पाचरट : नव्या वेठबिगारीचे वास्तव मांडणारी कादंबरी
अलिकडे वेगळ्याच कारणांसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ऊसतोड मजूर पुरविणाऱ्या बीड जिल्ह्यातील दुष्काळ, एकही लघू-मध्यम व मोठा उद्योग नसलेला जिल्हा अशी ओळख, भूमिहीन, अल्पभूधारक आणि कोरडवाहू जमीनी, इ. मुळे निर्माण झालेले दारिद्रय, व्यसनाधीनता, हुंडा पद्धती स्त्रीभ्रूण हत्यांचे केंद्र व विषम लिंग गुणोत्तर याचे अतिशय वास्तव मांडणाऱ्या श्री.अशोक नजान सर लिखित पाचरट कादंबरी ९ फेब्रूवारी २०२५ रोजी प्रकाशित झाली. दारुण वास्तव मांडणारी ही कादंबरी असल्याने या कादंबरीचे वाचक नक्कीच स्वागत करतील असा विश्वास आहे.
बीड जिल्ह्याच्या गावगाड्यातील विविध जाती धर्मातील भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी यांच्यातील समान धागा म्हणजे अठराविश्वे दारिद्रय. त्यातून वाढलेले कर्जबाजारीपण आणि विविध संकटांची मालिका यामुळे हतबल झालेल्या कष्टकरी ऊसतोड मजूरांची दशा अतिशय सहजसोप्या भाषेत मांडली असून बीड जिल्ह्यातील बोलीभाषेमुळे त्यात वेगळाच रंग भरला आहे. ग्रामीण भाषेतील शिव्या, वाक्प्रचार, म्हणी आणि एकूणच संवादांनी कादंबरीला आलेली वेगळीच झलक दिसून येते.
सात कुटुंबे, वेगवेगळ्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या कारणांनी मुकादमाकडून उचल घेऊन ऊसतोड मजूर म्हणजेच नगरी बनलेले असतात. गावात उच्च-निचता, अस्पृश्यता, खोटा धार्मिक व जातीय अहंकार आपापल्या गावच्या शीवेवर (सीमेवर) सोडून ती ओलांडली की सर्वधर्मसमभावाने एकत्र राहतात व एकमेकांच्या सुखदुःखात कसे धाऊन जातात याचे हृदयस्पर्शी वर्णन यात श्री.अशोक नजान सर यांनी केलेले आहे.
एकूणच सदासर्वकाळ पाचवीला पुजलेला दुष्काळ, दारिद्रय बेरोजगारी, कर्जबाजारीपण पुन्हा उचल (ऊसतोडीचे आगाऊ कर्ज) अशा दुष्टचक्रात अडकलेले हे केवळ सातच नव्हे तर हजारो संसार औद्योगिक क्रांती नंतर सुमारे चार शतकांनंतर आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या सात दशकांनंतर देखील कृषिप्रधान देशात ऊसतोड शेतमजूर/कोयता म्हणून नव्या वेठबिगारीचे जीवन जगत आहेत ही बाब अतिशय भयंकर आहे. ही पाचरटच्या निमित्ताने नजान सरांनी उघडकीस आणली आहे.
अतिवृष्टी, वीज पडणे अशा नैसर्गिक आणि रस्ते अपघात, कोपींना लावलेली आग अशा मानव निर्मित आपत्तीतसुद्धा ही कष्टकरी मंडळी कशी एकात्मतेचे व माणुसकीचे दर्शन घडवते हे डोळ्यात पाणी आणणारे चित्रण पाचरटमध्ये आढळून येते. ऊसतोड कामगारांची मुलगी डॉ.मानसी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी अशा काही सुखद घटना सोडल्या तर आयुष्य म्हणजे ऊसाच्या पाचरटाप्रमाणेच आहे हे नजान सरांनी अतिशय गांभीर्यपूर्वक मांडले आहे. कादंबरीच्या शेवटच्या परिच्छेदात पाचरट या शब्दाचा खुमासदार शैलीत केलेला वापर व पुन्हा उद्या त्याच पाचरटात पाचरट होण्यासाठी उचल घेण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती मन विषण्ण करणारी आहे. ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी म्हणजेच बीड जिल्ह्यातील वास्तव समोर येईल असे मला वाटते.
लेखक श्री. अशोक नजान सर यांचे अभिनंदन व पुढील साहित्यसेवेस हार्दिक शुभेच्छा!
-वारभुवन मधुकर, सहा. शिक्षक नवी मुंबई मनपा