दर्शन

एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही याचं दुःख कुठल्याकुठे पळालं... विठ्ठलानी स्वतः येऊन क्षणभर का का होईना... आपल्याला दर्शन दिलं असंच तिला वाटलं.त्याला कशात बघायचं हेही तिला आज नीट ऊमगलं.....आपल्याही आसपास असेलच आपलाही विठ्ठल ...जरा नीट बघू आपण.. हळुहळु येईल ती दृष्टी....,आपल्यालाही दिसेल मग ...कुठल्या न कुठल्या रूपात.

"विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते.” ती सुनबाईला म्हणाली.
"कुठे जाता ? आज एकादशीची गर्दी असेल.”
"अग पंढरपूरला जायचं नशिबात नाही. ईथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते.. देऊळ जवळ तर आहे.”
"आजे मी येणार.. ” बारका नातु मागे लागला.
"अरे तुला कुठे गर्दीत सांभाळू...तसं नातवानं भोकाडच पसरलं...
"मला पण विठ्ठलाला यायचंय.” तशी सुनबाई म्हणाली,
"एवढं रडतंय तर न्या की...हे घ्या अकरा रुपये ठेवा देवाला...या दोघं दर्शन करून.” पोरगं खुष झालं. खिदळायला लागलं.
देवळात ही गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या .पोरगं आनंदलं होत. नाचत होतं. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरग मात्र थोड्या वेळानंतर कंटाळलं.
"आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?”
"आता थोड्या वेळानं दिसेल हं...जवळ आलो ..लगेच दर्शन होईल..तिनी नातवाची समजुत काढली. जरा वेळानं पोरगं म्हणालं ,"आजे गोष्ट सांग ना.”
"अरे इथे कुठे ? घरी गेल्यावर सांगते.”
"इथच सांग.” पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं... म्हणून तीनी जनी दळण दळताना दमते ...मग विठुराया येऊन तिला  दळायला मदत करायचा ती छोटी गोष्ट सांगितली.
"आजे तुला दिसला का कधी तुझा विठ्ठल?”
"माझं कुठलं बाबा एवढा भाग्य.. मला कुठला दिसायला विठ्ठल..” ती म्हणाली, ईतक्यात पोराचं लक्ष गोळ्या विकणाऱ्या मुलाकडे गेलं. लगेच म्हणाला.."आजे मला गोळ्या घे की....”
"गप रे...पैशे नाहीत”
"ए आजे घे की..”
पोरग ऐकेच ना..हट्टच करायला लागलं...देवाचे पैसे...अकरा रूपये तेवढे होते. दुसऱे आणलेच नव्हते...पण पोरगं हट्टानं आलय खरं ..जाऊ दे..लहान लेकरू आहे ....म्हणून... दहा रुपयाच  गोळ्यांच पाकीट  तीनी घेतलं. पोरगं जरा रमलं... पुढच्या दोन चार बारक्या पोरींनाही त्यानी गोळ्या दिल्या ...
तसं त्या पोरीपण खुषं झाल्या ..
"आजे तुला घे की गोळ्या....”
"नको रे...”आजीचं लक्ष विठ्ठलाकडे...बऱ्याच वेळानी नंबर जवळ आला. तसं आजीनी पोराला कडेवर घेतलं.
"हा घे रुपया जवळ गेलं की त्या पेटीत टाक....”
"आज दुसरं काहीच आणलं नाही  देवा...परत येईन तेव्हा आणीन रे...” हात जोडून तिने विनवणी केली. समोर विठ्ठलाला पाहिलं तस तिला कृतकृत्य झालो असं वाटलं..आज ईथे का होईना.. त्याच दर्शन तर झालं....ते सावळे रूप समोर दिसलं... पिवळा पितांबर, जरीचा शेला, गळ्यात तुळशीचे हार, कपाळाला बुक्का भक्ती भावानी आजींनी दर्शन घेतलं आपल्याबरोबर नातवाचही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं.

पोरगं हसलं....पुजाऱ्यानं पोराच्या कपाळाला बुक्का लावला विठ्ठलाचा हार पोराच्या गळ्यात घातला...पोरगं हरखूनच गेलं...
आजी बघायला लागली. गर्दीतून बाहेर आली.नातू गळ्यातला हार काढू देईना ..
"मी नाही काढणार.” म्हणायला लागला...तशीच घरी आली. आता पोरगं जाम खुष होतं. नाचत होतं
दारातच सुनबाई ..म्हणाली,
"झालं का दर्शन ? आणि  ह्याच्या गळ्यात हार कोणी घातला ?”
"अगं दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्याने ह्याच्या गळ्यात हार कधी घातला मलाही कळलं नाही.”
"बसा पाणी देते. पोरानं त्रास नाही ना दिला....”
तसं पोरगं आईवर रागवलं..कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं....
"बघा सासूबाई ध्यान कसं दिसतंय...
आईनी असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं...आजी बघायला लागली... कमरेवर हात, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता... काय झालं कळलंच नाही..पण नातवाचा चेहरा तिला वेगळाच दिसत होता...तिचे डोळे भरून आले....क्षणभर काही समजेच ना....तिला नातवाच्या जागी  विठ्ठल दिसायला लागला... साक्षात्कार झाल्यासारखंच झालं... नातु हसतच होता....
ती निरखून बघायला लागली..
 नातवाने मगाशी विचारलेलं.."आजे तुला दिसला का गं तुझा विठ्ठल?” हे तिला आठवलं...आता तिचे डोळे भरून आले होते ती बघतच राहिली...हसत हसत...नातु एकदम  धूम पळाला...सुनबाई खिचडी करायला आत गेली..
भरल्या गळ्यान आजी म्हणाली.."इथे जवळच आहेस ...इतका वेळ कडेवर होतास का रे...धन्य रे बाबा तुझी.....जनाबाईची दळणं तू दळायला गेला असशील पटलं बाबा मला आज..” आतूनच तिला लख्खपणे काहीतरी जाणवलं....
ती मनात म्हणाली...
"ईतकी वर्षे झाली अजूनही आमच्या आसपास आहेस ...आम्हालाच समजायला उशीर होतोय.”
एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही याचं दुःख कुठल्याकुठे पळालं....विठ्ठलानी स्वतः येऊन क्षणभर का होईना... आपल्याला दर्शन दिलं असंच तिला वाटलं.
त्याला कशात बघायचं हेही तिला आज नीट ऊमगलं.....
आपल्याही आसपास असेलच आपलाही विठ्ठल ...
जरा नीट बघू आपण.. हळुहळु येईल ती दृष्टी....,
आपल्यालाही दिसेल मग ...कुठल्या न कुठल्या रूपात..
आपला विठुराया...
-नीता चंद्रकांत  कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुक्तांगण : नाजूक, तरल भावनांनी आणि सुंदर शैलीतील लयबद्ध शब्दांनी सजलेल्या कविता