प्रकाशक
जयंतरावांचा पाचवा स्मृतीदिन जवळ आला तसा साहित्यीक विश्वात त्यांच्या विषयी लिहून यायला लागलं. जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई, पुण्यात जास्त. पुण्याच्या साहित्य जीवन या ग्रुपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं. तसा दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच. पण यंदा पुण्याच्या ग्रुपने एक महीना आधी माझा होकार मिळविला. मी जयंताचा प्रकाशक त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी.
गेले महीनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभवती फिरत होत्या. नेहमीप्रमाणे त्याच्या कवितासंग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्या माझ्या प्रकाशन संस्थेमार्फत काढल्या.या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव.प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते. प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट. लाट अंगावर येवून मला चिंब भिजवत होती.
पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आधल्या दिवशी पुण्यात पोहचलो. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. व्यासपिठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता. टेबल, चार खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते. त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता. सुरूवातीस स्वागत झाले.माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी दोन मुली समोर येवून बसल्या. आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली.
प्रश्न- सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखकसुद्धा, तुम्ही त्यांचे चार कविता संग्रह आणि तीन कथा संग्रह प्रकाशित केलेत, मग तुमचे जास्त जवळचे नाते काय? मित्र की लेखक ?
मी - मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एलफिस्टन कॉलेज मध्ये शिकत होतो. लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो.
प्रश्न - मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात ?
मी - प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय. त्यावेळी आमची मुंबईत दोन पुस्तकांची दुकाने होती, आता सहा आहेत.
प्रश्न - जयंतराव केव्हापासून लिहू लागले? कॉलेजमध्ये असताना की नंतर ?
मी - तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक, कवि होते.त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले. कॉलेजनंतर तो म्युनिसीपाल्टी मधे नोकरीला लागला. लेखन सुरूच होते.
प्रश्न- जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात.
मी- समज होती नाही, तो उत्तम गायचा, आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली.
प्रश्न - सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात.
मी - ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती
प्रश्न - सर, कॉलेजमध्ये असताना तुम्हा तिघांचा ग्रुप होता असे म्हणतात हे खरे आहे काय?
मी - हे खरे आहे, मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो. तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं मस्त जमायचं.
प्रश्न - त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात?
मी - होय. आम्ही विजया मेहतांच्या रंगायन ग्रुप मध्ये होतो. विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थीनी. त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले.
लहान हॉलमध्ये नाटके व्हायची, आम्ही लहान-लहान भूमिका करायचो, तसं नाटकाचं सारंच करायचो, नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो.
प्रश्न - आणि तुमचा व्यवसाय?
मी - व्यवसाय सांभाळायचोच, कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो. माझ्यापेक्षा तिप्पट, चौप्पट वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशीत करत होतो.
प्रश्न - तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशीत केलीत?
मी - त्याचे कवितासंग्रह, कथासंग्रह मीच प्रकाशीत केले.
प्रश्न - आणि त्यांची नाटके? विशेषतः त्यांचे प्रसिध्द नाटक अलेक्झांडर?
मी - त्याची नाटके दुसऱ्या प्रकाशकाने प्रसिध्द केली.
प्रश्न - तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसऱ्यांकडे का गेली ?
मी- ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल. कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो. जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा, दहा बाय दहाच्या जागेत आठ जण राहायचे, अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी. त्या काळी वडीलांची गाडी वगैरे असलेली, मी ग्रॅन्टरोड भागातील उच्च मध्यमवर्गीय. आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात.अनघा मला आवडत होती विजयाबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचो, नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची, माझ्या घराजवळ येवून मला गाडीत घ्यायची, पुढे जयंताला ठाकूरव्दारच्या कोपऱ्यावर घ्यायची.
तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो. जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाण म्हणायची. अनघा जयंताला म्हणायची..चांगल्या इंग्लीश नाटकांची भाषांतरे कर, तू कवि मनाचा आहेस, आपण बाईंना सांगू नाटक बसवायला. अनघाने ब्रिटीश लायब्ररी मधून सात-आठ इंग्लीश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातील एक, बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले.
नव्या जुन्या कलाकारांना घेवून अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहीला. आणि जयंताला म्हटले - हे नाटक मी छापणार. त्यावर जयंता म्हणाला - तूच छाप,तूझ्याशिवाय दुसरं कुणाला देणार ?
त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला, जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तीचे कौतुक झाले. पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात होतो, सहा महीने झाले तरी जयंताने त्या पुस्तकांची हस्तलिखीते दिली नाहीत, अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो. आणि जयंताच्या घरी गेलो.
"जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे हे खरे काय?”
"होय, हे खरे आहे”
"पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं.आणि मी हस्तलिखीते मागत होतो ”.
"अनघाने या प्रकाशकाला माझ्याकडे आणले.”
"अनघाने? मग तिने मला कां नाही सांगितले?”
"अनघाचे म्हणणे तू जे माझे कवितासंग्रह छापलेस,त्याचे मानधन फारच कमी दिलेस,त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते.”
"अरे,पैशांचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो,मी नाही आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो.”
"अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वॉलीटी चांगली नव्हती, इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मानाने काहिच नाही.”
"हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेस मधून छापून घ्ोतलीत आणि अनघा म्हणते, अनघा म्हणते हे काय आहे?”
"तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”?
"होय!”
त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो
अशी घटना घडली त्यामुळे ती पुस्तके दुसऱ्याने प्रकाशीत केली.
प्रश्न - अलेक्झांडर सारखे सुंदर नाटकाचे पुस्तक असूनही त्या पुस्तकाची विक्री फारशी झाली नाही असे म्हणतात, कां?
मी - नुसते पुस्तक छापून चालत नाही, त्याचे मार्केटिंग करावे लागते, त्या पूण्याच्या प्रकाशकाला मार्केटिंगचा काहीच अनुभव नव्हता.
प्रश्न - मुंबईत मराठी पुस्तकांसाठी तुमची दोन दुकाने असताना आणि त्या काळी वाचक मराठी पुस्तकांसाठी तुमच्याच दुकानात येत असताना जयंतरावांची नाटके तुमच्या दुकानात मिळत नव्हती, हे खरे काय?
मी- हे खरे आहे, याचे कारण पुण्याच्या त्यांच्या प्रकाशकाने आमच्या दुकानात पुस्तके ठेवली नाहीत, आमची पुस्तकांची ऑर्डर त्यांनी पुरी केली नाही.
प्रश्न - कॉलेजमधील तुमची मैत्रिण अनघाताई यांनी जयंतरावांशी लग्न केलं, त्यांच्या प्रेम विवाहाबद्दल तुम्हाला कल्पना होती?
मी - मला कल्पना नव्हती.
प्रश्न - अनघाताई मग दूरदर्शनवर निर्मात्या झाल्या त्यांनी ही नोकरी स्विकारताना तुमचा सल्ला घ्ोतला होता काय?
मी- नाही. प्रश्न - मग अनघाताई दूरदर्शवर गेल्यानंतर तुमचे त्यांच्याबरोबर अनेक फोटो कसे काय दिसतात?
मी - अनघा ही साहित्यिकांच्या आणि कलावंताच्या मुलाखती घ्यायची, तिला साहित्यिकांच्या भेटीगाठी होण्यास माझी मदत व्हायची कारण माझा प्रकाशन व्यवसाय असल्याने या मंडळीत माझी उठबस असायची.
प्रश्न - अनघाताई जयंतरावांना वर्षभरात सोडून गेल्या, त्या सोडून जाणार हे तुम्हाला माहीत होतं का?
मी- नाही.
प्रश्न - अनघाताईनी जयंतरावांशी स्वतःहून लग्न केलं होतं, मग असं काय झालं, की त्या वर्षाच्या आत त्यांना सोडून गेल्या?
मी - याची मला कल्पना नाही,ते तुम्ही अनघाला विचारा.
एवढ्यात त्या मुलाखत घेणाऱ्या दोन मुलींपैकी दुसऱ्या मुलीने सोबतच्या बॅगमधून एक जूना पेपर बाहेर काढला, ती मुलगी बोलू लागली.
"वसंत सर, जयंतरावानी १९९५ साली कोल्हापूरच्या पुढारीस मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जयंतराव म्हणतात
- वसंताने म्हणजे तुम्ही माझी म्हणजे जयंतरावांची नाटके प्रकाशीत करायला नकार दिला, खरं तर वसंताचे पब्लीकेशन हे त्या काळी मराठीतील सर्वोत्तम प्रकाशन होते. शिवाय त्यांची मुंबईत स्वतः ची दोन दुकाने होती, म्हणून मला ती पुस्तके पुण्याच्या नवीन प्रकाशकाकडे द्यावी लागली...आणि येवढ्या चांगल्या पुस्तकांची त्यांनी वाट लावली, ती खपली नाहीत, लोकांपर्यंत पोहचली नाहीत.
मी ओरडलो- हे खोटं आहे. जयंता खोटे बोलत आहे.
पुन्हा तीच मुलगी बोलू लागली...वसंत सर, जयंतरावांच्या निधनानंतर दुरदर्शच्या प्रतिनिधीने तुमच्या मोठ्या भावाची म्हणजेच जे तुमची दोन्ही दुकाने सांभाळतात, त्या प्रभाकररावांची मुलाखत घेतली होती, त्याची कॅसेट माझ्याकडे आहे. त्या मुलाखतीत तुमचे मोठे भाऊ प्रभाकरराव म्हणतात, जयंतराव हे उच्च दर्जाचे कवी होते, कथा लेखक होते,आम्ही त्यांची पुस्तके सुरवातीस छापली,पण काय झाले कोण जाणे, माझा धाकटा भाऊ वसंत हाच त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्या काढायला विरोध करू लागला.
मला दरदरून घाम सुटला. एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर या दोन मुली मला उघडं पाडत होत्या,
मी ओरडलो - कोण आहात तुम्ही ? मला पाहुणा म्हणून बोलावलात आणि मलाच खोटारडा ठरवता ? माझा अपमान करता?
"तुमचा अपमान नाही करत सर, आम्ही दोघीनी जयंतरावांच्या साहित्यावर पी.एच.डी केली आहे. त्यांच्या साहित्यात जसजसं खोल जाऊ लागलो, तसें लक्षात आले,एवढ्या ताकदीचा लेखक त्याची तुम्ही काढलेली कविता संग्रह किंवा कथासंग्रह कुठेच उपलब्ध नाही, अगदी वाचनालयातसुद्धा, ज्यांची कुवत नाही अशा लेखकांच्या तुम्ही तीन चार आवृत्या काढता आणि जयंतरावांसारख्या असामान्य लेखकांची पुस्तके मिळत नाहीत. त्यांची पुस्तके खपत नव्हती. मग जयंतराव गेल्यानंतर त्यांच्या साहित्याच्या दरवर्षी आवृत्या कां काढता? आणि त्यांची पुस्तके आता खपतात कशी? माझा आरोप आहे जयंतरावांच्या पुस्तकांचे अधिकार स्वतःकडे ठेऊन तुम्ही जयंतरावांची फसगत केलीत. असं नाही वाटत?
त्या दोन मुलींच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. मी केविलवाणा होऊन ऐकत होतो. मी खजील होऊन व्यासपीठ सोडले आणि बाहेर येऊन माझ्या गाडीत बसलो. मी गाडी स्टार्ट केली, एव्हढ्यात माझ्या मनात आले ज्या चुका माझ्या हातून झाल्या त्याची कबूली देण्याची हीच वेळ आहे. मी गाडी बंद केली आणि पुन्हा हॉल मध्ये आलो. हॉलमध्ये येऊन माझ्या खुर्चीवर बसलो. मी बाहेर पडताच हॉलमधील लोक खुर्च्या सोडत होते, त्या दोन मुली पण आपले कागद, लॅपटॉप आवरून निघायच्या बेतात होत्या. मी स्टेजवर येऊन खुर्चीवर बसताच आयोजकाने माझ्या हातात माईक दिला आणि मी बोलू लागलो.
साहित्य जीवन या ग्रुपने माझ्या मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त येथे मला आमंत्रित केले त्या बद्दल आभार. मंडळी, आयुष्यात काही चुका होतात. मी माझ्या मित्राशी जे वागलो त्याबद्दल माझ्या मनात खंत आहे. जे मनात आहे त्याची कबुली देण्याची या व्यासपीठा सारखे उत्तम व्यासपीठ कदाचीत मला मिळणार नाही.
माझी मुलाखत घेणाऱ्या या दोन हुशार मुलींना जयंताच्या साहित्यावर डॉक्टरेट करावीशी वाटली. यातच त्याचे साहित्य काय उंचीचे आहे ते लक्षात येईल. मंडळी, आता तुम्हाला माझ्याकडून जयंताच्या साहित्याकडे कानाडोळा का झाला किंवा मी जयंताचा व्देष का केला हे सांगावे लागेल. यासाठी सुमारे चाळीस वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतरची दहा वर्षे डोळ्यासमोर आणावी लागतील...
...मी, जयंता आणि अनघा एका कॉलेजमध्ये होतो.तिघांनाही लेखन, नाटक, संगीत यांची आवड, जयंता उत्तम कविता करायचा तसेच उत्तम लिहायचा. अनघा गायिका, उत्तम वाचक, नाटकामध्ये काम करणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका. मला सर्वच कलांमध्ये उत्तम गती होती. अनघा वरच्या आर्थीक परिस्थीतील, मी मधल्या आणि जयंता कनिष्ठ. आम्ही तीघे एकत्र संगीत मैफली ऐकायचो, नाटके पहायचो, प्रायोगिक नाटके करायचो.
मला अनघा आवडायची. ती कधी कधी आमच्या घरी यायची. आमच्या दुकानात यायची, माझ्या आई-बाबा बरोबर गप्पा मारायची. माझ्या घरच्यांना वाटत होते की बहुतेक माझं अनघाबरोबर लग्न होईल. माझ्या व्यवसायानिमित्त मला दोन महीन्यासाठी लंडनला जावं लागलं. जाण्याआधी जयंताला त्याची नाटके मी आल्यावर छापूया असे सांगून मी लंडनला गेलो. दोन महीन्या नंतर मी लंडनहून आलो. मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिऱ्हाड केले होते. हा मला मोठा धक्का होता.
अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई-बाबांनी सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वाद/भांडण झाले होते की काय, अशी विचारणा केली.
खरंतर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती. मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही. मला या दोघांचा खूप राग आला होता. मनस्ताप झाला होता. कशातही लक्ष लागत नव्हते. याच काळात माझ्या मनात कली शिरला. या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो.
अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती. त्यामुळे तिला त्या जगात अडकवावे असा विचार मनात आला. त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू होत होते. त्या करीता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कविमित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली. अनघा मुळातच हुशार त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली. या मायावी दुनियेत तिचा प्रवेश झाला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले. तिला मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संगीतकार हवे असायचे. त्यामुळे ती मला भेटू लागली.
त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले.मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता. शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली. या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला, त्याची नाटके छापूया आणि प्रकाशीत करूया असे सांगू लागला. पण मी काही ना काही कारणे सांगून ते टाळू लागलो. मला जयंताचा सूड घ्यायचा होता.त्याचे कवितासंग्रह आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते. त्याचे अधिकार आमच्याकडे होते.
त्याच्या आवृत्या काढूया असे तो सांगत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या प्रकाशनाकडून नाटकांची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला.पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते, त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छीत नव्हता. म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला, पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंगची माहीती नव्हती, त्यामुळे ती पुस्तके दुकानात उपलब्ध झाली नाहीत.
त्यानंतरच्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो. आमच्या शाखा दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशीत करू लागलो. त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो. पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते. या नंतरच्या काळात जयंताने कविता लिहील्या. कथा लिहील्या; पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला. कारण अनघा त्याची स्फुर्ती होती. त्याने त्याच्या कविता, कथा माझ्या मोठ्या भावाला दाखविल्या; पण त्याला त्या आवडल्या नाहीत.
जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते. जोपर्यंत त्याचे फडके साहेब होते तो पर्यंत सहन केले, पण फडके साहेब निवृत्त होताच नवीन साहेबाबरोबर याचे पटेना, शेवटी जयंताने नोकरीचा राजिनामा दिला. एकंदरीत यामुळे त्याची सर्वबाजूने कोंडी झाली असावी. या काळात जयंताने मला काही पत्रे लिहीली. मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत. त्याचे म्हणणे असे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावीत म्हणून मी प्रयत्न करावेत, त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती. अर्थातच मी त्याकडे दुर्लक्ष केले.
माझ्या मुलाच्या ॲडमिशनच्या संबधात मी आणि पत्नी अमेरीकेत गेलो असताना जयंताला मृत्यू आला, शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यीक वर्गात खळबळ उडाली, पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता. त्याच्या मृत्यू नंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली.
दोन महिन्यांनी मी अमेरीकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशीत केली. आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध केली. त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे, तर मुंबईतील प्रतिष्ठीत नाट्य संस्थानी त्याची नाटके रंगभूमीवर आणली. जयंताच्या एका नाटकात अनघाने मुख्य भूमिका केली. या नाटकाचा प्रयोग पहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली.
त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो. या नंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैंनी आली. माझ्या पत्नीला कॅन्सर झाला, मुलीने माझ्या मनाविरूद्ध लग्न केले, माझा मुलगा अमेरीकेत स्थायीक झाला.
आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायत येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडु लागला. थोडक्यात आमचे वाईट दिवस आले. माझी फिरती बंद झाली. नवीन पुस्तके प्रकाशीत करण्याची ईच्छा नाहीशी झाली, मी दुकानात बसु लागलो. आता हळू हळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे.
या आयुष्यातील कातरवेळी जयंता, मला तुझी आठवण येते. तुझ्यासारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यिक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी यांच्यात कसली राजकारणे असणार.
पण पुण्यातील श्रोते हो! तुम्हाला सांगतो, राजकारण्यांची राजकारणे, वाद, भांडणे तुम्हाला कळतात दिसतात. पण ही पुस्तके लिहीणारे आणि छापणारे, प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत...आणि अशा हेव्यादाव्यांमुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो. त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत. साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो, आम्हा साहित्त्यिक लोकांचे हात असे बरबटलेेले असतात.
माझा प्रिय मित्र जयंता त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा व्देष केला. याचे मला वाईट वाटते. खेद वाटतो. कॉलेजमधील आम्ही तीन मित्र जयंता मी आणि अनघा. अनघाने त्याला मधेच सोडले. मी त्याचा तिरस्कार केला. त्याचे लिखाण कुजवलं. मित्रा, जयंता कुठे असशील तेथून या तुझा मित्रास माफ कर... असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्सी रडू लागलो. - प्रदीप केळुसकर