कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत
कोटी कोटी कामे त्यागून प्राधान्याने हरिनाम घ्यावे. असे नेटाने नाम घेतले तरच भक्ती दृढ होते आणि अंतसमयी भगवंताचे स्मरण राखता येते. हेच वर्म आहे. कारण अंतसमयी पूर्णकाम भगवंताऐवजी अपूर्ण जगातील वासनांचे स्मरण असेल तर पुनर्जन्माची आपदा बाधलीच म्हणून समजावे.
सदा रामनामे वदा पूर्णकामे।
कदा बाधिजेनापदा नित्यनेमे।
मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७०।
श्रीरामाचे चिंतन पहाटे पहाटे करावे. पण कधीतरी, मनात येईल तेव्हा, जमेल तेव्हा असे न करता सदा करावे, नित्य करावे आणि नेमाने करावे. सदा म्हणजे सतत. क्षणभरही नामाचा-अर्थात भगवंताचा विसर पडू नये. नित्य म्हणजे रोज घ्यावे. आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत अखंड घ्यावे आणि नेमाने घ्यावे. म्हणजे एखादे व्रत समजून घ्यावे. घेतलेला वसा टाकता येत नाही, टाकूही नये. नामाचा असा नेम करावा. नाम घेतल्याशिवाय दिवस संपू नये. कोणत्याही कारणाने त्यात खंड पडू नये.
दृढ निश्चयाने, निष्ठेने, नियमितपणे नाम घ्यावे. समर्थ आपल्या ‘अंतर्भाव ह्या लघुकाव्यात म्हणतात, ऐका उपायाचे वर्म। दृढ लाविला नित्यनेम। हाचि उपाय परम।' अंतसमयी वर्म चुकल्यामुळे उपायाचा अपेक्षित परिणाम होत नाही. उपासना किंवा एकूणच परमार्थ ही फावल्या वेळेत, वेळ घालविण्यासाठी म्हणून करायची गोष्टच नव्हे. ते नित्य कर्मच असायला हवे, जे न केल्याने पापसंचय होतो. म्हणून तर ब्रह्म पदाला प्राप्त झाल्यानंतरही सर्व संत आपली उपासना नित्यनेमाने करतात. निर्गुण जाणून ही सगुणाची पूजा अर्चा, आपली ध्यान धारणा चुकवत नाहीत. नित्य नेमाचे महत्त्व सांगताना सुभाषितकार म्हणतात, ‘शतं विहाय भोक्तव्यं, सहस्त्र स्नानमाचरयेत। लक्षं विहाय दातव्यं, कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत शंभर कामे सोडून भोजन करावे, हजार कामे सोडून स्नान करावे, लाखो कामे सोडून दान करावे, तर कोटी कोटी कामे त्यागून प्राधान्याने हरिनाम घ्यावे. असे नेटाने नाम घेतले तरच भक्ती दृढ होते आणि अंतसमयी भगवंताचे स्मरण राखता येते.' हेच वर्म आहे. कारण अंतसमयी पूर्णकाम भगवंताऐवजी अपूर्ण जगातील वासनांचे स्मरण असेल तर पुनर्जन्माची आपदा बाधलीच. म्हणून समजावे. पूर्णकाम भगवंत अंतःकरणात स्थिर झाला की माणसाच्या सर्व कामना पूर्णच होऊन जातात. याचा अर्थ आता कोणतीही कामना अंतःकरणात शिल्लक राहत नाही. मनुष्य निष्काम, निरपेक्ष होतो. नामाच्या सतत संगतीने भगवंताचे एवढे प्रेम निर्माण होते की त्याच्याशिवाय अन्य कोणताही विचार मनात येत नाही. अनन्य भक्तीमध्ये भगवंताच्या इच्छेत आपल्या सर्व इच्छा विलिन होऊन जातात. ‘भगवंताची इच्छा!' हेच जीवनाचे सूत्र होऊन जाते. त्यामुळेच जीवनात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तिची बाधा होत नाही. कोणत्याही आपदांचा त्रास होत नाही. जरी झाला तरी तो सहन करण्याची शक्ती मिळते. नामाचे बळ असेल तर मनुष्य कोणत्याही संकटाने खचून जात नाही. कितीही प्रतिकूलता असली तरी हिंमतीने उभा राहतो. रडत नाही, कुढत नाही, हरत नाही. त्याचे समाधान ढळत नाही. नामाचे हे सामर्थ्य आहे. मात्र त्याचा अनुभव येण्यासाठी नाम सदा आणि नित्य नेमाने घ्यायला हवे. असे करण्याच्या आड येणारे माणसाचे दोन मोठे दोष किंवा शत्रु म्हणजे ‘मद-अहंकार, आणि आळस.' अहंकारामुळे माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवतो. भगवंताची सत्ता त्याला मान्य होत नाही.
खरे तर हे जग, ही चराचर सृष्टी ही परमात्म्याची लीला आहे. त्याच्या केवळ संकल्पानेतिची उभारणी, स्थिती आणि संहारणी आहे. त्याने निर्माण केलेल्या अनंत कोटी ब्रह्मांडातील आपण एक क्षुद्र घटकमात्र आहोत. आपल्याला फक्त आपली क्रियमाण शक्ती वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचे फळ काय द्यायचे, कधी द्यायचे, की नाही द्यायचे हे भगवंताच्या इच्छेनुसार आहे. तो अधिकार त्याने स्वतःकडे ठेवला आहे. ‘आळस' हा माणसाचा दुसरा शत्रु. ‘आळस उदास नागवणा। आळस प्रेत्न बुडवणा। आळसे करंटपणाच्या खुणा। प्रगट होती श्रीराम (दा.बो ११-३-१२) म्हणौन आळस नसावा। तरीच पाविजे वैभवा। अरत्री परत्री जीवा। समाधान श्रीराम।' (दा.बो.११-३-१२) आळसाने करंटेपण येते. दुर्लभ नरदेहाचा, मनुष्यजन्माचा नाश होतो. आळस सोडून प्रयत्न केलेतरच वैभव प्राप्त होते. ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधता येते. मनुष्यजन्मातील परम वैभव म्हणजे मोक्ष होय. आपले संपूर्ण हीत व्हावे हीच समर्थांची तळमळ आहे. त्यासाठीच ते आग्रहाने नित्यनेमाने नाम घ्यायला सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ - सौ.आसावरी भोईर