गीत-संगीतमय आठवणी

हमे और जीने की चाहत ना होती,
 अगर तुम ना होते..
तुम ना जाने किस जहाँ मे खो गयें
हम भरी दुनियामे तन्हा हो गये..


लताच्या आठवणीशिवाय या ओळीला तसा अर्थ कुठे आहे? लताजींची महती वर्णन करणारे सर्व विशेषणं रांगेत उभी असतात. लता म्हणजे संगीताचे देणं आहे. शब्दांना स्वरांचा परीस स्पर्श लाभला की अर्थाच्या चांदण्यात न्हाऊन निघायला होतं.

संस्कार जेव्हा घट्ट खिळण्यासारखें रुतलेले असतात, तेव्हा मुखवटे हतबल होतात. तत्वांना तिलांजली देणं हे काही माणसाकडून प्राण गेला तरी घडत नाही. दिल सच्चा और चेहरा झूठा हे माहित असूनही अनेक जण चेहऱ्यावर फसतात. चेहऱ्यावर ठरलेला जोडीदार मुखवट्यामुळे उघडकीला येतो. मन जसं उलगडत नाही तसं काही माणसेही उलगडत नाहीत. मन म्हणजे हिमनगाचं तळ. चेहरा हसरा करत करत माणसें मनात कपट रचत असतात. आपल्या मनातील क्षणांनी कोणाशी दोस्ती करावी हे आपल्या हातात नाही. क्षण हे क्षणभंगुर असले तरी मनात कोणत्या क्षणांचं काहूर कोणत्या वेळी माजेल हे सांगता येत नाही. क्षणांचा लगाम सैल झाला की क्षण सैरभैर उधळतात. कोणत्या क्षणांना आपल्यावर हाती होऊ द्यायचं हे आपल्या हातात असतं. आत्महत्या करणाऱ्यांना त्यांच्यावर हावी होणाऱ्या क्षणांना थोपवता येत नाही.

त्या क्षणापुरतं हावी होणाऱ्या क्षणांना थांबवलं की आत्महत्या टळतें किंवा इतरांनी त्यांना परावृत्त केलं की आत्महत्या टळतें. कित्येक लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; पण तो टळला किंवा अनेक कारणांमुळे तो टळला.

अनेकांच्या अजरामर काव्याला लतादीदींनी अत्तराच्या गुपित बंद केल्याप्रमाणे पिढ्यानपिढ्या ते जपून राहील. गीताला संगीताचा स्पर्श झाला की मोगरा फूललां तसं काहीतरी हृदयात होतं.

रुक जा रात ठहर जा रे चंदा
बितेने मिलन की रैना हे ऐकताना कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही?
कुछ दिल ने कहां.. कुछ भी नही
म्हणत म्हणत व्यथा सांगणारं अप्रतिम गाणं हृदयावर कोरलं जातं.
जन पळभर म्हणतील हाय हाय या भा.रा. तांब्यांच्या ओळींनासुद्धा पळवर थांबून हे गीत ऐकावं वाटत असेल.
मोगरा फुलला हे ऐकताना तर स्वतःचे आयुष्य फुलतं आहे की काय असं वाटतं.
ढळला रे ढळला दिन सखाया आता प्रभूचे नाम कासया
संध्या छाया भिवविती हृदया
लागले नेत्र पैलतिरी
भयाण सत्य माहित असलं तरीही गोड गळ्यातून जेव्हा ते बाहेर पडतं, तेंव्हा
अनेकांच्या अश्रूंची फुलें होतात.
आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर मरने का इरादा है
 हे लताजींनाही जाणवलं असेल शेवटच्या दिवसात. कवीच्या भावना हृदयापर्यंत पोहोचवाव्यात तर लताजींशिवाय  ते शक्यच नाही.
तुम ना जाने किस जहाँ में खो गयें
हम भरी दुनिया मे तन्हा हो गयें
दिन जो पखेरू होते पिंजरे मे मैं रख लेतां.
या सर्व भावना लता दीदींना आठवताना येतातच.

आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है यावेळी लतादीदींना शेवटच्या क्षणी आठवत असतील का? शरीराला वार्धक्य येतं; पण सुरांना कुठे वर्धक्य येतं हे लतादीदींकडे पाहिल्यावर कळतं. काही दर्द भऱ्या गीतांनी दुःखं होतं पण लतांनी गायल्यावर हुंदका फुटतो.

लता दीदींचे गाणे म्हणजे स्वरांचे कारंजे, सप्तसुरांचे इंद्रधनुष्य जणू स्वरांच्या चांदण्यात न्हाहून निघालेला संगीताचा ताजमहाल. लता मंगेशकर म्हणजे भारत मातेच्या कंठातील एक अनमोल रत्न आहे. संगीतातील सर्व अलंकार लतादीदींच्या पायाशी लोळण घेत होते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लतादीदींचा आवडतं गाणं म्हणजे ओ सजना बरखा बहार आई
हे सोपे पण गायला तितकेच अवघड, अनेक चढउतार व कठीण जागा दाखवाव्यात त्या लता मंगेशकर यांनीच. ऐसे रिमझिम मे वो सजन प्यासे प्यासे मेरे नयन
इतक गोड चरण व सुरांचे झालेले चढउतार कठीण असले तरी ऐकायला लतामुळेच मधुर वाटतात. संगीतातल्या काही जागा लतामुळे आठवणीत राहतात. प्रत्येक गायकाची एक वेगळी शैली असते. कारण प्रत्येक गायकांनी आपल्या गळ्यावर, आपल्या स्वरांचा संस्कार केलेला असतो. रियाज हा एक संस्कारच आहे. रियाजाशिवाय गाणं म्हणजे संस्काराशिवाय जगणं.

तेरे सूर और मेरे गीत दोनो मिलकर बनेगी प्रीत असंच प्रत्येक गीतकाराला लतांच्या बाबतीत वाटत असेल.  गीतकारांच्या शब्दांना सप्त स्वरात इंद्रधनुष्यप्रमाणे लता दीदी गुंफतें. आमच्याकडे आजही अनेक लता आहेत, हवाय तो फक्त आधार, आशा आहेत, आशाला पल्लवीत करायच्या असतील तर प्रेरणा हवीच, प्रेरणा असेल तर संगीताचा उषःकाल ठरलेलाच.

भालजी पेंढारकरांच्या शब्दात सांगायचं तर "अवतार समाप्तीच्या वेळेस भगवान श्रीकृष्ण येथे विसरून गेलेली बासरी म्हणजे लता”!
लता पिढ्यानपिढ्या राज्य करेल. लता युगाचा अस्त कधी होणारच नाही. लता ही संगीतातील भगवत गीता आहे.    पोथी ची कितीही पारायणं केले तरी प्रत्येक वेळेस एक नवीन आयाम जगण्याला मिळतो.

डोळ्यात पाणी असणाऱ्यांनीच लताची गाणी ऐकावीत.  मधु मागशी माझ्या असो की जनपळभर म्हणतील हाय हाय असो कंठ दाटणारच. लताची रडवणारी गाणी, रडलो तरी ते रडणं अनेकांना आवश्यक वाटतं.. व्यक्तिमत्त्वाचं आकाश मोकळं होण्यासाठी.

मोगरा फुलला म्हटलं की डोळ्यासमोर नुसता बहरलेला मोगरा येत नाही तर स्वरांचा आवाज सुगंधा सारखाच मनाच्या अत्तरकुपीत बंद होतो.
फुलें वेचितां बहर कळीयासी आला हे ऐकताना जणू लतांची गाणी ऐकता ऐकता अनेक जण गायला लागल्या, बहरायला लागल्या हे जाणवतं.
लताचं कोणतं गाणं रडवत नाही व कोणतं गाणं हसवत नाही? कोणतं गाणं विचार करायला लावत नाही, गाणं लिहिणाऱ्यांकडून तत्त्वज्ञान येतं, पण गाणाऱ्याकडून मानसशास्त्र कळतं. गाणं नुसतं गाऊन फायदा नाही, तर गाण्यात भाव उतरला पाहिजे. गीत हृदयाला भिडायचे असेल तर संगीताची रुणझुण हवीच.
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय


याची जाण भा.रा. तांबे आणि लता यांना असणारच. पण काही माणसांची आठवण रोज तीळभर का होईना पिढ्यान्‌पिढ्या येत राहणार आणि लताची गाणी म्हणून म्हणून लोक लताला जिवंत ठेवणार. माणसें जातात.. आठवणी जात नाहीत. लताची आठवण ही संगीतातून कधीच जाणार नाही
-डॉ.अनिल कुलकर्णी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जानेवारी महिन्याचा लेखाजोखा !!!