परिवर्तन
भाऊसाहेब आतबाहेर करत होते, धुवाधार पाऊस सुरु होता, श्रावण महिन्यातील पाऊस थांबण्याची चिन्हे नव्हती. बाजूच्या कृष्णमंदिरात शेवंताने शेण काढले होते, भाऊराव त्यांच्या बायकोला नानीला म्हणाले "शेण सुकेल काय सायंकाळपर्यत, रात्री जन्माला मंडळी जमणार, त्यांच्या ओल्या पायानी शेण अजून पसरेल.”
नानी म्हणाली "म्हणून काय शेणाने स्वच्छ केल्याशिवाय कृष्णजन्म होईल? रात्री मंडळी जमली की डाळी घालू, डाळीवर बसतील सर्व.. पण आतापासून डाळी?”
भाऊसाहेब गप्प बसले, खरे तर उत्तर द्यायला पण त्यान्च्या अंगात ताकत नव्हती. गणेश येऊन नाही पोचला तर आपल्यालाच पायपेटीवर बसुन भजन करायला लागेल, या गावात पेटीवर भजन म्हणणारा आपल्याशिवाय दुसरा नाही, सुवर्ण मास्तर होता.. त्याचे हात पायपेटीवर लीलया फिरायचे आणि आवाज म्हणजे गाणे सर्व रागात उत्तम व्हायचे, पण चार वर्षांपूर्वी सुवर्णमास्तर गेला. त्याच्या मुलांच्या अंगात ही कला नाही.. सुवर्णमास्तर नंतर त्यांच्या घरातील गाणे संपलं. आपल्या घरात गणेश पेटी वाजवतो, भजन करतो आणि यापुढे त्यालाच..
घरात नानी आणि शेजारची बेबी स्वयंपाक करण्यात अडकली होती. रात्री कमीत कमी तीस माणसे तरी जेवायला असतील, कालच केळीची पाने तोडून ठेवली होती, द्रोण आणले होते. भरपूर दही लावले होते. काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळ्या. भाऊसाहेब त्यांच्या मुलाची.. सुनेची वाट पहात होते. पंधरा दिवसापूर्वी यमुनेचे म्हणजे त्याच्या सुनेचे पत्र आलेले यंदा यांचा मराठवाडा दौरा ठरला आहे; पण बहुतेक जन्मादिवशी आम्ही येऊ. उशीर होईल पण येऊच. भाऊसाहेबाना सुनेचे "बहुतेक, बहुदा” हे काय ते समजेना. गावातील गनपत गोसावी पुण्याला गेला तेंव्हा गणेश त्याला भेटला, तेंव्हा तो आम्ही जन्माच्या वेळपर्यत घरी येणार,” असे त्याला म्हणाला.
आज कृष्णजन्म आणि उद्या काला. आजच्या जन्माच्या वेळी गावातील मंडळी जमणार. धोंडी, आगलावे, सुवर्णमास्तर, चंदू, उमाकांत, प्रभाकर, सुरेश.. मुद्दाम भजन ऐकायला येतात, सारे भाऊसाहेबांचे भजन ऐकायला येत. धोंडी तबल्यावर असे, आगलावे उत्तम झांज वाजवी. सुरेश.. प्रभाकर चंदू, साधले मास्तरांचे दोन मुलगे साथीला.
भाऊसाहेबांच्या कुटुंबाचे हे कृष्णमंदिर. गेली कित्येक वर्षे कृष्णजन्म आणि काला करत होते. भाऊसाहेबांना आठवत होते, त्या प्रमाणे त्यांचे वडील करत.. मग भाऊसाहेब शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईस गेले, या श्रावण महिन्यात जोराचा पाऊस पडून मुंबईला जाणारे रास्ते बंद पडत, त्यामुळे एसटी बंद असायच्या, मग भाऊसाहेबना येणे शक्य होत नसे, पण त्यांचे मन गावी असे आणि कृष्णजन्मात असे. भाऊसाहेब वडील आजारी पडले, तेंव्हा त्यानी भाऊसाहेबाना बोलावून घेतले आणि पुढची जबाबदारी भाऊसाहेबांनी घेतली. गेली वीस वर्षे हा कृष्णजन्म आणि काला भाऊसाहेब नानीसह करत होते. सुरवातीला सुवर्णंमास्तर भजन करत. तात्यांनी जो अभंग इतकी वर्षे म्हंटला, तोच अभंग सुवर्णमास्तर म्हणत
"गोविंद गोविंद मना, लागलीया छंद...
लागलीय छंद मना, लागलीया छंद..”
पायपेटी मात्र भाऊसाहेब वाजवत, धोंडी तबला आणि आगलावे झांज वाजवी. बाकी साथीला गावातील लोक असत. त्यामुळे ”गोविंद गोविंद मना..” हे त्या घराण्याचे गाणे झाले होते. सुवर्णं मास्तर संगीत शिकून आलेले, त्यामुळे ते पुरिया रागात हा अभंग घेत. सुवर्णंमास्टरांचे भजन रंगत असे..ऐकणारे तल्लीन होत. काल्याचे कीर्तन मात्र भाऊसाहेब करत.
"नारायण भज रे मानस, नाम रे...”
हा पूर्वरंगासाठी अभंग तात्या घेत, तोच अभंग भाऊसाहेब घेत, सुवर्णंमास्तर पेटीवर असत. खूष होऊन मान डोलवत. त्यामुळे हा अभंग या कृष्णजन्माच्या काल्याचा अभंग झाला होता.
वीस वर्षे भाऊसाहेबांनी हा अभंग घेऊन कीर्तन केले आणि कृष्णकाला केला; पण आता वय ऐशीपार गेले होते, मधुमेहाने शरीर पोखरले होते, दोन तास भजन करण्याची आणि काल्याचे कीर्तन करायची शक्ती अंगात नव्हती, सुदैवाने गणेशला संगीताचे अंग होते. लहान होता तेंव्हा मुंबईत त्याने संगीताचा क्लास केला होता, मग गावी काही वर्षे होता तेंव्हा सुवर्णंमास्तराकडे शिकायचं. पेटी उत्तम वाजवतो.. अभंग म्हणतो.. आलापी घेतो; पण कीर्तन कसे करील कोण जाणे? म्हणजेच सुवर्णंमास्तर गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील गाणे संपले तसें भाऊसाहेबांच्या घरातील गाणे संपणार नव्हते, याचे त्याना समाधान वाटले.
रात्री आठला भजन सुरु करण्याची त्त्यांची पद्धत होती, पण सहा वाजले तरी गणेश पोचला नव्हता, यमुना आली तर नानीचा भार कमी होणार होता, नानीच्या मदतीला बेबी असली म्हणून काय झालं? एवढी जेवणे आणि चहापाणी. पाऊस जोरात होता, गणेश आला तर जीप घेऊन येईल, त्याला ऑफिसकडून मिळालेली. पण आंबोली घाटात काय झाले तर? गाडी अडकून पडेल. भाऊसाहेब पाय दाबू लागले, त्यांनी आयोडेक्स घेतले आणि ते पायाला मालिश करू लागले.. गणेश नाही आला तर पेटीवर बसुन भजन म्हणावे लागेल. नानी आत काम करत होती, पण तिचे पण लक्ष गणेशकडे होते.
साडेसहा वाजले आणि मोठया रस्त्यावर जीपचा आवाज ऐकू आला. नानीने आवाज ओळखला, पाय दाबत बदलेल्या नवऱ्याला ती म्हणाली "गणेश आला बहुतेक, जीपचा आवाज येतोय.”
भाऊसाहेब उभे राहिले.. कान मोठे करून आवाजाचा कानोसा घेत राहिले, एवढ्यात जीप गोपाळकृष्णच्या दारात ड्रायव्हरने लावली आणि गणेश यमुना बॅग घेऊन खाली उतरली. यमुना धावत घरात आली आणि पाण्याचा तांब्या तिने बाहेर आणला. गणेश आणि गाडीचा ड्रायव्हर पाणी पित होते, तोपर्यत ती चहा आणायला आत गेली.
"अरे साडेसहा वाजले, म्हंटले तू येतोस की नाही, घाटात वेळ झाला का?”
"कामे संपेनात, मंत्री होते काल पुण्यात.. निघायला उशीर झाला, पाऊस पण पडतोय वाटभर.”
"मला आता भजन करायला झेपायचे नाही रे.. तुलाच या पुढे.”
"त्याची काळजी करू नका.. मी तयारी करतोय भजनाची क्लासात आणि उद्याचे कीर्तन पण मीच करेन.” भाऊसाहेबाना समाधान वाटले, नाहीतर सुवर्णं मास्तरासारखे, त्याच्या नंतर त्याच्या घरातील गाणे संपले. यमुनेने सर्वाना चहा दिला. गणेश हातपाय धुवून आला, तोपर्यत भजनासाठी आणि कृष्णजन्मासाठी लोक जमू लागले. धोंडी आला आणि गणेशला बघून खूष झाला, झांज घेऊन आगलावे आले, साधले मास्तर, सुरेश, चंदू, प्रभाकर, जीजी.. बरीच मंडळी जमा झाली.
गणेश कपडे बदलून आला आणि सर्व भजनमंडळींना भेटू लागला. तोपर्यत भाऊसाहेबांनी जीजीच्या डोवयावरून पायपेटी देवळात ठेवली. ती पायपेटी पाहून गणेश म्हणाला, "आता ही नको पेटी, जुनी झाली ती.. तिच्यातून स्वर व्यवस्थित येत नाहीत, मी आणली आहे दुसरी पेटी..” गणेशाने ड्रायव्हरला खूण केली, तशी ड्रायव्हरने नवीन कोरी पायपेटी आणुन ठेवली. भाऊसाहेब चमकले, त्यांना आश्यर्य वाटले.. अनेक पिढ्या जी पेटी वाजवत होती, ती पेटी गणेश नको म्हणतो?
"अरे गणेश, ही आपली पारंपरिक पेटी आहे, माझे आजोबा, वडील मी हीच पेटी वाजवून भजन केले..”
"बाबा, ही पेटी जुनी झाली हो, त्याचे स्वर व्यवस्थित बाहेर येत नाहीत, गेल्या वर्षीचं माझ्या लक्षात आले होते.. म्हणून मी माणगावच्या मधु मेस्त्रीला नवीन पेटी बांधायला सांगितली होती.. काय स्वर आहेत बघा..” असे म्हणून गणेशने पेटीवर बोट फिरवली, ती ऐकून साधले मास्तर पटकन उदगारले "आह.. आह.. काय आवाज आहे.” आगलावे उठून उभे राहिले आणि ती नवी कोरी पायपेटी पाहू लागले, मग सर्वच मंडळी उठली आणि नवीन पेटी, तिचे स्वर याची स्तुती करू लागले. भाऊसाहेब अस्वस्थ होऊ लागले, काही तरी बिघडले आहे, असे त्यांना वाटले.. त्याना ती नवी पेटी, तो पिवळा धम्मक रंग, तो भाता, ते अनोळखी वाटू लागले. भाऊसाहेब आत घरात येऊन अंथरुणावर पडले.
कृष्णजन्माचे भजन सुरु झाले, गणेश नव्या पायपेटीवर बसला.. धोंडीने तबला ठक.. ठाक करत पेटीच्या स्वरांना जुळवून घेतला, आगलावेने झांज हातात घेतली. चंदू, प्रभाकर, सुरेश, नितीन साथीला बसले. जेवण आटोपून जीजी, यमुना, बेबीपण भजन ऐकायला बसल्या.गणेशने भजन म्हणायला सुरवात केली. "गोविंद गोविंद मना.. लागलीया छंद...
लागलीया छंद...मना लागलीय छंद...”
आतमध्ये भाऊसाहेब गादीवर पडून भजन ऐकत होते. दरवर्षी हेच भजन पुरिया रागात सुवर्णंमास्तर आणि मग भाऊसाहेब म्हणत असत. आज गणेशने ”मारवा” मध्ये रागात भजन घेतले. भाऊसाहेबाना काहीतरी विचित्र वाटत होते.. काही तरी बदलते आहे.. नवीन पिढी मोडतोड करत आहे. गणेशने भजनास नवीन पायपेटी घेतली हे त्यांना आवडले नव्हते तसेच हा नवीन राग.... त्त्यांचा अंदाज होता.. तबल्यावरील धोंडी पण चक्रवलेला असणार, साधलेमास्तर अनेक वर्षे कृष्णजन्म पाहिलेले.. भजनातील जाणकार.. तेपण नाराज झाले असणार, सुरेश, प्रभाकर..काय करावे हे भाऊसाहेबाना समजेना. भजनाचा आवाज त्यांच्या कानावर पडत होता. एवढ्यात नानी खोलीत आली.
"बरे वाटतं नसले तरी थोडा वेळ देवळात या.. भजन कसे रंगलेय पहा. मुलांचे कौतुक करायला नको?” नाईलाजेने भाऊसाहेब हळू हळू चालत देवळात आले. त्यांना वेगळेच दृश्य दिसले. गणेश रंगात आला होता.. पेटी सुरेल वाजत होती. धोंडी तोडीस तोड भजन वाजवत होता.. आगलावेची झांज खणखणत होती...साथ करणारे जोशात कृष्णाचा गजर करत होते.
भाऊसाहेबांनी साधलेमास्तरांकडे पाहिले, मास्तर खुशीने मान डोलवत होते, त्यांची पत्नी नानी आणि सून यमुनापण ठेवयावर टाळ्या वाजवत होत्या. थोडावेळ देवळात बसुन भाऊसाहेब परत आपल्या खोलीत आले. आता बारा वाजता कृष्णजन्म. कृष्णजन्माच्या वेळी भाऊसाहेब देवकी बनत. देवकीसाठी ते डोवयावरून शाल घेत आणि कृष्णाला त्यात घेऊन लोकांना दाखवत. आज गणेश कृष्णजन्माच्या वेळी काय करतो याचे त्याना टेन्शन आले. शहरात राहून नवीन काही केले नाही म्हणजे मिळवले.
कृष्णाचा पाळणा तयार होता. रात्री साडेअकराला गणेशने भजन आवरते घेतले आणि तो आत घरात आला. आता तो डोवयावर शाल घेऊन देवकी बनेल असा लोकांचा अंदाज होता. पण गणेशने उत्तर भारतातील स्त्रियाप्रमाणे परकर ब्लाउज घातला आणि वर दुपट्टा घेतला. इकडे देवळात साधलेमास्तरांनी गवळण सुरु केली.
"बाळ कसा नेऊ पाण्यातून..
कृष्ण कसा नेऊ...”
गवळण जोरात सुरु असताना देवकी झालेला गणेश देवळात आला आणि सर्वांनी गवळण उच्च स्वरात नेली. मग पाळण्यातील कृष्ण देवकीच्या ओटीत आला. कृष्णजन्म झाला तेंव्हा रात्रीचे बारा वाजले होते. मंडळी जेवली आणि आपल्या घरी गेली. नानी भाऊसाहेबाना म्हणाली "यंदा गणेशने मथुरेतील देवकीसारखे कपडे घातले, ते लोकांना आवडले. गणेशने आपल्या वडिलांपेक्षा चांगला कृष्णजन्म केला असे सुरेश म्हणत होता.” असे गणेशचे कौतुक होत असले तरी भाऊसाहेब विष्णण होते.. आज गणेशने आपल्यासारखे किंवा आपल्या तात्यासारखे वेष केला नाही, याचे त्यांना दुःख वाटले. गणेश आपलाच मुलगा.. आपली पुढील पिढी.. तात्याकडून हा वसा आपण घेतला तेंव्हा त्यात काही बदल केला नाही, पण आपला मुलगा गणेश.. सर्व मोडतोड करत सुटलाय... रात्रीचे दोन वाजले तरी त्याना झोप येईना.. उद्या काला.. उद्या कीर्तन.. उद्या आणि काय पहावे लागेल याची त्यांना चिंता लागून राहिली.
सकाळी भाऊसाहेब उठले पण त्त्यांचे चित्त ठिकाणावर नव्हते. त्यानी आंघोळ केली आणि नेहेमीप्रमाणे देवळात जाऊन कृष्णपूजा केली. देवळाच्या कोपऱ्यात काल नवीन आणलेली पायपेटी ठेवली होती, पण तिच्याकडे त्याना पहायची इच्छा होईना. एवढ्यात गणेश देवळात पूजा करायला आला. त्याला भाऊसाहेब म्हणाले "काल्याच्या कीर्तनाची तयारी आहे ना रे? नाही अजून कधी कीर्तनला उभा राहिला नाहीस, म्हणून काळजी वाटते.”
"काही काळजी करू नंका बाबा, तुम्ही फक्त ऐकायला बसा.”
"पण पेटीवर कोण बसणार?” असे भाऊसाहेबाना विचारायचे होते कारण पायपेटी फक्त भाऊसाहेब आणि गणेशला येत होती आणि गणेश कीर्तनला उभा रहाणार. मग पेटीवर? पण त्त्यांचा प्रश्न ऐकायला गणेश होता कुठे? तो फुल तोडायला बागेत गेला होता. काल्यासाठी माणसे जमू लागली. काल रात्री होती ती सगळी मंडळी आलीच, शिवाय गावातील अजून माणसे, बायका, मुले जमली. गणेश धोतर, सदरा घालून आला. दरवर्षीची कीर्तनकराची पगडी त्याने डोवयावर घातली. डोक्याला गंध लाऊन तो कृष्णदेवाला नमस्कार करून आला, मग भाऊसाहेबना, नानीला, साधलेमास्तराना. साधले मास्तरानी त्याला उठविले आणि ते म्हणाले, "भाऊसाहेब, गणेश थेट तुमच्यासारखा दिसतो या वेशात. मग सगळेच म्हणालो, होय होय.. गणेश थेट वडिलांसारखा दिसतोय. आज पेटी कोण वाजवणार याचे सर्वाना कुतूहल होते, एवढ्यात गणेशाने "तुकाराम” अशी हाक मारताच कालचा जीप चालवत आलेला ड्रायव्हर पुढे आला आणि त्याने पायपेटी उभी केली आणि तो पेटीवाल्यांच्या खुर्चीवर बसला. भाऊसाहेब घाबरले, म्हणजे हा तुकाराम ड्रायव्हर पेटी वाजवणार... झाला सत्यानाश.. राग आलेले भाऊसाहेब उठत होते, तोच तुकारामने पेटीवर स्वर लावले, आणि सर्वांनी एकदम "आहा.. हा.. हा” केले. अर्धवट उभे राहिलेले भाऊसाहेब खाली बसले.
कीर्तन सुरु झाले. तुकाराम ड्रायव्हर पेटीवर, धोंडी तबल्यावर. गणेशाने दरवर्षीचा भाऊसाहेबांचा अभंग घेतला
"नारायण भज रे मानस.. नाम रे..”
आता पुन्हा गणेशाने यमनकल्याण राग घेतला.. भाऊसाहेब पुन्हा नाराज झाले. आपण हा अभंग भीमपलास घेत होतो.. तीच आपल्या कुटुंबाची परंपरा, पुन्हा गणेशाने राग बदलला.. किती मोडतोड चालली आहे. कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाबद्दल काही पारंपरिक कथा होत्या, गणेश नवीन नवीन पुस्तकातील संदर्भ देत, उत्तरेकडील ग्रंथातील कथा सांगू लागला. भाऊसाहेबाना बसवेना, त्यांनी उठण्यासाठी मांडी बदलली; पण साधलेमास्तरांनी त्याना खुणा केली, "उठू नका..” अशी. परत भाऊसाहेब बसले. त्यांनी श्रोत्याकडे पाहिले.. सर्वजण खूष होते.. ही नवीन माहिती लक्षपूवर्क ऐकत होते. माना डोलवत होते.. तुकाराम रंगात येऊन वाजवत होता.. धोंडी तोडीस तोड साथ देत होता. कीर्तन रंगत होते, भाऊसाहेब साधले मास्तराकडे पहात होते.. साधलेमास्तर त्यांच्याच वयाचे.. अनुभवी.. उच्चशिक्षित.. आधुनिक विचाराचे... गाणे जाणणारे. गेली अनेक वर्षे या कृष्णजन्मास हजर राहिलेले. कीर्तन रंगात आले होते. गणेशाने गवळण घेतली.
"देवकीचा बाळ बाई, नंदाघरी आला
गोकुळात जिकडेतिकडे आनंद झाला..”
कीर्तन संपत येत असताना दह्याचे मडके टांगले होते... ते सर्वांनी फोडले. प्रसाद घेऊन लोक घरी गेले. भाऊसाहेब देवळात बसुन होते. कृष्ण पूजेची सूत्र आपल्या मुलाकडे दिली हे खरे, पण.. त्यांना काहीतरी जाचत होते... आपल्या मुलाने पहिल्याच वर्षी परंपरा मोडली.. वेगळे अभंग... वेगळे राग..
साधलेमास्तर घरी गेले नव्हते. घरात नानीबरोबर गप्पा मारून, चहा पिऊन आले.. त्यांनी पाहिले.. भाऊसाहेब अजून देवळात खांबाला टेकून बसलेत.. त्यांच्या अनुभवी नजरेने सर्व टिपले होते. ते भाऊसाहेबांच्या शेजारी बसले.
"भाऊ, सुवर्णंमास्तर गेला आणि त्याच्या घरातील गाणे संपले.. तसे तुझे झाले नाही.. तुझा मुलगा उत्तम गातो... एवढा मोठा ऑफिसर पण कीर्तनाला उभा राहिला.. देवकी बनून कृष्णजन्म केला त्याने. भाग्य तुझे. पण तू नाराज आहेस हे माझ्या नजरेतून सुटलेले नाही.. आपला वसा नवीन पिढीकडे देताना मनाची घाबराट होतेच रे.. रेल्वेगाडी रुळ बदलताना थोडा खडखडाट होतोच.. गणेशने नवीन पेटी आणली हे तुला आवडलेले नाही, अरे पण काय सूर आहेत या पेटीचे.. गाववाले खूष झाले स्वर ऐकून. गणेशाने अभंगाचा राग बदलला, काय फरक पडला? उलट ते अभंग या रागात मजा देत राहिले. कृष्णजन्म हा उत्तर भागातील, त्या भागातील देवकी गणेशने उभी केली. आता जग बदललय.. तो तुकाराम ड्रायव्हर, काय सुंदर त्याने पेटी वाजवली... या गावात तूझ्यासारखा पेटी वाजवणारा दुसरा नव्हता.. आज कुणाला तुझी आठवण आली नाही. तू नशीबवान आहेस भाऊ.. तुला असा गुणी मुलगा मिळाला आणि तुझी सून यमुना.. किती गुणी मुलगी.. आल्यापासून राबते आहे..”
"पण साधले, तुम्हाला भजन आवडले ना? काला?”
"होय.. सर्वजण खूष आहेत.. नानी खूष आहे.. आता मी आत चहा पिऊन आलो, पण तू खूष नाहीस भाऊ.. का? तूझ्या मुलाने नवीन पायपेटी बांधून घेतली.. तिच्याकडे पहिलंस तरी.. अरे बघ.. तिचे स्वर.. पाण्यासारखे पळतात नुसते.. तू अस्सल पेटीवाला.. आपल्या मुलाचे कौतुक करायला नको?”
"करायला पाहिजे रे,..”
"अरे भाऊ, परिवर्तन होतच राहणार.. जुने ते सोने म्हणून कसे चालेल? नव्या परिवर्तनची पण तयारी करायला हवी, चल, बस, त्या पेटीवर आणि वाजव तुझे आवडते गाणे.”
भाऊसाहेब उठले आणि त्यानी पेटी उभी केली,.. स्वरावरुन हळूच हात फिरवीला आणि गाऊ लागले
"उगवला.. सूर्य पुनवेचा..
मम हृदयी..”
त्यांचे गाणे ऐकून नानी, गणेश, यमुना बाहेर आली... सर्वांचे डोळे वाहू लागले.
देवळातून सूर बाहेर पडत होते..
"सूर्य पुनवेचा.. उगवला सूर्य पुनवेचा..”
-प्रदीप केळुस्कर