उंबराच्या झाडाखाली दत्त वस्ती

दत्त संप्रदायामध्ये काही खर्च नाही. नारळ कापूर उदबत्ती नाही घेतली तरी दत्त महाराजांना दोन हात व तिसरी मस्तक असली की त्यांना नमस्कार पोचतो असा हा बिन पैशाचा मार्ग. खडीसाखर नारळ किंवा उदबत्ती घेऊन माझ्याकडे या असे देव कोणालाही सांगत नाही. अखंड सृष्टीचा मालक तो काही भिकारी असणार आहे का?

अध्यात्मिक गोष्टी आजीला ठाऊक होत्या. दिवसभर शेतामध्ये काम करून रात्री जेवण झाल्यानंतर अंथरुणावर आडवी झाली म्हणजे बऱ्याच देवाची नावे घेऊन झोपी जात होती. हा तिचा नित्य नियम असायचा.  मला कळते असे आजी रोज देवाचे नाव घेऊन झोपी जायची. आज गुरुवार दत्ताचा वार अखंड जगातील लोक दत्त दर्शनाला जाणार. सदा सर्वदा तो पाठीशी, दत्तगुरु अवतार करण्या भक्तांचे कल्याण.  सोयीनुसार माणसांनी तयार केलेले देव हे सुद्धा काही मागत नाहीत. नारळ, फुले, फळे हे देवांनीच निर्माण केली आहेत ते काय  म्हणून मागतील? हे सारे पदार्थ भक्ताला लागतात, देवाला नाही.  देवाची भक्ती केल्यामुळे त्याला या वस्तू खाण्यासाठी लागतात. देवाचा यामध्ये काही संबंध नसतो. देवाची तक्रार नसते तक्रार असते फक्त पुजाऱ्याची. पुजाऱ्याची पोट भरली म्हणजे देवाचे भरले असा भाविकांचा समज आहे असे त्यांच्या मनाला वाटत राहते.
उंबराच्या झाडाला फक्त आणि फक्त उंबरे दिसतात; पण फुल दिसत नाही. फुल आहे तिथे फळ आहे. परंतु उंबराच्या झाडाचे फुल कोणालासुद्धा दिसत नाही. फक्त नशीबवान माणसाला दिसते असे आजी म्हणते. उंबराचे एक एक फुल गाडीच्या चकरा एवढे मोठे असते. त्याचा प्रकाश फार लांबून दिसतो. पण हे पाहण्यासाठी नशीब लागते असे पूर्वीपासून लोक सांगत आले आहेत. यावर मी म्हणालो तुला उंबराचे फुल दिसते का? ते मी सांगणार नाही. झाला चमत्कार कोणास सांगू नये, लटकेपणाने सांगितला पुन्हा होणार नाही. मला अमुक दिसली तमुक दिसले हे कुणी कुणाला सांगत नाही. कारण समजा एखाद्या माणसाने सांगितले तर तो म्हणेल आम्हालासुद्धा सांगा म्हणून सांगण्याच्या भानगडीमध्ये कुणी पडत नाही. मंदिरामध्ये अनेक लोक जाऊन नवस करतात, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मंदिरात जाऊन माझे अमुक काम होऊ दे तुला मी घंटा बांधीन. देव फक्त ऐकून घेतो. कारण देव ही एक संज्ञा आहे काम होण्याची वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्या वाऱ्या काही कमी नसतात...।

....कामे झाली तर तो भक्त म्हणतो देवाने माझे काम केले. खरंतर देव ही एक संज्ञा असल्यामुळे देवाचा व कामाचा यामध्ये काही संबंध येत नाही. देव हा मार्ग दाखवतो त्या मार्गाने मानवप्राणी गेला तर त्याला यश नक्की मिळते, पण तशी श्रद्धा हवी. बरीच लोक नवस करतात पण ही नवसे का म्हणून करायची प्रत्येकाचे काम वेळ आल्यानंतर होत असते तोपर्यंत या मानव प्राण्याला गडबड झालेली आहे. माझे काम लवकर व्हावे म्हणून तो देवाकडे साकडे टाकायला जातो हा सारा समाज आहे. शेतामध्ये कष्ट करायचे नाही आणि देवाला म्हणायचे मला एक खंडी ज्वारी होऊ दे. त्याला ज्वारी होणार आहे का ? वेळच्या वेळेला पिकाला पाणी दिले पाहिजे, खते घातली पाहिजे भांगलण-डुंगलण वेळच्या वेळी केली पाहिजे. कष्टातून ज्वारी तयार झाली पाहिजे असे काहींना वाटतच नाही. सारखे देवाजवळ काहीतरी मागत राहायचे हे चुकीचे आहे. मानव प्राण्याच्या मागण्या फार झाल्यामुळे देव सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत, अशी समस्या निर्माण झाली आहे. देवाजवळ एक रुपया टाकायचा आणि मागण्या मात्र भरपूर मागायच्या. एका रुपयामध्ये मागणी पूर्ण होईल का? हा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. सुख मागायला देवाकडे जायची दुःख कोणी उचलायचे सर्वजण सुख मागतात. सुख हे माणसाचे वैरी आहे आणि दुःख हे माणसाचे कैवारी आहे. मग सुखाला का म्हणून बोलवायचे हा प्रश्न निर्माण होतो. उंबराच्या झाडाखाली दत्तात्रय भगवान यांची वस्ती असते म्हणून लोक उंबराच्या पाया पडतात ही पारंपरिक पद्धत आजपर्यंत चालू आहे. हे कलियुग आहे या कलियुगामध्ये नामस्मरणाला फार मोठी किंमत आहे. कलियुगात देव कोणालासुद्धा दिसणार नाही. स्वतःचा संसार सोडून काही लोक हिमालयामध्ये देवाला शोध आहे गेली आहेत. पण हे सारे अशक्य आहे. पूर्वीची पुण्याई असेल तर हे सारे घडून जाईल. पाठीमागची पुण्याई नसेल तर देव तर भेटणारच नाही; पण या उघड्या जगातील माणसे मात्र नावे ठेवतील. हे सारे देव पाहत असतो आणि माणसाची मजा सुद्धा बघत असतो.
पोटासाठी देवाच्या नावावरती काहीतरी उद्योग करायचे आणि पोट भरायचे हे चुकीचे आहे. अशाने संसार होत नाही संसारासाठी कष्ट हवे. देगा देवा पलंगावर तसे कधीच होत नाही. स्वतःचा संसार करून रात्री एक वेळा देवाचे नाव घेतले तर त्याला हाक ऐकू जाते. संसार सोडून किंवा संन्याशी होऊन सारे प्रश्न मिटत नाहीत. संन्यासी होणेसुद्धा नशिबात असावे लागते. अंगावर भगवी कपडे परिधान करून गावोगाव फिरणे आणि पोट भरणे याला संन्याशी किंवा साधू कुणी म्हणत नाही. आम्ही गावोगाव फिरणारे संन्याशी साधू यांचा देवाशी काही संबंध नसतो. अशा अनुसंन्याशाच्या खोट्या वागण्यामुळे खरा देव किंवा खरा साधू कोण दिसत नाही. देवाच्या नावावर मार्केट करून फिरणारी मंडळी स्वतःचं पोट भरत आहेत आणि उघड्या जगातील लोकांना फसवून टोप्या घालीत आहेत. हे लोकांच्या लक्षात येत नाही. भगवी कपडे परिधान केल्यामुळे हा देव आहे, हा साधु आहे असे समजून त्याला घरात बोलवतात. अगोदर संसाराचे गाऱ्हाणं त्याला सांगतात तेच त्यांना साधू सांगतो अशी ही कलियुगातील मंडळी होय...। 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खेड्यातला उरुस