अस्सं बालपण सुरेख बाई

माझं बालपण कल्याण - मुरबाड रस्त्यावर शहाडपासुन थोडं पुढे कांबा आणि वरप या दोन गावांच्या मध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या छोट्याशा टुमदार ‘अंबरनाथ टाटा कँप'मध्ये गेलं. खरंतर हे अंबरनाथ नाहीच. पण तिथे असलेल्या डोंगराच्या पलिकडे अंबरनाथ असल्यामुळे याला ‘अंबरनाथ टाटा कँप (अंबरनाथ रिसिव्हींग स्टेशन)' असं म्हटलं जातं. जन्मल्यापासून लग्न होईपर्यंतचा सगळा काळ आमचा ‘टाटा'तच गेला. खरंतर टाटातच आम्ही घडत गेलो. चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे नकळत चांगले संस्कार आमच्यावर होत गेले. ‘टाटा'तला हा काळ म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी सुवर्णयुग होतं.

आम्ही पाच भावंडं आणि आई वडिल असं आमचं मोठं कुटुंब. सगळ्यात मोठी अनिता, त्यानंतर प्रशांत, त्याच्यापेक्षा लहान मी. प्रणिता (घरात सगळे मला राणीच म्हणतात.) सगळ्यात लहान प्रविण, प्रतिभा. ही दोन्ही जुळी भावंडं. त्याकाळी अंबरनाथला शाळेची गैरसोय असल्यामुळे अनिता ही आमच्या आजोळी पुण्याला विमलाबाई गरवारेमध्ये शिकायला होती. अनिता पुण्याला असल्यामुळे शाळेला सुट्टी असली की ती अंबरनाथला घरी येई. अनिता घरी आली की मला प्रश्न पडायचा की ही नेमकी माझी आहे तरी कोण? बहिण की मैत्रीण? आईपण मला गंमतीने म्हणायची की ‘ही तुझी मैत्रीण आहे.' प्रशांत, प्रविण, प्रतिभा हे तिघे सेंच्युरी रेयॉनच्या शाळेत इंग्लिश मिडियममध्ये होते. मी मात्र शाळेत वयाच्या तिसऱ्या वर्षी स्वतःच प्रवेश केल्यामुळे हिला इंग्लिश मिडियममध्ये घालायचं की मराठी मिडियममध्ये घालायचं हा विचार करायची. आईबाबांना संधीच दिली नव्हती. मी शाळेत कशी गेले हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल. कॉलनीतल्या १०-१२ मुलींचा ग्रुप रोज सकाळी कांबा येथे शाळेत जाण्यासाठी निघायचा. त्यांना बघुन मी रोज रडून गोंधळ घालायचे की ‘मलापण त्यांच्यासोबत शाळेत जायचंय.'

एके दिवशी या मुली माझ्या आईला म्हणाल्या की ‘काकू आम्ही राणीला घेऊन जातो शाळेत' आणि माझ्या आईनेपण सोडलं. नंतर मग आईबाबांनी शाळेत जाऊन रितसर ॲडमिशन घेतलं. कांब्याच्या शाळेत मी १वर्ष होते नंतर आम्ही सगळ्या मुलांनी वरपच्या शाळेत ॲडमिशन घेतली. वरपची शाळा घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही सगळी मुलं-मुली पायीच शाळेत जायचो. शनिवारी सकाळची शाळा असायची. शनिवारी शाळा सकाळी १० ला सुटायची. रस्त्याने जाणाऱ्या बैलगाड्यांना लोंबकाळत आम्ही घरी यायचो. बैलगाडीवाले मामा चांगले असले तर आम्हाला बैलगाडीत बसवत. असे आम्ही खेळत बागडत शाळेतून घरी यायचो. अंबरनाथ कँप म्हणजे पाच बिल्डिंग आणि दहा घरं असलेली एक चाळ. असं जेमतेम ४० कुटुंबांचं हे कँंप. त्यामुळे हे कँप म्हणजे आम्हाला एक कुटुंबच वाटायचं. सगळे लोक एकोप्याने येथे राहायचे. आमचं घर पहिल्या बिल्डिंगमध्ये होतं. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये भगत कुटुंबीय राहायला आले होते. त्यांच्याशी आमची चांगली ओळख झाली. भगत काकूंसोबत माझी विशेष मैत्री होती. तसं पाहिलं तर त्या वयाने माझ्या आईपेक्षा मोठ्या; पण माझी त्यांच्याशी मैत्री होती. आम्ही सगळे त्यांना ‘ताई' म्हणायचो. ताई मला ‘राणू' म्हणायच्या. ताईंसोबत बराच वेळ असल्यामुळे झाडं झुडपं, पानं, फुलं, रानभाज्या यांची नावं मला त्याच वयात माहिती झाली होती. मला आठवतंय की भगत ताईंच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं. लग्न पनवेलला होतं. त्यांनी लग्नाला जाण्यासाठी बस केली होती. कॉलनीतली मोठी माणसेच लग्नाला जाणार होती. मी आईबाबांकडे हट्ट केला की ‘मला पण लग्नाला यायचंय !' पण आईबाबा ‘नाही' म्हणाले. मी बसच्या मागे रडत रडत पळत कॉलनीच्या गेटपर्यंत गेले. शेवटी माझ्या बाबांनी गेटजवळ बस थांबवली आणि वॉचमन चौकीवरून कुणाची तरी सायकल घेऊन घरी गेले आणि माझा सॅटीनचा परकर, झंपर घेऊन आले.  बसमध्येच माझे कपडे बदलले आणि मी लग्नाला गेले. इतकी मी हट्टी होते.    

                    कॉलनीतला गणेशोत्सव विशेष असायचा. आम्ही सगळी मुलं आदल्या दिवशी गणपती आणण्यासाठी कल्याणला जायचो. गणपती आणण्यासाठी कॉलनीची बस निघायची. बसमध्ये ३-४ मोठी माणसं असायची बाकी आम्ही सगळी कॉलनीतली मुलं असायचो. मुलं बसमध्ये वाजवण्यासाठी रंबासंबा, ढोलकी आणायची. गणपती घेऊन जाताना आम्ही मुलं बसमध्ये नाचून गाऊन अक्षरशः धुमाकुळ घालायचो. भोली सुरत दिल के खोटे, रमय्या वस्तावया, मेरी तुझे केस लांब लांब लांब अशी गाणी म्हणायचो. कॉलनी जवळ बस आली की सगळी मुलं ओरडायची...आले रे आले टाटावाले गणपती बाप्पा घेऊन आले. मोठी माणसं गणपती बाप्पा येण्याची वाट बघत उभी असायची. त्या दिवशी रात्री गणपती बाप्पा खडसेंच्या घरी मुक्कामाला असायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी वाजत गाजत मिरवणुक निघायची आणि क्लबमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. आम्ही मैत्रिणी गणपतीसमोर झिम्मा फुगड्या खेळायचो. आम्ही सगळी मुलं रोज क्लबच्या गणपतीची आरती झाली की ज्यांच्या घरी गणपती बसलाय त्यांच्या घरी ढोल आणि टाळ घेऊन आरतीसाठी जायचो. गणपतीचे पाच दिवस कॉलनीत सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्यात लहान मुलांचे डान्स, जादूचे प्रयोग, नाटकं असायची. ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणायला माझी आई आणि इतर मोठी मुलं असायची. माझ्या आईला गाण्याची खूप आवड.

हा पन्नास वर्षांपूर्वीचा काळ. त्याकाळी अंबरनाथहून कुठेही जायचं म्हणजे फार गैरसोय असायची; पण माझी आई त्याकाळी कल्याणला गायन समाजात गाणं शिकायला जायची. भगत ताईंचा धाकटा मुलगा मुकुंद याला जवळपास सगळी वाद्यं वाजवता यायची. त्यामुळे तो गाण्याला साथ संगत करण्यासाठी असायचा. प्रशांत गाणी म्हणायचा. प्रविण नाचात भाग घ्यायचा. एकेवर्षी आईबाबा मला म्हणाले की ‘यावर्षी तू नाचात भाग घ्यायचा नाही. कारण तू अभ्यास करत नाही.' रोज माझ्या मैत्रिणी नाचाच्या प्रॅक्टीसला निघाल्या की मला बोलवायला यायच्या. मैत्रिणी माझ्या आईला विनवणी करायच्या, काकू राणीला पाठवा ना. पण आईने काही पाठवलं नाही. २-३ दिवस मी रडून डोळे सुजवुन घेतले होते. शेवटी आईला किव आली. आईने मुकुंदला सांगितले की जा रे हिला एखाद्या नाचात घ्यायला सांग. (पुढे हाच मुकुंद माझी मोठी बहिण अनिताचा नवरा.. म्हणजे माझा मेव्हणा झाला.)

 गणपतीचं विसर्जन कॉलनीच्या बाहेर असलेल्या तळ्यात केलं जाई. विसर्जनासाठी कॉलनीतले सगळे लोक सहभागी व्हायचे. वाजत गाजत, नाचत गणपतीची मिरवणुक काढली जाई. आमचं मोठं कुटुंबं असल्यामुळे आम्ही चार भावंडं घरातपण खूप खेळायचो. दुपारी आई झोपली की स्वयंपाक घरात वरच्या फळीवर ठेवलेल्या बिन्कि बिस्किटच्या डब्यातून बिस्कीटं चोरून खाण्याची मजा काही वेगळीच असायची. माझा मोठा भाऊ प्रशांत ओट्यावर चढून डबा उघडायचा. डबा उघडताना आवाज होऊ नये म्हणून आम्ही इतर भावंड टॉयलेटमध्ये जाऊन पलश करायचो. तेवढया वेळात प्रशांत पटकन डबा उघडायचा. (इथे मला सांग सांग भोलानाथ या गाण्याची एक ओळ आठवली - ‘भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?')

प्रशांतचा मित्र बिपीन खोपकर याच्याकडे प्रोजेक्टर होतं. सुट्टी असली की हे दोघे आम्हाला प्रोजेक्टर दाखवायचे. त्यासाठी आम्ही सगळी मुलं दिवसभर उन्हातान्हात बांगडीच्या काचा गोळा करायचो. बांगडीच्या काचा दिल्या की आम्हाला प्रोजेक्टर बघायला मिळायचा. (ह्या बांगडीच्या काचा कशासाठी वापरल्या जायच्या हे आता मला आठवत नाही) बिपीन खोपकरच्या समोरच्या पलॅटमध्ये लुईस अंकल राहायचे. लुईस अंकलचं लग्न झालं नसल्यामुळे त्यांचा पलॅट आम्हाला खेळायला मिळायचा. किचन, बेडरूम, हॉलची दारं लावुन घेतली की मधल्या पॅसेजमध्ये काळोख होई. तिथे आम्ही सगळी मुलं प्रोजेक्टर बघायचो. प्रोजेक्टरमध्ये एकच सिन होता. हिरो टेकडीवरून दरीत उडी मारतो. बस एवढंच. पण त्यात किती मजा होती हे आजच्या मोबाईलच्या युगातल्या मुलांना काय कळणार?  कॉलनीत माळी मामाने ४ - ५ आंब्याची कलमे लावली होती त्याला एक दोन वर्षातच कैऱ्या लागल्या होत्या. कैऱ्या अगदी खाली खाली लागल्या होत्या. आम्ही सगळ्या मुलांनी कैऱ्या पाडल्या होत्या. हे माळी मामाने बघितले आणि माळी मामा आमच्या मागे काठी घेऊन धावत आला तशी आम्ही सगळ्या मुलांनी तेथुन धुम ठोकली होती. यानंतर बरेच दिवस माळी मामा दिसला की आम्ही पळून जायचो. एकदा आम्ही ४-५ मुलं-मुली कॉलनीच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बोराच्या झाडाला थोडीशी बोरं लागली होती ती काढण्यासाठी तारेच्या फेन्सिंगवरून पलिकडे गेलो होतो ( शाळे व्यतिरीक्त कॉलनीच्या बाहेर जाण्याची आम्हाला परवानगी नसायची) हे रफिक अंकलनी पाहिलं. ते आम्हाला ओरडले तशी बाकीची मुलं पळून गेली; पण मी त्यांच्या तावडीत सापडले. माझ्या आई जवळ माझी तक्रार केल्यानंतर त्यांनी मला सोडलं होतं.

उन्हाळ्याच्या सट्टीत आजूबाजूच्या गावातल्या कातकरी बायका ‘करदा घ्या करदा' करत करवंद विकायला यायच्या. आम्ही सगळी मुलं त्यांच्या भोवती करवंद, जांभळं घेण्यासाठी जमायचो. शाळेच्या बाहेर कच्ची करवंद, चिंचा, बोरं मिळायची त्यावर आम्ही ताव मारायचो. त्याकाळी आत्तासारखा खाऊ नाही मिळायचा; त्यामुळे सहाजिकच निसर्गातल्या या रानमेव्यावर यथेच्छ ताव मारला जायचा.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडा वंदनासाठी आम्ही पॉवर हाऊसमध्ये जायचो. तिथे झिनिया, जरबेरा, डेन्थस्‌, कार्नेशन, गुलाब अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुललेली असायची. ती बघुन मी माळी मामाला नेहमी म्हणायचे की, ‘माली मामा सिर्फ एक फूल दे दो ना.' माळी मामा त्याच्या कन्नड टोन मध्ये म्हणायचा, ‘ये रानी याडी हो गई है. अभी नही; तुम्हारे शादीमें ट्रक भरके फूल दूँगा.'

   दरवर्षी मे महिन्यात कॉलनीत जेवणाची पार्टी ठरलेलीच असायची. गफार अंकल बिर्याणी बनवायचे. कॉलनीतल्या सगळ्या बायका आणि आम्ही सगळी मुलं मदतीला असायचो. संध्याकाळी क्लबमध्ये जेवण असायचं. खूप धम्माल असायची त्यादिवशी. कोजागिरी पौर्णिमा, होळी, धुलिवंदन या सणांची मज्जा तर काही विचारूच नका. खूप मजा करायचो आम्ही. दसऱ्याला आम्ही सगळी मुलं पाटी पुजनासाठी सकाळी सात वाजता शाळेत जायचो. पाटीवर सरस्वती काढून, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन आम्ही शाळेत जायचो. टाटा कॉलनीच्या बाहेरच्या तळ्यात छान कमळं उमललेली असायची. धुकं पडलेलं असायचं खूप सुंदर वातावरण असायचं.

   त्या काळी दिवाळीचं वातावरण इतकं सुंदर असायचं की निसर्गच दिवाळी आली हे दाखवुन द्यायचा. (अलिकडे तर दिवाळी पर्यंत पाऊसच असतो) या काळात पावसाळ्यात वाढलेलं गवत कापण्यासाठी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असायचं त्यामुळे गवत कापून नेण्यासाठी बैलगाड्या कॉलनीत यायच्या. झाडाला बैल बांधुन ठेवलेले असायचे. जागोजागी गवताचे ढिग कापून ठेवलेले असायचे ( हे गवत आम्ही शेकोटी करण्यासाठी वापरायचो ) खूप छान वातावरण असायचं.  दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मैत्रिणी पहाटे ४ वाजता उठायचो. रनिंग करायचो, शेकोटी पेटवायचो. थोडंसं उजाडलं की आम्ही बुचाच्या झाडाची फूलं गोळा करायला जायचो. बुचाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असायचा. झाडावर चढून पण काही मुली फुलं पाडायच्या. ती फुलं गोळा करायची आणि त्यांच्या वेण्या गुंफल्या जायच्या.

दिवाळीला प्रत्येक बिल्डिंगचा एक किल्ला असायचा. आमच्या बिल्डिंगचा किल्ला माझे बाबा बनवायचे. (माझे बाबा किल्ला छान बनवायचे.) आम्ही सगळी मुलं त्यांना मदत करायचो. दिवाळीच्या आधी पितळेच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कल्हईवाला यायचा. त्याच्याकडून आम्ही भांड्यांना कल्हई करून घ्यायचो.

त्याकाळी मोठी कुटुंबं असल्यामुळे घरोघरी भरपूर फराळ केला जाई. बुंदीच्या लाडूंची ऑर्डर फडके काकांना देण्यात यायची. फडके काका तिथेच शेडमध्ये बसून ऑर्डरप्रमाणे लाडू बनवुन द्यायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुली चुलीवर स्वयंपाक करायचो. त्यादिवशी आम्ही मुली एकमेकींच्या घरी जाऊन प्रत्येकी कडून १ वाटी पिठ, १ वाटी तेल, कांदे , बटाटे असं लागणारं सगळं साहित्य गोळा करायचो. बिल्डिंगच्या मागची जागा स्वच्छ करून तिथे चूल पेटवली जाई. पुरी भाजी, बटाटा वडा, रगडा पॅटीस असे पदार्थ आम्ही बनवायचो.

मुलांना हे कळालं की मुलींनी पार्टी केलीए की लगेच मुलं पण गफार अंकलना बिर्याणी बनवायला सांगायची. बिल्डिंगच्या मागच्या बाजूला प्रत्येकाची बाग होती तिथे आम्ही फुलझाडं, केळी वगैरे लावायचो. पावसाळ्यात आम्ही भाजीपाला लावायचो. वरपची शाळा चौथीपर्यंत असल्यामुळे पाचवीला मी शहाडच्या शाळेत जाऊ लागले.

हिवाळ्यातली थंडी आणि काळोखाची पर्वा न करता सकाळी सहा वाजता मी एकटी कुंदाची फुलं आणायला बागेत जायचे. जाताना सोबत दोरा घेऊन जायचे. साडेसहाची बस असायची. बसमध्ये बसुन गजरा बनवायचा तो केसात माळायचा आणि मग शाळेत जायचं. असं मी रोज करायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री १२ पर्यंत आम्ही आट्यापाट्या, डब्बा ऐसपैस, लिंगोर्चा असे खेळ खेळायचो. आमचे आईबाबापण खाली येऊन पायरीवर गप्पा करत बसायचे. खूप छान वातावरण असायचं. मे महिन्यात घरोघरी पापड, कुरडया सांडगे केलेच जायचे. आम्ही मुलं दिवसभर राखण करत बसायचो.

   क्लबमध्ये नविनच टिव्ही आला होता. आम्ही सगळे छायागीत, चित्रपट पाहण्यासाठी क्लबमध्ये जायचो. नंतर आमच्या घरी टिव्ही आला. मग सगळी मुलं आमच्या घरी टिव्ही बघायला येऊ लागली. चार्ली चॅपलीन, रविवारचा चित्रपट, छायागीत बघायला मुलं आमच्या घरी यायची. घर भरून जायचं. चार्ली चॅपलीन बघुन मुलं हसुन अक्षरशः लोटपोट होऊन जायची. एखादा चित्रपट थोडासा जरी रडका असला तर मुलं ढसाढसा रडायची. आम्ही मात्र त्यांच्याकडे बघुन खूप हसायचो.

 रोज संध्याकाळी छान कपडे घालायचे, मस्तपैकी नट्टाफट्टा करायचा आणि खेळायला जायचं. मैत्रिणींसोबत गाणी म्हणत उंच उंच झोके घ्यायचे. घसरगुंडीवर खेळायचं, पकडापकडी, लपाछपी खेळायची. खेळण्यात मी इतकी दंग असायचे कि दिवेलागणीची वेळ झाली तरी घरी जाण्याची मला शुद्ध नसायची. माझी भावंडं मला बोलवायला यायची. राणी आईने बोलवलंय घरी चल. माझे हातपाय, फ्रॉकचा घेर मातीने बरबटलेला असायचा आणि मग घरी गेल्यावर आईच्या हातचे धपाटे मला मिळायचेच.

मला आठवतय की दिवाळीची सुट्टी संपत आली होती आणि एके दिवशी मैत्रिणींची खेळण्यासाठी वाट बघत मी एकटीच झोक्यावर बसले होते. छान वारा सुटला होता. बाजूला असलेल्या बुचाच्या झाडाचं एक एक फुल वाऱ्याच्या झुळुकेबरोबर गळून पडत होतं. आता दिवाळीची सुट्टी ३-४ दिवसातच संपणार आहे आणि हे क्षण मला पुन्हा अनुभवता येणार नाही याचं मला खूप वाईट वाटलं होतं.

फुलपाखरासारखी खेळत बागडत लहानाची मोठी कधी झाले हे कळलंच नाही. मी आठवीत असताना आम्ही कल्याण ‘टाटा कँप'मध्ये राहायला आलो. जन्मल्यापासून लग्न होईपर्यंतचा सगळा काळ आमचा ‘टाटा'तच गेला. खरंतर टाटातच आम्ही घडत गेलो. चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे नकळत चांगले संस्कार आमच्यावर होत गेले. ‘टाटा'तला हा काळ म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी सुवर्णयुग होतं. - सौ. प्रणिता खरात 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नाते जुळले - नात्याच्या पलीकडले