पथदर्शी आई.. ‘श्यामची'
आपल्या मुलाने भविष्यात नक्कीच चांगलं काहीतरी करून मोठं व्हावं अन् त्यानं त्याचं नाव रोशन करावं अशी जगातल्या प्रत्येक आईची आपल्या मुलाबद्दल माफक अपेक्षा असते. तेही काही मागणे नसताना! हे मात्र तितकंच खरं. म्हणून तर मी म्हणतो श्यामच्या आईने नुसतं श्यामलाच घडवलं नाही; तर अनेक श्याम घडवले यात शंका नाही.
लहानपणी सहावीला असताना बालसंस्कार परीक्षेकरता शिक्षकांनी जसं ‘श्यामची आई' हे पुस्तक हातात दिलं अन् माझ्या अंतर्मनावर खूप खोलवर परिणाम होत गेला तो अगदी असाधारण! त्यातील श्यामच्या छोट्या छोट्या प्रश्नांना आईने दिलेला प्रतिसादवजा मौलिक उत्तरांमार्फत सल्ला माझ्यासारख्या अनंत संवेदनशील मुलांना तो लागू पडला! निरागस प्रश्न विचारणारा मुलगा - श्याम व तितकीच प्रामाणिकपणे मुलाच्या प्रश्नांना उत्तरं देणारी सोज्ज्वळ त्याची आई असा दुहेरी संगम त्या पुस्तकातील अनेक प्रसंगांवरून प्रत्येक वाचकाचा आपोआपच उर भरून आणल्याशिवाय राहत नाही. अगदी सहजपणे आईने केलेले बालसंस्कार श्यामच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणतात. म्हणूनच की काय आमच्या शिक्षकांनीसुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्यावर दूरगामी संस्कार घडविण्याचा बेत आखलेला असावा.
बरेच जागतिक कीर्तीचे तत्ववेत्ते पण त्यांच्या सिद्धांतांमध्ये सांगत आलेत की तुम्ही बालपणात अगदी मनापासून ठरवलेल्या गोष्टी तुमच्या सातत्य व चिकाटीच्या जोरावर भविष्यात नक्की प्राप्त करू शकतात. म्हणूनच हे संस्कार व पुस्तक आम्हां विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आमच्या गुरुजनांना वाटले असावे.
साने गुरुजींनी अहिंसेच्या मार्गावर गांधीजींच्या पावलावर टाकलेलं पाऊल म्हणजे एक प्रकारे त्यांच्या बालमनावर आईने कोरलेली अहिंसेची ढालच म्हणावी लागेल. घरासमोरच्या ओट्यावर अंघोळीला मांडलेल्या दगडावर बसलेला श्याम पायाला माती लागेल म्हणून आईला खाली पदर पसरायला सांगतो व त्यावर ‘मी पाय ठेवेन' म्हणतो तेव्हा आईने श्यामच्या डोक्यात असलेल्या सर्व कल्पनांना सुरुंग लावत; ‘ठीक आहे. पायाला धूळ चिटकू नये म्हणून मी नक्की पदर पसरेल अन् तू त्यावर पाय ठेव; परंतु मनाला चिटकलेली धूळ कशी काय बाजूला करशील?' त्यावर आख्ख्या आयुष्यभर श्यामने घेतलेला धडा अन् त्याप्रमाणे सत्वशील वागणे सर्वांनाच परिचित आहे. शरीराची अंगमेहनत अन् व्यायाम, मानसिक तंदुरुस्ती, वेगवेगळे खेळ, पोहणे, विद्या अन् ज्ञानार्जन अशा सर्वच पातळ्यांवर श्यामच्या आई त मलाच काय, प्रत्येकालाच आपली आई दिसली नाही तर नवलच! आपल्या मुलाने भविष्यात नक्कीच चांगलं काहीतरी करून मोठं व्हावं अन् त्यानं त्याचं नाव रोशन करावं अशी जगातल्या प्रत्येक आईची आपल्या मुलाबद्दल माफक अपेक्षा असते. तेही काही मागणे नसताना! हे मात्र तितकंच खरं. म्हणून तर मी म्हणतो श्यामच्या आईने नुसतं श्यामलाच घडवलं नाही; तर अनेक श्याम घडवले यात शंका नाही.
मी पुढं मोठा झाल्यावर पुस्तकं बरीच वाचली; पण सुरुवातीपासून दीर्घकालीन छाप पडली ती फक्त ‘श्यामची आई याच पुस्तकाची. त्यावेळी मी फक्त सुरुवातीला १०० मार्कांची ‘श्यामची आई संस्कार परीक्षा देऊन मोकळं होऊ असं म्हणून सरांनी राबवलेल्या या शाळाबाह्य उपक्रमात सामील व्हायचं ठरवलं अन् त्यात मला ६३ गुण मिळवून प्रथम श्रेणी मिळालीही! मार्कांचे आकडे जसे की ६ व ३ जुळवून आले तसंच माझं त्यांनी भविष्यपण त्याच वेळी जुळवलं असं म्हणावं लागेल. तेव्हा अज्ञान जास्त असल्याने पडलेल्या मार्कांचं काही सोयरसुतक नव्हतं. एकतर त्यावेळी मार्क मिळाले असं आम्ही म्हणतच नव्हतो! पडले असं म्हणायचो. पण ते पडत नव्हते, मिळत होते. आज कुणाला किती मार्क पडले? असं विचारलं तर मुलं गांगरून जातात. त्यावेळी शाळेचा अभ्यास करून हेही ६३ मार्क काही कमी नव्हते. मामाच्या गावी शिकायला असल्यानं माझी आई दूर असल्याचा विरह मला सहन होत नव्हता म्हणून या पुस्तकानंच मला खूपच आधार दिला. त्यात मी म्हणजे श्याम अन् श्यामची आई म्हणजे माझी आई - आक्का हे समीकरण डोक्यात ठेवून श्यामच्या आईने जेवढ्या सूचना श्यामला त्याच्या जीवनाच्या मूल्यवर्धनासाठी दिल्या तेवढ्यांचा आपोआपच मी स्वीकार करून घेत घेत पुढे आलो. यात एक साम्य नक्की मला सांगावंसं वाटेल ते म्हणजे मी ज्यांचं पुस्तक वाचत होतो ते पालगडचे साने गुरुजी अन्ज्यांनी वाचायला भाग पाडलं ते संगमनेरजवळच्या चिखलीचे सहाने सर! ही दोन्ही नावं मला आज तितक्याच आदराने घ्यावीशी वाटतात.
केवढा बदल केला एका पुस्तकाने माझ्या विचारसरणीत! अगदी नवल करण्यासारखी गोष्ट आहे. मामाचं गाव सिन्नर तालुक्यातलं दोडी (बु) हे दुष्काळी अन् पर्जन्यछायेतल्या पट्ट्यातलं म्हणून श्यामच्या आईने श्यामला कोकणात जसं पाठीला भोपळा लावून विहिरीत पोहायला शिकण्यास भाग पाडलं अशा काही गोष्टी मला भौगोलिक परिस्थितीमुळे इथं मामाच्या गावात शिकता आल्या नाहीत; परंतु ज्या शक्य होतील त्या मी ते पुस्तक वाचूनच सुधारणा करत गेलो. त्यात आणखी एक सकारात्मक गोष्ट झाली ती म्हणजे साने गुरुजींचं गाव रत्नागिरीतलं पालगड..पण जळगाव जिल्हा बोर्डातल्या शिक्षकाच्या नोकरीने त्यांना अमळनेर येथे यावं लागलं. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत त्यांचा तुरुंगवास सुरू असल्याने त्यांना नाशिकच्या कारागृहात बंद केलं अन् तिथेच या श्यामची आई पुस्तकाची निर्मिती झाली. मला या गोष्टीची आणखीच प्रेरणा मिळाली. कारण मी शाळेला होतो ती दोडी अन् नाशिक हे अंतर फक्त ४५ किलोमीटर म्हणून. त्यातले धडे मी बारकाईने पुन्हा पुन्हा वाचत गेलो अन् मला नवी एक आत्मप्रेरणा मिळत गेली.
मनात विचार यायचा; एवढे शांत संयमी साने गुरुजी. ”इंग्रज सरकार अशा चांगल्या माणसांना तुरुंगात का ठेवत असावं?” बालवयात उत्तर सापडणं कठीण होतं; परंतु त्यांच्या विचारांच्या ताकदीने ते कितीही मोठा जनसमुदाय सरकारच्या विरोधात उभा करू शकत होते. म्हणून सरकार त्यांना घाबरत होतं, हे मला थोडं उशिरा समजलं. पुस्तक वाचून आपण काय करायचं? तर पहिलं चांगले मार्क मिळवू अन् मग भविष्यात असंच काहीतरी लिहू , असं माझ्या बऱ्याच दिवसांचं डोक्यात विचारचक्र सुरू होतं. नोकरी निमित्ताने स्थिरस्थावर होता होता बरेच दिवस निघून गेले; परंतु श्यामच्या आईने दाखवलेली दिशा अन् लिहिण्याची महत्त्वाकांक्षा शेवटी बऱ्याच दिवसांनी म्हणजे चाळीशीत जागृत झाली अन् मी लिहिता झालो.
ग्रामीण भागातल्या अनंत अडचणी अन् त्यातून मार्ग काढत आलेले माझ्यासारखे अनेकजण मला माझ्यात दिसू लागले. इतरांनाही त्यातून प्रेरणादायी काहीतरी चांगलं मिळेल ही सद्भावना डोक्यात ठेवून मी माझं ‘तडजोड कादंबरीचं लिखाण पूर्ण केलं. लिहायचं डोक्यात घेतलं; लिहायला बसलो; लिहित गेलो; पूर्ण झालं; पण माझ्यासाठी सगळ्यात अवघड म्हणजे प्रकाशक मिळणं! कारण माझं या क्षेत्रात कुणीही ओळखीचं नव्हतं. मी ग्रामविकास आणि कृषी या क्षेत्रात काम केलेला साधा नोकरदार माणूस. कच्चे लिखाण पूर्ण झाल्यावर मी चांगला प्रकाशक शोधू लागलो अन् प्रयत्नांती माझं लेखन सकाळ प्रकाशने कादंबरी स्वरूपात प्रकाशित करण्याचं आश्वासन मला दिलं.
नोकरी सांभाळून लेखन अन् कुटुंबप्रपंच अशी तारेवरची कसरत करत अखेर माझी ‘तडजोड कादंबरी गेल्या जानेवारी २४ ला प्रकाशित झाली अन् मला या जगात लेखक होण्याचा सन्मान मिळाला. नवीन ‘खटपट- कादंबरी व ‘दागिना - कथासंग्रह पण लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होणार आहे ही आणखी दुसरी आनंदाची गोष्ट. माझ्या विचारांना ३० वर्षांपूर्वी मिळालेली दिशा इतके दिवस आडवाटेने फिरत फिरत शेवटी आज हमरस्त्याला लागलीय; सोशल मीडियावर पुस्तकांच्या अनेक जाहिराती करणारे ग्रुप दिसतात. त्यातून मी थोडा अलिप्त आहे. कारण जाहिरातबाजी अन् तत्सम गोष्टींचा कधी कधी खेदही वाटतो. कारण आपलेच विचार आपण इतरांना "विकत घ्या” किंवा "बळंच ऐका.” असं म्हणायचं म्हणून मी थोडा त्यापासून लांबच राहतो. पुस्तक प्रकाशन करायला वयाच्या मानाने थोडा उशीर झाला असं वाटतंय; पण अल्पावधीतच ‘तडजोड ने बहुसंख्य मराठी वाचकांच्या मनाचा वेध घेतला. हे वर्षभरात मला विविध माध्यमांतून मिळालेल्या बोलक्या प्रतिक्रिया सर्वकाही सांगून जातात म्हणूनच वर्षपूर्ती निमित्ताने हे दोन शब्द.. शेवटी तीच पथदर्शी आई ‘श्यामची मलासुद्धा अन् माझ्यासारख्या अनेकांना धोपट रस्ता दाखवणारी ठरली हे मात्र त्रिकालाबाधित सत्य!
-निवृत्ती सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर