एकेक दार बंद होताना
पूर्वी सर्व दारं उघडी असायची. बालपणी गल्लीतली सगळी घर, कुठेही गेलं तरी चालेल अशी असायची. यापूर्वी तर चाळ संस्कृती सगळीच दार उघडी असायची आणि कधीही कुणाकडे गेले तरी चाले.
हळूहळू गर्दी वाढली. वय वाढलं. संस्कृती, समाज, राहणी, बाई बदलली. बाई नोकरी करू लागली, स्वतःच्या हक्कांबद्दल अवेअर झाली. घरात राहणाऱ्यांना एकटं वाटेना कारण, करमणूक करायला टीव्ही आला. त्याच्यात ती रमली. तिला वाटलं,आपल्या आपण बऱ्या. ते भेटणे, मैत्री नंतरचा वाद नको. वस्ती वाढली, पलॅट स्कीम सुरू झाल्या. फास्ट लाईफ, आता इतर कुणाची, शेजारी पाजारी यांची गरज वाटत नाही.
पण आम्ही जी वयस्कर माणसं होती, आहोत ना, त्यांना पूर्वीच्या काळी,कुणाशी तरी गप्पा मारायला जायची, कुणाला तरी भेटायला जायची, दुपारी कुणाकडे तरी अर्धा तास बसायला जायची, सवय असते.
आमचा सहा मैत्रिणींचा चांगला घट्ट मैत्री ग्रुप होता. कधी ते मंडळ, भगिनी माझ्याकडे यायचं. कधी मी एखाद्या तिच्यापैकी एकीकडे जायचे.
पण एक मैत्रीण, तिने घरजावई केला आणि कधी मुलाकडे राहायला जाऊन, ती तिकडची झाली. आम्ही वृद्ध मैत्रिणी तिच्या लेकीला, मुलांना जावयाला चिप वाटायचो.
तिच्या लेकीचं म्हणणं, "परदेशात मैत्रिणी, भेटणं, मैत्रिणी हा कन्सेप्टच नसतो. तू आपली टीव्ही बघ, मोबाईल बघ, युट्युब बघ आणि गप्प बस. कुत्रा फिरवून आण.” त्यामुळे ते दार मला बंद झालं
दुसऱ्या दाराच्या बाबतीत ती मैत्रीण अचानकच खूप लहरी होऊन गेली. कधी खूप प्रेमाने बोलवणार, तर कधीही हिडीसफिडीत करणार. तिचा फायदा असला की चिकटणार, फायदा नसला की दूर ढकलणार. पूर्वी हे कधी जाणवलं नव्हतं. आता का जाणवायला लागलं आणि तेही दार बंद झालं.
तिसऱ्या मैत्रिणीच्या ठिकाणी, खाऊ घेऊन गेले होते आणि काही वस्तू घेऊन गेल्या होत्या. (ती जुनीच सवय) त्या नेलेल्या वस्तू पसंत न पडल्याने, ते आवडलं नाही म्हणून तिची सून तिला काहीतरी बोलली. त्यावरून तिला असं वाटू लागलं की घरी सुनेशी वाद वाढवण्यापेक्षा या लोकांनी आपल्या घरी येऊ नये. त्यामुळे तेही दार बंद झालं.
चवथी मी माझ्या घरी हौशीने सगळ्यांना बोलवत होते. तर माझ्या घरात, इमारतीचे जिन्याचे रिपेअर सुरू झालं. जिन्यात पायरीवर थोडी तूटफूट झाली.त्यामुळे या लोकांना बोलवायचं, तर माणसांना आजारपण येईल. त्या पडल्या धडपडल्या तर जबाबदारी येईल म्हणून मी बोलवणं कमी कमी केलं.
पाचवी म्हणते, "आल्यावर ऑर्डर देऊन खाणे मागवायचं तर त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये, आता भेटत जाऊ या ना.” "ते देखील काय वाईट आहे, चालेल,” असाही विचार मी सुचवला. पण वयोमानाने आहार कमी झाल्यामुळे, हॉटेलमध्ये उरलेले पार्सल आणायचे, तर घरी तरी कोण खाणार? वाया जाणार, अशी परिस्थिती असल्यामुळे तो हॉटेलचा ऑप्शन बंद झाला.
सहावी म्हणते.,"आपल्या घरी लोकांना बोलावलं की ते आपली किंमत करतात, कारण आपली घरं साधी असतात, पॉश नसतात. मोलकर्णींवर अवलंबून राहायच्या वयात आल्यावर, घर तितकीसे स्वागत करत नसते. आजार, औषधांचा वास, जुनंपण, यामुळे स्वच्छ राहत नाहीत. लोक येतात आणि मग ही लोक नावं ठेवत फिरतात. त्यामुळे तिनेपण माझ्याकडे येऊ नका. आपण वाटल्यास खाली कॉम्प्लेक्सचे ते खाली बागेतल्या बाक्यावर बसू.” असं सांगितलं. पण बाथरूमला वगैरे लागते, तोंड धुवावेसे वाटतं, फ्रेश व्हावंसं वाटतं, ते तिथे खाली बागेत जमेना. त्यामुळे आम्ही जाणं बंद केलं. त्यामुळे तेही दार बंद झालं.
सातव्या मैत्रिणीने सुचवलं... ”मंदिरात भरपूर जागा असते भेटू या. पण अस्वछ लोक असतात. गर्दीपण असते वेगवेगळ्या आजार साथीचे भय असतं.” त्यामुळे बाहेर भेटल्यावर बोलू, हा विचार कमी झाला.
आठवी अजून एक मैत्रिण होती. तिचं घर सगळ्यांचा हक्काचं होतं. ती तिच्या घरात घेतच नाही. तिच्या बागेत प्लास्टिकच्या खुर्च्या टाकल्या असतात, त्याच्यावर बसायचं. ती कधी चहा विचारत नाही की नाश्ता विचारत नाही. पण जागा भरपूर मोकळी असल्यामुळे, केळीचे बाग फुल झाड असल्यामुळे, खूप जण तिकडे चिकटले. आम्ही नेहमीच्या जाणाऱ्या मैत्रिणी उपऱ्या झालो. आपल्या वाटेनाशा झालो. मग आम्ही उरलेल्या मैत्रिणींनी दर मंगळवारी एका गणपतीच्या देवळात भेटायचं ठरवलं. अकरा मंगळवारात फलश्रुती होईल, असं आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं. मग त्या गुरुजींचं ऐक, या गुरुजींचं ऐक असं करून काही व्रतं केली. मैत्रिणीला मुलाचं लग्न करायचं होतं तिला स्थळं यायला लागली. त्यामुळे ती खुश झाली. एका मैत्रिणीला घर विकायचं होतं, गावची शेती विकायची होती, तिलासुद्धा फायदा झाला आणि तीदेखील खुश झाली. या व्रतांमुळे आशा वाढत होती. फलश्रुती मिळते की नाही, असा संशय आला. कंटाळा येऊ लागला. हळूहळू त्या मंगळवारी गणपतीच्या देवळाच्या आवारातील, पायरीवर जमणंसुद्धा बंद झालं. देवळात इतकी गर्दी झाली की आपापसात बोलता येईना. रस्ता क्रॉस करता येईना. आजूबाजूलापण बांधकामे सुरू झाली. रस्ते तर बारा महिने खोदलेले असतात. ट्रॅफिक सोसेना. ते भेटीचा द्वारदेखील बंद झालं.
काळ बदलतो आहे. हल्ली तर पाहुणेपण कुणी कुणाकडे जात नाही. पाहुण्यांनासुद्धा हॉटेलात उतरवायची पद्धत आहे. पूर्वी माझ्या घरी पाहुणे आल्यावर हॉलमध्ये, बारा बारा तेरा जण गाद्या टाकून झोपलेले मला आठवत आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळे, प्रवास जलद होतो. पहाटे निघून मुंबईला येतात, कामे करतात, रात्री घरी पोहोचतात किंवा आले तर हॉटेलला उतरतात. त्यामुळे दार बंद व्हायला लागले आहे.
दिवस तर कामात आणि नेहमीच अन्य काम, वाचन याच्यात निघून जातो. संध्याकाळी कुणाशी तरी संवाद साधावा, असं वाटतं. पण मनातील स्नेहाचा दीपसुद्धा मालवतोय. अशी सगळी दारं बंद झाली, तर या बंद दरवाजावर ठोठावत राहावं लागेल. - शुभांगी पासेबंद