काय क्रिया..आणि काय प्रतिक्रिया

भस्म, उदी, ताईत, लिंबू, मिरच्या, कुठल्या प्राण्यांची शिंगे, अंगारे-धुपारे, गंडे-दोरे, करणी, भानामती, मूठ मारणे, काला जादू, बंगाली जादू यापैकी कोणतीच गोष्ट कुणाचेही काहीही वाकडे करु शकत नाही. जर तसे असते तर आपले शत्रुराष्ट्र पाकिस्तान आपल्या भारतात घुसखोर, दहशतवादी, मानवी बॉम्ब, अंमली पदार्थ, खोट्या नोटा, गुप्तहेर पाठवून भारताला खिळखिळा करु पाहात आहे, त्यावर आपल्या देशाने भस्म, उदी, ताईत व तत्सम प्रकारांचा वापर करुन सीमेवरच पाकिस्तानी शत्रूंना रोखले असते.

   गेली जवळपास दोन महिने बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनाचे प्रकरण केवळ राज्यातच नाही, तर देशभर गाजते आहे. त्यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्यांच्यावर संशयाचे बोट आहे त्यांचा अजूनही राजीनामा घेतला गेला नाही. याविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाहिक कार्यकर्ते यांनी रान उठवले असतानाच भगवानगडाचे प्रमुख नामदेव शास्त्री यांनी ‘त्या मंत्र्याच्या पाठीशी भगवानगड' असल्याचे सांगत तो निरागस, निष्पाप समाजसेवक असल्याचे प्रमाणपत्र जारी केले. यावर जनमत प्रक्षुब्ध झाल्यावर त्यांनी मग ‘आपण संतोष देशमुख यांच्याही कुटुंबियांच्या पाठीशी' असल्याचे जाहीर केल्याचा शाब्दिक खेळ मांडला. हे म्हणजे एकाच वेळी एकच व्यवती किंवा संस्था रामाच्या आणि रावणाच्या, कौरवांच्या आणि पांडवांच्या बाजूने असल्याचा प्रकार म्हटला पाहिजे अशाही प्रतिक्रिया लोकमानसातून उमटत आहेत. पिडीत आणि आरोपी या दोघांनाही पाठिंबा देण्याचा हा अजबगजब प्रकार आहे.  

   शक्यतो धर्मसत्तेने राजकारणात लुडबुड करु नये, कुणाची बाजू घेण्याचा किंवा वकिली करण्याचा प्रकार तर अजिबातच करु नये; कारण त्यामुळे त्यांची उरलीसुरली विश्वासार्हताही संपुष्टात येण्याचा धोका संभवतो. बाजूच घ्यायची झाली तर दुर्बल, कमकुवत, पिडीत, अन्यायग्रस्त घटकांची घ्यावी असा संकेत आहे. पण "शास्त्री" म्हणवणाऱ्यांनी हे शास्त्रच पायदळी तुडवल्याचा प्रकार घडला आहे. खुनाची क्रिया घडली असता ज्यांच्याविरोधात जनमानस एकवटले आहे त्या संशयितांच्या बाजूने प्रतिक्रिया देण्याने काय साधले असा प्रश्न आता निर्माण होतो. सध्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याबद्दल उलटसुलट बातम्या पाहण्याचे, वाचण्याचे दिवस आहेत. विविध शास्त्री, आध्यात्मिक अधिकारी मंडळी, संत यांनी आवाहन केले होते की जीव धोक्यात घालून एवढ्या लांबवर थंडीत आला नाही तरी चालेल. घरुनच तुमच्या आराध्य दैवताला श्रध्दापूर्वक नमस्कार करा, तो पोहचेल. मात्र तरीही आयोजनाचा भपका, नियोजनाचा बडेजाव मिरवण्याच्या नादात स्थानिक प्रशासनाकडून अनेक त्रुटी राहिल्या. अपेक्षेबाहेर गर्दी वाढली. प्रशासनाच्या सूचनांचे पालन झाले नाही. ‘सिव्हिक सेन्स' अर्थात नागरी कर्तव्यभावनेचा लवलेश नसलेल्या लोकांकडून व्हायची ती गडबड झालीच आणि तीसहुन अधिक जीव हकनाक गेले. अनेक कायमचे, अंशतः जायबंदी झाले. देशाच्या विविध ठिकाणांहुन आलेल्या या गर्दीत आप्तस्वकीय मृत्युमुखी पडणे, त्यांचे मृतदेह ताब्यात घेणे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे किंवा मृतदेह आपल्या घरापर्यंत आणणे तसेच जबर जखमी झालेल्यांना योग्य ते उपचार घेऊ देणे, स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी कर्मचारी, दवाखान्यांतील डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांचे योग्य ते सहकार्य मिळवणे (हे लोक अनेकांना दाद देत नसतात; तर मग परमुलखात काय होत असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी!) हे सगळे करताना पिडीतांच्या, जखमी भाविकांच्या नातेवाईकांना ब्रह्मांडच आठवले असेल. ही झाली मृत्युमुखी पडण्याची क्रिया; पण त्यावर विविध अंगांनी विचित्र प्रतिक्रिया उमटल्या.

   कुणी म्हणे ते लोक थेट स्वर्गातच गेले. त्यांना मोक्ष मिळाला. त्यांचा उध्दार झाला. कुणी म्हणे ते पापी होते. त्यांना त्यांच्या कर्मांची फळे मिळाली. कुणी म्हणे.. कुणी सांगितले होते तडफडायला जायला? नसते गेले तर काही अडले असते का? काही मुस्लिमधर्मीयांच्या विविध फेसबुक ग्रुप्स आणि अन्य समाजमाध्यमांवरुनही अशाच आक्रस्ताळी व आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. पण मुस्लिमांपेक्षा हिंदुधर्मीयांनीच कुंभमेळ्याला जाण्याविरोधात अधिक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत हे विशेष! आता जमाना समाजमाध्यमांचा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातही कुठे खुट्ट झाले तरी त्याचे पडसाद जगाच्या दुसऱ्या टोकाला उमटण्याचे दिवस आले आहेत. ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी दरम्यान नवी मुंबईत खारघर येथील सेन्ट्रल पार्क येथे मुस्लिमपंथीयांचा इज्तेमा ( संत समागम, सत्संग प्रकारचा एक धार्मिक सोहळा) भरला होता. या आधी काही वर्षे याच मैदानावर संत निरंकारी मंडळाचे समागम सोहळे, मार्गदर्शन, सामुदायिक विवाह समारंभ पार पडल्याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. खारघर येथील टाटा मेमोरियल सेन्टरच्या कॅन्सर हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेला जाताना मला इज्तेमाला जाणाऱ्या मुस्लिमपंथीयांची गर्दी खारघर रेल्वे स्थानकाजवळील बस स्टॉपवर दिसली व त्यासाठी ‘एनएमएमटी' ने प्रवासाची चोख व्यवस्था केल्याचेही पाहायला मिळाले. त्याचा मी व्हिडिओ बनवून तो आमच्या समाजमाध्यमांवर पोस्ट केला. हा मजकूर मी लिहीपर्यंत तो जवळपास दोन लाखाहुन अधिक लोकांनी पाहिला व त्यावर चित्रविचित्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एकजण म्हणे खारघरमध्ये आता कुणी घर घेणार नाही. त्याला तळोजा वसाहत जबाबदार ठरणार. कुणी लिहीले..तेथे जाणाऱ्यांचे आधारकार्ड, फोटो, पत्ते तपासा. कुणी लिहिले..या येणाऱ्या झुंडी परिसराच्या शांततेला बाधा आणणार. हिंदु व मुस्लिम अशा दोन्ही बाजूंनी त्या व्हिडिओवर वारेमाप प्रतिक्रिया आल्या व आता इज्तेमा संपून गेला तरी येत आहेत.

   हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, पारशी, बौध्द या साऱ्या जगण्याच्या धारणा शिकवणाऱ्या, काही विशिष्ट जीवनप्रणाली मानणाऱ्या मार्गिका आहेत. अनेकदा त्या जन्मानेच आपल्याला आपोआप प्राप्त होतात. आपल्या कुणाचेही आई-वडील ‘ते तुझ्या विरोधात आहेत, त्यांना तुझे दुश्मन मान' असे संस्कार करीत नसतात. तरीही काही लोकांची मुलं जसजशी मोठी होत जातात तसतशी ती काही धर्मियांविरोधात जाण्याची मानसिकता बाळगतात व तसेच वागत जातात हा अनुभव मात्र दारुण आहे. ‘माझा धर्म मी मानेन, त्याचा धर्म त्याने मानावा ही प्रकृती; मी माझ्या धर्माप्रमाणेच त्याच्याही धर्माचा आदर करीन ही संस्कृती; तर त्यानेही माझाच धर्म मानावा नाहीतर मी त्याच्यावर हल्ला करीन, माझ्या धर्मप्रसारासाठी तलवारीच्या जोरावर त्याला माझ्या धर्माचा बनवीन, त्याच्या धर्मातील स्त्रीयांना पळवीन-बाटवीन, त्यांची श्रध्दास्थाने मोडून तोडून टाकीन, ज्या देशात मी राहतो त्यांच्या बहुसंख्यांकाच्या धर्माविरोधात मी वागेन-शत्रुराष्ट्रात राहणाऱ्या माझ्या धर्मबांधवांप्रति निष्ठा ठेवीन, माझ्या जन्मभूमीतील राष्ट्रगीताच्या वेळी मी उभाही राहणार नाही, तिरंग्याचा अपमान करीन, मुंबईत अमर जवान या सैनिक जवान स्मृतीस्तंभावर लाथा मारीन, भारतीय सैन्यातील जवानांवर-भारतीय पोलिसांवर हल्ले करीन ही मानसिकता म्हणजे विकृति होय'. या प्रकारची विकृति वाढीला लागणे हे अतिधोक्याचे! आता अवतीभवती अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या क्रिया-प्रतिक्रिया पाहायला मिळताहेत हे मोठेच दुर्भाग्याचे लक्षण होय. भस्म, उदी, ताईत, लिंबू, मिरच्या, कुठल्या प्राण्यांची शिंगे, अंगारे-धुपारे, गंडे-दोरे, करणी, भानामती, मूठ मारणे, काला जादू, बंगाली जादू यापैकी कोणतीच गोष्ट कुणाचेही काहीही वाकडे करु शकत नाही. जर तसे असते तर आपले शत्रुराष्ट्र पाकिस्तान आपल्या भारतात घुसखोर, दहशतवादी, मानवी बॉम्ब, अंमली पदार्थ, खोट्या नोटा, गुप्तहेर पाठवून भारताला खिळखिळा करु पाहात आहे, त्यावर आपल्या देशाने भस्म, उदी, ताईत व तत्सम प्रकारांचा वापर करुन सीमेवरच पाकिस्तानी शत्रूंना रोखले असते. भारतीय सैन्यावर, देशाच्या सुरक्षेवर इतका अतिप्रचंड खर्च केला नसता; देशाच्या सैनिकांचे प्राण पणाला लावले नसते. खरेतर भस्म, लिंबू मिरच्या आदि साऱ्या निरुपद्रवी बाबी आहेत, त्याने कुणालाही काहीही फरक पडत नसतो; युध्दे ही रणांगणावर व योग्य त्या रणनितीनेच जिंकावी लागतात, हेच वास्तव आहे.

   ...आणि तरीही या देशात बुद्धिजिवींच्या गटात मोडणारेही कुणा मुख्यमंत्र्याने त्याच्या शासकीय निवासस्थानी राहावयास जाण्यास विलंब लावण्यामागे तेथील आवारात म्हणे ‘रेड्याची शिंगे' पुरलेली आहेत असे जाहीर वक्तव्य करतात म्हणजे त्यांच्या बुध्दीचे दिवाळे वाजल्याची कबूलीच त्यांनी देण्यासारखे आहे. क्रिया काय व प्रतिक्रिया काय देतोय याचे भान सुटले की असेच व्हायचे! आपल्यानंतर दुसरा कुणी तेथे मुख्यमंत्री म्हणून येऊच नये, टिकूच नये असे साध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल होत असेल तर मग देशाचा राष्ट्रपती, देशाचा पंतप्रधान, देशाचा गृहमंत्री या  गृहमंत्री या अतिमहत्वाच्या पदांवरही दुसरे कुणी येऊ नये म्हणून या आधीच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री पदावरील लोकांनीही अशीच कुणा प्राण्यांची शिंगे, भस्म, उदी, ताईत यांचा वापर केला असावा असे समजायचे का? आणि तरीही मग आधीच्यांची पदे (आपल्या राज्याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे!) गेली तरी कशी? हा प्रश्न उरतोच! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

करुणामूर्ती माता रमाई !