतात...' असं म्हणून तो निघून गेला.
तसे दोघे हळूहळू मंगळवेढा बसस्टँड कडे आले. सुहास म्हणाला, ‘मित्रा येथे तीच बोंब नोकरी लागणं, प्राध्यापक होणं मृगजळासारखंच आहे. माझी या महिन्यातील तिसरी मुलाखत.' तर सीताराम म्हणतो, ‘माझी तर पाचवी आहे. काय करावं कळत नाही. सरकारी नोकरी दुर्मिळ झाली. संस्थेवरती लागणं अवघड आहे. चला निघतो.' असं म्हणून सुहास सोलापूर गाडीत बसतो. गाडी सुरु होते.
दुसऱ्या पुन्हा जळगावच्या कॉलेजची जाहिरात आली होती. त्याचं कॉल लेटर घरी आलं होतं. सुहास पुन्हा विचार करत होता. मुलाखतीस जावं की नाही ? तिकिटाच्या पैशांची जुळवाजुळव कशी करावी. घरी बसून तरी नोकरी मिळणार तर नाही. दहा धोंडे तर मारावे तर लागतील? एखादा तरी लागेल असं मनात विचार करत पुन्हा नव्या उमेदीने मुलाखतीला निघाला.
-प्रा पी एस बनसोडे