पंचनामा
सर्वांना स्वत्वाची जाण आल्यामुळे कोणीही आपले विचार-आचार दुसऱ्यांवर बळजबरीने लादू शकत नाही. जग पुराणानुसार व त्याच्या तत्वानुसार चालणार नाही. विज्ञानाने माणसाला सर्व दिशा खुल्या केल्या आहेत. ज्ञानी लोक आपल्या ज्ञानाच्या जिवावर आकाश भरारी घेण्यासाठी उतावळा आहे. तो भ्रमातून बाहेर पडला आहे. तो परत भ्रमात अडकला जाणार नाही, मात्र आजही काही मंडळी, जी जास्त शिकलेली नाही किंवा शिकूनही भ्रमात अडकलेली आहे त्यांच्यापासून समाजाला मोठा धोका आहे. सध्या काही लोक जाती जातीत, धर्माधर्मात विद्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत.
प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सध्या सुरु आहे. या कुंभ मेळ्याला देश-विदेशातील श्रद्धाळूसह विविध आखाड्याचे संत महंत पवित्र गंगा स्नान करण्यासाठी जमलेले आहेत. त्यांच्यात कुठलाही वाद विवाद नाही, पण, देशातीलच काही तथाकथीत स्वतःला, स्वघोषित जगत् गुरु म्हणणारे व पदसिध्द बसलेले धर्माचार्य अर्थात शंकराचार्य स्वामी अविमुवतेश्वरानंद यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
सध्या प्रसार माध्यमांवर कुंभ मेळ्याऐवजी या दोघांच्या वादाचीच चर्चा जास्त होत आहे. खरंतर हे दोन्ही संत हिंदु धर्माचे पुरस्कर्ते असले तरी, त्यांना साम्यवाद बिलकुल मान्य नसल्याचे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येते. त्यांना देशात वर्ण प्रथा आणायची असावी, कारण त्यांच्यापैकी एकाने स्पष्ट केले आहे की, योगी बनण्याचा अधिकार फवत आणि फवत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच आहे. शुद्रांना योगी किंवा संन्यासी बनण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी स्विकारलेले योगीत्व वा सन्यासित्व धर्माला मान्य नाही. त्यांची ही कृती दंडनीय आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानाने देशवासियांना मुलभूत अधिकार देऊन उपकृत केले, शिक्षणाचा, बोलण्याचा आपल्या भावना व्यवत करण्याचा मतदानाचा, देशात कुठेही जाऊन नोकरी धंदा करुन पोट भरण्याचा संत, संन्याशी महंत बनण्याचा अधिकार मिळाल्याने जो तो आपापल्या नितीप्रमाणे, धर्माचे पालन करतांना दिसत आहे.
या कुंभ मेळ्यात असे कितीतरी संत, संन्यासी असतील जे तळा-गाळातील वा दलित समाजातील असतील त्याची पडताळणी कशी करणार? देशात विविध ठिकाणी विविध देवतांची मंदिरे आहेत तेथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना जात विचारण्याची हिंमत कोणी करत नाही, पण पूर्व राष्ट्रपती व त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. एवढेच कशाला, सध्याच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनाही रामजन्मभूमी असलेल्या आयोध्येतील राममंदिर उद्घाटनापासून दूर ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे नवीन बांधण्यात आलेल्या संसदभवनाच्या उद्घाटनापासूनही दूर ठेवण्यात आले. या राजकारण्याची व त्यांची तळी उचलणाऱ्या तथाकथित धर्ममार्तडांची निती ही धार्मिक द्वेषावर आधारित आहे.
गत काही वर्षापूर्वी देशातील जनता धार्मिक द्वेष विसरण्याच्या प्रयत्नात होते, पण देशात भाजप प्रणित मोदी सरकार आले आणि देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्याला खतपाणी घालण्याचे काम कर्मठवादी संत, संन्यासी, महंत यांच्यासह ‘आर एस एस'चे सर्वेसर्वा मोहन भागवत करताना दिसतात. काही वर्षापूर्वी चित्रपट अभिनेत्री, मॉडेल कलाकार व सध्याची भाजप खासदार कंगना राणावत हिने देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाल्याची वल्गना करुन आपले हसे करुन घेतले.
आता मोहन भागवत यांनी देशाला खरे धार्मिक स्वातंत्र्य हे राममंदिर बांधल्यानंतर मिळाल्याची वल्गना केली आहे. देशात व खासकरुन आयोध्येत रामाच्या येण्याने देशापुढील सर्व प्रश्न आपोआप सुटतील. भूकमरी, बेकारी, महागाई एवढंच कशाला, आरोग्य व शिक्षणाचा विचार करण्याची गरज नाही असे उद्गार काढून देशातील जनतेला मुर्खात काढण्याचा प्रकार केला आहे व त्याला सनातनी धर्मवादी, हिन्दूवादीसह भाजपाचे नेते कार्यकर्ते दुजोरा देत आहेत.
परवा-तेरवाचीच गोष्ट आहे, कुंभ मेळ्यात १९ गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन फुटले. जवळपास ५९-६० तंबू जळाले. त्यात अग्नीशामक दलाने मोलाची मेहनत घेऊन अग्नीकांड आटोवयात आणून विझवले. त्यात जीवीतहानी झाली नाही. मात्र अनेकजण बाधीत झाले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत असे सरकारकडून सांगण्यात येते, पण खरा प्रश्न असा आहे की, मेळ्यात आलेल्या अनेक साधू-संताना अपरिमित दैवी शवती प्राप्त आहे. ते कोणतेही काम आपल्या शवतीच्या जोरावर करु शकतात. मग त्यांनी आग विझवण्याचे काम आपल्या मंत्रसिध्दीने का केले नाही? असे प्रश्न हिंदू धर्म विरोधी विचारत आहेत. त्यांना योग्य उत्तर धर्ममार्तंडाकडून मिळत नाही. राजकीय नेते खोट्याच्या आधारावर खऱ्याला लपविण्याची कला जाणतात. अनेक वेळा खोट्यावर खऱ्याप्रमाणे दिसणारे चमकदार पॉलिश केले जाते. त्यामुळे सामान्य माणूस त्याला सत्य मानेल असे ‘नॅरेटिव्ह' राजकारण्यासह धर्म मार्तंडही पसरवताना दिसतात.
मागील दोन दशकामध्ये अर्धसत्य, पूर्ण खोटे आणि विकृत तथ्यांवर नॅरेटिव्ह तयार करण्याची एक विशेष विद्या विकसित झाली आहे. ज्याचा आपला देशही शिकार झाला आहे. काही दिवसांपूर्वी दलित विचारवंत दिलीप मंडल यांच्यावर सोशल मीडियात दावा केला की, त्यांनी कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना ‘फातिमा शेख' नावाचे काल्पनिक पात्र निर्माण केले होते. ज्यांचा उल्लेख देशातील पहिल्या शिक्षिका म्हणून केला होता. खरं तर अशा नावाची त्याकाळी कोणी शिक्षिकाच नव्हती. देशातील पहिल्या शिक्षिका म्हणून ‘सावित्रीबाई फुले' यांनाच ओळखले जाते. काही नेते मंडळी आपल्या तार्किक स्वार्थासाठी व मतलबासाठी असे नॅरेटिव्ह तयार करुन लोकांची दिशाभूल करतात. अशी दिशाभूल करणारी मंडळी समाजातील सर्वच धर्मात आढळतात. त्यांना लोकांशी व लोकांच्या भावनांशी खेळायचे असते. त्यातून समाजा-समाजात तेढ निर्माण होऊन दंगली पेटल्या तरी त्यांना चालते. काही नेते व काही धर्मपिठाधिशही यात मागे नाहीत.
जर नेते मंडळी आणि धर्मापिठाधिश असे नॅरेटिव्ह तयार करु लागले तर मग त्यांची चिल्ली-पिल्ली अंधभवत मंडळी मागे कशी राहणार? ते तर आपल्या नेत्यांच्या पुढची पायरी चढणार, मुळ ववतव्यात स्वतःचे काही टाकून अधिक चिघळणारी ववतव्ये करणार, याच ववतव्याच्या आधारावर ‘टी व्ही चॅनेलवर' डिबेट होणार. तिथे तिघांची हजेरी असते, एक ववत्याचा समर्थक, दुसरा ववत्याचा विरोधक अिाण तिसरा असतो दोघांमध्ये भांडण लावणारा चिथावणीखारे म्हणजेच ‘अँकर'.
अँकरला त्या दोघांशी व लोकांशी काहीही देणे घेणे नाही. डिबेटमुळै चॅनेलचे प्रेक्षक वाढवणे व स्वतःची मिळकत वाढवून घेणे इतकेच अँकरचे काम असते. पण या चिथावणीमुळे समाजा-समाजात, नेत्या-नेत्यात वाद वाढविण्याचे काम ही मंडळी करतात. त्यास अंधभवत मंडळी विचार न करता दुजोरा देऊन ॲवशन मुडमध्ये येतात व नको ते उद्योग करुन बसतात.
याचे ताजे उदाहरण म्हणजे लोकसभेत देशाच्या संविधानावर पंच्याहत्तरी निमित्ताने चर्चा होती, राजनाथसिंग यांनी, संविधान निर्मितीत संघाचे गोळवलकर व वि. दा. सावरकर यांचा मोलाचा वाटा होता. खरंतर हे दोघेही संविधानविरोधी नेते होते. त्याचप्रमाणे संविधान समितीत यांचे नावही नव्हते, पण रेटून खोटे बोलले, व काही प्रमाणात संविधानावर टिकाही केली. परिणामस्वरुप परभणीत एका माथेफिरुने तेथील एका चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातात असलेली संविधानाची प्रत पाहून संविधानासह पुतळ्याची तोडफोड केली, लोकांच्या लक्षात आल्यावर तोड-फोड करणाऱ्याला पकडले. पण या कृती विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शांततेत पार पडत असताना समाजकंटकांनी मोर्चेकऱ्यांवर दगडफेक केली, मोर्चाला वेगळे वळण लागले, अनेक गाड्या फोडल्या गेल्या, काही जाळल्या गेल्या, काही दुकानेही फोडली गेली, मालाची लुटालूट झाली.
पोलिसांनी कसेबसे प्रकरण शांत केले; पण, तपास यंत्रणांनी काेंबिग ऑपरेशनमध्ये दलित वस्त्यात जाऊन अनेकांची धरपकड केली, ती करत असतांना अनेक निरापराधींनासुध्दा मारहाण करुन त्यांना पकडण्यात आले. त्यात एका विद्यार्थ्यांचा लॉकअपमध्ये मृत्यू झाला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, निकाल लागेल तेव्हा लागेल; पण अनेकांना गुन्हा नसतांना शिक्षा मिळत आहे, एकाचा तर जीव गेला आहे, त्याचे कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यांची भरपाई कशी होणार? त्यातून हिंदुत्ववादी व दलितवादी यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे त्याची मिळवणी कशी करणार?
एक काळ होता तेव्हा सगळं काही चालायचं, आता काळ बदलला आहे, सर्वांना स्वत्वाची जाण आली आहे, त्यामुळे कोणीही आपले विचार-आचार दुसऱ्यांवर बळजबरीने लादू शकत नाही.
जग पुराणानुसार व त्याच्या तत्वानुसार चालणार नाही. विज्ञानाने माणसाला सर्व दिशा खुल्या केल्या आहेत. ज्ञानी लोक आपल्या ज्ञानाच्या जिवावर आकाश भरारी घेण्यासाठी उतावळा आहे. तो भ्रमातून बाहेर पडला आहे. तो परत भ्रमात अडकला जाणार नाही, मात्र आजही काही मंडळी, जी जास्त शिकलेली नाही किंवा शिकूनही भ्रमात अडकलेली आहे त्यांच्यापासून समाजाला मोठा धोका आहे. त्यांच्यात विषारी टूलकिट भरलेले आहे. ते घातक शस्त्राप्रमाणे आहेत. ते समाजाला तर भ्रमित करतच आहेत; पण निरपराध लोकांच्या विरोधात हिंसासुध्दा वाढवित आहेत.
आज राजकीय नेत्यासह धर्ममार्तंडाना ते आपले अनुयायी वाटतात; पण जेव्हा त्यांचे मनपरिवर्तन होईल तेव्हा धुरीणांचे काय? - भिमराव गांधले