ज्ञानमाता दुर्गा भागवत (जन्म - १० फेब्रुवारी १९१० निधन - ७ मे २००२)
१९७६ साली आयोजित केलेल्या ५१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा बौध्द धर्माच्या प्रगाढ संशोधिका, मराठीतील शैलीदार ललित लेखिका, संस्कृती व पाककृतींच्या जाणकार, आणीबाणीच्या काळातील रणरागिणी अशा अनेक भुमिकांतून वावरून महाराष्ट्राचे समाजजीवन समृद्ध करणाऱ्या ज्ञान परंपरेचा वसा आयुष्यभर जपलेल्या दुर्गाबाई भागवत यांना एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या. दुर्गाबाई सर्वात मोठ्या. त्यांच्या पाठची बहीण कमलाबाई सोहोनी या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ. दुसरी बहीण विमलाबाई गोडबोले या आर्टिस्ट होत्या. सर्वात धाकटा भाऊ राजाराम हे व्यवसायाने डॉक्टर असले तरी ते उत्तम टेनीसपटू होते. दुर्गाबाई अकरा वर्षाच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
१९१५ साली भागवत कुटुंब इंदूरहून मुंबईला राहायला आले. दुर्गाबाई एम. ए. झाल्यानंतर त्या पी.एच.डी.अभ्यासासाठी १९३६ ते १९३८ या तीन वर्ष मध्यप्रदेशातील अतिदुर्गम आदिवासी भागात राहिल्या. याच सुमारास त्यांना एका रानटी, विषारी सुरणाची विषबाधा झाली आणि त्या अनेक वर्ष अंथरूणाला खिळल्या. त्या दरम्यान त्यांचा प्रबंध विद्यापीठास सादर होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची डॉक्टरेट हुकली.भविष्यात त्यांनी साहित्यात इतके भव्य दिव्य काम केले. त्यामुळे ह्या पदवीचे काही महत्वच उरले नाही. त्यांच्या लिखाणावर अनेकांनी पी.एच.डी. मिळविली.
तरुण वयातील सहा-सात वर्षाच्या आजारपणामुळे दुर्गाबाईंनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. या आजारातून बऱ्या झाल्यानंतर त्यांनी १९५६ साली ऋतुचक्र' लिहिले. विश्व चैतन्याच्या रहस्याचा वेध घेणारा हा ग्रंथ आज मराठीतील एक अभिजात ग्रंथ म्हणून ओळखला जात आहे. १९६२ साली प्रकाशित झालेला व्यासपर्व आणि १९७० साली प्रकाशित झालेला पैस हा ग्रंथसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. स्पष्टवक्तेपणा, परखडपणा हया त्यांच्या स्वभावामुळे त्या वादग्रस्त ठरल्या. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी कारावास भोगला. दुर्गाबाईंचा पहिला इंग्रजी ग्रंथ १९३८ साली प्रकाशित झाला त्यानंतर त्यांनी नाटक सोडून मराठीतील सर्व प्रकारचे विपुल लेखन केले. देहोपनिषद ही अर्थगर्भ एकमेव दीर्घ कविता लिहिली. त्यांना साहित्य क्षेत्रांतील अनेक पुरस्कार लाभले.
ज्वालामुखीचा उद्रेक व बर्फासारख्या शीतल व्यक्तिमत्वाचा संगम असलेल्या दुर्गाबाईंचे ७ मे २००२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. - दिलीप प्रभाकर गडकरी