खेड्यातला उरुस
उत्सव आणि उत्साह हे समीकरण कोकणी माणसाला विशेष भावणारे आहे. समाजात सर्वधर्मसमभाव जपण्याचा तो एक विशेष मार्ग आहे. आपुलकी आणि परोपकार ह्याचे मनोमिलन म्हणजे कोकणातील खेड्यात साजरा केला जाणारा उरुस म्हणजेच उत्सव!
कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात माघ महिन्याच्या पौर्णिमेला सर्वत्र पीरांचे उरुस साजरे केले जातात. थेट रत्नागिरी शहरातील हतीस येथील शेख बाबर शाह वली साहेबांचा उरुस हा सर्वधर्मसमभाव जपणारा एक पारंपरिक उत्सव समजला जातो. तेथील प्रशासकीय यंत्रणाच मजार शरीफवर फुलांची चादर वाहुन आपला आदर व्यक्त करते. हिंदू-मुस्लिम एकतेचा हा एक विशेष संदेश होय! तसेच संत-पीर परंपरेचा हा सन्मान आहे...पीर अवलिया यांच्या भावनिक अस्तित्वाला मनस्वी सलाम!
गंगा-जमनी तेहजीब ही पूर्वापार जपली जायची तशीच आजही कोकणात सजीव आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे गावांतील दोन ठिकाणी चार दिवसांचे अंतर सोडून माघ महिन्याच्या पौर्णिमेला सुवासिक संदल तसेच भरगच्च भरलेल्या फुलांची चादर दोन ठिकाणच्या बाबांच्या मजारीवर वाहून आदराने उत्सव साजरा केला जातो. याला पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित राहतात. ज्यामध्ये आया-बहिणींची तसेच लहान मुलांची उपस्थिती विशेष असते! सर्वत्र आनंदी वातावरणात ग्रामजीवन भरुन जाते.
हजरत सुलेमान शेख (र.अ.) यांचा उरुस माघ मासाच्या ‘जया एकादशी' रोजी दिवसा साजरा केला जातो. खरंतर पूर्वी आम्ही लहान असतांना पीर बाबांच्या आसपासच्या जागेतच संदल गायले जायचे. पीरांचे शौर्य गायले जायचे. हजरत सुलेमान शेख नाना यांचा दर्गाह नसून त्यांचे अध्यात्मिक जीवन आणि त्यांचे एकुणच माणूस म्हणून जगण्याची दीक्षा देणारे मौलिक कार्य तेथे निर्सगाने आजही सजीव असलेल्या वडाच्या बुंध्याशी बसून होत असे. तीच त्यांची अध्यात्माची जागा. नांनाच्या मजारीवर समोरुन वअरबी समुद्र स्पष्ट दिसतो तसेच समुद्र किनारी वसलेली स्थानिकांची वस्ती सुद्धा दिसते. उर्दू - अरेबिक भाषेतील संदल गायन संपल्यावर तेथेच शिजवलेले डेगीतले गोड भात नियाज (प्रसाद) म्हणून सर्वांना दिले जाते. भाविक आवडीने तेथेच खातात. जातायेता वाटसरू पीर बाबांना आदराने सलाम-नमस्ते करायला विसरत नाही. हा करिष्मा आहे त्यांच्या भावनिक अस्तित्वाचा!
माघ महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्र उगवलेला अन एसटी स्टँड नजिकच्या जागी असलेला हजरत मेहमूद शहीद पीर (र.अ) यांच्या दरगाहचा पारंपरिक वार्षिक उरुस कोळथर जमातुल- मुस्लिनच्या वतीने साजरा केला जातो. त्यावेळी पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सवात सामील होतात. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दुपारी ४ ते रात्री १० पर्यँत बाबांचे संदल भाविक लेझमाच्या तालावर ढोल-ताशाच्या गजरात साजरे केले जाते. सनईचे सूर सर्वत्र सांगितिक लहरी तयार करतात. यांमध्ये उपस्थित भाविकांचा समावेश आजही होतो. ही परंपरा जपली गेली पाहिजे. एकतेची ही अनोखी ओळख पारंपरिक होती, आहे आणि यापुढे ती अशीच रहावी, हिच सदिच्छा!
भाविक मोठ्या संख्येने संदल शरीफ मध्ये शरिक होतात. यांत सहभागी होणारे बहुतांशी स्थानिक असतात. त्याशिवाय आतां शैक्षणिक कारणाने कुटुंबासहित चांगल्या सुविधेसाठी शहरांत स्थलांतरित झालेले भाविक उत्सवी मनाने आपल्या गावी येतात व बंद घराची कुलुपे उघडुन त्यांत राहतात. उरुस हे एक कारण म्हणा, पण ह्याच नात्याने गावकऱ्यांस भेटतात. एकमेकांची गळाभेट होते. मराठी मिश्रित कोकणीत बोलतात! आनंदी वातावरणात आपल्या पाल्यांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. स्वतः रमतात तसेंच ग्रामीण कौटूंबिक जीवनाचा वेगळा पैलू अनुभवतात. शहरांत शोधून सापडत नसेल ते वैश्विक सुख काही क्षणासाठी का होईना त्यांना आपल्या गावी अनुभवायला मिळते! उरुस, उत्सव हे एक निमित्त असेल, त्यांतच दडलेले भावनिक सुख गावांत सहपरिवार आल्याने मिळते, यांत दुमत नसावे!
श्रमदानातून गावाचा विकास घडू शकतो हे आमच्या लहानपणी गावांत शिक्षण घेतल्याने अनुभवले आहे. विशेषतः आपण ज्या ठिकाणी राहतो, जेथे आपले वडिलोपार्जित घर आहे, त्याच्या परिसरातील घाण, कचरा, काटाकुटा काढून त्याची व्यवस्थित बेनणी करुन सामाजिक आरोग्य जपता येते. उरुस किंवा उत्सवात असेही सहभागी होता येते. श्रमदान हेच खरे सशक्त निरोगी परीसराचे द्योतक होय. उत्सवी, उत्साही जनजीवन अशा वार्षिक उत्सवांतून सशक्त होण्यास पूरक ठरत असेल तर गावात अशा वेळी निश्चितच गेले पाहिजे हा पण मनोमनी करावा लागेल. कोकणातील खालूबाजा हे एक नावाजलेले वाद्य आहे. अलिकडे खूप लोकप्रिय झालेले कोकण मेळा म्हणून जो वार्षिक इव्हेंट दुबई येथे साजरा केला जातो, त्यामध्ये सनई आणि खालू बाजाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये आर्थिक उलाढालीत कोकणी माणूस बराच व्यस्त झालेला दिसतो. स्थानिक कलेला सुगीचे दिवस आले आहेत.
अशा वार्षिक उत्सवाची पूर्व परवानगी प्रशासनाकडून लेखी घ्यावी लागते. मंजुरी मिळताच स्थानिक आऊट पोस्टचे पोलीस अधिकारी बंदोबस्त चोख ठेवतात. जेणेकरून उत्सवी वातावरणास मद्यधुंदीतले तसेच नव्याने उदयास आलेले गर्दुल्ल्यांचा उपद्रव होऊ नये याची काळजी घेतात व सदल आनंदी वातावरणात पार पडावे, याकरिता स्थानिक जमातुल मुस्लिमीनचे पदाधिकारी व इतर स्वयंसेवक विशेष काळजी घेतात. उत्सव आणि उत्साह हे समीकरण कोकणी माणसाला विशेष भावणारे आहे. समाजात सर्वधर्मसमभाव जपण्याचा तो एक विशेष मार्ग आहे. आपुलकी आणि परोपकार ह्याचे मनोमिलन म्हणजे कोकणातील खेड्यात साजरा केला जाणारा उरुस म्हणजेच उत्सव! या, कोकण आपलंच आहे, भाऊबंद आले गावाला, उत्साही मनातला आनंद द्विगुणित झाला. - इक्बाल शर्फ मुकादम