नाते जुळले - नात्याच्या पलीकडले
माणसाला माणसाशी बांधून ठेवणारे नाते म्हणजे मैत्री. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे की ‘शरीराची सेवा करणारे हात आणि डोळ्यांचे रक्षण करणाऱ्या पापण्या, कोणत्याही हेतूने प्रेरित न होता, न सांगताच आपले रक्षण करीत असतात; त्याचप्रमाणे न सांगता निर्हेतूक आपल्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा मित्र होय.' या व्याखेनुसार कर्जत जि.रायगड येथील ‘अभिनव ज्ञान मंदिर' या शाळेतील १९७४-७५ च्या नवीन अभ्यासक्रमाच्या (१०+ २ + ३ ) चे आम्ही १०२ विद्यार्थी, विद्यार्थिनी दोन तुकड्यांत विभागलो गेलो. ह्यापैकी दहा-बारा विद्यार्थी हयात नाहीत. ह्यातील बहुतेकजण इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत एकत्र होते. १९७५ साली दहावीची परिक्षा झाली. १०२ पैकी १०० जण पास झाले व त्यानंतर सर्वजण विखुरले गेले.
आमचा वर्गमित्र सुधीर तळवेलकर याने १९८५ साली सर्वांशी संपर्क साधून शाळेत गेट टुगेदर आयोजित केले. त्यावेळेस ८५ जण हजर होते. त्यानंतर साधारणपणे दर पाच वर्षांनी आम्ही एकत्र येऊ लागलो. २०२५ साली आम्ही दहावीची परिक्षा पास होऊन पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त एक भव्यदिव्य कार्यक्रम करावा व जास्तीत जास्त जण एकत्र यावेत असा आमचा विचार होता. शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी कर्जत जि.रायगड पासून तीन किलोमीटर वर असलेल्या वेणगाव येथील आयुष फार्म वर संध्याकाळी सहा वाजता आम्ही सर्वजण जमलो. सुरुवातीला सुनंदा मुळे, विनित दिवेकर, बिपिन जाधव, माधव बहुतुले , निलेश अत्रे, चारुदत्त दगडे, बंड्या धामणकर, संजय बागाईतकर, प्रकाश श्रीखंडे, अनिल पगारे, वंदना दाभणे या दिवंगत मित्र मैत्रिणींना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर काही सदस्य पन्नास वर्षांनंतर प्रथमच भेटत असल्याने प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. त्यानंतर गप्पागोष्टी झाल्या.
रात्री जेवल्यानंतर श्रीपाद उर्फ आनंदा कुलकर्णी, प्रतिभा सहस्त्रबुद्धे, मेघा कुलकर्णी, सुभाष ठकेकर, शामला जोशी यांनी गाणी गायली. धनंजय बेडेकर याने तबल्यावर तर संवादिनीवर सुयोग ओक यांनी साथ दिली. आमचा मित्र प्रकाश पटवर्धन हा अनेक वर्षापासून मोटरसायकलवरून देशात व परदेशात प्रवास करत आहे. सध्या तो सायकलवरून धाडसी प्रवास करत आहे. त्याच्या अनुभवकथन ऐकून सर्वांनी त्याचे कौतुक केले.
दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी रोजी सर्वजण ओअभिनव ज्ञान मंदिर' या शाळेत सकाळी सात वाजता ध्वजवंदनासाठी हजर झाले ५० वर्षांनंतर ह्या कार्यक्रमाला हजर राहता आले. त्यामुळे खूप आनंद झाला.तेथे संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. सकाळी दहा वाजता आमचे शिक्षक अधिकारी सर , शिक्षिका अनुपमा कुळकर्णी, उषा वैद्य, सामंत व मृदुला गडनीस या पाच जणांचे श्रीकांत बक्षी, आनंदा कुलकर्णी, राजेंद्र घायाळ, शामला जोशी, आशा थत्ते यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गेली ४५ वर्ष गेट टुगेदरच्या माध्यमांतून आम्हां सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारा आमचा मित्र सुधीर तळवेलकर याचा शिक्षकांनतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी ‘बी' यांची ‘माझी कन्या' ही कविता ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या' आमच्या शिक्षकांची आवडती कविता सर्वांनी म्हणून दाखवली व आम्ही सर्वजण पुन्हा पंचावन्न वर्षापुर्वीच्या वातावरणात गेलो. कवितेची कल्पना राजन ओक याची होती. त्याने तसेच राजेंद्र घायाळ, किशोर वैद्य, सुधीर तळवेलकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
दुपारच्या जेवणानंतर सर्वजण आपल्या शाळेतील आठवणीत रममाण झाले व २०३५ साली आमच्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. तसेच आम्ही सर्वजण वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहोत त्यानिमित्ताने एक भव्य कार्यक्रम करण्याचे व दर दोन वर्षांनी गेट टुगेदर करण्याचे सर्वानुमते ठरले. गेले चाळीस वर्ष आदिवासी वस्तीत समाजसेवा करणारी आमची मैत्रीण रंजना गांगल व विलोगिता भिडे या आजारी असूनही आमच्यात सहभागी झाल्या. चार वाजण्याच्या सुमारास सर्व जण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले. आमची वर्गमैत्रीण मेघा कुलकर्णी ही शीघ्रकवी आहे. तीने यानिमित्तानं लिहिलेल्या कवितावाचनाने ‘गेट टुगेदरचा' शेवट झाला.
‘गेट टुगेदर'
साठावं वर्ष सरलं तरी मन आहे तरुण
सगळे आले भेटायला प्रवास दूरदूरचा करून
गेट टुगेदरचा निरोप आला की मनात उत्साह संचारतो
साठी विसरून जीव मात्र शालेय आठवणीत रमतो
मित्र मैत्रीणींचा सहवास वाटतो नेहमी हवा हवा
अशा कित्येक आठवणींचा जवळ आहे अनमोल ठेवा
प्रत्येकाच्या आयुष्याची वाट वेगळ्या रंगाची
मात्र मैत्रीची सुंदर कमान आहे इंद्रधनुची
आम्ही जमलो की मारतो मनमोकळ्या गप्पा
त्या जपून ठेवायलाच मनात आहे एक वेगळा कप्पा
माहित असतं ‘गेट टुगेदरचा' दिवस पटकन संपतो
तरीपण आम्ही आतुरतेने वाट पहात असतो
घरी जाऊन प्रत्येकजण लागेल आपल्या कामाला
पण आठवणी नेहमीच असतील आमच्या सोबतीला
-कवयित्री - मेघा कुलकर्णी
- दिलीप प्रभाकर गडकरी