मुलांच्या स्मार्ट फोन वापरावर बंधने हवीच !

१६ वर्षांखालील मुलांना इंटरनेट वापरापासून दूर ठेवणारे विधेयक गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या सभागृहात मांडण्यात आले. संसदेतील ११५ सदस्यांपैकी १०२ सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला त्यामुळे लवकरच कायदा स्वरूपात ते जनतेसमोर येईल. कायदा करताना त्यामध्ये सामाजिक माध्यमांवरही मर्यादा घालण्यात येणार आहेत. टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स, इंस्टाग्राम या आणि अशा स्वरूपाच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १६ वर्षाखालील मुलांना खाते बनवता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून सुमारे अडीच अब्ज रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. काही मोजकी मंडळी सोडली तर देशभरातून या विधेयकाचे स्वागत करण्यात येत आहे. लहान मुलांकडून इंटरनेटचा तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा केला जाणारा अतिवापर ही देशासमोर एक मोठी समस्या बनली होती. त्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेला आहे.

          भारताची परिस्थिती पाहता भारतातील लहान मुलांकडून आज सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा बेसुमार वापर केला जात आहे, ज्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. हट्ट करणाऱ्या मुलाला शांत ठेवण्यासाठी किंवा त्याला वेळ घालवण्यासाठी पालक मंडळी आपले स्मार्ट फोन सर्रासपणे पाल्याच्या हाती देतात. काही महाभाग तर आपल्या मुलांना स्वतंत्र स्मार्टफोन्स उपलब्ध करून देतात. आज घरोघरी वायफाय आल्याने आणि इंटरनेट डाटाही स्वस्त झाल्याने या स्मार्टफोन्सवरील इंटरनेटचा मुले मुक्तपणे वापर करताना दिसतात. ऑनलाईन व्हिडीओ गेम्स खेळण्यात आणि रिल्स पाहण्यात ती तासनतास रमतात. रिल्सना वयाचे बंधन नसल्याने हिंस्त्र स्वरूपाचे, अश्लील कंटेंट आणि संवाद असलेले, शिव्यांचा मुक्त वापर केलेले रिल्स मुलांच्या पाहण्यात येतात. सातत्याने असे रिल्स पाहिल्याने त्याचे मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होतात. रिल्समध्ये ऐकलेल्या शिव्या मुलेही एकमेकांना देऊ लागतात. ज्यामुळे मुलांमध्ये भांडणे होऊन त्याचा पालकांच्या डोक्याला ताप होतो. लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शिक्षण थांबायला नको म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला होता ज्यामुळे प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन आला. या प्रदीर्घ कालावधीत स्मार्टफोन वापरण्यात मुले पारंगत झाली; मात्र शिक्षणाव्यतिरिक्त मनोरंजनाचे प्रचंड मोठे दालन या हातात मावणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सामावले असल्याचे मुलांना लहान वयातच ज्ञात झाल्याने मुले मनोरंजनाच्या आणि खेळाच्या अन्य साधनांपेक्षा स्मार्ट फोन्समध्ये अधिक रमु लागली आहेत.

 स्मार्ट फोन्सच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये चिडचिड करणे, राग येणे, सूड भावनेने वागणे, तुलना करणे. मनोराज्यात रमणे यांसारखे दोष वाढले आहेत. इतरांच्या तुलनेत स्मार्ट फोन्स वापरणाऱ्या मुलांमध्ये अपमानाचे आणि आत्महत्येचे विचार अधिक  प्रमाणात येत असल्याचेही एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले, त्यामुळेच गेल्या काही वर्षांत लहान मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अधिक प्रमाणात कार्टून्स बघून मुले त्यातील पात्रांप्रमाणेच वागू लागतात. मुलांच्या मानसिक आरोग्यावर स्मार्ट फोन्सचा विपरीत परिणाम होतो, त्यांची शारिरिक आणि बौद्धिक वाढही खुंटते. पौगंडावस्थेतील मुले स्मार्ट फोन्सवरील रिल्स आणि हिंसक दृश्ये पाहून व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्याचेही निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या सायबर गुन्हेगारीलाही मुले बळी पडू लागली आहेत. स्मार्ट फोन्सचा अति वापर मुलांमध्ये शिक्षणाविषयी, मैदानी खेळाविषयी रुची कमी करतो. मुलांच्या मेंदूचा विकासही स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे खुंटतो. मुली भावनाशील असल्याने स्मार्ट फोनचा अधिक वापर करणाऱ्या लहान मुलींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लवकर परिणाम होतो. जगभरातील हवी ती माहिती चुटकीसारखी उपलब्ध करून देणारा स्मार्ट फोन स्वतः स्मार्ट असला तरी त्याच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे हे निश्चित. आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या स्मार्ट फोनपासून मुलांना पूर्णपणे दूर करूनही चालणार नाही; मात्र आजमितीला प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम निश्चित करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात मुलांच्या स्मार्ट फोन वापरावर बंधने आणली, तशा प्रकारची बंधने भारतातही आणण्याची आज नितांत गरज आहे. - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

तरंगता संसार!