उपेक्षित समाजाच्या वेदना मांडणारे आत्मकथन  ः परका

परका आत्मकथन प्रत्येक युवकांस प्रेरणा देते गरिबी असली तरी संघर्ष, जिद्द यांतून लेखक घडतो. जीवन अंधकारमय असतानाही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील वंचित उपेक्षित भटक्या समाजाला सामाजिक समानतेच्या पायावर उभे केले. आत्मकथन परका  कैकाडी समाजाची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती रेखाटते.

मराठी साहित्यात अनेक साहित्य प्रकार प्रचलित आहेत. सर्वांत लोकप्रिय प्रकार तो आत्मकथन असून स्वतःच्या वाटयाला दुःख वेदना समाजातील दैन्य दारिद्रय प्रस्थापित समाजाकडून होणारी ससेहोलपट याचे चित्रण म्हणजे आत्मकथा असते. मराठी साहित्यविश्वात खूप आत्मकथन येऊन गेले..त्यात प्रामुख्याने - उपरा - लक्ष्मण गायकवाड, उचल्या - लक्ष्मण माने,  कोल्हाट्याचं पोरं - किशोर शांताबाई काळे, आठवणीचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे,  झोंबी - नांगरणी - आनंद यादव, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, बलुतं दया पवार,  आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेन्द्र जाधव, निवडूंगाचे काटे - जी. जी. कांबळे, गावठाण - तु लि कांबळे जागरण - भारत सातपुते इ. आत्मकथने प्रचंड गाजली. आत्मकथन स्वकथन असते.

आज परका हे लालासाहेब जाधव यांचे आत्मकथन वाचण्यात आले. सरांच्या आत्मकथनास खूप पुरस्कार मिळाले आहेत. हे एक सुंदर आत्मकथन असून जगण्याचा संघर्ष सामाजिक जाण आणि भान लेखकाला आहे. आपण समाजातून आलो त्या समाजाचे ऋण फेडले पाहिजे यांवर लेखकाचा फार विश्वास दिसतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील वंचित उपेक्षित भटक्या समाजाला सामाजिक समानतेच्या पायावर उभे केले.  प्रस्तुत आत्मकथन परका  कैकाडी समाजाची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती रेखाटते.

१) कैकाडी समाजाचं वास्तव : परका या आत्मकथनातून लालासाहेब जाधव  यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन काबाडकष्ट करून आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करून शासकीय नोकरी प्राप्त केली. कैकाडी समाज आज उपेक्षित वंचित असून त्यांचा जीवन संघर्ष फारच ताकदीने लेखकांनी मांडला आहे. कैकाडी समाजाला न्याय देण्यासाठी लेखक आज धडपडत आहे. संबंधित आत्मकथन कैकाडी समाजाला रानोमाळ फिरून दिवसभर एक पायलीभर धान्य मिळत नव्हतं, समाजातील कोणा पाहुण्यांची मदत करण्यासारखी परिस्थिती नव्हती, तरीसुद्धा शिक्षण हे परिवर्तनाचे हत्यार अशी व्याख्या महात्मा फुले यांनी केली होती; त्या शिक्षणाच्या जोरावर लेखकांनी उंच भरारी घ्ोतली वाखाणण्याजोगी आहे.

२) जगण्यासाठी धडपड : या आत्मकथनातून लेखकाने कैकाडी समाज त्यांचे स्थान त्यांच जगणे उपेक्षित वंचित जीवन  अधोरेखित केले असून समाजाचे हाल, दैन्य जवळून भोगलेले आहे. डुकरास पकडून त्याला मारणे, त्याचे मांस खाणे हे जगणे कैकाडी समाजाचे होते. पाट्या-टोपल्या, झाप, कुडवे, खुराडी बनविणे हा व्यवसाय पोटासाठी कैकाडी समाज आज करतोय. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर भटक्या जाती जमाती यांचा संघर्ष आज सुरूच आहे सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी लालासाहेब जाधव आज धडपडत असून कैकाडी समाजाला अनुसूचित जातीत समावेश करावा यासाठी प्रयत्न करत आहेत.

३) कैकाडी समाजाचा संघर्ष : समाजात जगत फक्त आरक्षणाच्या कुबड्या न घेता जिद्दीने शिक्षण घेऊन ताठ मानेनं जगता आलं पाहिजे यावर लेखकाचा विश्वास आहे. आपल्या वेदनेवरती कोणी हसले तरी चालेल, पण आपल्या हसण्याने कोणाला वेदना होऊ नये आयुष्यात कधी कधी धीर देणारे आणि मदत करणारे कान अन ्‌समजून घेणाऱ्या हृदयाची नितांत गरज असते. जातव्यवस्थेचे लेखकाचे चिंतन मूलगामी तर आहे; परंतु कैकाडी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची धडपड तळमळ यात व्यक्त होते. कैकाडी समाजात लक्ष्मीआई, मरिआई, खंडोबा, देवर, आरकुळा, गम्मा या देवदेवतांवर श्रध्दा ठेवतात. यातून सामाजिक मागासलेपण सिद्ध होते. लेखक कैकाडी समाजात विळयाचे महत्व आणि मूल्य सत्यता आणि दैवत म्हणून असल्याचे रेखाटतो. गरिबीत आणि अन्यायी वातावरणात शिक्षण घेतात ही जिद्द आत्मकथनातून व्यक्त होत रहाते.

४) आत्मकथन - परका  सामाजिक भाष्य : आई वडिलांनी भोगलेला वनवास बालवयात लेखकाला प्राप्त झाला वयाने लहान असूनही इतर जवळचे नातेवाईक तोंड टाकून आईला बोलायचे. तारानानी आणि गीता आजी दोघी मिळून लेखकाच्या आईला मारताना पहातात, त्या वेदना लहानपणी लेखक पहातो.  पोट भरण्यासाठी बिऱ्हाड घेऊन आई बाबा सोबत लेखकाला जावे लागते स्कॉलरशिपवर लेखकाने शिक्षण घेतले काही वेळा पाट्या टोपल्या विकून आई वडिलांना दहा पंधरा रुपये मिळत त्यातून लेखक शिकला या आत्मकथनाचे बलस्थान म्हणजे कैकाडी भाषेचा वापर लेखकाने केला आहे. कैकाडी समाजाची भाषा, संस्कृती यांचं चित्र आणि चरित्र वाचकांना मिळते.

५) शिक्षणाचा संघर्ष : लेखकाचे बालवयात लग्न होते बी ए शेवटच्या वर्षाचा परिक्षा फार्म भरताना आर्थिक विवंचनेमुळे बायकोच्या पायातील पैंजण गहाण ठेवून लेखकाला पैसे घ्यावे लागले. कणगी, टोपल्या पाट्या विकायला जाताना पोटात अन्नाचा कण नसायचा. तहान लागली तरी पिण्यासाठी पाणी मिळायचे नाही. कोणी दिले तर वाकून जनावराप्रमाणे ओंजळीने प्यायला लागायचे. द्रारिद्रय आणि अस्पृश्यतेचे वेदना भोगून लालासाहेब जाधव सचिवालयाच्या नोकरीत पोचले आणि अवर सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले. नोकरी करतानाही जातियतेचे चटके सोसावे लागले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श लेखक समोर ठेवतो. कारण अनुसूचित जातीचा आणि कैकाडी समाजाचे परिस्थिती सारखीच होती. वडिल अंध होते; परंतु पहिलवान होते. तशा अवस्थेत मुलांना सायकलवर बसवून ते प्रवास करत सेवानिवृत्तीनंतरसुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रकल्प संचालक म्हणून महत्वाची जबाबदारी लेखकाने बजावल्याचे दिसते.

लालासाहेब जाधव यांची कथा पुण्याची पेरणी करणारी सुद्धा आहे. स्वकीय आणि परकीय दोन्ही बाजूनी परका लेखकाची आत्मकथा वाचण्यासारखी आहे.

६) द्रारिद्रय, दुःख, वेदना : आयुष्यात संघर्ष असावाच लागतो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून साऱ्या जगासमोर आदर्श ठेवला, तो शिक्षणाद्वारा ते सिद्ध केला. लहरी निसर्गाने पाठ फिरवल्यानंतर पोटासाठी वणवण फिरावे लागले पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची शेती पिकत नव्हती. शेतकऱ्यांच्या शेतीत पीकच येत नसल्यामुळे त्यांच्याकडे धान्य कोठून येणार शेतकऱ्यांकडे? धनधान्य नसल्यामुळे जवळ असलेली पाट्या, टोपली, झाप, कुडवे बनविण्याकरिता कुणी येत नाही. कैकाडी समाजातील लोकं गाव सोडून बाहेरगावी सुगीला गेल्यानंतर बरेच दिवस आंघोळही करीत नसत. लेखकाचं बालपण फिररस्त्यासारखं गेल होतं. आता मोठेपणीदेखील फारसं वेगळं नव्हतं. नोकरी होती तरी आजही भटक्याचं जीवन जगत होतो..मी भटक्या विमुक्त कैकाडी जमातीचा आहे व असंच जगणं माझ्या नशिबात आहे असंच वाटत होतं..असं लेखक लिहुन जातो.

७) आई - वडिलांची पुण्याई : लेखकाच्या आई वडिलांच्या कष्टातून, त्यांच्या रक्ताच्या थेंबातून, घामातून लेखकाचे आयुष्य बदलले. आईची प्रकृती चिंताजनक असल्याचा हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर मी सुरेश व संजय आम्ही तिघे जण बारामती येथील हॉस्पिटलमध्ये पोचलो डॉ रमेश भोईटे यांना भेटलो त्यांनी आईला पूर्णपणे तपासले. परंतु आई निस्तेज पडून होती डोळे मिटलेले होते हालचाल बंद होती श्वासोच्छवास बंद झाल्यासारखा वाटत होता डॉ भोईटे यांनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. खुर्चीवर बसवलं आणि डॉक्टर भोईटे यांनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं "जाधव तुमची आई तुम्हाला सोडून गेली आहे.” आईने तिच्या सर्व मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं २७ मार्च २००८ रोजी आई लेखकांस सोडून गेली वडिल २३ मे २००१ रोजी मोरगाव या ठिकाणी गेले. अशा प्रकारे आई वडिल गेल्यानंतर लेखक पोरका झाला. आई वडिलाच्या पुण्याईमुळे लेखक शासकीय नोकरीस लागला. समाजातील प्रत्येक थरांतून असे आई वडिल व्हावे अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतो.

८) सामाजिक जाणिवांचा संदर्भ : परका आत्मकथन प्रत्येक युवकांस प्रेरणा देते गरिबी असली तरी संघर्ष, जिद्द यांतून लेखक घडतो. जीवन अंधकारमय असतानाही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली पाहिजे. कैकाडी समाजातील इतर आई वडिलांप्रमाणे आमच्या आई वडिलांनी आम्हालाही त्यांच्या पिढीजात धंदयामध्ये कायम ठेवलं असतं तर आम्ही अशिक्षित राहिलो असतो, असे लेखकास वाटते.

परका ( आत्मकथन) लेखक - लालासाहेब जाधव  प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
प्रस्तावना : श्रीपाल सबनीस  मुखपृष्ठ - सरदार जाधव  पृष्ठसंख्या -२८८
किंमत -  ४०० रुपये  पहिली आवृत्ती - २०२३
-प्रा पी एस बनसोडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !