हवेहवेसे वाटणारे इच्छामरण
‘हळवे पाषाण' या काव्यसंग्रहाद्वारे सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये डॉ. सुनीता चव्हाण यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये ‘वेदनेची गर्भनाळ' हा काव्यसंग्रह. लगेच मार्च २०२२ मध्ये भयातून निर्भयाकडे... संवादसेतू हा त्यांचा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध झाला; आणि मराठी वाचकांचे लक्ष त्या संग्रहाने आपल्याकडे वेधून घेतले. एका वर्षात एखाद्या मराठी पुस्तकाच्या सहाहून अधिक आवृत्त्या निघणं ही खरंच ऐतिहासिक ,दुर्मिळ आणि निखळ कौतुक करण्यासारखी गोष्ट. ते भाग्य या ललितलेखसंग्रहाला लाभले आहे.
नुकतीच त्याची नववी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि आता डिसेंबर २४ मध्ये ‘इच्छामरण' हा कथासंग्रह आणि ‘वारी निसर्गरंगांची' हे प्रवासवर्णन अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या लेखात आपण ओळख करून घेणार आहोत इच्छामरण या त्यांच्या कथासंग्रहाची. पहिलीच चकवा ही कथा ट्रान्सजेंडर असलेल्या तनय या व्यक्तीविषयी आहे. या उत्कंठावर्धक कथेत शरीरात होणारे अनैसर्गिक बदल स्वीकारून, समाजाचा रोष आणि विरोध पत्करून यशस्वी आयुष्य जगणाऱ्या तनय या तरुणाचा संघर्ष शब्दबद्ध केलेला आहे. आपले शरीर स्त्रीमध्ये परावर्तित होत आहे हे कळल्यावर त्याच्या मनाची होणारी घालमेल, उदासीनता, वैफल्य याचे वर्णन लेखिकेने संयमितपणे..पण परिणामकारकपणे केलेले आहे. शेवटचा सकारात्मक धक्काही आनंद देऊन जातो. एकंदरीत दुर्दैवाने या प्रक्रियेमधून जाणाऱ्या सर्वानाचएक आशादायक संदेश लेखिकेने दिलेला आहे. हा विषय निवडून लेखिकेने या जमातीविषयीचा जिव्हाळाच व्यक्त केलेला आहे... आणि आपल्याला त्यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी दिलेली आहे.
या कथासंग्रहाला जिचे नाव दिलेले आहे ती इच्छामरण ही कथाही मनोवेधक. या कथेत लेखिकेची जीवनाविषयक कृतज्ञता, विनम्र भाव आणि दुर्मिळ अशी समाधानी वृत्ती दृष्टोत्पत्तीस येते. इच्छामरणाच्या प्रवासाला निघताना धरती, अग्निदेवता, अन्नपूर्णा, भिंती, साड्या, पोशाख, अलंकार, अनेक फुलझाडे या साऱ्या निर्जीव वस्तूंचे ती आभार मानते. आपल्या यशाचे सारे श्रेय या साऱ्या निर्जीव वस्तुंना देते. ही कल्पनाच किती भन्नाट ! सर्वसाधारण माणूस अपुऱ्या इच्छांचा, स्वप्नांचा डोंगर घेऊनच मरणाच्या दारी जात असतो. पण देह सोडताना तिची विरक्ती, जीवनविषयक अलिप्त भाव आणि उतू जाणारी आनंदी वृत्ती अनुकरणीय वाटते.
आणि ती बाबा झाली ही पौगंडावस्थतेतील मुलाच्या मानसिक आणि शारीरिक बदलांची आणि त्यानुसार त्याच्या वरखाली आंदोलित होणाऱ्या नाजूक भावलहरींची कथा. त्याची आई अतिशय कौशल्याने त्याच्या मनातील भयगंड दूर करत त्याच्या मनातील गुंता सोडविते. हे वयात येणाऱ्या बऱ्याच मुलामुलींच्या बाबतीत घडत असतं. पण त्यांना कथेतील आईसारखी आई मिळतेच असे नाही. मग त्यांच्या नशिबी भरकटणं येतं. महत्वाचा विषय, सोप्या शब्दात सांगितलेली वैद्यकीय माहिती, साधी शैली. पौगंडावस्थतेतील मुलामुलींनी आणि त्यांच्या आयांनी आवर्जून वाचावी अशी कथा. लेखिकेचे आत्यंतिक प्राणीप्रेमी दर्शवणारी ‘माऊ' ही कथा. पोटच्या पोराप्रमाणे माऊचं आजारपण काढणारी, त्याच्यावर जीवापाड जीव टाकणारी, त्यांनी चावलं तरी ; आपली माणसंकित्येक वेळा रक्त न काढणाऱ्या जखमा करत असतात. त्यांना आपण सोडून देतो का? असं घरच्यांना विचारणारी आणि मरेपर्यन्त त्याची सेवा करणारी लेखिका शेवटी त्याच्या मृत्यूने कोलमडते.
‘एक हळवं पत्र' या कथेत पत्नीला गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष केलेल्या पतीची पश्चातापदग्ध अवस्था वर्णन केली आहे. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. शेवटी पती पत्नीच्या मृत्यूनंतर तिला पत्र लिहितो आणि आपली चूक कबूल करत, मन मोकळं करतो. पत्र वाचून मुलींचाही गैरसमज दूर होतो. पौगंडावस्थेतील समस्यांपासून ट्रान्स जेंडर व्यक्ती, कौटुंबिक मतभेद, भांडणे, मानापमान, संस्काराचं जपणं, न जपणं, प्राणीप्रेम इत्यादी विविध विषयावरील बारा कथा या संग्रहात आहेत. म्हणून हा संग्रह एकसुरी न वाटता वेगवेगळ्या अनुभूतींची गोडी चाखायला देणारा वाटतो. जीवनातील घटना, संदर्भ सहजपणे त्या निसर्गाशी जोडतात. निवेदन आणि संवाद हे दोन्ही प्रकार, कथानक पुढे सरकवण्यासाठी त्या परिणामकारकपणे वापरतात. जीवनाकडे पाहण्याचा श्रद्धाशील आणि संस्कारक्षम दृष्टिकोन त्यांच्या कथांमध्ये सकारात्मकता आणि प्रफुल्लताआणतो. साधारणपणे मध्यमवर्गीयांचे भावविश्व मांडणारी साधी, सरळ भाषाशैली हे आणखी एक वैशिष्ट्य.
हा संग्रह सौ. विद्या नाले यांनी, अनघा प्रकाशन, ठाणे येथून प्रकाशित केलाय. इच्छामरण या नावाला साजेसे मुखपृष्ठ सतीश खानविलकर यांनी केले आहे. पुस्तकाला गंधाली दिवाळी अंकाचे संपादक डॉ. मधुकर केशव वर्तक यांची प्रस्तावना लाभली आहे. लेखिकेचा हा पहिलाच कथासंग्रह. त्यामुळे कसलेल्या कथालेखकाचं प्राविण्य आणि परिणामकारकता येथे अपेक्षित नाही. पण परिणामकारक कथालेखनाला आवश्यक असणाऱ्या आशय, शैली, नाट्यात्मकता, ठसठशीत व्यक्तिरेखा, टोकदार संघर्ष, उत्कंठावर्धक कथाबीज निवडीची प्रगल्भ जाणीव, या वैशिष्ठ्यांचे दर्शन पुढील संग्रहातून अधिक ठळकपणे जाणवेलयाची खात्री हा संग्रह नक्कीच देतो. अधिक गोळीबंद आणि चिंतनशील कथा त्यांच्या हातून लिहून होतील अशा शुभेच्छा देऊन थांबतो.
इच्छामरण कथासंग्रह अनघा प्रकाशन, ठाणे
मुखपृष्ठ श्री. सतीश खानविलकर मूल्यः रुपये २००/-
प्रकाशनः डिसेंबर २०२४ पुस्तकासाठी संपर्कः ९२७००५३६०२
-अशोक गुप्ते