तरंगता संसार!
सगळीकडं पाणी पाणी झालं होतं. सगळ्यांच्याच पालात पाणी शिरलं. मोकळी भांडीकुंडी पाण्यावर तरंगायला लागली. एकेक करत त्यांचा सगळा संसार पाण्यावर तरंगत होता. एक वेळचा स्वयंपाक करून दुसऱ्या दिवशी शिळीपाकी खाणारी तोंडं इकडं तिकडं पाणी पाणी करून ओरडू लागली. कितीतरी दिवसांतून असा अनर्थ घडला होता!
"अगं, ये राहीबाई उचल तुझं सगळं सामान अन् लाव त्या कोपऱ्याला!”
असं धावपळीत चंपाआजी तिला बोलता बोलता तिचं स्वतःचं बिऱ्हाड लावत होती. बारकी पोरं कोणाला काय माहित आता काय होणार? म्हणून जिथं पाणी ओसरलंय तिथं जाऊन थांबली होती! नको तो दुष्काळ पाहिलेली अशी पालावरची कुटुंबं ह्या पानकळ्यात उध्वस्त झाली होती! चार दिवसापासून पाऊस नको नको इतका कोसळत होता..! कुणाचाच कुणाला ह्या दोन-तीन दिवसात ताळमेळ राहिलेला नव्हता! बऱ्याच वर्षांपासून पालं ठोकून राहिलेली अशी बरीच कुटुंबं ह्या गोदाकाठच्या मोकळ्या पटांगणात वसली होती! कितीतरी वर्षांपासून असं झालेलं कुणाला आठवत नव्हतं. पाऊस असा तुफान बरसत होता की बास्स. कोकणातल्या डोंगरमाथ्यासारखे इथं ढग रिचत होते. चांगल्या सिमेंट काँक्रीटच्या घरांमध्ये सुद्धा इतकं पाणी पाणी झालं होतं त्याचं नाव ते!
म्हणूनच सगळे पालातले माणसं दोन दिवसांपासून इकडं तिकडं सैरावैरा पळत सुटले होते...
हया सगळ्या बेवारस पालांच्या गर्दीत चंपाआजी तेवढी अनुभवी होती. एवढं होऊन सुद्धा ती तिच्या पोराचा उघडा झालेला संसार पुन्हा पुन्हा राहीबाईला सावरायला सांगत होती! राही म्हणजे तिच्या मोठ्या भावाचीच मोठी लेक अन् पुढं चालून तिच्याच मोठ्या परसरामला केलेली! इकडं पोरगी द्यायची म्हणजे समोर काहीतरी मोठं घबाड दिसणार अन् मग एखादा बाप आपली पोरगी देणार पुढं चालून तिचं लै भारी होणार असं काहीच नाही! लग्न जमवण्याचा सगळा चालता बोलता खेळ अगदी तोंडातून शब्द निघायचा "ए, बहिणबाई, पोरगी दिली तुला हवाली करून बघ तुझं तू आत्ता पुढचं सगळं” असंच म्हणून चंपाआजीनं राहीबाई स्वतःचा लेक परसरामला पंधरा-वीस वर्षांपूर्वी करून मोकळी झाली.
तेव्हा काय ह्या पालात बोलणी झाली अन् वीस फुटावरच दुसऱ्या पालात दिली असं सगळं त्यांच्या लग्नाचं गणित. कुठं बेंडबाजा वाजवायचा नाही अन् कुठं सनई तुताऱ्या! सगळं जवळच्या जवळ राही अन् परश्या हे सुद्धा लहानपणापासून मैतरच होते. त्यांना आपण भविष्यात नवरा बायको होऊ असं स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल; परंतु झालं ते झालं अन् यांचा संसार सुरू झाला होता. लग्न झाल्यानंतर राही अन् परशा खूप जीवाभावानं राहिले. मिळेल तो काम धंदा करून त्यांचं आयुष्य सुरू होतं. करणार तरी काय..? कामधंदा केल्याशिवाय पोट तरी कसं भरणार.. हाही मोठा प्रश्न होता. दररोज पोटाची खळगी भागून जीवनात पावलं टाकत टाकत त्यांचं आयुष्य कसं कडेला जाईल हा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना साधा प्रश्न वाटायचा. पुढं पाळणा हलला. अन् दोनाचे चार झाले! होणारच ते काय कुठं थांबलय का..? सगळा चिल्यापिल्लांचा कारभार पाहून राही अन् परशराम आपला कुटुंबकबिला पुढं रेटित होते. अन् अचानक इकडं दोन दिवसांपासून मेघराजा जोर जोरात गर्जत बरसू लागला!
सगळीकडं पाणी पाणी झालं होतं. सगळ्यांच्याच पालात पाणी शिरलं. मोकळी भांडीकुंडी पाण्यावर तरंगायला लागली. एकेक करत त्यांचा सगळा संसार पाण्यावर तरंगत होता. एक वेळचा स्वयंपाक करून दुसऱ्या दिवशी शिळीपाकी खाणारी तोंडं इकडं तिकडं पाणी पाणी करून ओरडू लागली. कितीतरी दिवसांतून असा अनर्थ घडला होता! सगळी जुनी जाणती माणसं उघड्यावर आली होती. वरच्या नाशिक-नगरकडच्या धरणांतून गोदावरीत किती मोठा विसर्ग सोडला होता ! आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं.! पैठणच्या सगळ्या रस्त्यारस्त्यांवरून पाणीच पाणी झालं होतं.. त्यावरून होड्या फिरू लागल्या! आता कोणाला सांगितलं की रस्त्यावरून होडी फिरते तर असा लक्षार्थ घेताना प्रत्येकालाच नवल वाटेल. पण होड्या मात्र रस्त्यावरून त्यावेळी नक्की फिरल्या! शासकीय यंत्रणा अन्नाची पाकिटे लांबूनच उभरत्या हातांना लांबून देऊ लागली होती.
हेलिकॉप्टरसुद्धा येणार असं समजलं होतं. कितीतरी किंचाळणारे आवाज अन् मदतीचे हात ओरडून ओरडून थकले होते.. सगळे बाळ गोपाळ पाण्यात रस्ते शोधत होते. दोन दिवसांपासून कुणाच्याच पोटाला काही मिळालं नव्हतं म्हणून जो तो आपल्याला काही खायला मिळेल का म्हणून पाण्यात हात जोडून "मला द्या मला द्या..!” असं काहीतरी पोटासाठी मागत होता..
पाणी आता ओसरायला लागलं होतं म्हणून चंपाआजी केव्हाची राहिबाईला भिजलेलं बिऱ्हाड उंचावर कोरड्यात घ्यायला जीव तोडून सांगत होती. राहीच्या पोटात दोन दिवसापासून काहीच नव्हतं. हातात मिळालेलं अन्नाचं पाकीट देत तिचा मोठा पोरगा रमा तिला म्हणाला, "ये आये, घे एक घास खाय मंग उचलू बिऱ्हाड आपलं.” शेवटी तिनं पोराच्या हातातला एक घास दोन ठिकाणी केला अन् परशरामच्या हाताकडं करत "घ्या तुम्ही बी ....” असं म्हणत दोघं एकेक घास खाऊन बिऱ्हाड उचलून लांब नेवून उंचावर टाकलं. दोन दिवसांनी हळूहळू हडकायला लागलं अन् त्यांचा संसार सुरू झाला. -निवृत्ती सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर