‘स्व. बाळासाहेब ठाकरे' - असा नेता होणे नाही !
जो शून्यातून विश्व निर्माण करतो, इतिहासात त्याचेच नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्व. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. मराठीसह कट्टर हिंदू बांधवांना त्यांनी भगव्या झेंडयाखाली एकत्र केले. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये आज फूट पडली असली तरी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाजलेले बाळकडू आज प्रत्येक शिवसैनिकाच्या रक्तामध्ये वहाते आहे. २३ जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन.
महाराष्ट्रात जेव्हा केव्हा हिंदुत्वावर हल्ला केला जाईल, मराठी माणसाच्या न्यायहक्काचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्या विरोधात दोन हात करण्यासाठी सज्ज राहणारा हा शिवसैनिकच असेल, मग भले तो आज अन्य कोणत्याही राजकीय पक्षात असेल. २३ जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे पाहून त्यांचे रक्त सळसळले आणि शिवसेना या संघटनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. मराठी माणसांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मानसिक बळ देण्याचे महत्कार्य त्यावेळी बाळासाहेबांनी केले. राज्यात मराठी आणि देशपातळीवर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा त्यांच्यासारखा एकही नेता ना कधी झाला ना भविष्यात कोणी होईल.
१९५० साली फ्री प्रेस जर्नल या नियतकालिकांच्या समूहामध्ये बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून नोकरीला लागले. सामाजिक प्रश्नांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडण्याची त्यांची खुबी काही काळातच जनमानसाला भावू लागली. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे, पुढे नोकरी सोडून त्यांनी १९६० मध्ये स्वतःचे मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. समाजात घडणाऱ्या घटनांवर ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करू लागले. त्यावेळचे ते पहिले व्यंगचित्रात्मक साप्ताहिक होते.
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊनही मुंबईत मराठी माणसांना दिली जाणारी सापत्न वागणूक त्यांना अस्वस्थ करत होती. मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडली. मराठी माणसांना त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मार्मिकच्या माध्यमातून केली. अल्पावधीतच मार्मिकचा जसा खप वाढला तसा मराठी माणूस जागा होऊ लागला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या हाताला रोजगार नव्हता, सामाजिक विषमतेला मराठी माणूस बळी पडत होता. मराठी माणसात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची क्षमता आहे, मात्र त्याला कुशल नेतृत्व नसल्याने तो विखुरला गेला आहे हे लक्षात आल्यावर १९६६ मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना या मराठी अस्मितेसाठी लढा देणाऱ्या संघटनेची स्थापना केली. ३० ऑक्टोबर १९६६ या दिवशी शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला ज्याला ५ लाखाहून अधिक मराठी माणसांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून बाळासाहेबांचे नाव देशभरात प्रसिद्ध झाले. १९६६ पासून आजतागायत शिवाजी पार्कचा दसरा मेळावा आणि एकनिष्ठ मराठी माणसांची गर्दी हे समीकरण अबाधित राहिले आहे. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी शिवसेनेवर प्रेम करणारे संघटनानिष्ठ शिवसैनिक आजही जनमानसांत आहेत.
राज्य स्तरावर मराठी आणि राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्व हे धोरण शिवसेनेने अवलंबले. मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणे आवश्यक आहे हे ओळखून शिवसेनेने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र ठरवून राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापालिकेवर भगवा फडकला. तेव्हापासून मधला काही काळ वगळता मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा सदैव डौलाने फडकत राहिला आहे. १९९५ साली भारतीय जनता पार्टीसोबत सोबत युती करून बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या रूपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री राज्यावर बसवला. शिवसेनेच्या नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत विजयी करून बाळासाहेबांनी काही खासदारही लोकसभेत पाठवले. १९८९ मध्ये बाळासाहेबांनी ‘सामना' हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून दैनिक सुरु केले.
महाराष्ट्रात राहून देशभरातील हिंदूंना त्याकाळी त्यांचा आधार होता. आज रामजन्मभूमी अयोध्येत उभे राहिलेले श्रीरामांचे भव्य मंदिर हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. बाळासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी ते पूर्ण झाले. ‘बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकाने पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे' अशी स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी ज्वलंत हिंदुत्व म्हणजे काय असते हे हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या आणि पक्षांना आणि संघटनांना त्यांनी दाखवून दिले होते. अमरनाथ यात्रा रोखू पहाणाऱ्या अतिरेक्यांना बाळासाहेबांनी मुंबईतून ठणकावल्यानंतर अतिरेकीही वरमले होते, एव्हढा दरारा त्यांनी निर्माण केला होता. ‘देशावर प्रेम करणारा प्रत्येक मुसलमान माझा आहे' असे म्हणून त्यांनी देशप्रेमी मुसलमानांनाही संरक्षण दिले होते. कोणत्याही राजकीय पदाचा मोह न बाळगणारे बाळासाहेब मातोश्रीवर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांशी राजकारण सोडून बोलत होते. त्यामुळे दय्राादिल माणूस म्हणूनही त्यांची ख्याती आहे. १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. कोणाचीही भीडभाड न बाळगता आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून राजकारण करणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
- जगन घाणेकर