सहज उठून जावे तसे
एकटे राहताना फार पूर्वीपासून, १९७८ पासून दादा म्हणायचे, ”आपण सहज एक वृद्धाश्रम काढू !”
या भावी वृद्धाश्रमात आपल्या घरात बदल करून कशी रचना करावी, व्यवस्था ही कशी हवी याची पूर्ण कल्पना दादांच्या डोक्यात पक्की रुजली होती.
हॉलच्या पुढच्या दाराला, दार सताड उघडून त्या हॉलचे स्टेज करून लहान मुलांचे कार्यक्रम तिथे व्हावे हे त्यांनी ठरवले होते. काळे का्याचे तुळशी वृंदावनाचे शिल्प लावून घेतले. खूप झाड त्यांनी आणली.
गच्चीला एक चार फुटी भिंत पॅरापिट वॉल करून फक्त आराम खुर्ची गच्चीत ठेवून दादा सूर्योदय बघत बसत. काहीही करण्याचे कारण देत सहजच वर जात.
पूर्व दिशेला उगवतो तो राव,
त्याचे सूर्यदेव नाव!
म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त बघणे ते कधीच टाळत नसत. संध्याकाळी पश्चिमेला सूर्यास्त, रात्री चांदण्या बघत, ते तिथे बसत असत. अगदी शेवटचे काही दिवस त्यांना आजारपणामुळे घरातच पडून राहावं लागलं. मात्र त्यावेळीही नक्कीच ते मनाने कुठे ना कुठे फिरून येत असतील.
बुद्धीचा खुराक म्हणजे वाचन व मनाचा खुराक म्हणजे गप्पा, असे दादा म्हणत असत. दोन्ही टाईमपास त्यांना खूप आवडत होते. बाग, गप्पा हे सर्व त्यांना फार आवडत असे. सर्व काही आकारणी सहजच करायचं असतं ते म्हणत.
सहज सहज सगळं करताना, सहज सहज उठून जावं लागतं, असंही ते म्हणत. वृद्धापकाळामुळे झोप येत नाही म्हणून पहाटे खुडबुड करायची, इतर घरच्यांची झोप मोड करण्याची वृत्ती असलेले वृद्ध आपण पाहतो. ते ईतर लोक चिडून चिडून ‘म्हाताऱ्याला झोप येत नाही, म्हणून उठतो आणि आम्हालाही उठवतो असं म्हणून करवादतात. दादा सकारात्मक होते. ते अगदी काही बोलू शकत ना.. तेव्हा त्यांच्या अस्तित्वाने ती खोली गजबजलेली असायची.
दादांना वेगवेगळी वचन, जीभेवर तोंडपाठ येत असत. ते खडे आवाजात ओव्या भजन म्हणत...
कोणाचे हे घर?
हा देह आहे कोणाचा?
आत्माराम त्याचा तोच जाणे!
पक्षी अजगर न करिती संचित,
तयासी अनंत प्रतिपाळी!
पावसाबद्दल पण त्यांची वचन ते सांगत असता, त्यांचे डोळे चमकून उठत.
बघा पडतील मघा ,तर ढगाकडे बघा! पडतील स्वाती, तर पिकतील मोती!
माणिक बोलती !
मोकळी स्वाती,
तर कापूस मिळेना वाती!
पत्नीच्या मृत्यूनंतर ते सांगत,
मी येतो सांभाळा,
म्हणूनच मुन्नुचे आई तुम्ही पुढे पळाला! अंधाऱ्या वाड्यातील संपली यात्रा,
भरल्या घराचा उडाला पत्रा!
अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नसतं. प्रत्येक जणांना कधीतरी जायचं असतं. मीही कधीतरी दादाच्या मागे जाणार.
अनाथ कोण आहे यहा,
त्रिलोकनाथ साथ हा !
कसे असावे संसारी?
उठून जाता येईल झटकरी,
असे असावे संसारी !
आज कानावर पडले की दादा वृद्धाश्रमातून देवाचे आश्रमात गेले आहेत. सहजच उठून जावे तसे.
-शुभांगी पासेबंद