न लागती सायास जावे वनांतरा।सुखे येतो घरा नारायण
नाम घेण्यासाठी पदरचा काही पैसा खर्च करावा लागत नाही की शरीराला काही कष्ट द्यावे लागत नाहीत.नरदेहाचे आत्यंतिक हीत करून देणारे नाम आपल्याला बसल्याठिकाणी विनासायास उपलब्ध आहे.पण ते उच्चारण्याची बुध्दी होत नाही ही शोकांतिका आहे.
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ काही।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।
महां घोर संसार शत्रू जिणावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७२।
मनुष्यजन्माचे सार्थक करुन घ्यायचे असेल तर आपले मूळ स्वरूप जाणून घेणे व त्याच्याशी तदाकार होणेहाच उपाय आहे. स्वरूपाचा साक्षात अनुभव येण्यासाठी सर्वसामान्य लोकांना भक्तीमार्गच सुलभ आहे हे समर्थांचे सांगणे आहे. अनन्य भक्तीपर्यंत जाण्यासाठी अंतःकरण शुद्ध करावे लागते. ही शुद्धी विहित कर्म निष्कामपणे केल्याने होते.
निष्काम होण्याचा सोपा उपाय आहे भगवंताचे नामस्मरण. अनेक वाटांनी धावणा-या वृत्तींना एकाग्र करणे, भेद विसरून सर्वत्र भगवंताला पाहणे, फक्त भगवंतप्राप्तीची कामनाठेवणे, फक्त आणि फक्त भगवंताचीच सत्ता मानणे ही साधना करत गेले की कर्मात निष्कामता येते. नित्य नियमाने नामस्मरण करत राहणे हेच या साधनेचे मर्म आहे. अंतःकरण संपूर्ण दोषमुक्त करणारे, महापातकांचा नाश करणारे, पुण्याचा साठा करून देणारे, असे हे मौल्यवान नाम आपल्याला अगदी सहज उपलब्ध आहे. समर्थ म्हणतात, नाम घेण्यासाठी पदरचा काही पैसा खर्च करावा लागत नाही की शरीराला काही कष्ट द्यावे लागत नाहीत. नरदेहाचे आत्यंतिक हीत करून देणारे भगवद्नाम बसल्या ठिकाणी विनासायास उपलब्ध आहे. पण ते उच्चारण्याची बुध्दी होत नाही ही शोकांतिका आहे. माणसाला त्याच्या भल्यासाठी काही करायला सांगितले की आधी त्याला खर्चाचा, मग शारीरिक कष्टाचा आणि नंतर वेळेचा प्रश्न पडतो. पण त्याच्या आवडीचे काही असेल तर त्या "प्रेयस” गोष्टीसाठी तो हीत/अहित न पाहता कितीही कष्ट करायला, खर्च करायला, वेळ घालवायला तयार असतो. जे हीताचे आहे, "श्रेयस” आहे, त्यासाठी मात्र तो विचारात पडतो. म्हणूनच समर्थ आवर्जून सांगत आहेत की नामासाठी काही पदरमोड करावी लागत नाही.मुखाने उच्चारण्यासाठी काही श्रम पडत नाहीत. भक्तीची इतर साधने जसे पारायण, उपासना, तीर्थयात्रा, पूजा-अर्चा,यज्ञयाग इ.साठी शारीरिक कष्ट लागतात, धन लागते, वेळ काढावा लागतो, अनेकांची मदत लागते. मंत्रपठण इ. करताना त्यात शुद्धतेचा आत्यंतिक आग्रह असतो. तसे न झाल्यास दोष लागतो.
नाम घेण्यासाठी कोणताही आग्रह नाही, अटी-नियम नाहीत. वामन पंडित म्हणतात, "अजित नाम वदे भलत्या मिसे। सकलपातक भस्म करीतसे” कोणत्याही कारणाने भगवंताचे नाम मुखात आले, अगदी वैरभावाने जरी त्याचे स्मरण झाले तरी त्यापासून होतो तो लाभच! वाल्या कोळ्याने उफराटे नाम घेतले तरी त्याचा उध्दार झाला. पापी अजामिळाने पुत्राच्या निमित्ताने "नारायण” म्हणून साद घातली आणि तो उध्दरून गेला. नाम कोणालाही, कधीही, कसेही घेता येते. नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही. पण नामाचे माहात्म्य असे की नामामुळे मनुष्य भवबंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. हा घोर संसार माणसाला अडकवतो, गुंतवतो, भ्रमित करतो. संसारातून सुटका करून घेणे मोठे अवघड काम आहे. आपल्याला सर्व बाजुंनी पराधीन, परावलंबी करणारा तो महाभयंकर शत्रु आहे. तो घात करताना दिसत नाही. पण पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, कुटुंब-कबिला असे लाभ देऊन तो माणसाला कधी उन्मत्त करतो तर कधी लाचार करून टाकतो. जीवनाचे मुख्य ध्येय विसरायला लावून नाशवंत पदार्थांमागे फरपटत नेतो. अशा भयंकर शत्रुचा पराभव करायचा असेल तर नामस्मरण हेच शस्त्र आहे.
भगवंताच्या नित्य स्मरणाने संसारातील आसक्ती कमी होते. भय कमी होते.अलिप्तता आली की दुःख कमी होते. संसाराचा प्रभाव कमी झाला की त्या गुंत्यातून सुटका होऊ लागते.नामाचे शस्त्र दुहेरी काम करते. संसारपाशातून सोडवते आणि भगवंताच्या जवळ घेऊन जाते. अखंड नामाने अनन्यता साधली की भगवंताशी एकरूपता होऊन मनुष्याचे संपूर्ण कल्याण होते. म्हणूनच हे कल्याणकारीनाम पहाटेच्या मंगल समयी घेत जावे, नित्य घेत जावे हे समर्थांचे सांगणे आहे.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर