दुसरा ताजमहाल
फेब्रुवारी महिना.. मी रात्रीच्या ट्रेनने कोकणात माझ्या गावी चाललो होतो. खरं तर ट्रेनला गर्दी होती कारण मालवणजवळील आंगणेवाडीची उद्या जत्रा होती. दरवर्षीप्रमाणे लाखो चाकरमानी देवीच्या दर्शनाला निघाले होते. मी मात्र माझ्या काही कौटुंबिक कामासाठी निघालो होतो. माझे टू टायर रिझर्व्हेशन होते, त्यामुळे मी बिनधास्त होतो.
गाडी ठाण्याला आली आणि या डब्यात काही प्रवासी चढले. माझ्या समोरच्या बर्थवर एक अंदाजे साठ वर्षाचा गोरा, उंच, भरदार तब्येतीचा गृहस्थ पाय ओढत ओढत चालणारा हातात होलडॉल घेऊन बसला, त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी बहुतेक फिक्कट आणि आजारी दिसणारी, छोटी पर्स घेऊन शेजारी बसली.
माझा अंदाज होता, हा माणूस लष्करातील असणार आणि पंजाबी असावा.
”आप फौजी है क्या?”
”येस येस, आय एम रिटायर्ड कर्नल, कर्नल हरमीतसिंग अँड माय वाइफ वनिता सिंग.”
”आप गोवा जा रहे है क्या?”
”नही, मालवण जा रहे है!”
”मालवण?”
”हा, मेरी बीबी मालवणकी है ना.. वनिता कदम.”
”अरे वहिनी तुम्ही मालवणचे?”
”होय हो, आमचा घर मालवणात मेंढ्यात आसा.. म्हणजे आता थय कोण रवना नाय.. पडला बहुतेक.. माजा लहानपण मालवणात गेला.”
वहिनी सांगू लागल्या. पण हे बोलताना पण त्याना कष्ट पडत होते. श्वास लागत होता.
”तुमची तब्येत बरी नाय की काय?”
”येस, कल रातको उसे बुखार था. ऐसा दो दिनसे बुखार आ रहा है, फिर दिल्ली से मुंबई आना, इससे वो थक गयी है. चलो चलो, सो जावं..”
असं म्हणत कर्नलने तिचे अंथरूण घातले आणि हाताला धरून तिला टॉयलेटला घेऊन गेला आणि तिचे तोंड पुसत तिला झोपवले. मग कर्नलने आपले अंथरून एका बर्थवर घातले आणि एक इंग्लिश पुस्तक वाचू लागला. मग मी पण माझ्या बर्थवर झोपी गेलो.
पहाटे पाच वाजता गाडी रत्नागिरी स्टेशनवर आली आणि डब्यात चहा.. कॉफी करत पोरे येऊ लागली, तसा कर्नल खाली उतरला.. त्याने खालच्या बर्थवर झोपलेल्या पत्नीकडे पाहिलं आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. मला पण राजापूरला उतरायचं होतं म्हणून मी पण उठलो आणि तोंड धुवून कॉफीची वाट पाहू लागलो. कॉफीवाला पोरगा जवळ येताच मी कर्नलला विचारले
”कर्नल, कॉफी लेंगे..”
”हा हा जरूर.”
मी दोन कॉफीची ऑर्डर दिली आणि बोलू लागलो.
”तुम्हारी वनिता कदमके साथ मुलाकात कहा हुई?”
”जम्मूमे.. जम्मूमे कॅप्टन प्रशांत कदम मेरे पडोसी थे, याने मेरे सुपीरिअर.. तभी मै अकेला था.. लष्करमे नया नया जॉईन हुवा था, मेरी माँकी मुझे बहुत याद आती थी.. कॅप्टन कदम मुझे अपने घर लेके जाते थे, उनकी बेटी वनिता.. पहचान हो गयी और प्यार हो गया..”
”और कॅप्टन कदम और उनकी पत्नी?”
”कॅप्टन कदम कारगिलवॉर मे शहिद हो गये और वनिता की माँ दो साल पहले उपर गयी. वनिता उनकी एकलौती लडकी.. अब उसका मैका नही रहा.”
”तो आप मालवण ज्या रहे है?”
”हा.. मालवण तो जाना है, मगर वनिता की ऐसी हालत मे आना बोले तो.. उसकी भराडी देवी है ना.. मालवणके पास उसको फुल चढना है, कल यात्रा है ना देवीकी?”
”हा हा, कल भराडीदेवी की यात्रा है, इसलिये सब ट्रेनमे रश है.”
”वनिताभाभी हर साल आती है क्या, देवीकी ओटी भरने?”
”नही तो.. कई साल हो गये.. कॅप्टन कदम जानेके बाद, शायद वो नही आयी, मगर..”
”मगर क्या कर्नल?”
”वनिताको ब्रेस्ट कॅन्सर हुवा था लास्ट इयर.. सब अच्छे ट्रीटमेंट किये.. रेडियशन.. केमो.. ऑपरेशन.. मेडिसिन. अब ऐसी अच्छी है वो, मगर उसने भराडीदेवी को मनही मन बोला था.. अच्छी हुई तो तेरे जत्रामे आकर फुल चढाऊंगी. आठ दिनसे उसे बुखार है, फिरभी उसे संभालते संभालते ले आया.”
”अच्छी जोडी है तुम्हारी? एक दुसरे को काफी प्यार करते हो तुम दोन्हो.”
”वनिता जैसी बीबी.. क्या बोले तो... लाईफ पार्टनर शायदही किसी को मिली होगी.. कारगिल वॉरमे मेरे पावमे गोली घूस गयी थी.. मै छे महिना हॉस्पिटलमे था.. वही टाइम कॅप्टन कदम वॉरमे शहीद हो गये थे.. याने वनिता और उसकी मम्मी बहोत दुखमे थे.. फिर भी वनिताने मेरी ऐसी देखभाल की.. कौनसीभी ट्रेन नर्स नही कर सकती.. हमारे लष्कर हॉस्पिटल के सर्जनने कहा, तुम्हारी बीबीके कारण तुम बच गये. मै ये नही भूल सकता.. उसे अच्छा लगे तो वो जहांँ कहेगी वहा उसे ले जाऊंगा.”
”और कहा जाना है मालवणमे?”
एवढ्यात वनिता जागी झाली.. बर्थवर उठून बसली.
”हो दादा, देवींची ओटी भरतलंय.. खुप दिवसांनी आंगण्यावडीची जत्रा फिरतलंय.. मग मालवणचो समुद्र.. जेटीवर हरमीतचो हात हातात घेऊन फिरतलंय.. किल्यावर जातलंय.. साळगावकरानी नवीन गणपती मंदिर बांधला.. त्या गणपतीक नमस्कार करतलाय, मालवनातले ताजे मासे जेवतालाय.. खुप खुप इच्छा आसा माजी.”
”होय वनिता, चार दिवस मालवणात मजा कर.. तुझा माहेर ता.. तुजो हो नवरो.. इतको तुझ्यावर प्रेम करता, इतिहासात शहाजनान आपल्या बायकोसाठी ताजमहाल बांधल्यान, हो तुजो हरमीत तुझ्यासाठी दुसरो ताजमहाल बांधित.”
त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी रुमाल काढून डोळे पुसू लागलो.
एवढ्यात कर्नल मला म्हणाले..”मैने सुना, ये जत्रामे बहोत रश होता है, वनिताको काफी संभालना पडेगा.”
”आप फिकर मत करो, मेरे एक वहाके पुजारी अंगणे पहचानवाले है, मै उनसे बात करता हू.”
मी माझा मित्र प्रकाश आंगणे याला फोन लावला आणि उद्या हरमीतसिंग आणि वनिता तुला भेटतील, तेंव्हा त्याना लगेच दर्शन घडवून देण्याची विंनती केली. मी माझे कार्ड कर्नलच्या हातात दिले आणि एकमेकांवर प्रेम करणारी जोडी प्रवासात भेटावल्याबद्दल देवी भराडीला मनातल्या मनात नमस्कार केला.
-प्रदीप केळुस्कर