साहित्यिक राम गणेश गडकरी आणि समीक्षक आचार्य अत्रे

मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचे शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल असलेल्या राम गणेश गडकरी यांनी ३३ वर्ष ७ महिने २८ दिवस इतके अल्पायुष्य लाभूनसुध्दा जे विपुल लेखन केले त्यापैकी फारच थोडे प्रकाशित झाले. बाकीचे अप्रकाशित राहिले. एखादा आप्त जशी गडकरी यांच्यावर टीका झाल्यानंतर कड घेईल तशी अत्रे गडकरी यांची कड घेत आणि टीकाकारांवर तुटून पडत. असे असले तरी अत्रे यांनी गुरूचे  यथायोग्य गुणसंकीर्तन केले तसेच वेळप्रसंगी दोषदिग्दर्शन करण्यासही ते कचरले नाहीत. २३ जानेवारी हा गडकरी यांचा स्मृतीदिन.

 १८९० साली ‘गुणसुंदरी' (गुजराथी नाटक ) लिहून वयाच्या पाचव्या वर्षी साहित्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गडकरी यांचा   १३७ कवितांचा समावेश असलेला ‘वाग्वैजयंती' हा एकमेव कवितासंग्रह गडकरी यांच्या निधनानंतर १९२१ साली प्रकाशित झाला.प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, गर्वनिर्वाण , राजसंन्यास ही नाटके प्रकाशित झाली असली तरी वीरवंदना, पीड प्रदान, गैरसमज, आत्मसंन्यास, तोड ही माळ, लक्ष्मी स्थित्यंतर, प्रेमपिशाच्च, द्वैतविनाश, जरीपटका ही नाटके लिहिली; परंतु अप्रकाशित राहिली.

 गडकरी यांनी १८ नाटके, दोनशे पन्नास कवितांचे चुटके, दोन हजार पाचशे अभंग, दो रंगी दुनिया, झेलम, लालाराम, सोन्याची सलकडी या कादंबऱ्या लिहिण्याचा संकल्प केला होता; परंतु अल्पायुष्य लाभल्यामुळे त्यांचा  संकल्प पुरा होऊ शकला नाही. इतर साहित्यिकांच्या तुलनेत राम गणेश गडकरी यांना अल्पायुष्य लाभूनसुध्दा जे थोडे साहित्य निर्माण केले त्यामुळे ते साहित्य क्षेत्रांत ते अजरामर ठरले आहेत. त्यांच्या साहित्यावर अद्यापही अनेकजण प्रेम करत आहेत; परंतु अनेकजणांनी  त्यांच्यावर समीक्षेच्या माध्यमातून टीका सुध्दा केली आहे. आचार्य अत्रे हे राम  गणेश गडकरी यांना गुरू मानत होते. त्यांनी त्यांच्या साहित्यावर खूप प्रेम केले. ज्या टीकाकारांनी गडकरी यांच्या साहित्यावर अनावश्यक टीका केली असे अत्रे यांना वाटले तेव्हा अत्रे यांनी लेखणी व वाणीद्वारे वाभाडे काढले. असे असले तरी अत्रे यांनी गडकरी यांच्या साहित्यावर आंधळेपणाने प्रेम केले नाही. ते स्वतः उत्तम समीक्षक असल्याने त्यांना गडकरी यांच्या ज्या साहित्यात त्रुटी आढळल्या त्यावर त्यांनी समीक्षेच्या माध्यमांतून टीका सुध्दा केली आहे.

 अत्रे यांची काव्यसमीक्षा

 राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांच्या काव्यदोषांची टीकाकारांपेक्षा आपल्यालाच अधिक चांगली कल्पना आहे असा अत्रे यांचा दावा होता. गडकरी यांच्या काव्यात दोष नाहीत असे नाही; मात्र टीकाकारांनी दाखविले, त्यापेक्षा ते निराळे आहेत्। तसेच गुणांच्या लखलखाटात ते लपून जातात असे अत्रे यांना वाटत होते.गडकरी यांचे गद्य काव्य जेवढे तेजस्वी आणि प्रभावी आहे, तेवढे त्यांचे पद्यकाव्य नाही असे अत्रे यांचे मत होते. गडकरी यांना ‘प्रेमाचे शाहीर' असे म्हणतात; पण त्यांची बहुतेक प्रेमकाव्ये यांना गेयता नाही. तसेच त्यांची पुष्कळशी प्रेमकाव्ये गद्य नि कृत्रिम वाटतात.असे अत्रे यांचे मत होते. गडकरी व्यसनी, अतिरेकी, निराशाग्रस्त आणि चारित्र्यशून्य होते, असा भ्रांत पूर्वग्रह मनात धरून त्याला पोषक ठरणारे पुरावे हुडकून काढण्याच्या टीकाकारांच्या तंत्रावर अत्रे यांनी चांगला समाचार घेऊन नामोहरम केले आहे.

अत्रे यांची विनोदसमीक्षा

राम गणेश गडकरी यांच्या सर्व साहित्यात विनोदी साहित्य वाचकांना कायमचे स्मरणात राहिले असले तरी त्यात समीक्षकांना  अनेक दोष आढळतात. आचार्य अत्रे सुध्दा त्यांच्या मतांशी सहमत आहेत. कवींचा कारखाना'  हा विनोदी लेख वाचकांना आवडला असला तरी समीक्षकांच्या भूमिकेत असलेल्या अत्रे यांना रुक्ष, बकाली, आणि अस्ताव्यस्त वाटला आहे. गडकरी यांच्या नाटकांतील काही विनोदी प्रवेश मुख्य कथौघावर कुरघोडी करतात तसेच अतिरेकी आणि प्रमाणबाह्यता हे गडकरी यांच्या विनोदाचे प्रमुख दोष आहेत असे अत्रे यांचे मत आहे.

 अत्रे यांची नाट्यसमीक्षा

राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून जास्त लोकप्रिय असले तरी त्यांच्या बहुतेक प्रमुख नाट्यकृतींचे मूळ श्री.कृ.कोल्हटकर यांच्या नाटकांत आढळते असे अनेक टीकाकारांना वाटते.प्रेमसंन्यास व मतिविकर, भावबंधन व सहचारिणी, पुण्यप्रभाव व प्रेमशोधन तसेच एकच प्याला व मूकनायक यांतील साम्यसंबंधांची चर्चा साहित्य क्षेत्रांत झाली. त्याला अत्रे यांनी अंशतः दुजोरा दिला आहे. नाटकातील प्रसंगात कायदेकानूविषयक गडकरी यांचे ज्ञान तुटपुंजे असल्याबद्दल त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.अत्रे यांच्या मते गडकरी यांच्या काही नाटकांत उपकथानकातील ‘अनावश्यक ठिगळे' जोडली आहेत. प्रेमसंन्यास ' नाटकाने विलक्षण प्रतिभेचा नाटककार म्हणून गडकरी यांचे स्थान कायम केले असल्याबद्दल अत्रे यांनी प्रशंसा केली असली तरी गडकरी कवी असूनही त्यांना 'पुण्यप्रभाव नाटकातील पदे साधली नाहीत. ती ‘रुक्ष व दुर्बोध' आहेत असे त्यांचे मत होते. काव्य, नाटक व विनोद याबाबत अत्रे यांनी गडकरी यांच्यावर  टीका केली असली तरी या तिन्ही क्षेत्रांत गडकरी यांनी उमटविलेला ठसा सहजी पुसला जाणार नाही असे अत्रे यांचे मत होते. अत्रे गडकरी यांना गुरू मानत असत. त्यांनी गडकरी यांची रंगमंचावरील कारकीर्द आत्मीयतेने पहिली होती. तेव्हा आचार्य अत्रे यांची समीक्षा ही केवळ टीका नसून तिच्यामध्ये स्वानुभूतवासाचे दान आहे. अत्रे गडकरी यांचे फक्त पट्टशिष्य नव्हते तर आप्तस्वकीयासारखे जवळचे होते. एखादा आप्त जशी गडकरी यांच्यावर टीका झाल्यानंतर कड घेईल तशी अत्रे गडकरी यांची कड घेत आणि टीकाकारांवर तुटून पडत. असे असले तरी अत्रे यांनी गुरूचे यथायोग्य गुणसंकीर्तन केले तसेच वेळप्रसंगी दोषदिग्दर्शन करण्यासही ते कचरले नाहीत. गडकरी आणि अत्रे या गुरुशिष्यांच्या जोडीवर त्यांच्या गुणदोषांसह महाराष्ट्राने प्रेम केले आहे. रसिक वाचकांना यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी श्याम जोशी, अर्चना कर्णिक, अर्णव चव्हाण यांनी संकलीत केलेला  संशोधक-समीक्षक डॉ.स.गं.मालशे प्रस्तावना खंड हा बहुपयोगी ग्रंथ जरूर वाचवा ही नम्र विनंती.
संदर्भ : संशोधक - समीक्षक डॉ.स.गं.मालशे प्रस्तावना खंड )
-दिलीप प्रभाकर गडकरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस