माध्यमकर्मी आणि बाकीच्यांची कर्मे

यंत्रणांनी अन्याय केला, कुठे दफ्तरदिरंगाई झाली, कुठे कुणी दादागिरी केली, फसवणूकीचा अनुभव आला की प्रथम आठवतो तो पत्रकारच! पैसेवाले, धनिक, कुबेरपुत्र, आर्थिदृष्ट्या बलवान लोक त्यांचा न्याय ‘त्यांच्या पध्दतीने' मिळवतात. मात्र अजूनही रस्त्यावर चालणारा सर्वसामान्य माणूस, साधा नागरिक, मध्यमवर्गीय, लोकशाही-न्यायप्रणाली यांच्यावर विश्वास ठेवणारे नागरिक यांना पत्रकारच जवळचे वाटत असतात.

   ही गोष्ट पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीची असावी. तिला कोणताही लेखी पुरावा नाही. केवळ एकाने सागितले दुसऱ्याने ऐकले या पध्दतीने ती संक्रमित होत गेली व कर्णोपकर्णी झाली हे आधीच सांगितलेले बरे! गोष्ट अशी आहे की विख्यात साहित्यिक स्व. विजय तेंडुलकर त्यांच्या ‘हटके' लेखनशैलीसाठी प्रसिध्द होते. त्यांनी त्यांच्या एका लेखात हिंदुत्ववादाबद्दल की देव-धर्माबद्दल काहीतरी लिहिले होते. त्यावेळी ते मराठीतील एका नामांकित दैनिकात काम करीत असत. त्यांच्या त्या लेखामुळे खवळलेल्या एका हिंदुत्ववादी नेत्याने त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जात तेंडुलकरांवर छडीने हल्ला केला होता व त्यांना झोडपून काढले होते. विशेष म्हणजे ही घटना भारतीय जनता पक्षाच्या जन्मापूर्वीची असून जनसंघ हा तत्कालिन राजकीय पक्षही कसाबसा अस्तित्वात असण्याच्या काळातली आहे.

   विजय तेंडुलकरांची विविध नाटके, लेख हे ‘काळाच्या पुढच्या गोष्टी' सांगत असत. बंडखोरी, प्रचलित नितीनियमांना धवका देणारे असे त्यांचे लिखाण असे. त्यांचे ‘घाशीराम कोतवाल' हे नाटक परदेश दौऱ्यावर निघाले होते. त्यात हिंदुंची, देवतांची टिंगल वगैरे आहे म्हणून त्यावेळी शिवसेनेने प्रारंभी त्या दौऱ्याला विरोध केला होता. पण यातून मग त्यात काम करणाऱ्या कलाकारांना मारहाण, जखमी करणे प्रकार होऊ नयेत म्हणून शिवसेनेतीलच प्रमोद नवलकर व त्यांच्यासारख्या साहित्यिक, सांस्कृस्तिक जगतात वावरणाऱ्या नेत्यांनी या नाटकातील कलाकारांना ‘संरक्षण' देऊ केले होते. १९९२ च्या सुमारास बाबरी मशिद पाडली जाण्याच्या काळात  एका नामांकित मराठी दैनिकातून विजय तेंडुलकरांनी ‘रामप्रहर' या नावाचे दैनिक सदर चालवले होते. २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एवसप्रेसला लागलेल्या आगीत अयोध्येहुन परतणारे ५९ हिंदु कारसेवक जळून मृत्यू पावले; तर ४८ कारसेवक जखमी झाले होते.  यानंतर गुजरातमध्ये धार्मिक दंगे उसळले व  त्यात ७९० मुस्लिम तर २५४ हिंदुंना आपला प्राण गमवावा लागला व सुमारे २५०० नागरिक जखमी झाले होते. त्याहीवेळी विजय तेंडुलकर म्हणाले होते की ‘मला जर पिस्तुल मिळाले तर मी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोळी झाडेन.' मात्र त्यांच्या या स्फोटक ववतव्यानंतरही तेंडुलकरांना अटक करण्यात आली नव्हती आणि ‘मी तसे म्हणालोच नव्हतो, माध्यमांनी मोडून तोडून ते वक्तव्य माझ्या तोंडी घुसवले, मिडियाने त्याचा विपर्यास केला' वगैरे टाईपची प्रतिक्रियाही तेंडुलकरांनी दिली नव्हती हे विशेष!

   सांगायचे तात्पर्य हेच की वेगळे, हटके, काहीसे बोचरे, टोकदार, कठोर सत्य सांगणारे कुणी बोलले, लिहिले, छापले तर ते सगळ्यांनाच पसंद पडतेच असे नाही किंवा ते हलकेपणाने घेण्याचेही औदार्य, जिंदादिली, खिलाडूपणा सगळ्यांकडेच असतो असेही नाही. अनेकदा यात प्रसार माध्यमकर्मींना बळीचा बकरा बनवून त्यांच्यावर ‘बिल फाडण्याचे' उद्योग केले जातात. गेली सुमारे तीस वर्षे माध्यमकर्मी म्हणून वावरताना याचा मीही अनुभव घेतला आहे. नवी मुंबईतील काय किंवा अन्य महानगरे, शहरे, तालुके काय, बातम्यांचे केंद्रस्थान तेथील प्रभावी व्यक्तीमत्वे असतात हे ओघाने आलेच. साधारण पंधरा वर्षांपूर्वीची ची गोष्ट आहे. येथील एका राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीतील एका ज्येष्ठ सदस्याने मला सांगितले होते की ‘गणेश नाईक यांच्याविरोधात असे लिही, तसे लिही.' मी म्हटले की ‘बरे.. मी असे लिहीतो आणि तसेही लिहीतो; पण हे सारे तुमच्याकडून कळल्याचे तुमच्या नावानिशी लिहुन टाकतो, कारण आम्हाला हवेमध्ये लिहिता येत नाही. आम्ही लिहितो त्या लिखाणाला सबळ पुरावा पाहिजे आणि तुम्ही तर हे आरोप करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावानिशी मला लिहावे लागेल.' मी असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने माझा नाद सोडला. अनेकांना विंचू  मारायचा असतो; पण तो पाहुण्यांच्या चपलेने!  पत्रकारांच्या खांद्यावर बंदुक ठेवून चाप ओढायला अनेकजण उत्सुक असतात. यामुळे एखादा पत्रकार अडचणीत आला तर मात्र त्याच्या बाजूने कितीजण उभे राहतात, हा प्रश्न उरतोच!

   ‘लोकशाहीच्या चारही खांबांना किड लागली आहे. ते भ्रष्टाचाराने पोखरले आहेत, सत्ताधाऱ्यांची बटीक बनले आहेत, देशातील सहिष्णुता संपुष्टात आली आहे, हा देश सर्वसामान्यांना राहण्याच्या लायक उरला नाही, पत्रकार विकले गेले आहेत, गोदी मिडियाचा उदय झाला आहे, अंधभक्तांची चलती आहे' वगैरे वगैरे टाईपची मुक्ताफळे उधळताना अनेकजण अवतीभवती सहज आढळून येतात. मात्र याच लोकांवर यंत्रणांनी अन्याय केला, कुठे दफ्तरदिरंगाई झाली, कुठे कुणी दादागिरी केली, फसवणूकीचा अनुभव आला की या सगळ्यांना प्रथम आठवतो तो पत्रकारच! पैसेवाले, धनिक, कुबेरपुत्र, आर्थिदृष्ट्या बलवान लोक त्यांचा न्याय ‘त्यांच्या पध्दतीने' मिळवतात. मात्र अजूनही रस्त्यावर चालणारा सर्वसामान्य माणूस, साधा नागरिक, मध्यमवर्गीय, लोकशाही-न्यायप्रणाली यांच्यावर विश्वास ठेवणारे नागरिक यांना  पत्रकारच जवळचे वाटत असतात. अनेकजण त्यांच्या जवळपासच्या भागात कुठेही आग लागली तरी अग्निशमन दल, पोलीस यांना कळवण्याऐवजी आधी पत्रकारांना फोन करतात असा अनुभव आहे. आजही अनेक ठिकाणी साप निघाला तर लोक अग्निशमन दल किंवा पोलीसकर्मींआधी मला फोन करुन त्याची खबर देतात हे मी अनुभवले आहे. मी अनेक सर्पमित्रांच्या सानिध्यात असल्याने असे होत असेल कदाचित. अपघात झाला, डोमेस्टिक व्हायोलन्स अर्थात घरेलु हिंसाचार, सुनेचा छळवाद, घरातील ज्येष्ठांची उपेक्षा, हाल करणारी मुले-सुना याहीबाबतीत असे पाहायला मिळते की येथेही लोक आधी पत्रकारांना कळवतात. ‘हे सगळे पोलीसांना आधी सांगा' असे लोकांना सांगितल्यावर ते म्हणतात की ‘पोलीस आमचे ऐकत नाहीत, लगेच कारवाई करायला येत नाहीत,  येतात तोवर चोर, गुन्हेगार, संशयित आरोपी पळून गेलेले असतात; त्यापेक्षा तुम्हीच त्यांना सांगा ना!'  

   जागल्याची भूमिका निभावणे, विसंगती-भ्रष्टाचार-अन्याय नेमका टिपून तो प्रसारमाध्यमांतून मांडणे, नागरी समस्यांना वाचा फोडणे ही पत्रकारांची कर्तव्ये आहेतच; अनेकजण ती नित्यनेमाने पार पाडत असतातच. परंतु बऱ्याचदा  सारी कामे पत्रकारांनीच करावीत असाही काही लोकांचा दुराग्रह दिसतो. यातून अनेक गंमतीजमती, वादविवाद, तंटे, चकमकी उद्‌भवतात. वाशीच्या टोलनाक्यावर मुतारी हवी..यावर पत्रकारांनीच लिहायला हवे; ट्रॅफिक पोलीस हप्ते खातात यावर पत्रकारांनीच लेखण्या झिजवाव्यात-स्टिंग ऑपरेशन करावे, बड्या राजकारण्यांच्या शिक्षण संस्था पालकवर्गाची लूट करुन भरमसाठ फी आकारतात याविरोधात पत्रकारांनी आवाज उठवावा, ठेकेदार-राजकारणी-अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात याबद्दल पत्रकारांनी झोड उठवावी, मोठ्या-नामांकित हॉस्पिटल्समधून रुग्णांच्या नातेवाईकांना मोठमोठ्या रकमा भरायला लावून लुबाडले जाते..या आणि अशा कित्येक मामल्यांमधून राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते, संबंधित शासकीय विभागांचे उच्चाधिकारी, पोलीस, न्यायालये वगैरे मार्गाने जाण्यापेक्षा ‘आधी पत्रकारांना गाठू या' अशा मानसिकतेचे लोक खूप आहेत. पण अशी त्यांच्या मागण्यांची दखल घेताना अनेकदा पत्रकारांच्या मानसिकतेचे काय होते, याचा कितीजण विचार करतात? एकाने दुसऱ्याला रस्त्यात फटकावले, दुसऱ्याने तिसऱ्याला कोर्टाच्या आवारात चोपले, सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून कुणाला तरी बाहेर काढले, कोर्टाने निर्णय दिला तरी आधीचेच पदाधिकारी दादागिरी करताहेत या व अशा प्रकारच्या शेकडो बाबी नित्यनेमाने अवतीभवती घडत असतात. अनेकदा त्यात कुणाचे तरी हितसंबंध, पूर्वीची भांडणे, आपापसातील वैर, व्यवितगत अहंकार लपलेले असतात. या साऱ्याची दखल घेण्यासाठी पत्रकारांवर दबाव टाकणे, त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहचून तिथे आपल्या व्यवतीगत फायद्याच्या, आपली छबी उजळ करणाऱ्या बातम्या छापून येण्यासाठी सक्ती करणे हेही प्रकार काही महाभाग करत असतात. म्हणजे कर्मे त्यांची.. आणि नसता ताप माध्यमकर्मींना अशा प्रकारांचा सामनाही अनेक पत्रकारांना करावा लागत असतो. तेही त्यांचा त्यात कसलाही सहभाग, संबंध नसताना!

   अलिकडे सारे  डिजिटलाईज्ड झाले आहे. वर्तमानपत्रे तरी त्याला कसा अपवाद असतील? पूर्वी कुणा सामाजिक कार्यकर्त्याने, राजकीय व्यवतीमत्वाने, संस्थेच्या पदाधिकाऱ्याने वा अन्य कुणी आपल्या लेटरहेडवर प्रसिध्दीपत्रक वर्तमानपत्र कार्यालयात कुणाच्या मार्फत किंवा स्व-हस्ते दिले की त्याची बातमी बने..आजही काहीजण त्यावरुन बातमी बनवतातच! पण संगणक..त्यानंतर मोबाईल, व्हाटस्‌ अप, त्यावरील विविध ॲप्स, ईमेल पाठवायची सुविधा, त्यावरच व्हिडिओ, टेलिग्राम, फेसबुक,  इन्स्टाग्राम अशा अत्याधुनिक सोयी त्यात आल्यावर वर्तमानपत्रांतील ‘टायपिस्ट' या पदाचे जवळपास उच्चाटन झाले. ‘वाचकांची पत्रे' पूर्वी कागदावर लिहिलेल्या अवस्थेतच दैनिके/साप्ताहिकांच्या कचेरीत पोस्टाने पोहचत. हाही प्रकार अलिकडे जवळपास बादच झाला. तेही सारे आता ईमेलवर/व्हाटस्‌अपवरच प्राप्त होऊ लागले. कागद व तो बनवण्यासाठी केली जाणारी झाडांची कत्तल वाचली. पण तरीही काहीजण त्यांच्या त्यांच्या कुठल्यातरी स्मरणिका, जातिविशेषांची नियतकालिके यातून छापून आलेल्या बातम्यांच्या पानांचे फोटो काढून ‘व्हाटस्‌ अप' वरुन ते पत्रकारांना धाडतात आणि ‘यातील तिसऱ्या, आठव्या, चौदाव्या ओळीतील त्या अमुकतमुकांची नावे वगळून ही बातमी छापा' असा गळेपडूपणा करतात, तेंव्हा त्यांचा गळा आवळावासा वाटतो.

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हवेहवेसे वाटणारे इच्छामरण