दारू पिणाऱ्यांना मुलगी देऊ नका !
सध्या एक व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मारवाडी कुटुंबातील या लग्नाच्या व्हिडिओमध्ये नवरदेव लग्नात दारू पिऊन आला म्हणून नवरीची आई मुलीचे लग्न मोडताना दिसत आहे. दारुड्या मुलाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देणार नाही असे उपस्थितांना विनंती करून सांगताना ती माउली दिसत आहे. जो मुलगा स्वतःच्या लग्नातही दारू ढोसून धिंगाणा करू शकतो तो आपल्या लेकीला आयुष्यभर कशा स्थितीत ठेवील याची कल्पनाच या माउलीला आल्याने तीने हा ठोस निर्णय घेतला.
याच व्हिडिओमध्ये नवरदेवाचे नातेवाईक लग्न मोडू नये यासाठी विनवणी करतानाही दिसत आहेत; मात्र महिला आपल्या निर्णयावर ठाम राहून मुलीचे लग्न मोडताना दिसत आहे. मारवाडी समाजाचे लग्न म्हणजे प्रचंड खर्च, नातेवाईक आणि वर्हाडी मंडळींची मोठ्या प्रमाणात रेलचेल. लग्न मोडल्याने हे सर्व वाया जाणार, नातेवाईकांत चर्चा होणार; मात्र या सर्वांचा तिळमात्र विचार न करता केवळ मुलीच्या भवितव्यासाठी या सर्वांवर पाणी फेरणाऱ्या माउलीचे नेटकरी मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहेत.
दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत, अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी-लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते. दारू केवळ तिचे सेवन करणाऱ्याचाच ऱ्हास करत नाही, तर घरातील एका दारुड्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतो, घरातील लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. दारू पिणाऱ्याकडून नशेत अनेकदा धिंगाणा घातला जात असल्याने त्याचा त्रास शेजारपाजाऱ्यांनाही सहन करावा लागतो. मद्यविक्रीतून दरवर्षी राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने कोणतेही राज्य सरकार आपल्या राज्यात दारूबंदी करण्यास अनुकूल नसते. तरीही दारूमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेऊन बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड, मणिपूर आदी राज्यांत तर काही राज्यांतील गावांत आणि तालुक्यांत संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे.
ही दारूबंदी करण्यात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. घरातील एखादा पुरुष दारू पित असेल तर सर्वाधिक त्रास घरातील स्त्रीला होतो, मग ती स्त्री पत्नी असो, आई असो वा मुलगी असो. आजही अनेक गावांत दारूबंदी करण्यासाठी स्त्रियांनी मोर्चे काढल्याच्या, आंदोलने केल्याच्या बातम्या वाचनात येतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही एक स्त्री आपल्या मुलीचे भविष्य वाचवण्यासाठी सर्व नातेवाईकांशी आणि समाजाशी लढताना दिसत आहे. ही स्त्री समस्त मातांसाठी आदर्श आहे. दारू पिणाऱ्या मुलाशी मी माझ्या मुलीचे लग्न करणार नाही या निर्णयावर प्रत्येक आईने ठाम राहिल्यास भविष्यात अनेक मुलींचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचतील.
मुलाला कोणते व्यसन आहे का याबाबत प्रत्येक माउली मुलीचे लग्न ठरवण्याआधी मुलाच्या नातेवाईकांना विचारून घेते. त्यावेळी अनेकदा मुलाकडून अथवा मुलाच्या नातेवाईकांकडून मुलगा कधीतरी क्वचितच मित्रांसोबत दारू पितो असे सांगितले जाते. मुलाच्या बाबतीत अन्य बाबी चांगल्या आहेत मग कधीतरी दारू पिणे सध्याच्या काळात ठीक आहे असे समजून अनेकदा मुलीचे पालक त्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र हेच महाभाग पुढे अट्टल बेवडे निघतात आणि एकदा लग्न झाल्यावर सर्वच हाताबाहेर गेलेले असते. अशा घटना आज अनेक ठिकाणी घडताना पाहायला मिळतात. उपरोक्त माउलीप्रमाणे दारू पिणाऱ्या मुलाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देणार नाही या निर्णयावर प्रत्येक आईने आणि प्रत्येक पित्याने ठाम राहायचे ठरवले तर येणाऱ्या काळात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास वेळ लागणार नाही. जसे नोकरीधंदा न करणाऱ्याला कोणी आपली मुलगी देत नाही तसे दारू पिणाऱ्याशीही कोणी लग्न करू इच्छित नाही हा संदेश समाजात रुजल्यास तरुणांमधील दारू पिण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
- जगन घाणेकर