कुंभमेळा की अंधश्रद्धा मेळावा ?
नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत. अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात. कोणताही आचार, विचार या मेळाव्यात न रुजता फक्त चमत्कारिक व्यापार होतो. अनेक धार्मिक स्थळे ही पर्यटन स्थळे झाली आहेत.
जत्रेत जसें हौसे गौसे असतात, तसे देव असलाच तर काय घ्या, म्हणून सामील होणारेही असतात. तार्ककिता खुंटीला टांगून अनेक माणसे जीवन जगतात. संस्कृती, परंपरा जतन करण्यासाठी काही महोत्सव आवश्यक असतात. कुंभ मेळाव्याला कोट्यवधी रुपयांचं अनुदान शासनच देतं. या कुंभमेळ्यातून फक्त साधू संतांचे चमत्कार दाखवले जाणार असतील तर अंधश्रद्धा कशी कमी होणार? गरिबांच्या कल्याणासाठी कित्येक योजना या कुंभमेळ्याऐवजी होऊ शकतात, पण मतांच्या राजकारणासाठी काही महोत्सव सरकारी तिजोरीतून भरभराटीला आणले जातात.
कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो भारतातील चार प्रमुख ठिकाणी हरिद्वार, प्रयागराज (अलाहाबाद), उज्जैन आणि नाशिक याठिकाणी आयोजित होतो. हा उत्सव बाराव्या वर्षी एका ठिकाणी भरतो. महाकुंभमेळ्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. लाखो भाविक गंगा, यमुना किंवा गोदावरीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी एकत्र येतात, जे पापांपासून मुक्ती देण्याचे प्रतीक मानले जातं.
महाकुंभमेळ्याचा उद्देश आध्यात्मिक शांती आणि धार्मिक परंपरांचे पालन हा असला तरी, काही लोक याला अंधश्रद्धांशी जोडतात. असे मानले जाते की कुंभमेळ्यात पवित्र नदीत स्नान केल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्ष मिळतो. मुख्यमंत्रीसुद्धा पाण्यात जेव्हा डुबकी मारतात तेव्हा अंधश्रद्धाही पाण्यावर तरंगते. आता हे गंगाजल घरपोच मिळणार आहे हे जाहिरातीतून पसरविले जात आहे,हा व्यापार आहे. ४० करोड जनता प्रयागराजला जमणार आहे. डुबकी मारल्याने त्यांचे पाप नाहीसे होणार आहे. मौनी अमावस्येला चित्रपटातील हीरोइन ममता कुलकर्णी तिचे नाव ड्रगशी जोडले जात होते, ती सुद्धा पापक्षालन करुन जणू आता महामंडलेश्वर झाली आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा केवळ श्रद्धेचा भाग आहे. यामुळे मानसिक समाधान मिळू शकते, परंतु प्रत्यक्षात पाप किंवा कर्माचा परिणाम यावर काहीच परिणाम होत नाही.
कुंभमेळ्यात अनेक साधू, संन्यासी आणि बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. काही जण त्यांना चमत्कारीक शक्ती असलेल्या व्यक्ती मानतात आणि त्यांच्याकडे समस्यांवर उपाय शोधतात. यामुळे काहीवेळा लोक दिशाभूल होतात आणि अंधश्रद्धांना बळी पडतात. कुंभमेळ्याचा काळ विशिष्ट ग्रहयोग आणि तिथींवर अवलंबून ठरतो. काही जण यावर इतका भर देतात की त्यातून अंधश्रद्धा निर्माण होऊ शकते, जसे की हा योग चुकल्यास जीवनात अपशकुन होईल अशी भीती वगैरे.
साधू, संन्यासी यांच्या चमत्कारिक दाव्यांची चौकशी व पडताळणी करणे आवश्यक आहे. तार्ककितेला ताण देण्यापेक्षा शरण गेलेलं अनेकांना आवडतं. पवित्र स्नानासोबत स्वच्छता आणि आरोग्याच्या महत्त्वावरही भर देणे गरजेचे आहे. म्हणून, महाकुंभमेळा हा एक सांस्कृतिक आणि धार्मिक महोत्सव असून, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा ओळखून त्याचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. धार्मिक उत्सवाच्या आड आलेलं आज लोकांना आवडत नाही.
श्रद्धा ठीक आहे, पण आज अनेक देवळांत कर्मकांडाचा बाजार फोफावतो आहे. माणूस चंद्रावर जाऊन आला तरीही तिरुपतीला दोन-दोन दिवस रांगेत उभारणारे व व चेंगराचेंगरीत मरणाला सामोरे जाणारेही आहेत. चंद्रावर, मंगळावर स्वारी केली तरी बालाजीच्या रांगेत काही फरक पडत नाही. व्हीआयपी दर्शनासाठी ही रांग असते. समाजातला एक गट आज श्रद्धेवर व अंधश्रद्धेवर जगतो आहे. नैराश्याने ग्रासलेल्यांना अंधश्रद्धा हा एकच आशेचा किरण वाटतो आहे. जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन रुचत व रुजत नाही तोपर्यंत अंधश्रद्धा दूर होणारच नाही.
शालेय अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन पाठ केला जातो. घरामध्ये त्याची पडताळणी करण्याची संधी मुलांना मिळतच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या पाठ असते; पण प्रत्यक्ष व्यवहारात कुटुंबातील व समाजातील धार्मिक वातावरणामुळे अनेक जण हतबल होऊन मेंढरासारखें कळपात सामील होऊन जातात, हे बदलणार कां?
याचे उत्तर काळच ठरवेल. - डॉ.अनिल कुलकर्णी