भाविकांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र चिरनेर महागणपती
माघ शुध्द चतुर्थी तथा गणेश जयंतीनिमित्ताने आज १ फेब्रुवारी रोजी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या महाराष्ट्रातील श्री अष्टविनायक स्थळी आणि देशभरातीलही श्रींच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावणे आश्चर्याचे नाही. अनेक दशकांची ही परंपरा अखंडीतपणे सुरु असणे यामागील तसेच देवावरील, आराध्य दैवत श्री गणेशावरील श्रध्दाभाव वाढणे यास अनेक कारणे असू शकतात. मात्र या साऱ्यांचा धागा एकच श्री दर्शन घेणे! याच श्री दर्शनासाठी हाच भाविक, भवत विविध श्री गणेश चरणी लीन होण्यासाठी गेलेला असेल. नवी मुंबई नजिकच्या उरण तालुवयातील श्री क्षेत्र चिरनेर,जि. रायगड येथील स्वयंभू श्री महागणपती दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील आणि बाप्पांपुढे लीन होत त्यांचे आशीर्वाद घेऊनच परततील...असे दरसालचे चित्र आजही पहावयास मिळेेल...
सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकट दूर करणारा, नवसाला पावणारा अशी भाविकांच्या मनात श्रध्दा असलेल्या श्री क्षेत्र चिरनेर महागणपती उत्सव सोहळ्याची महती आता सर्वदूर पसरली आहे. उरण, पनवेल, नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, पुणेसह अन्य भागातूनही अनेक लोक भाविक भवत या नात्याने दरसाल येतात, श्रींचे दर्शन घेतात आणि निघून जातात. बाप्पांचे आणि आपले नाते आहे, अशी भावना या भाविकांमध्ये असल्याचे जणू दिसून येते. यापैकीच अनेक भाविक संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीलाही नियमित येतात. यामागे मुख्य कारण एकच, भाविकांच्या मनात श्री क्षेत्र चिरनेर महागणपती विषयी असलेली श्रध्दा. भाविकांच्या मनातील बाप्पांवरील हा अढळ श्रध्दाभावच त्यांची पाऊले दरसाल माघ शुध्द चतुर्थ दिनीच्या गणेश जयंतीदिनी आपसूक वळवत असतो, असे भाविकांशी बोलल्यानंतर जाणवते.
काही वर्षांपूर्वीचा काळ पाहता गणपती मंंदिरात नित्याचा पूजापाठ होणे आणि ग्रामस्थ व गावात येणारे पाहुणे यांनी श्रींचे दर्शन घेणे हे ओघाने आलेच. मात्र जे श्रींचे दर्शन घेऊन गेले ते पुन्हा पुन्हा येऊ लागले. पाहुणे म्हणून जे मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह अन्य ठिकाणाहून येऊन गेले ते येताना आणखी २-४ लोकांना दर्शनार्थी म्हणून आणू लागले. यामुळे अन्य ठिकाणच्या भाविकांमध्ये वाढ होत गेली. अशा भाविकांमधील अनेक जण माघ शुध्द चतुर्थ दिनीच्या गणेश जयंतीदिनी येऊ लागले, त्यावेळीही आपले कुटुंबिय, मित्र, नातेवाईक, परिचित यांना ते आणू लागले आणि या दिवसाला वाढत जाणारी भाविकांची संख्या आणि कळत-नकळत माघ शुध्द चतुर्थ दिनीच्या गणेश जयंतीदिनी मंदिर भाविकांनी फुलून जाणारे ते चित्र स्थानिकांनाही समाधान देणारे ठरु लागले आणि उत्सव परंपरा काही वर्षांपासून सुरु झाली.
दरम्यान, गेल्या किमान २५-३० वर्षांपासून माघ शुध्द चतुर्थ गणेश जयंतीदिनी भाविकांच्या संख्येत सातत्याने झालेली वाढ लक्षणीय आहे. यामागे कारण तेच... श्री महागणपतीवर त्यांच्या मनात असलेला श्रध्दाभाव. भाविकांना कुतूहलापोटी, आपण कधीपासून श्रींच्या दर्शनासाठी येता, काही अनुभव आलेत का, नियमित येता का..यासह अन्य प्रश्न विचारले तर ते याबाबत निश्चत उत्तर देतात. त्यांना आलेले चांगले अनुभव ते सांगतात. श्रीक्षेत्र चिरनेर महागणपती म्हणजे सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकट दूर करणारा, नवसाला पावणारा...असाच आहे, असे सांगत भाविक त्यांच्या मनातील श्रध्दाभाव आणि त्यांना आलेले अनुभव-प्रचिति ते निःसंकोचपणे सांगत असल्याचे दिसून येते. असे भाविक आज श्रींच्या दर्शनाला आलेले पहावयास मिळतील.
गेल्या काही वर्षांपासून माघ शुध्द चतुर्थ दिनीच्या गणेश जयंतीदिनाचा उत्सव सोहळा अत्यंत व्यापक स्वरुपात साजरा होत असून भाविक-भवतांनी जणू सामुहिकपणे श्रींचे दर्शन घेणारा महोत्सवच म्हणायचा. मंदिरात भजन, किर्तनाची मांदियाळी, मंदिर परिसराला आलेले धार्मिक रुप, विविध प्रकारची दुकानांमुळे जाणवणारा यात्रौत्सव, संपूर्ण गावात भवतीमय वातावरण, नोकरी-व्यवसायानिमित्त इतर असणारा ग्रामस्थ, माहेरवाशीण अशी सारी मंडळी आपल्या मित्र-स्नेहींना सोबत घेत आवर्जून गावी येणे... असे सारे चित्र मन हेलावणारेही आहे. भाविकांच्या सेवेसाठी पिण्याचे पाणी आणि महाप्रसाद व्यवस्था केली जाते. भाविक आवजर्ून या सेवांचा लाभ घेत असतात. रात्री श्रींचा पालखी सोहळा असतो. श्री क्षेत्र चिरनेर महागणपती उत्सव सोहळा दरसाल व्यापक होत आहे आणि भाविकभवतांची संख्या वाढत आहे. काही भाविक पायी येतात, कोणी दिंड्यांमधून तर कोणी एकटा तर काहीजण समुहाने येतात.अनेक भाविक नियमित येतात-काही जण अन्य भाविकांना सोबत आणतात...यासह अनेक मनोहारी दृश्ये पहावयास मिळतात.
गेल्या काही कालावधीत उत्सवास भव्य स्वरुप प्राप्त होत गेले, तसे मूळ मंदिराचे सभामंडप, उत्तरेकडील प्रवेश द्वाराआधी उभारण्यात आलेला भव्य मंडप, श्रींचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघाल्याांनतरच्या आधीच्या मोकळ्या जागीही मंडप आहे. तर याच ठिकाणी प्रभू श्रीराम भवत हनुमानजींचे मंदिर आहे. मंदिरासमोरील तलावाचे सुशोभिकरण केले आहे. तलावानजिक प्राचीन शिवमंदिर आहे. याच मंदिराजवळ १९३० सालच्या जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मा धाकू गवत्या फोफेरकर यांच्या स्मरणार्थ राज्य शासनाने उभारलेले हुतात्मा स्मारक आहे. याच स्मारक आवारात जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या नरवीरांची काल्पनिक शिल्पे आहेत. त्यामुळे श्री महागणपती मंदिर प्रेक्षणीय असून भाविक पर्यटकही समाधान मानत असयाचे दिसून येते. भाविकांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र चिरनेर महागणपतीचे स्थान आता सुपरिचित आहे. त्याचबरोबर १९३० साली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे इतिहास प्रसिध्द असलेले चिरनेर एक धार्मिक स्थळ म्हणूनही सुप्रसिध्द ठरले आहे, ते केवळ स्वयंभू महागणपतीमुळेच! - रामनाथ चौलकर