मुक्तांगण : नाजूक, तरल भावनांनी आणि सुंदर शैलीतील लयबद्ध शब्दांनी सजलेल्या कविता
कवयित्री चित्रा बाविस्कर यांनी लहान मुलांच्या भावविश्वातील वेगवेगळ्या प्रतिमा, कल्पना त्यांच्या भावनांचे कंगोरे दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. दर्जेदार कागद, उत्तम छपाई, आकर्षक चित्रांची सजावट या बरोबर उत्तम व विविध विषयांवरील बालकवितांच्या संग्रहाला नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभल्यामुळे या कविता संग्रहाचा दर्जा उंचावला आहे.
सध्या नवी मुंबई महानगर पालिकेत नगरसचिव पदावर कार्यरत असलेल्या सौ.चित्रा विजय बावीसकर यांचा मुक्तांगण हा बालकविता संग्रह वाचला. या कवितासंग्रहाला पिंपरी - चिंचवड येथे आयोजित केलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभली आहे.
सबनीस यांच्या मते बाविस्कर यांच्या बालकविता नाजूक, तरल भावनांनी आणि सुंदर शैलीतील लयबद्ध शब्दांनी बहरलेली कलाकृती आहे. त्यांच्या काव्यविश्वात निसर्ग सौंदर्य तर आहेच, पण प्राणी आणि पक्षांची सृष्टीसुध्दा बालमनाला भवणारी आहे. नव्या पिढी साठी नव्या संकल्पना बल्कवितेत पेरल्या आहेत. सबनीस यांच्या मते बाविस्कर यांच्या बालकविता सांस्कृतिकतेचे, मानवतेचे, निसर्गप्रेमाचे, विशुद्ध पर्यावरणाचे आणि सत्प्रवृत्तीचे संस्कार घडविते. ‘मामाच्या गावाला जाऊ या या धर्तीवर फुलांच्या गावाला जाऊ या' या काव्यरचनेद्वारे कवयित्री बालमनाला हळुवार साद घालतात व ‘फुलाप्रमाणे होऊ या आणि डोलू या' हा संदेश मनाला भावला.
‘जगणे सोपे करा' या काव्यात सिमेंटच्या जंगलात पक्षांना राहणे व जगणे अशक्य झाले याची जाणिव करून पक्षांना दाणा पाणी द्या, त्यांना खोपे बांधून देऊन त्यांचे जगणे सोपे करण्याचा संदेश दिला आहे. या काव्यसंग्रहातील कवितेत सुंदर नाट्य, कोवळ्या, नाजूक भावभावनांचा आविष्कार आहे. तसेच कल्पनांच्या उंच भराऱ्या आहेत. ‘प्राण्यांची शाळा' ही कविता माकड, हत्ती, पोपट, चिमणी, खारूताई, बेडूक, मोर या लहान मोठ्या पक्षी आणि प्राण्यांच्या अंगभूत गुणांनी नाट्यपूर्ण झालीय. यातून कवयित्रीची निरीक्षणशक्ती सूक्ष्म असल्याची जाणिव होते.
सबनीस यांच्या मते निसर्गप्रेम, पक्षी प्राण्यांची व्यापक करुणा, बालमनाची स्पंदने, बालकांची निरागसता आणि स्वप्नाळूपणा स्वच्छंदीपणा, आशावाद याबरोबरच ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडीत कल्पनांना कुरवाळणाऱ्या कवयित्रीचा प्रयत्न गौरवास्पद आहे.
कवयित्री चित्रा बाविस्कर यांनी लहान मुलांच्या भावविश्वातील वेगवेगळ्या प्रतिमा, कल्पना त्यांच्या भावनांचे कंगोरे दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. दर्जेदार कागद, उत्तम छपाई, आकर्षक चित्रांची सजावट या बरोबर उत्तम व विविध विषयांवरील बालकवितांच्या संग्रहाला नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभल्यामुळे या कविता संग्रहाचा दर्जा उंचावला आहे. कवयित्री चित्रा बाविस्कर यांच्या मते त्यांच्या ‘काव्यबाळाला मुद्रणाचे आकर्षक आंगडे टोपडे तर घातले आहेच परंतु लक्षवेधी व्यक्तिमत्व असलेले साहित्य क्षेत्रांतील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन या गोंडस बाळाला कडेवर घेतल्यामुळे हे बाळ सर्वांचे लक्ष वेधून घेईल' यात शंकाच नाही.
या काव्य संग्रहाला डॉ.श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभल्यामुळे प्रकाशित होण्यापूर्वीच मोठा पुरस्कार लाभला आहे. यापुढेही अनेक प्रत्यक्ष पुरस्कार लाभतील व सौ.चित्रा बाविस्कर साहित्यक्षेत्रांत अग्रेसर राहतील यात शंकाच नाही. वाचकांनी हा संग्रह जरूर वाचावा ही अपेक्षा.
कविता संग्रह....मुक्तांगण
कवयित्री : सौ.चित्रा बाविस्कर प्रकाशक : ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन
प्रथम आवृती : १४ डिसेंबर २०२३ पृष्ठे : १७५ मूल्य ३२० रुपये
-दिलीप प्रभाकर गडकरी