मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !

 मुलांना शाळेत पाठवताना आपण शाळांनी ठरवून दिलेला गणवेश घालून त्यांना पाठवतो, कार्पोरेट कार्यालयांतही कपड्यांच्या बाबतीत कंपनीने घालून दिलेले नियम कर्मचाऱ्यांना पाळावे लागतात. रुग्णालये, न्यायालये, पोलीस, टपाल कार्यालय सर्वच ठिकाणी ड्रेसकोड आहेत आणि वर्षोनुवर्षे या ड्रेसकोडचे पालन होत आलेले आहे, मग देवालयांत जाताना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा कशी बरे येते? मुळात मंदिरे ही काही सहलीची ठिकाणे नाहीत की ज्या ठिकाणी कोणी मौजमजेसाठी यावे. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांत मागील शेकडो वर्षांपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

देशभरातील लक्षावधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहिर करण्यात आला आहे.  मंदिर प्रशासनाने एक पत्रकही जारी केले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादर प्रभादेवी येथे वसलेल्या पुरातन श्रीसिद्धिविनायक मंदिरात फार पूर्वीपासून भक्तांची गर्दी पाहायला मिळते. प्रतिदिन हजारो भक्तगण श्रीगणरायाच्या चरणी लिन होण्यासाठी येतात. मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा आकडा काही लाखांच्या घरात जातो. आपल्या आराध्य देवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील भाविकही याठिकाणी येत असतात. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी सात्विकता जपली जावी यासाठी मंदिर  प्रशासनाने नुकतेच एक पत्रक काढले असून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी इतरांना संकोच वाटणार नाही यासाठी आपल्या संस्कृतीला साजेसे म्हणजे अंगभर कपडे परिधान करून यावे असे आवाहन या पत्रकातून केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असेही या पत्रकात नमूद केले आहे. आजमितीला राज्यातील अनेक मंदिर प्रशासनांनी आपापल्या मंदिरांत भाविकांसाठी ड्रेसकोड अर्थात वस्त्रसंहिता लागू केली आहे.

भारतीय संस्कृतीची भुरळ आज साऱ्या जगाला आहे. त्यामुळेच प्रयागराज येथील महाकुंभातील सात्विकता अनुभवण्यासाठी आणि परमपवित्र गंगा नदीत डुबकी मारण्यासाठी हजारो विदेशी पर्यटक, सेलिब्रिटी  कुंभनगरीत आले आहेत. प्राचीन हिंदू संस्कृती आणि मंदिरे देशाचा अनमोल ठेवा आहेत. आजवर या देशावर अनेक आक्रमकांनी हल्ले करून येथील वैभव लुटून नेले; मात्र येथील संस्कृतीच्या खुणा त्यांना मिटवता आल्या नाही. या खुणा आणि त्यांचे पावित्र्य जतन करून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे ते पावित्र्य टिकवून ठेवण्याचे दायित्व आता आपल्या खांद्यावर आहे. महाराष्ट्रात जेव्हा मंदिरांतून वस्त्रसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा समाजातून जसे या भूमिकेचे स्वागत झाले, तसा यास काही पुरोगामी मंडळींकडून विरोधही करण्यात आला. तरीही मागील दोन वर्षांत राज्यातील अनेक मंदिरांनी ड्रेसकोड लागू केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात राज्यातील काही उत्सव मंडळांनीही श्रीच्या मंडपात वस्त्रसंहितेचे पालन करणे बंधनकारक केले. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांत मागील शेकडो वर्षांपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणारे भाविक त्याचे तंतोतंत पालन करतात, मग राज्यातील वस्त्रसंहितेला विरोध का? मंदिरांच्या गाभाऱ्यात जाताना पुरुषांनी सोवळे आणि स्त्रियांनी साडी नेसावी ही प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे, मग मंदिर परिसरातील वस्त्रसंहितेला आक्षेप नेमका कशासाठी ? मुळात मंदिरे ही काही सहलीची ठिकाणे नाहीत की ज्या ठिकाणी कोणी मौज मजेसाठी यावे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला त्या देवतेचे दर्शन घ्यायचे असते, देवतेच्या मूर्तितून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करायचे असते, आपले मागणे देवापुढे  मांडायचे असते. याचाच अर्थ तिथे देव प्रत्यक्ष आहे आणि तो आपले म्हणणे ऐकणार आहे अशी श्रद्धा येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते. मग त्या देवतेच्या ठिकाणचे पावित्र्य जपणे आपले कर्तव्य नव्हे का?

मुलांना शाळेत पाठवताना आपण शाळांनी ठरवून दिलेला गणवेश घालून त्यांना पाठवतो, कार्पोरेट कार्यालयांतही कपड्यांच्या बाबतीत कंपनीने घालून दिलेले नियम कर्मचाऱ्यांना पाळावे लागतात. रुग्णालये, न्यायालये, पोलीस, टपाल कार्यालय सर्वच ठिकाणी ड्रेसकोड आहेत आणि वर्षोनुवर्षे या ड्रेसकोडचे पालन होत आलेले आहे, मग देवालयांत जाताना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा कशी बरे येते? कोरोना काळात कोरोना रुग्णांना भेटायला जाताना पीपीई किट परिधान करून जाणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यावेळी ते नियम डॉक्टरांनी केले होते म्हणून आपण सर्वानीच ते पाळले. मग धार्मिक स्थळांच्या बाबतीत धर्म आणि अध्यात्मशास्त्र जाणणाऱ्या मंडळींनी केलेले नियम आपल्याला मान्य का होत नाहीत? चित्रपटात अंग प्रदर्शन करणाऱ्या हॉलिवूड-बॉलिवूडमधील नायिकाही मंदिरांत जाताना साजेशी वस्त्र परिधान करतात, डोक्यावर पदर घेतात; मग आपण या नियमांना विरोध करून नेमके कोणते पुढारलेपण दाखवत आहोत? पुरातन मंदिरे ज्यावेळी निर्माण करण्यात आली, त्यावेळी सामान्य लोकांचे पोशाख हे सात्विक आणि धर्माला अनुसरून होते. त्यामुळे त्यावेळी वस्त्रसंहिता बनवण्याची गरजच निर्माण झालेली नव्हती. आताच्या पिढीवर असलेला पाश्चात्य संस्कृतीचा पगडा, धार्मिक स्थळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेल्याने वस्त्रसंहिता लागू करणे आज अनिवार्य झाले आहे. मंदिरे ही पर्यटनाची केंद्रे नसून ती धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी योग्य ती शुचिर्भूतता पाळली जावी, मंदिरांचे पावित्र्य राखले जावे, मंदिरांत येणाऱ्या भाविकांचा देवतेप्रतीचा भाव टिकून राहावा यासाठी तोकडे आणि निषिद्ध कपडे परिधान करून मंदिरांत प्रवेश करण्यास अनेक देवस्थानांकडून घालण्यात आलेली बंदी स्वागतार्ह आहे.   - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सुक्या म्हावऱ्याचा सुखी प्रवास